• Mon. Sep 25th, 2023

ग्रेट मिलेट – ज्वारी – ग्रेट फूड

आंतरराष्ट्रीय भरडधान्य वर्ष २०२३
ज्वारी हे भारतीय अन्न म्हणून ओळखले जाते. ज्वारीच्या उत्पादनात आपला देश जगात सहाव्या क्रमांकावर आहे. जागतिक पातळीवर ज्वारी उत्पादनात नायजेरियाचा प्रथम क्रमांक असून दुसऱ्या स्थानी अमेरिका आहे.
सर्वांच्या आवडीत समाविष्ट असणारे राज्यातील अव्वल भरडधान्य म्हणजे ज्वारी. महाराष्ट्रात ज्वारी न खाणारे खूपच कमी असतील. ज्वारी हे मध्य महाराष्ट्राचे आणि मराठवाड्याचे मुख्य अन्न म्हटले जाते. हल्ली कॅशक्रॉप अर्थात नगदी पीक म्हणून साखर कारखानदारी वाढविणाऱ्यांनी ऊस शेतीस प्रोत्साहन दिले आणि शेतकरी देखील तिकडे वळला असला तरी ज्वारीचे महत्व कमी झालेले नाही.
मराठवाड्यात तर केवळ सणाला आणि पाहुणे आल्यास गव्हाची पोळी असा प्रकार जवळपास सर्वच घरात होता. आता गव्हाची उपलब्धता वाढल्याने फरक पडला असला तरी युवा पिढी वगळता सर्वांना आवडणारे भरडधान्य म्हणून ज्वारीची ओळख आहे. इंग्रजीत याला ग्रेट मिलेट (Great Millet) म्हणतात याचे शास्त्रीय नाव सोरगम बायकलर असे आहे.
भारतातील एक प्रमुख अन्न म्हणून ज्वारीची वेगळी ओळख आहे. ज्वारीचे उगमस्थान आफ्रिका खंडाच्या पूर्व भागात आहे. ज्वारी इसवीसन पूर्व 11 व्या शतकात भारतात आली असे मानले जात होते. पंरतु नुकत्याच झालेल्या संशोधनानुसार ज्वारी 5000 वर्षांपूर्वी भारतात आली आणि या मातीत रुजली आणि भारतीय पारंपारिक अन्न म्हणून प्रचलित झाली आणि आजही आहे.
ज्वारी हे भारतीय अन्न म्हणून ओळखले जाते. ज्वारीच्या उत्पादनात आपला देश जगात सहाव्या क्रमांकावर आहे. जागतिक पातळीवर ज्वारी उत्पादनात नायजेरियाचा प्रथम क्रमांक असून दुसऱ्या स्थानी अमेरिका आहे. ग्रामीण अर्थव्यवस्थेचा एक मुख्य भाग म्हणून ज्वारीच्या पिकाकडे बघितले जाते. यंत्र क्रांतीनंतर शेतीच्या स्वरुपात खूप बदल झाला आहे. पारंपरिक शेती बैल-नांगर याच्या आधारे आजही जेथे हाते तेथे ज्वारी उत्पादनास प्राधान्य दिले जाते. ज्वारी घरातील अन्न आणि त्याचे इतर भाग पशू खाद्य आहे. ज्वारी एक प्रकारे उंच गवत आहे ज्याला कणसं लागतात आणि त्यातील दाणे म्हणजे ज्वारी ज्या गवतावर ती येते त्याला ताट म्हटले जाते. हे ताट बैल आणि इतर पशूंचे खाद्य म्हणून वापरता येते.
जागतिक बाजारपेठेत देखील ज्वारीची उलाढाल खूप मोठी आहे आणि त्याचा वापरही विविध पध्दतीने होते. आपल्याकडे ज्वारीची भाकरी तसेच ज्वारी पीठाच्या थालिपीठासह ज्वारीचे उप्पीठ आणि ज्वारीच्या लाहया आदि प्रकारे वापर होतो. चीन मध्ये ज्वारी आणि यांच्या पिठाच्या मिश्रणातून नूडल्स आणि ब्रेड बनवले जातात तसेच तेलाच्या चवीसाठीही ज्वारीचा वापर होतो. आफ्रिकेतील अनेक देशात याचा वापर पाण्यात उकळून पेजसारखा होतो. ज्वारीच्या विशिष्ट गुणधर्मामुळे मद्यनिर्मितीसाठी मोठया प्रमाणावर जगभरात वापर होत आहे.
राज्यात मराठवाडयात पर्जन्य छायेच्या अर्थात अवर्षण प्रवण भागात आहे. कमी पाऊस आणि उच्च तापमान असणारा हा प्रदेश अशा सर्व प्रदेशात ज्वारीचे उत्पादन सहजशक्य आहे. त्यामुळे आफ्रिका खंडातील बहुसंख्य देशांसह अमेरिकेत ज्वारी एक महत्वाचे पीक आहे.
ज्वारीतील पोषणमुल्यांचा विचार केल्या गहू आणि ज्वारी यातील पोषणमुल्ये समसमान आहेत. 100 ग्रॅम ज्वारीमध्ये मिळणारी ऊर्जा 349 कॅलरी इतकी तर गव्हात 346 कॅलरी आहे. ज्वारीत प्रथिने 10.4 ग्रॅम तर गव्हात 11.8 ग्रॅम आहेत. ज्वारीत कर्बोदके 72.6 ग्रॅम तर गव्हात 71.2 ग्रॅक आहेत. फॅटस् चा विचार केल्यास ज्वारीत 1.9 ग्रॅम तर गव्हामध्ये 1.5 ग्रॅम आहे.
ज्वारी आणि गव्हातील पोषणमुल्ये समान असली तरी खनीज आणि इतर गुणधर्म बघता आरोग्यासाठी ज्वारी सर्वोत्तम ठरते. ज्वारी हे ग्लुटेनमुक्त धान्य आहे त्यामुळे पोटातील विकार असणाऱ्यांसाठी ज्वारी लाभदायक आहे. ज्वारीत असणारी फायबरची मुबकलता ही ज्वारीची जमेची बाजू आहे. एका भाकरीतून 12 ग्रॅम पर्यत फायबर शरिरासाठी मिळतात याच्या दररोजच्या सेवनामुळे ओबेसिटी (लठ्ठपणा) टाळण्यासह उच्च रक्त दाब, ह्दयविकार, पचनाचे विकार, मधमेह आणि स्ट्रोक यांना आपण दूर करु शकतो.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आपण जागरुक झालो आहोत त्याच पार्श्वभूमीवर आपणास माहिती असावे की ज्वारीच्या सेवनाने लोह शरिरास मिळते आणि व्हिटामीन सी सहजरित्या यातून आपण मिळवू शकतो. यात कॅल्शिअम सोबत मॅग्नेशिअम आहे. कॅल्शिअम मुळे हाडे मजबूत होतात पण कॅल्शिअम शरिरात सहजरित्या मिळण्यासाठी व मिसळण्यासाठी मॅग्नेशिअमची आवश्यकता असते.
ज्वारीत या मुख्य खनीजांसह झिंक, कॉपर च्या अशांसह 20 प्रकारच्या लघू पोषणद्रव्यांसह ॲन्टी ऑक्सीडन्टस आहेत. यामुळे कोणत्याही पुरक आहाराशिवाय आणि औषधांशिवाय दिर्घकाळ आरोग्य संपन्नता राखता येते. ग्रामीण भागाता आजारी असणाऱ्यांचे प्रमाण तसे खूप कमी आहे याचे कारण त्यांचा अन्नातील ज्वारीचा दैंनदिन वापर हेच आहे. आंतरराष्ट्रीय भरडधान्य वर्ष साजरे करा असे म्हणताना सर्वोत्तम पोषणमुल्य असणाऱ्या ज्वारी या तृणधान्याला सर्वोत्तम म्हणावे लागेल.. अर्थात ते नावातच ग्रेट मिलेट आहे.
* संकलन-
अनिल साखरकर
9021020038

gauravprakashan1@gmail.com

Maharashtra News, Braking News, Marathi News, Most Popular Marathi News, Latest Marathi News,Today News,Marathi Article, Marathi Poem, Marathi Story,