• Sat. Sep 23rd, 2023

वैष्णवी रोहिदास राठोडची गरुडझेप

नीट 2023 च्या परीक्षेत 720 पैकी 700 गुणांकन मिळवून भारतात अव्वल. वैष्णवी चा जन्म 15 ऑगस्ट 2005 रोजी झाला. ती चिमुकली अतिशय बुजरी आहे. लहानपणी ती आई-बाबांसोबत माझ्याकडे पुसदला आल्यानंतर मी तिला हळूच स्पर्श करत असे त्यावेळेस ती लाजाळूच्या झाडाला स्पर्श करताच त्याने आपली पाने मिटून घ्यावीत तसेच ती आपले अंग चोरून घेत असे. तशी ती नाजूक आहे पण अतिशय तीव्र बुद्धीची असल्याचे कळून चुकले होते. मी तिला मुद्दाम “आझादी” तुम, कलेक्टर कैसे बनोगी? असा सवाल करत असे. गावी सुट्टीवर आल्यावर मला भेटल्याशिवाय रोहिदास राजुरा येथे जात नसे. अतिशय हुशार, मनमिळावू, समजदार असंच हे व्यक्तिमत्व. राजुरा येथे वैष्णवी चे वडील सहाय्यक शिक्षक म्हणून नोकरीला होते. अपघाताच्या पंधरा-वीस दिवस आधीच सर्व मला भेटून गेले होते.

Thank you for reading this post, don't forget to subscribe!

एका शिक्षक मित्राला घरी सोडून येण्याकरिता आपल्या स्वयंचलित दुचाकी वाहनाने ते गेले होते. मित्राला सोडून परत येताना वादळ वाऱ्यासह पाऊस झाला होता. ज्या रस्त्याने ते गेले होते त्याच रस्त्याने परत आले संध्याकाळची वेळ होती संधी प्रकाश होताच रात्रीत सामावणारा. रस्त्यावर एक वृक्ष उन्मळून पडलेले होते. ते त्यांच्या लक्षात आले नाही. स्वयंचलित दुचाकी वाहणावर त्यांना ताबा मिळवता आला नाही. रस्त्यात पडलेल्या वृक्षावर गाडी धडकली. डोक्याला जब्बर मार लागला. जखम मर्मस्थानी झाली. रुग्णालयात भरती करण्यात आले. जवळपास तब्बल एक महिना व्यथावेदनेशी संघर्ष केला. अमावसेलाच शेवटचा श्वास घेतला. दिवसाचा तिसरा प्रहर सूर्य तसा मावळतीच्या दिशेने कललेला. माझा भ्रमणध्वनी खणानला पोखरीचे पाहुणे आपल्यातून निघून गेल्याचा संदेश मिळाला.


माझ्या पायाखालची जमीन सरकली, शब्द मुके झाले, तडीत तडीतासवे कडाडली. डोळ्यांच्या कडा ओलावल्या, नयनांचा बांध फुटला. अख्खा श्रावण गंगायमुनेतून वाहून गेला. नियतीचा असा छद्म खेळ मी पहिल्यांदाच अनुभवला. सुनिता विधवा झाली. अश्विनी आणि वैष्णवी अनाथ. सरणाला भडाग्नी देऊन परत आल्यावर वैष्णवी विमस्कअवस्थेत दोन्ही गालावर हात देऊन अमावस्येच्या धुसर प्रकाशात दारावर बसलेली दिसली. ती माझ्या कमरेपर्यंत ही येत नव्हती.

अपघाताचा दिवस अमावस्येचा आणि मृत्यूचाही दिवस अमावस्येचा होता. अमावस्येच्या रात्रीत प्रकाश कसा शोधायचा? आभाळच फाटले तिथे थिगळ कोण लावणार? आव्हानात्मक शिवधनुष्य कसे पेलणार अशा अनेक प्रश्नांचे ढग मनातून घिरट्या घालू लागले. पाचवीच्या कार्यक्रमात एका सोयऱ्याने ह्या मुली येथेच शिकणार असा सुर छेडलाच मामा शंकरराव जाधव यांनी मुली माझ्याकडे चंद्रपूरला शिकणार असल्याचे सर्व सोयऱ्यांना सांगितले. मामांनी शैक्षणिक जबाबदारीचा विडा उचलला. याचे फलित आज दिसून आले. अमावस्येच्या काळ्याकुट्ट अंधारातही वैष्णवी चा काजवा चमकलाच. लगन, ध्यास, संकल्प यामुळेच तिने व्यथा वेदनेची खरतड वाट तुडवीत यशोशिखर गाठलेच. वैष्णवी ची आई सुनिताला शाळेत जा म्हटल्यास ती आपल्या आईचा लेंगा धरून मागे लपत असे, यावरून वैष्णवीच्या आईच्या शिक्षणाची कल्पना करता येते. वैष्णवी शुक्राच्या चांदणीसवे प्रकाशमान झालीच, रात्रीच्या गर्भातला सूर्य उषःकाळानंतर उगवणार असल्याचे संकेत देत. ज्या शुक्रताऱ्याचा दिशादर्शक म्हणून लदेणी लादताना बंजारा गणात केला जात होता. आज वैष्णवी चा शुक्रतारा यशोशिखराचा दिशादर्शक ठरला असेच म्हणावे लागेल.

गरुडाने आपल्या पिल्लांना पायात धरून आकाशात उंच झेप घ्यावी 12 मैलाच्या विशिष्ट उंचीवर नेऊन पिलांना सोडून द्यावे. ज्या पिल्लांनी कधीच पंख फडफडली नाहीत. त्यांना आपल्या उंचीची जाणीव करून द्यावी. बळ नसलेल्या पंखाने उंचीवर फडफड करावी. असेच वैष्णवीचे झाले. आणि तिने उंची गाठलीच. बाळा दादा, मला विमानातून शिकायला जायचे आहे. असा मनोदय बाळगून तिच्या मावस भावाकडे अभिव्यक्त करणारी वैष्णवी विमानाच्या उडाणाच्या उंची पलीकडे जाऊन पोहोचली. गुरुवर्य कलीम खान मला नेहमी म्हणायचे,

“उडणे को तो सब उडे, कव्वा, चिडिया, बाज!
तू पंखों में कैद कर, आंधी की परवाज”

पितृछत्र हरवले, आईचे शिक्षण जेमतेम झालेले, घरात अठरा विश्व दारिद्र्य, खाजगी वर्गात शिकवणी नाही, मनोनिग्रह, स्वतःला झोकून देणे, केवळ वाट्याला संघर्ष आणि संघर्ष. म्हणतात ना इच्छा तिथे मार्ग! तिने मार्ग शोधलाच नव्हे तो काबीज केला. वाळुतुनही पाण्याचे झरे निघू शकतात हे आपल्या मेहनतीने, कष्टाने सिद्ध करून दाखवले. धाडसाने यशोशिखर गाठलेच आपण सर्वांनी शुभेच्छांचा वर्षाव केला. जणू काही धो – धो पाऊस पडला शुभेच्छांचा. आता मात्र एखादी आर्थिक सहकार्याची सरी कोसळावी या अपेक्षेने चातकाप्रमाणे डोळे अंथरून वाट बघते…!

बँक खाते गं. भा. सुनिता रोहिदास राठोड
युनियन बँक ऑफ इंडिया काळी( दौलत खान)
आय. एफ. सी. कोड. UBIN0543888
खाते नं. 438802010579338
“आज जहाँ है, तू उसे समज न मंजिल यार!
मंजिल नही, सराय है, चलना तुझे अपार!
म्हणूनच आपल्या आर्थिक सहकार्याची जरुरी फार🙏

शब्दांकन : कवी – शांतीकुमार
बा. पू. राठोड, पुसद

gauravprakashan1@gmail.com

Maharashtra News, Braking News, Marathi News, Most Popular Marathi News, Latest Marathi News,Today News,Marathi Article, Marathi Poem, Marathi Story,