• Tue. Sep 26th, 2023

मागासवर्गीय विद्यार्थ्यांचे सर्वोत्तम गुरु श्री.अनंत कडव सर..

गुरु ब्रह्मा, गुरुर्विष्णु, गुरुर्देवो महेश्वरा…या प्रमाणे अत्यंत शिस्त वृत्तीचे आणि तेवढेच प्रेमळ स्वभावाचे, लोणी (जवळा) ता.आर्णी.जिल्हा यवतमाळ. येथील रंगभूमीच्या कर्मभूमीवर विविध रंगाने भूमिका चौकपणे निभावणारे असे अलौकिक आणि सर्वगुण संपन्न व्यक्तिमत्व म्हणजे श्री. अनंत कडव सर, आज ते राष्ट्रीय पोस्ट बेसिक आश्रम शाळा लोणी येथील वसतीगृहातून अधीक्षक या पदावरून ते सेवानिवृत्त होत आहे त्याबद्दल लिहिण्याची संधी मला मिळाली मी स्वतःला भाग्यवान समजतो..अत्यंत कडक शिस्तीचे सर म्हणून सरांची ओळख अख्या परिसरात आहे, सरांचे नाव श्री अनंत कडव
वडिलांचे नाव श्री. नारायण डोमाजी कडव
आईचे नाव अनुसयाबाई नारायण कडव
पत्नीचे नाव सौ.मंदा कडव
अपत्य तीन मुली, उच्च शिक्षित
जन्म गाव म्हसोला कान्होबा ता.आर्णी जिल्हा यवतमाळ.
बालपण आणि वर्ग 1ते 7 म्हसोला गावीच. पुढील महाविद्यालय शिक्षण श्री महंत दत्ताराम भारती आर्णी येथे झाले आणि लोणी येथे डी. एड. करून माजी खासदार दिवंगत उत्तमराव पाटील यांनी स्थापन केलेल्या राष्ट्रीय आश्रम शाळा लोणी येथेच1988 ला वसतिगृह अधीक्षक पदावर ते रुजू झाले. तेथून त्यांचा प्रवास सुरू झाला.
वसतीगृहात सरांनी एक नियम अत्यंत शिस्त पद्धतीने लावलेला होता तो म्हणजे सर्वच विद्यार्थी सकाळी पाच वाजता उठलेच पाहिजे पाच वाजून दहा मिनिटांनी सकाळची प्रार्थना झालीच पाहिजे, प्रार्थनेला एकही विद्यार्थी अनुपस्थित राहत नव्हते प्रार्थना झाल्याबरोबर सर्वच विद्यार्थ्यांची त्यावेळी अंघोळ झालीच पाहिजे, कारण सरांचा दराराच तेवढा होता. आंघोळ पाणी झाल्यानंतर सर्वच विद्यार्थी अभ्यासाला बसलीच पाहिजे, हे त्या वसतिगृहातील नित्य नियम.. सर उपस्थित असो किंवा नसो सर्वच गोष्टी वेळेवर झाल्याच पाहिजे.. त्याच सवयी आम्हाला आजही आहेत वसतीगृहात 90% पेक्षा जास्त विद्यार्थी बंजारा समाजातील असल्यामुळे विद्यार्थ्यांची गोरबोली सरांना स्पष्ट समजायची आणि बोलता सुद्धा यायची त्यामुळे सरांच्या तावडीतून एकही विद्यार्थी सुटत सुटत नसे.
मला अजूनही तो दिवस आठवतो, सर कामानिमित्त एकदा यवतमाळ ला गेले असताना काही विद्यार्थी जवळच असलेल्या महागाव येथे व्हिडिओ सिनेमा बघायला गेले ही गोष्ट सरांना जसी माहिती झाली सर तसेच तेथे जाऊन त्यांना आणून सर्वांसमोर पिटाई केली हे दृष्य आम्हाला नेहमीच आठवते..
सरांना खेळाची खूपच आवड होती,आम्ही खेळात खूप तरबेज होतो माझा मोठा भाऊ हा जिमनॅस्टिक मध्ये तर मी कबड्डी आणि गोळा फेक मध्ये तरबेज होतो श्री कडव वाचनाची आणि खेळाची प्रचंड आवड होती त्यांच्या मार्गदर्शनात आम्ही किती तरी पारितोषिक शाळेला मिळवून दिले आहे.सर स्वतःचे काम स्वतः करत असायचे आणि घरी कामात मदत पण करायचे.
अनुभवाच्या मातीत उगवलेल्या आणि भरलेल्या त्या राष्ट्रीय पोस्ट बेसिक आश्रम शाळेच्या वटवृक्षाच्या सावलीत आम्ही लहानाचे मोठे झालो, बळ आणि बुद्धी स्थिर ठेवून कठीण प्रसंगी निर्णय घेण्याची सरांची क्षमता आणि कौशल्य आम्ही अत्यंत जवळून बघितलेला आहे, श्री. कडव सर जेव्हा आमच्या सोबत असायचे तेव्हा त्यांच्या उपस्थितीने आमचे सामर्थ्य धैर्य आणि शक्ती दुप्पट होऊन जायची आज कितीतरी विद्यार्थी पदवी घेऊन शिकत आहेत परंतु सरांच्या अनुभवाचे शिक्षण हे कितीतरी पदव्याला मागे पाडून जातात, सरांचे कौशल्य जगातील कुठल्याही विद्यापीठात शिकायला मिळणार नाही.. एवढं मी नक्की सांगू शकतो, माझ्यासाठी नाही तर माझ्यासारख्या कितीतरी गोरगरीब बंजारा, मागासवर्गीय समाजातील विद्यार्थ्यांसाठी ते सर्वोत्तम गुरु आहेत आणि ते राहणार आहेत.
या भूतलावर जन्म घेणाऱ्या प्रत्येकाने समाजाचे ऋण फेडणे आवश्यक असते ही कृतज्ञता नाही तर धर्म आहे आणि या धर्माची जाणीव सरांनी जोपासलेली आहे आणि आम्हा सर्व विद्यार्थ्यांना त्यांनी करून दिलेली आहेत, गरजवंताला शक्य ती मदत करण्याचा कायमच त्यांचा प्रयत्न राहिलेला आहे, हे आम्ही अगदी जवळून बघितलेला आहे 1990 ला मी राष्ट्रीय पोस्ट बेसिक आश्रम शाळा लोणी या वसतिगृहात प्रवेश घेतला त्यावेळी माझे मोठे बंधू गणेश बा.राठोड हे त्या वसतिगृह आणि शाळेत शिकत होते निवासी आश्रम शाळा असल्यामुळे शाळा आणि वस्तीगृह एकच होती आणि ती शाळा कडक शिस्तीची असल्यामुळे तिथे खूप दूरचे विद्यार्थी त्या ठिकाणी शिकायला यायचे, मी त्या ठिकाणी फक्त दोन वर्षे राहिलो परंतु त्या दोन वर्षात दोनशे वर्षाचा अनुभव घेऊन मी बाहेर पडलो.
आजपर्यंत त्या वसतिगृहातून हजारो विद्यार्थी उच्च शिक्षण घेऊन आपले भविष्य उज्वल करीत आहे कितीतरी विद्यार्थी उच्च पदावर कार्यरत आहेत त्यापैकी मी एक नागपूर जिल्ह्यातील नामवंत राष्ट्रीय विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात कलाशिक्षक म्हणून कार्यरत आहे, महाराष्ट्रात लेखक,उत्तम कवी,सुलेखनकार, चित्रकार म्हणून आज माझी ओळख असून नुकताच राष्ट्रीय आदर्श शिक्षक पुरस्काराने मी गौरविला गेलो आहे विविध वृत्तपत्रातून माझे लेख,कविता चित्र,सुविचार प्रकाशित होत असतात, मी श्री. कडव सरांचा विद्यार्थी आहे याचा मला सार्थ अभिमान आहे. तसेच सुनील अंकुश राठोड हा विद्यार्थी सुद्धा आज सडक अर्जुनी येथे आश्रम शाळेत माध्यमिक शिक्षक असून तो सरांना आदर्श गुरु मानतो…कोणी वनपाल,तर कोणी,शिक्षक आहे,कोणी पोलीस तर कोणी,तलाठी आहे कोणी डॉक्टर तर कोणी प्राध्यापक आहे कोणी इंजिनीयर तर कोणी एस. टी. ड्राइव्हर आहे.आज प्रत्येक क्षेत्रात सरांनी घडविलेले विद्यार्थी नाव चमकवित आहे. त्या वसतिगृहाला, शाळेला आणि श्री. कडव सरांना,मी तर कधीच विसरणार नाही.
या सर्व प्रवासात सरांच्या पत्नी सौ.मंदा कडव यांनी सरांना कायम साथ दिली आहे, सर अहोरात्र शाळेसाठी आमच्या विकासासाठी झटायचे, सर नेहमीच वसतिगृहात राहायचे विद्यार्थ्यांसाठी, समाजासाठी काम करणाऱ्या व्यक्तींचा संसार सांभाळणे सोपे नव्हते तरी पण सरांच्या पत्नीने काहीही तक्रार न करता प्रत्येक प्रसंगाला सामोरे जाऊन आणि येईल त्या परिस्थितीला सोबत राहून कुटुंबाला सांभाळण्याचा महत्त्वाचा वाटा सरांच्या पत्नीने उचललेला होता हे आम्ही प्रत्यक्ष डोळ्यांनी बघितलेला आहे जेव्हा जेव्हा आम्ही सरांच्या घरी जायचो तेव्हा आम्हाला सरांच्या पत्नीने आम्हाला मातृत्वाचा आधार दिलेला आहे, अशा विशाल हृदयाच्या व्यक्तिमत्त्वाला मला जवळून अनुभवता आलं हे मी माझं भाग्य समजतो अशा या अमृत रुपी आणि मित्ररुपी गुरूचा मला निरंतर सहवास मिळत राहो अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि सर आज सेवानिवृत्त होत आहे त्याप्रसंगी मी सरांना भरभरून शुभेच्छा देतो, त्यांचे उर्वरित आयुष्य निरोगी राहो, सरांची उर्वरित इच्छा, आकांक्षा पूर्ण होवो, अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. उद्या म्हणजेच एक जुलै हा आदरणीय श्री. कडव सरांचा वाढदिवस, सरांना मी वाढदिवसाच्या आभाळभर शुभेच्छा देतो.. आणि येथेच थांबतो.
धन्यवाद…!
-सुरेश बा.राठोड ( कलाशिक्षक)
राष्ट्रीय विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय भिवापूर,
जिल्हा.नागपूर.
9765950144

gauravprakashan1@gmail.com

Maharashtra News, Braking News, Marathi News, Most Popular Marathi News, Latest Marathi News,Today News,Marathi Article, Marathi Poem, Marathi Story,

Comments are closed.