अमरावती, : नव भारत साक्षरता कार्यक्रम जिल्ह्यामध्ये यशस्वीपणे राबविण्यासाठी यंत्रणांनी पुढाकार घेण्याचे आवाहन जिल्हाधिकारी पवनीत कौर यांनी आज केले. नव भारत साक्षरता कार्यक्रम 2022-27 अंतर्गत गठित नियामक परिषदेची सभा श्रीमती कौर यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली होती, त्यावेळी त्या बोलत होत्या.
Thank you for reading this post, don't forget to subscribe!यावेळी नव भारत साक्षरता कार्यक्रमाचे स्वरुप, सहभागी यंत्रणा खर्च, तरतूद, यंत्रणांची जबाबदारी याबद्दल माहिती देण्यात आली. ही योजना राज्यात प्रायोगिक तत्त्वावर काही जिल्ह्यात सन 2022-23 ला सुरु झाली. तसेच पूर्ण राज्यात या वर्षापासून ही योजना सुरु करण्यात आली आहे. या कार्यक्रमांतर्गत 15 ते 35 वयोगटातील निरक्षरांना साक्षर करावयाचे आहे. या अंतर्गत अमरावती जिल्ह्यात सन 2022-23 अंतर्गत 9 हजार 418 तसेच सन 2023-24 अंतर्गत 8 हजार 785 असे एकूण 18 हजार 203 निरक्षरांना साक्षर करावयाचे उद्दिष्ट आहे.
या कार्यक्रमांतर्गत 10 निरक्षरांना एक स्वयंसेवक साक्षर करणार आहे. यासाठी संपूर्ण जिल्ह्यात 1 हजार 820 स्वयंसेवक नियुक्त करण्यात येणार आहे. स्वयंसेवक कमीत-कमी 8 वा वर्ग शिकलेला असावा. या निरक्षरांचे सर्वेक्षण प्राथमिक, माध्यमिक तसेच उच्च माध्यमिक शिक्षक करणार आहे. या योजनेच्या अंमलबजावणीमध्ये मुख्याध्यापक, शिक्षक, माता-पालक संघ, बचत गट, आशा वर्कर, अंगणवाडी सेविका, समाजसेवक तसेच राष्ट्रीय छात्र सेना, राष्ट्रीय सेवा योजनेचे सहकार्य घेण्यात येईल. या योजनेचा निरक्षरांना लिहिता- वाचता येणे, दैनंदिन व्यवहारातील हिशोब येणे, डिजीटल साधनांचा उपयोग करण्यास सक्षम करणे हा उद्देश आहे. या संबधित यंत्रणांनी पूर्ण क्षमतेने कार्य करुन योजना पूर्णत्वास नेण्याचे आवाहन श्रीमती कौर यांनी केले.
नव भारत साक्षरता कार्यक्रमाच्या योजनेचे स्वरुप व संबंधितांच्या जबाबदारीची माहिती शिक्षणाधिकारी (योजना) सय्यद राजीक सय्यद गफ्फार यांनी दिली. नियामक परिषद पदाधिकारी श्री. खंडारे, प्राचार्य मिलींद कुबडे, श्री. मानकर, प्राथमिक शिक्षणाधिकारी बुध्दभूषण सोनोने, शिक्षण विभागाचे राजेश मनवर, जिल्हा सांख्यिकी उपसंचालक केतकी धरभारे, मनपा शिक्षणाधिकारी डॉ. प्रकाश मेश्राम, अतुल वानखडे तसेच शिक्षणाधिकारी (योजना) सहायक योजना अधिकारी राजेश वरकडे आणि प्रितम गणगणे आदी मान्यवर उपस्थित होते.