• Fri. Jun 9th, 2023

धगीचा निखारा : एका अनुभव संपन्न गझलकाराचे आत्मचिंतन

आपले दोष झाकून दुसऱ्यांचे उघड करण्याचा प्रयत्न करणे हा मुळात मानवी स्वभाव,अशा प्रवृत्तीने आपण इतरांच्या आयुष्यात हस्तक्षेप करून त्यांना किती दुखावतोय याची खंत न वाटता अनेकांना त्यातच आनंद मिळत असतो.हे कितपत योग्य आहे, याचे चिंतन व्हायला हवे.
मराठीत एक सुंदर म्हण आहे..”आपले ठेवायचे झाकून… दुसऱ्याचे पहायचे वाकून” या म्हणीनुसार किती समर्पक वाटतो हा शेर.
उणीव अपुली शोधा आधी
नंतर ठेवा जगास नावे..
श्री.प्रकाशजी मोरे सरांचा हा शेर किती स्पष्ट आणि सहज वाटतो.तो तेवढाच आत्मचिंतनास भाग पाडणारा शेर आहे.आपल्या लिखाणात सहजता आली की ती वाचणाऱ्यांच्या मनात सहज पेरल्या जाते.अशीच सहजता ‘धगीचा निखारा’ हा गझल संग्रह वाचतांना जाणवते..
मिळाली धर्म जातीला मराया माणसे साधी
पुढारी आग लावे हे तिथे मेले कुठे होते?
साहित्यिक सामाजिक बांधिलकी जपत असतो.तो जेवढ्या प्रेमाने शृंगारिक कवितांची रचना करीत असतो तेवढ्याच निडरतेने घडत असणाऱ्या घटनांची नोंद घेणे हे त्याचे कर्तव्य असते आणि ते त्याने पार पाडायलाच हवे.
धर्माच्या जातीच्या नावावर उसळलेली दंगल यात मरतो कोण? सर्वसामान्य माणूस, ही दंगल घडविणारे मात्र शोधूनही सापडत नाही. दोन वेळच्या पोटापाण्याची चिंता सोडून घरा, दाराचा विचार न करता आमचे रिकामे शूरसैनिक उड्या घेतात या दंगलीमध्ये, साहेबांसाठी काही पण! अशा घोषणा देत, साहेब असतात घरात घडवून आणलेल्या पराक्रमाचा आनंद घेत.
माणसे प्रत्येक वेळी मारली दंग्यात साधी
कोणत्याही मोरक्याचे रक्त कोठे का दिसेना?
हीच ताकद असते गझलची. अगदी मोजक्या शब्दात रितं होता येते. ज्यांना गझल लिहिता येते त्यांनाच शेर समजतो हा निव्वळ गैरसमज आहे. जो शेर सहज येतो, मनातून येतो तो वाचणाऱ्याच्या सरळ काळजात पेरल्या जातो. त्याचे हा शेर उदाहरण..
दूर केले माणसांचे दुःख ज्याने
जन्मला ऐसा जगी अवतार नाही..
ज्या परमेश्वराकडे आपण दुःख दूर व्हावे म्हणून धावा करीत असतो, तोच जेव्हा या भूतलावर मानवी योनीत जन्म घेतो तेव्हा त्यालाही या दुःखापासून सुटका नसते. मग तो कसे दुसऱ्यांचे दुःख दूर करेल. आपल्या दुःखावर, संकटांवर आपणच औषध शोधायला हवे.
इ.स.वीसना पासून तर एकविसाव्या शतकापर्यंतचा मानवी जीवनाचा प्रवास, रीतीरीवाज, परंपरा, गीत संगीत, नैसर्गिक वातावरण सर्व काळानुसार बदलत आलेले आहे. परंतु मुलगा म्हणजे वंशाचा दिवा ही मानसिकता अजूनही बदलू शकलेली नाही. स्त्री पुरुष समानतेचा होणारा गवगवा निव्वळ फोलपणा असल्याचे चित्र पाहायला मिळते. आजही मुलांसाठी हट्ट धरला जातो. घरात मुलींना तीच दुय्यम वागणूक, घरकाम करणाऱ्या बाईपासून तर उच्च पदावर असणाऱ्या स्त्रियांना सुद्धा पुरुषप्रधान संस्कृतीला बळी जावे लागते, ही वास्तविकता आहे. स्त्रीभ्रूणहत्येची सरकारी आकडेवारी कमी असली तरी वास्तविक परिस्थिती आजही वेगळी असल्याचे जाणवते. ही खंत या शेरातून जाणवते..
मागते मी आर्ततेने भीक जन्माची तुला
एकदा तू सोस आई माझियासाठी कळा
श्री. मोरे सरांचा गझल संग्रह अभ्यासपूर्ण आहे. सामाजिक परिस्थिती, राजकारण असे अनेक विषय गझल संग्रहातून वाचायला मिळतात.
हा गझल संग्रह जस जसे वाचत पुढे सरकत असताना एकापेक्षा एक सरस गझल वाचायला मिळतात. काही शेर अगदी मनाचा ठाव घेतात. एक चांगला गझल संग्रह वाचल्याचे समाधान वाचकाला नक्कीच मिळते.
सावलीच्या आसऱ्याने रोप कुठले वाढले?
तीच रोपे वृक्ष झाली सोसल्या ज्यांनी झळा..
माणसाला वास्तविकतेच्या काठावर नेऊन ठेवणारा हा सुंदर शेर.
आपला उद्धार आपल्याला करावा लागेल त्यासाठी कुठलाही चमत्कार होणार नाही. “जीवन एक संघर्ष आहे” जो संघर्ष करेल तोच स्वाभिमानाने जगू शकेल हेच अंतिम सत्य आहे. ज्यांनी ज्यांनी संघर्ष केला त्यांचीच नावे इतिहासाच्या पानावर अजरामर झालेली दिसून येतात. ‘दे हरी पलंगावरी’ हि प्रवृत्ती ज्यांची असते ते कधीच आपला विकास करू शकत नाही.
‘धगीचा निखारा’ हा एका अनुभव संपन्न गझलकाचे आत्मचिंतन आहे, जो आपल्या गझलांन मधून मनातील धग शब्द बद्ध करण्याचा प्रयत्न करतो.
एक शेर बघा..
जरा शांततेने जळू दे मला
धगीच्या निखाऱ्यास वारा नको..
मुखपृष्ठावरील हा शेर गझल संग्रहात काय असेच याची मनाला चुनूक देऊन जातो. त्यामुळे संग्रह वाचण्याची उत्सुकता वाढत जाते. गझल प्रवासाचे खंदे वारकरी असलेले प्रकाशजी मोरे असे अर्ध्यात आपली जीवन वारी संपवून निघून गेल्याची खंत मनाला चटका लावून जाते.
शेवटी सरांच्याच शेराने त्यांना अभिवादन करतो..
कोणास काय ठावे भाकीत जीवनाचे
केव्हा कुठे कुणाचा होणार अस्त आहे?
-शरद बाबाराव काळॆ
धामणगांव रेल्वे
९८९०४०२१३५

gauravprakashan1@gmail.com

Maharashtra News, Braking News, Marathi News, Most Popular Marathi News, Latest Marathi News,Today News,Marathi Article, Marathi Poem, Marathi Story,

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *