डिजिटल स्वाक्षरीच्या अडचणीमुळे मोर्शी वरूड तालुक्यातील हजारो विद्यार्थ्यांची गैरसोय !

डिजिटल स्वाक्षरीच्या अडचणीमुळे मोर्शी वरूड तालुक्यातील हजारो विद्यार्थ्यांची गैरसोय !

हजारो विद्यार्थ्यांचे कास्ट सर्टिफिकेट, नॉन क्रिमीलीयर सर्टिफिकेट अडचणीत !

तत्काळ तोडगा न निघाल्यास राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा आंदोलनाचा ईशारा!

मोर्शी (तालुका प्रतिनिधी) : मोर्शी वरूड तालुक्यात मागील दहा दिवसांपासून उपविभागीय अधिकारी मोर्शी यांच्या डिजिटल स्वाक्षरीच्या तांत्रिक अडचणीमुळे मोर्शी वरूड तालुक्यातील सेतू सुविधा केंद्रांतील हजारो कास्ट सर्टिफिकेट, नॉन क्रिमीलीयर सर्टिफिकेट अडचणीत सापडल्यामुळे हजारो विद्यार्थ्यांचे व विवीध विभागांच्या भारती प्रक्रिये करीता अर्ज करणारे विद्यार्थी चांगलेच अडचणीत सापडले असून त्यांचे नुकसान होऊ नये भरती प्रक्रियेपासून कोणीही वंचित राहू नये यासाठी तत्काळ तोडगा काढून हजारो दाखले तत्काळ निकाली काढण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुका उपाध्यक्ष रुपेश वाळके, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहर अध्यक्ष अंकुश घारड यांनी जिल्हाधिकारी पवनित कौर यांच्याकडे केली आहे.
शैक्षणिक निकाल जाहीर होताच पुढील प्रवेशाकरिता आवश्यक असणारे दाखले मिळवण्यासाठी पालक आणि विद्यार्थ्यांची धांदल उडते. त्यामुळेच राज्य सरकारने यंदा ‘शासन आपल्या दारी’ हा उपक्रम राबवून पालक-विद्यार्थ्यांचा त्रास कमी करण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र मागील काही दिवसांपासून गर्दी वाढताच मोर्शी वरूड तालुक्यात उप विभागीय अधिकाऱ्यांचे डिजिटल स्वाक्षरीच्या अडचणींमुळे पालक आणि विद्यार्थ्यांच्या त्रासात भर पडत आहे. एका दाखल्यासाठी त्यांना काही किलोमीटरचा प्रवास करून तहसील कार्यालयाच्या फेऱ्या माराव्या लागत आहेत. सुरू असलेली तलाठी भरती प्रक्रिया व शाळा-कॉलेजच्या प्रवेशाआधी दाखले मिळावेत, यासाठी पालक व विद्यार्थ्यांच्या वतीने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुका उपाध्यक्ष रुपेश वाळके, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहर अध्यक्ष अंकुश घारड यांनी जिल्हाधिकारी पवनित कौर यांना निवेदन दिले असून तत्काळ तोडगा न निघाल्यास आंदोलनाचा इशारा दिला आहे.
मोर्शी वरूड तालुक्यात गेल्या ८ ते १० दिवसांपासून उप विभागीय अधिकार्यांच्या डिजिटल स्वाक्षरी होत नसल्यामुळे कर्मचाऱ्यांबरोबरच या केंद्रात विविध कामांसाठी येणाऱ्यांना प्रचंड मानसिक त्रास होत आहे. सेतू सुविधा केंद्रात नॉन क्रिमीलीयर, जातीचा दाखला, व इतर प्रमाणपत्रासाठी अर्ज केलेले हजारो विद्यार्थी तलाठी इतर भारती प्रक्रियेपासून वंचित राहू नये यासाठी तत्काळ तोडगा काढून सर्व विद्यार्थांना पर्यायी व्यवस्था निर्माण करून प्रमाणपत्र वाटप करण्यात यावे.
-रुपेश वाळके
उपाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष मोर्शी तालुका.
सेतू केंद्रात विविध कामांनिमित्त येणाऱ्यांची सध्या मोठी गैरसोय होत आहे बऱ्याच कालावधीपासून तांत्रिक समस्या येत असतानाही यंत्रणेत अद्याप सुधारणा न झाल्याने नागरिकांकडून प्रचंड रोष व्यक्त होत आहे. सध्या शाळा-कॉलेजांच्या प्रवेशाची लगबग सुरू असतानाच झालेल्या या तांत्रिक बिघाडामुळे मोर्शी वरूड तालुक्यात गोंधळाची स्थिती आहे
-अंकुश घारड
शहर अध्यक्ष राष्ट्रवादी युवक काँग्रेस.