एकल महिलांचे भावविश्व उलगडणार्‍या कथा: दहा महिन्यांचा संसार

एकल महिलांचे भावविश्व उलगडणार्‍या कथा: दहा महिन्यांचा संसार

Thank you for reading this post, don't forget to subscribe!

डॉ. प्रतिभा सुरेश जाधव या बहुविध प्रतिभेच्या लेखिका आहेत. कथा, कविता, ललित, वैचारिक आणि समीक्षेसह त्या सामाजिक विषयांवर एकपात्री नाट्यप्रयोग सादर करतात. त्या ख्यातनाम वक्ता म्हणूनही सर्वदूर परिचित आहेत. आंबेडकरी साहित्य विश्वात ज्या स्त्री लेखिका सातत्यपूर्ण नि प्रयोगशील दृष्टीने लेखन करतात, त्यामध्ये डॉ. प्रतिभा जाधव यांचा अग्रक्रमाने विचार करावा लागतो. ‘अक्षरांचं दान’, संवाद श्वास माझा’, ‘श्वास मोकळा घेते'(संपादन), हे त्यांचे बहुचर्चित कवितासंग्रह आहेत. ‘काळोखाला दूर सारून’, ‘अस्वस्थतेची डायरी’ हे त्यांचे नामांकित पुरस्कार-सन्मान प्राप्त ललित लेखसंग्रह साहित्य विश्वात दखलपात्र ठरले आहेत.‌ शिवाय ‘मी अरुणा बोलतेय…!’ या त्यांच्या एकपात्री नाटकाचे प्रयोग महाराष्ट्रभर झाले आहेत. ‘मी जिजाऊ…!’, ‘सावित्री तू होतीस म्हणूनच!’ ह्या एकपात्री नाट्यप्रयोगांनादेखील उदंड असा प्रतिसाद महाराष्ट्रभरातून लाभत असतो. बहुआयामी व्यक्तिमत्वाच्या डॉ.प्रतिभा जाधव यांच्या साहित्यिक, सामाजिक, शैक्षणिक तथा सांस्कृतिक क्षेत्रातील योगदानाबद्दल त्यांना ‘युनिवर्सल टॅलेंट बुक-२०१८’ मध्ये नोंद झालेली आहे व सिंगापूर येथे ‘ग्लोबल सिटीझन ऑफ इंडिया’ हा मंचा सन्मान बहाल करण्यात आला आहे. याशिवाय अनेक प्रतिष्ठित राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आले आहे.

त्यांचा ‘दहा महिन्यांचा संसार’ हा सत्तावीस कथांचा संच असलेला कथासंग्रह नुकताच प्रकाशित झाला आहे. यामध्ये त्यांनी कोरोना काळातील एकल महिलांच्या उद्धवस्त झालेल्या संसारांच्या काळजाच्या ठाव घेणार्‍या कथा लिहिल्या आहेत. एकूणच स्त्रियांच्या व्यथा, वेदनेची वास्तवदर्शी कहाणी कथन केलेली आहे. ‘दहा महिन्यांचा संसार’ हे शीर्षक वाचूनच डोळ्यातून अश्रू येऊ लागतात. कोरोना काळात ज्यांच्या कपाळावरच कुंकू पुसले गेले अशा कोरोनानंतर एकल झालेल्या महिलांची परिस्थिती काय असेल? हे सुन्न करणारे वास्तव चित्र डॉ. प्रतिभा जाधव यांनी या कथासंग्रहातून मांडले आहे. तसेच येणार्‍या परिस्थितीला खंबीरपणे सामोर्‍या जाणार्‍या, संकटांशी दोन हात करणार्‍या, स्वाभिमानाने स्वत:ल सिद्ध करणार्‍या कोरोना एकल महिलांचे वास्तव चित्रण त्या नेमकेपणाने करतात. या कोरोना काळात ज्यांच्या घरातील एकुलता एक कमावता माणूस मृत्युमुखी पडला त्या घराची काय अवस्था असेल? ते घर पुन्हा कसं सावरतं किंवा नाही? हे लोकांसमोर येणं खूपच गरजेचे होते, ते डॉ प्रतिभा जाधव यांनी या पुस्तकातून हृदस्पर्शीरित्या साकारले आहे. त्यासाठी डॉ.प्रतिभा जाधव यांनी कोरोना एकल महिलांशी प्रत्यक्ष संवाद साधला, त्यांच्या मुलाखती घेतल्या.
सद्यस्थितीत सामाजिक संवेदना किती बोथट झाली आहे हे सर्वांना ज्ञात आहे. कोरोना काळात तर ती जणू हरवूनच गेली होती. कोरोनाकाळात महामारीचे समाजावर काय परिणाम झालेत? ते सुन्न करणारे वास्तव शब्दचित्र या ‘दहा महिन्यांचा संसार’ ह्या संग्रहातील कथांमधून त्यांनी चित्रित केले आहे. कोरोना महामारीत ६० टक्के मृत्यू हे पुरुषांचे झाले आहेत, किमान ७० हजार महिला कोरोनामुळे विधवा झाल्या आहेत. त्यात २१ ते ५० वयोगटातील मृत्यू २२ टक्के आहेत. याचा अर्थ अनेक महिला तरुण वयात कोरोनामुळे विधवा झाल्या. त्यामुळे कुटुंब पुनर्वसनाचा मोठा प्रसंग निर्माण झाला आहे. विशेष म्हणजे ज्यांचा जगण्याचा संघर्ष घरात बसून संपणारच नाही असे लोक कोरोना काळात जगण्यासाठी, जीवाची भीती असून रस्त्यावर गेले; असे असंघटित क्षेत्रातील अनेक कर्ते पुरुष कोरोनाचा संसर्ग होऊन मृत्यू पावले. मोठी मुले आहेत म्हणून अशा एकल महिला दुसरे लग्न करू शकत नाहीत. काहींची अशी परिस्थिती आहे की, जगण्यासाठी त्यांनाच पुढे यावे लागले आहे. काहीना तान्हे बाळ असून त्यांचा संसार आता स्वतःच चालवायचा आहे. अशावेळी नात्यातील जवळचा भाऊ बहिण, वहिनी, आजूबाजूची घरातली माणसे नातेवाईक कुणीच साथ देत नाहीत. अशा कसोटीच्या काळात त्या ‘स्त्रीची मानसिक घुसमट’ हा ‘दहा महिन्यांचा संसार’ या कथा संग्रहातील कथांचा विषय आहे.

कोरोनाकाळात दवाखान्यांनी केलेली लुटमार व या लूटमारीचा असा परिणाम झाला की या महिला मोठ्या प्रमाणात कर्जबाजारी झाल्या, पोसणारा तर सोडून गेला वर आता कर्जाचा डोंगर! बँका, पतसंस्था, नातेवाईकांकडून घेतलेली उसनवारी, यात या महिला बेजार झाल्या, हातात कौशल्य नाही, घराचा कर्ता पुरुष सोडून गेलेला, कर्जही फेडायचे आणि समोर आ वासून उभे असणारे जीवनही जगायचचे अशा महिलांचे हे वास्तव चित्रण आहे. बोलणे सोपे असते प्रत्यक्ष त्याला सामोरे जाणे किती वाईट असते? हे वर्णन यात आहे. या कथांमधील दुःख जरी एक असले तरी त्या महिलांच्या वेदना मात्र वेगवेगळ्या आहेत. कोरोनामुळे ज्यांचे पती मृत्युमुखी पडले त्या विधवा महिलांचे जगणे किती त्रासदायक झाले आहे, पूर्वी माणूस मेला तर सासरचे लोक तीन-चार वर्षे तरी त्या महिलेचा सांभाळ करायचे, नंतर माहेरची माणस सांभाळायची, पण कोरोना काळात एकल झालेल्या महिलांना सासरच्या लोकांनी तेराव्याच्या आधीच भांडणे सुरू करून हाकलवून लावल्याची काही उदाहरणे आहेत. ह्या महिलांच्या काळजातील सल, दु:ख, वेदना सहज मोकळ्या न होणार्‍या महिलांना बोलतं करून त्यांच्या कहाण्या ‘दहा महिन्यांचा संसार’ या कथांसंग्रहातून मांडलेल्या आहेत.
वस्तुतः या महिलांच्या वाट्याला आलेली परिस्थितीची कल्पना सर्वसामान्य वाचकाला व्हावी, एकल महिलांकडे बघण्याचा समाजाचा दृष्टीकोन बदलावा हा कथालेखनामागचा मूळ उद्देश आहे. यासंदर्भात सुप्रसिद्ध शिक्षणतज्ज्ञ, विचारवंत व सामाजिक कार्यकर्ते हेरंब कुलकर्णी लिहितात की, “एकल महिलांचे विश्व अजून आमच्या साहित्याचा भाग झालेला नाही. काही चित्रपट, कथा यात नक्कीच ते आले आहे. वृंदावन येथील विधवांच्या जगण्याला धार्मिक संदर्भ व त्यांची प्रचंड संख्या त्यामुळे त्याची विशेष दखल घेतली जात आहे. पण खेड्यापाड्यात जगणाऱ्या एकल महिलांची वेदना आणि त्यांचे मन अजूनही साहित्याचा प्राधान्यक्रम होत नाही.’ अशी खंत त्यांनी व्यक्त केली. प्रस्तुत कथासंग्रहाने ही उणीव किंचित का काही प्रमाणात का होईना भरून काढली, असे म्हणता येईल.

प्रस्तुत कथासंग्रहातील ‘कपाळाच्या टिळ्यापेक्षा’, ‘तिचा वनवास सरो’, ‘बाप बापच असतो’, ‘डाग’, ‘वैरी’, ‘दोष कुणाचा?’, ‘फसवणूक’ इत्यादी कथा विचार करायला बाध्य करतात, अस्वस्थ करतात. महिलांच्या वाट्याला आलेली ही कठीण परिस्थिती, त्या साऱ्या भगिनींचे कातर हळवे स्वर, त्यांचा आवाज, दाटलेले कंठ असे अगदी सारे सारे या कथांमधून जीवंत प्रत्ययाला येते. जणू ही कहाणी आपल्या डोळ्यासमोरची आहे असे जाणवायला लागते. ज्यांच्या वाट्याला मृत्यू आला त्यांच्यासोबत नियतीने केलेला घात, ज्यांच्या घरातील कर्ता व्यक्ती गेला त्यांच्यासाठी तो मोठा धक्का ठरला, त्यातून त्यांना सावरायला वेळ नक्कीच लागेल. परंतु या सगळ्यातून मार्ग निघण्यासाठी मनाची तयारी करावी लागते. त्यासाठी आवश्यकता असते, प्रेरणा आणि ऊर्जेच्या आंतरिक बळाची. डॉ. प्रतिभा जाधव यांच्या ह्या कथा खचून गेलेल्या, हतबल झालेल्या निराश्रित स्त्रियांना हे आंतरिक बळ देतात, त्यांना पुन्हा उठून लढण्यासाठी प्रेरीत करतात हेच ह्या कथांचे मोठे यश आहे.

एकंदरीत साहित्य हे समकालाचे अपत्य असते. काळ पुढे आणि साहित्य काळाच्या कोसो दूर मागे असे घडता कामा नये. असे घडल्यास ते साहित्य कुणी उत्कटतेनं वाचणार नाही. मात्र डॉ. प्रतिभा जाधव यांनी कोरोनानंतर निर्मित प्रश्नांना कवेत घेत, साहित्यातून त्या प्रश्नांना मुखरीत केले. त्यामुळे हे लेखन अनेकांसाठी प्रेरणेचा स्त्रोत बनू शकते. मानवी मनाचा तळ ढवळून काढणारे असे हे संवेदनशील भावविश्व ‘दहा महिन्यांचा संसार’ मधून उजागर केले म्हणून या कथासंग्रहाचे मोल महत्त्वाचे ठरते.

– डॉ. अशोक रा. इंगळे,

अकोला
प्रोफेसर, मराठी विभाग
श्री. शिवाजी कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, आकोट जि अकोला
मो. 9421747417