इंग्रजांचं हिलस्टेशन आणि महाराष्ट्राची कॉटन सिटी यवतमाळ…

इंग्रजांचं हिलस्टेशन आणि महाराष्ट्राची कॉटन सिटी यवतमाळ…

इंग्रजांचं ‘हिलस्टेशन’ आणि यवतमाळ महाराष्ट्राच्या ‘कॉटन सिटी’ बद्दल जाणून घ्या.यवतमाळ हा “महाराष्ट्रातच असणाऱ्या सदैव दुर्लक्षित आणि मागास समजल्या जाणाऱ्या विदर्भातील” एक जिल्हा आहे. महाराष्ट्राची उपराजधानी असलेल्या नागपूरपासून यवतमाळ १५० किमीच्या अंतरावर आहे.
यवतमाळ म्हणजे डोंगरांची माळ.. जुन्या रेकॉर्डप्रमाणे यवतमाळ हे जगातलं सर्वात सुरक्षित गाव होते. पूर्वी यवती म्हणून ओळखले जाणारे हे शहर बेरार सल्तनतेचे प्रमुख शहर होते. १३४७ मध्ये ह्या भागावर अलाउद्दीन हसन बहमन शाह ह्याची राजवट होती आणि त्याने ह्या प्रदेशात बहमनी सल्तनतीची स्थापना केली.
त्यानंतर १५७२ मध्ये अहमदनगर सल्तनतीच्या मुर्तझा शाहने यवतमाळ आपल्या ताब्यात घेतले. १५९६ साली अहमदनगरच्या चांद बीबीने यवतमाळ मुघल साम्राज्यात आणले. औरंगजेबाच्या मृत्यूनंतर म्हणजे १७०७ साली यवतमाळवर मराठ्यांचे राज्य आले. रघुजी भोसले पहिले नागपूरचे शासक झाल्यानंतर त्यांनी १७८३ साली यवतमाळला आपल्या अधिपत्याखाली घेतले.
त्यानंतर ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीने १८५३ साली बेरार प्रॉव्हिन्सची स्थापना केल्यानंतर यवतमाळ सेंट्रल प्रॉव्हिन्सेस अँड बेरार ह्या भागात समाविष्ट झाले.१९५६ साल पर्यंत यवतमाळ सुद्धा नागपूर सारखंच मध्य प्रदेशात होतं. पण १ मे १९६० नंतर पूर्ण विदर्भासह यवतमाळ सुद्धा महाराष्ट्रात आले.
यवतमाळला कॉटन सिटी पण म्हणतात. कारण यवतमाळ जिल्ह्यात कापसाचे उत्पादन होते. ब्रिटिश शासनात यवतमाळमध्ये कापसाच्या वाहतुकीसाठी शकुंतला ही मिनी ट्रेन होती. यवतमाळ ते अचलपूर अशी ही भारतातील एकमेव खाजगी रेल्वे लाईन होती.
२०१६ साली भारतीय रेल्वेद्वारे ह्या नॅरो गेजचे रूपांतर ब्रॉड गेजमध्ये करण्याची घोषणा करण्यात आली आहे. ब्रिटीश काळात यवतमाळ हे ‘हिल स्टेशन’ होते. कारण विदर्भात यवतमाळ हे त्यातल्या त्यात थंड आहे कारण ते उंचावर आहे.
यवतमाळ मध्ये रेमंड्सची फॅक्टरी आहे जिथे जीन्ससाठी स्पेशल धागा तयार केला जातो. यवतमाळला गेलं की तिथूनच जवळ कळंब येथे विदर्भातील अष्टविनायकांपैकी चिंतामणी गणेशाचे मोठे मंदिर आहे. अतिशय सुंदर देवस्थान आहे हे. एकदा जरूर भेट द्या.
श्री चिंतामणी गणेशाचे मंदिर जमिनीखाली विशिष्ट स्वरुपात आढळून येते. या ठिकाणी प्रसिद्ध असे गणेश-कुंड सुद्धा पाहता येईल. चक्रावती नदीच्या तीरावर वसलेले हे ठिकाण गणेश भाविकांसाठी नेहमीच जागृत राहिले आहे. माघ-शुद्ध महिन्यामध्ये चतुर्थी पासून सप्तमी पर्यंत येथे श्री चिंतामणीची मोठी यात्रा भरते. यवतमाळ जिल्ह्यातच टिपेश्वर अभयारण्य आहे आणि पैनगंगा अभयारण्य सुद्धा आहे. ह्या अभयारण्यात तुम्हाला सांबर, चिंकारा ,कोल्हा, नीलगाय ह्यासारखे प्राणी बघायला मिळतील.
यवतमाळ मध्ये बघण्यासारखे म्हणजे प्रसिद्ध जुने विठ्ठल मंदिर, महादेव मंदिर आणि दत्त मंदिर. अतिशय सुंदर असे हे दत्त मंदिर आहे. यवतमाळची सांगण्यासारखी खासियत म्हणजे इथला नवरात्र उत्सव होय. दुर्गापूजेच्या बाबतीत कोलकाता नंतर दुसरे यवतमाळ आहे इतक्या मोठ्या प्रमाणावर येथे नवरात्री उत्सव साजरा केला जातो. इथल्या मंडपाची सजावट नवरात्री दरम्यान बघण्यासाखी असते. आणि मुख्य म्हणजे इतका मोठा उत्सव असूनदेखील हा उत्सव अतिशय शांततेत आणि उत्साहात पार पडतो.
यवतमाळ जिल्ह्यातील दिग्रस मधील घंटी बाबाची यात्रा व वणी येथील श्री रंगनाथ स्वामी यांची यात्रा ह्या दोन यात्रा येथील महत्वाच्या यात्रा म्हणता येतील. त्याचप्रमाणे कळंबच्या श्री चिंतामणीची यात्रा, घाटंजीची मारोती महाराज यात्रा, व जोम्भोरा माहूर येथील श्री दत्त जयंती उत्सव हे सुद्धा तेवढ्याच थाटात साजरे केले जातात. तसेच पुसद, महागाव येथील महाशिवरात्री उत्सव सुद्धा पाहण्या सारखा असतो.यात्रेमध्ये शेजारच्या ठिकाणचे व्यापारी व दुकानदार आपली दुकाने आवर्जून थाटतात.
यामध्ये मोठ्याप्रमाणात अन्न धान्य, दैनंदिन वापरासाठीची भांडीकुंडी, शेतीला लागणारे अवजारे इत्यादि वस्तूंची विक्री केली जाते. लोक यात्रेमध्ये आपल्याला आवश्यक ते सामान मोठ्या प्रमाणात येथे खरेदी करतात. श्री रंगनाथ स्वामीची यात्रा गायी-बैलांच्या खरेदी-विक्रीसाठी खूप प्रसिद्ध आहे.
निरंजन माहूर, अंजी (घाटंजी) येथील नृसिंहाचे मंदिर, जोडमोहा येथील खटेश्वर महाराजांचे मंदिर इत्यादी काही महत्वाची ठिकाणे यवतमाळला गेल्यावर भेट देण्यासारखी आहेत. ह्याशिवाय पैनगंगेच्या तीरावर असलेले कापेश्वर येथील गरम पाण्याचे झरे सुद्धा बघण्यासारखे आहेत.
याच भूमीतले महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक सलग १२ वर्ष मुख्यमंत्री होते. त्यानंतर सुधाकरराव नाईक यांनी मुख्यमंत्रीपद भूषविले. वेगळा विदर्भ चळवळीचे नेते जांबुवंतराव धोटे, जवाहरलाल दर्डा, मनोहर नाईक, भाऊसाहेब पाटणकर (गझलकार व मराठी शायर), जांगडबुत्ता वाले प्रसिद्ध कवी मिर्झा रफी बेग (नेर), लोकनायक बापुजी अणे(वणी) हे दिग्गज यवतमाळ जिल्ह्यातच झाले. तर असे हे यवतमाळ म्हणजे विदर्भाची खासियत आहे…!
(साभार : आठवणीतील करजगाव समूह)