• Tue. Jun 6th, 2023

आठवणीतले पुणे : प्रभाकर कंदील

वीज जाणे ही परंपरा गेली अनेक वर्षे आपण अनुभवत आहोत. विजेची मागणी इतकी वाढली की मुंबई, पुण्यासारखी शहरे देखील घायकुतीला येतात आणि काही काळ अंधारात जातात. पण जेव्हा विजेची निर्मिती ही बाल्यावस्थेत होती, तेव्हा पुण्यासारख्या शहरातही एक मोठा आधार होता तो म्हणजे ‘प्रभाकर कंदील’. अनेक जणांच्या परीक्षा या कंदिलानी यशस्वीपणे पार पाडल्या. छोट्या छोट्या गल्ल्यांमध्ये वाड्यांमध्ये पेटलेल्या कंदिलानी घरातले, दुकानातले व्यवहार उजळून काढले, त्या प्रभाकर कंदिलाचे निर्माते हे गुरुनाथ प्रभाकर ओगले होते.
महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यात अनेक माणके दडलेली आपल्याला पाहायला मिळतात. प्रतिकूल कौटुंबिक परिस्थिती, आर्थिक अडचणी, मार्गदर्शकांची वानवा असूनही, ही माणसे जिद्दीने उभी राहतात आणि अनवट वाटेवरून चालत जगाला प्रकाशाचा मार्ग दाखवतात. या तरुणाने नेमके हेच केले. कोल्हापूर बावडा इथं जन्माला आलेला हा तरुण कोल्हापुरात मॅट्रिक झाला आणि मोठा संघर्ष करीत मुंबईच्या व्हीजेटीआय मध्ये दाखल झाला आणि या हुशार विद्यार्थ्याने पहिला क्रमांक मिळवत आपला अभ्यासक्रम पूर्णही केला. हे साल होते १९०८.
उपजिविका महत्वाची हे लक्षात येऊन यांनी थेट बार्शी गाठले आणि ‘लक्ष्मी टेक्‍निकल इन्स्टिट्यूट’ मध्ये शिकवायला सुरुवात केली. पण मन नोकरीत नव्हते, काहीतरी नवीन निर्माण करावे, उद्योग करावा याने पछाडलेल्या या तरुणाने छोटे मोठे व्यवसाय सुरूही केले. ऐन थंडीत कार्तिक मासात १९१३ साली आपले बंधू श्रीपाद यांच्या बरोबर एका माळरानात १० पौंड काच वितळवून एका नव्या उद्योगाची त्यांनी सुरुवात केली. पण म्हणावी तशी अनुकूल परिस्थिती नव्हती. बघता बघता १०-१२ वर्षे गेली.
किर्लोस्कर यांच्या कारखान्यात काही काळ काढून, हे आपल्या भावाच्या ओगलेवाडीच्या काच कारखान्यात रुजू झाले व काच हाच एकमात्र ध्यास घेऊन ते कामाला लागले. या क्षेत्रातील त्यांचा अभ्यास आणि भरारी पाहून तत्कालिन सरकारने यांना थेट अमेरिकेत उच्च शिक्षणासाठी पाठवले. काच निर्मिती तंत्र शिकून भारतात आलेल्या प्रभाकर यांनी अल्पावधीतच प्रभाकर कंदिलाचे उत्पादन सुरु केले. साल होते १९२५-२६. १५-२० वर्षे प्रचंड कष्ट आणि जनते पर्यंत आपले उत्पादन नेण्याची धडपड करीत अखेर १९४२ साली या व्यवसायाला कारखान्यात रुपांतरित करून त्यांनी भारतीय उद्योजकतेची चुणूक दाखवली.
१९४२ साली चलेजाव चळवळ सुरू झाली आणि या तरुणाने मराठी माणूस आत्मनिर्भर आहे याचा दाखला देत ‘चले जाव’ या घोषणेला एकप्रकारे मूर्त स्वरूपच दिले. आपल्या कंदिलाच्या जाहिरातीतून ‘खरे देशभक्त असाल तर प्रभाकर कंदील वापरा’ असा संदेश देत त्यांनी आपले हे स्वप्न देशप्रेमाशी जोडून लाखो ग्राहकांना आपलेसे केले. विजेच्या मोटारी, पंप, एनॅमल वेअर अशी उत्पादने सुरू करून पश्चिम महाराष्ट्रात हजारो हातांना रोजगार दिला. पुण्या जवळील पिंपरी येथे या कारखान्याची शाखा सुरू करून त्यांनी आपला व्यवसाय वाढवला. हे लोकमान्य टिळक यांचे मोठे भक्त होते. त्यांनी यांच्या कारखान्याला प्रेमाने भेट दिली होती.
जवाहरलाल नेहरू यांनाही यांच्या कारखान्यात आल्या नंतर या मराठी तरुणाच्या कर्तृत्वाने भारावल्या सारखे झाले होते. १९६२ सालच्या भारत चीन युद्धा मध्ये, रात्रीच्या अंधारात सैनिकांना एकच आधार होता, तो म्हणजे प्रभाकर कंदिलाचा. आपल्या वडिलांचे नाव दाही दिशात दुमदुमत ठेवणाऱ्या, प्रकाशमान करणाऱ्या गुरुनाथ प्रभाकर ओगले यांच्या कार्यास विनम्र अभिवादन..!
-संकलन : मिलिंद पंडित,
कल्याण*

gauravprakashan1@gmail.com

Maharashtra News, Braking News, Marathi News, Most Popular Marathi News, Latest Marathi News,Today News,Marathi Article, Marathi Poem, Marathi Story,

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *