पारदर्शक व गतिमान प्रशासनावर भर -सौरभ कटियार

पारदर्शक व गतिमान प्रशासनावर भर -सौरभ कटियार

अमरावतीचे नवीन जिल्हाधिकारी सौरभ कटियार रुजू

अमरावती, : अमरावतीचे नवे जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांनी आपल्या पदाचा कार्यभार यापूर्वीच्या जिल्हाधिकारी पवनीत कौर यांच्याकडून आज स्वीकारला. जिल्ह्यातील नैसर्गिक आपत्ती, पुनर्वसन, कुपोषण आदी समस्या सोडविण्यासाठी योजनांना गती देतानाच पारदर्शक व गतिमान प्रशासनावर भर देऊ, असे जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांनी आज येथे सांगितले.

Thank you for reading this post, don't forget to subscribe!

श्री. कटियार हे मूळ लखनऊ येथील आहे. केंद्रीय लोकसेवा आयोगाकडून 2016 मध्ये आय.ए.एस. सेवेत त्यांची निवड झाली. त्यांनी कानपूर इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी येथून बी.टेक. तसेच एम.टेक केले. सोबतच आय.ए.एस. ची तयारी केली. निवड झाल्यानंतर त्यांची प्रथम नियुक्ती पालघर जिल्ह्यात डहाणू येथे एकात्मिक आदिवासी विभागाचे प्रकल्प अधिकारी व सहायक जिल्हाधिकारी म्हणून झाली. त्यानंतर त्यांनी अकोला येथे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून काम पाहिले. अमरावती येथील जिल्हाधिकारी या पदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर त्यांनी पत्रकार बांधवांशी संवाद साधला.

शासकीय योजनांचा लाभ गरजूंपर्यंत पोहचविणार

अमरावती जिल्हा विभागाचे मुख्यालय आहे. येथे काम करण्याची संधी मिळाली. शासनाने प्राधान्यक्रम दिलेल्या बाबींवर प्रशासन काम करेल. शासकीय योजनांचा लाभ गरजूंपर्यंत पोहचविण्यासाठी प्रशासनासह लोकप्रतिनीधी, सामाजिक संस्था तसेच प्रसार माध्यमांची भूमिका महत्त्वाची आहे. जिल्ह्यात शासकीय योजनांची अंमलबजावणीला पूर्व जिल्हाधिकारी पवनीत कौर यांनी गती दिली. हा कार्यक्रम या पुढेही भरीवपणे राबविणार. निवडणूक काळामध्ये निवडणूक मार्गदर्शक तत्त्वानुसार काम चालेल. जिल्ह्यातील विविध प्रश्न व समस्यांबाबत निर्णय व अंमलबजावणीसाठी लवकरच उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, विभाग प्रमुख आदींच्या बैठका घेण्यात येतील. त्याप्रमाणे, जिल्ह्यात आवश्यक त्या सर्व ठिकाणी भेटी देऊ, असेही जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी सांगितले.

कुपोषण निर्मुलनासाठी विशेष मोहीम

मेळघाटात कुपोषण निर्मुलनासाठी आरोग्य व पोषण योजनांच्या अंमलबजावणीला गती देण्यात येईल. त्याचप्रमाणे वैद्यकीय सुविधा उपलब्ध करुन देत असतानाच तेथील स्थानिकांनी शासकीय योजनांचा लाभ घ्यावा, या हेतूने व्यापक जनजागृतीसाठी प्रशासन, सामाजिक संस्था यांच्या सहकार्याने मोहीम हाती घेऊ. शासकीय योजनांच्या प्रसिद्धीसाठी प्रसार माध्यमांची भूमिका महत्त्वपूर्ण आहे.पालघरमध्ये यापूर्वी आदिवासी क्षेत्रात काम केले आहे. त्या अनुभाचा फायदा होईल, असेही ते यावेळी म्हणाले.

स्पर्धा परीक्षेमध्ये यश मिळविण्यासाठी परिश्रमाला पर्याय नाही. स्वयः अध्ययन, सातत्यपूर्ण प्रयत्न, मेहनत यामुळे स्पर्धा परीक्षेत यश मिळविता येते. स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी अभ्यासात सातत्य ठेवावे, असा सल्ला त्यांनी यावेळी दिला .