राजकारण : शोध आणि बोध

भारत हा भिन्न भिन्न जातीचा, धर्माचा ,भाषेचा देश आहे. प्राचीन काळातील राजकारणाची दिशा एकात्म होती कारण लोकांची भावना राजाला बांधील होती .राजा जसा म्हणेल तसा कायदा होत होता. यावरून सामान्य माणसाचे शोषण होत होते .
सामान्य माणसाच्या नैसर्गिक हक्कावर गदा येत होती .तथागत गौतम बुद्ध यांच्या मानवतावादी धम्माने भारताला नवीन लोकशाही व्यवस्थेची ओळख करून दिली . लोकांनी लोकांचे प्रतिनिधि निवडून देण्याची पद्धत भिख्यू संघात निर्माण केली होती. यातूनच भारताला नव्या लोकशाही विचारांची संजीवनी मिळाली होती .
मध्ययुगीन काळातील राजकारणाने देशातील बहुजनाला गुलाम केले. मनू व्यवस्थेच्या राजव्यवस्थेने स्त्री ,शूद्र व अतिशूद्र यांच्यावर सामाजिक, आर्थिक ,राजकीय, शैक्षणिक,सांस्कृतिक प्रतिबंध लावून त्यांचे मेंदू गुलाम केले. धार्मिक कायदा श्रेष्ठ आहे. वर्ण व्यवस्थेच्या माध्यमातून देशाला गुलामीच्या काळाकुट्ट अंधारात ढकलले.
या काळात काही समाजसुधारकांनी समतेचे राज्य निर्माण करण्याचा प्रयत्न केला. पण त्यांना फारसे यश आले नाही. ब्राह्मणवादी विचाराने व चातुर्वर्ण्य व्यवस्थेने इथला बहुजन व स्त्री समाज पूर्णतः पिचून गेला .अन्याय व अत्याचाराला सीमाच उरली नाही. राजकारणासाठी देशाला गुलाम केले गेले.
आम्हीच श्रेष्ठ अशी भूमिका घेतल्याने भारताला प्रगती करता आली नाही. आपला एकसंघ भारत मध्ययुगात प्राचीन युगात नव्हता.सम्राट अशोकाच्या कालखंडात सोडला तर आम्ही नेहमी खंडितच राहिलो.
राजकारणाचा शोध आणि बोध घेताना आजच्या वर्तमानाच्या अनुषंगाने काही विचार होणे गरजेचे आहे .आधुनिक काळातील इंग्रजांच्या सुधारणा ने भारताला नवी राजकीय व्यवस्था माहित झाली. राजकारणाला नवी दिशा मिळाली .बहुजन समाजाला नवी चेतना मिळाली. या प्रकरणात राजकारणाचा शोध आणि बोध आपण समजून घेणार आहोत.
* राजकीय क्रांती
भारतामध्ये राजकीय क्रांती ही सामाजिक व धार्मिक क्रांतीच्या यशस्वीतेवर अवलंबून आहे .राजकीय क्रांती ही बहुदा सशस्त्र उठाव वा युद्ध यांच्या योगानेच घेऊन येते. काही देशांमध्ये सशस्त्र उठाव करून आपली राजकीय व्यवस्था मजबूत केली आहे. उदाहरणात रशिया ,जपान ,चीन ,इराक, अफगाणिस्तान, जर्मनी, ब्रह्मदेश इत्यादी देशात सशस्त्र उठाव करून आपापली राजकीय सत्ता स्थापन केली .
 या राजकीय क्रांतीने लोकांवर अमानुष अन्याय आणि अत्याचार केला. भारतात राजकीय क्रांतीची सुरुवात इंग्रजाच्या सुधारणा कायद्यापासून झाली .देशातील समाज व्यवस्था व राज्यव्यवस्थेला धक्का न लावता राजकारण करणे हाच इंग्रजांचा हेतू होता. यामध्ये ते यशस्वी झाले.
स्वातंत्र्य आंदोलनातील वैचारिक मतभेद जरी असले तरी देशाप्रती सर्वांची निष्ठा एक होती. पण काही समाजघटक यापासून अलिप्त राहिले. आज ते स्वतःला खरे स्वातंत्र्यसैनिक म्हणत असले तरी त्यांचे वास्तव फार वेगळेच आहे. आज आपल्याला नव्या राजकीय क्रांतीची गरज आहे .ती राजकीय क्रांती समतामुलक समाज निर्मितीतून निर्माण व्हावी अशी आशा आहे.
भारताच्या राजकारणाची सुरुवात ही १९३७ च्या निवडणुकीपासून झाली असे म्हणावे लागेल .त्यापूर्वीच्या काही सुधारणा कायद्याने भारतीय माणसाला राजकारणात प्रवेश मिळाला होता. २६ जानेवारी १९५० पासून जेव्हा भारताचे संविधान लागू झाले तेव्हापासून भारताला खरी राज्यकारभार करणारी नवी संहिता मिळाली.१९५१ मध्ये पहिली सार्वत्रिक निवडणूक झाली .यामधून राजकारणाला वेगळी दिशा मिळाली. काँग्रेस पक्षाचा जनभावनेवर प्रभाव असल्याकारणाने काँग्रेसचे अनेक उमेदवार निवडून आले .पण यावेळी विरोधी पक्षाचे उमेदवार सुद्धा निवडून आले होते .भारतीय राजकारणाला दिशा देणारी ही निवडणूक नव्या आव्हानाचा मुकाबला करू लागली.
कायदामंत्री डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी केलेल्या हिंदू कोड बिलाला कडाडून विरोध झाला. स्त्री , उच्चवर्णीय, धार्मिक लोकांनी मोठे आंदोलन केले. अनेक नेत्यांनी आपापल्या अस्मितेला धक्का न लावता या कायद्याला विरोध केला. यामुळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपला राजीनामा दिला. त्याचप्रमाणे ओबीसी समाजाच्या हितासाठी एक आयोग गठीत करण्याची जी व्यवस्था केली होती तो आयोग गटीत न झाल्यामुळे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला.
समाजसुधारणेशिवाय राजकीय चळवळ यशस्वी होऊ शकत नाही. यावर भाष्य करताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की, ” या राजकारणापासून समाज कारणाकडे वळताना सहारा वाळवंट सोडून एखाद्या हिरवळीत प्रवेश केल्याचा भास होतो. हल्लीचे राजकारण हा शुद्ध पोखेळ होऊन बसलाय .सामाजिक चळवळीची परिस्थिती निराशाजनक असली तरी इतकी निराशाजनक नाही. उपमा द्यायची असल्यास असे म्हणता येईल की ,राजकीय चळवळ अजीर्ण होऊन मरत आहे. तर सामाजिक चळवळ मरत असली तरी भुकेमुळे मरत आहे. वास्तविक ती मरत नाही. तिला मारण्याचे अनेक प्रयत्न झाले व आजही होत आहेत. टिळक चिपळूणकरापासून तो परवा काशीला जमलेल्या ब्राह्मणापर्यंत या प्रयत्नांची परंपरा येऊन पोहोचते. टिळक चिपळूणकरांनी सामाजिक सुधारण्याची चळवळ मारण्यासाठी कसेकसे प्रयत्न केले ते महाराष्ट्राच्या इतिहासात नमूद आहेत. त्यांचा घंटा बडव्यांनी हिंदू संघटनेच्या नावाखाली सामाजिक अंतःशुध्दीच्या चळवळीला गुदमरण्याची कशी कारस्थाने चालवली आहेत हे सर्वांना माहीत आहे. काशीच्या ब्राह्मण संमेलने समाज सुधारणेचा मुळावरच कु-हाड कशी घातली हेही सर्वांना विधीत झाले आहे. हे प्रयत्न निराळ्या वेळी, निराळ्या स्थळी व निराळ्या लोकांकडून झाले .पण सुधारण्याची हिंसा हे त्यांचे एकच ध्येय आहे. पण सुधारण्याची चळवळ या सर्व प्रयत्नांनी पुरून उरली आहे. तिच्या सैन्यात तिच्या विरोधकांच्या अपेक्षे बाहेर रिक्रुटभरती होत आहे. समाज सुधारणे शिवाय राजकीय चळवळीची धडकत नाही हे आता सर्वांना पटू लागले आहे.”
हे शब्द आजच्या काळातही तंतोतंत लागू पडत आहेत .राजकीय लोकशाहीचे रूपांतर जोपर्यंत आपण सामाजिक आणि आर्थिक लोकशाही करणार नाही तोपर्यंत खऱ्या राजकारणाला भारतात महत्व येणार नाही .
* वर्तमानातील राजकीय व्यवस्था
भारत गणराज्य झाला तेव्हापासून देशाने प्रगती केली आहे. फाळणीच्या जखमा व ब्रिटिशांनी लुबाडलेल्या काळात भारताला जे संविधान मिळाले त्या संविधानाच्या उर्जेने देश एकखंड व एकात्म झाला .पण राजकीय पक्षांनी स्वतःच्या स्वार्थासाठी भारतीय संविधानाचे मोठ्या प्रमाणात उल्लंघन केले. आपलं स्वार्थ जिथे आहे तिथे संविधानाचा उपयोग केला आणि आपला स्वार्थ नाही तिथे संविधानाची मोडतोड केली.
आज त्र्याहतर वर्षानंतरही भारतीय मानवांना आपण समानसूत्रात बांधू शकलो नाही. कारण आपण संविधानाच्या अनुषंगाने नवीन पिढी निर्माण करू शकलो नाही .संविधान विरोधी लोकांनी आपापल्या परीने संविधानाच्या विरोधात आवाज उठवल्याने योग्य चर्चा घडवून आलेली नाही.काही नेते स्वतःच्या विचाराला श्रेष्ठ समजून राज्यकारभार करतात. योगी ,भोगी,साध्वी,भ्रष्टाचारी असे नेते भारतीय राजकारणात नंगानाच करत आहेत. वर्तमान राजकीय व्यवस्था हुकूमशाही पद्धतीने राज्यकारभार करत आहे. स्वतःची हटके कार्यशैली निर्माण करून जनते भय व आक्रोश पैदा करत आहेत. संविधानाचे चौकट उध्वस्त करून इथल्या माणसाला नव्या गुलामगिरीच्या जोखंडाला बांधत आहेत .वर्तमान राजकीय व्यवस्थेच्या विरुद्ध आवाज उठवणे हेच भारतीय नागरिकांचे कर्तव्य आहे.
* राजकारणातील भक्त
 आज देशातील राजकीय पक्षाने भक्तीचे दुकान उघडले असून. सारेच पक्षाचे नेते संविधान मर्यादा उल्लंघन करून राजकारणात व्यक्ती श्रेष्ठता निर्माण करत आहे. आज देशात राजभक्तीला ऊत आला आहे .नेता जसा म्हणेल तसी प्रजा वागायला लागली आहे .नोटबंदी, लॉकडाऊन, पुन्हा नोटबंदी अशा विविध कारणे स्वतःला श्रेष्ठ घोषित केले आहे. राष्ट्रपतीचे अधिकार यावर गदा आणली जात आहे.
देशात अंधभक्ताची राजकीय फौज निर्माण केली जात आहे .त्याचा वापर आपली राजकीय पोळी शिकण्यासाठी केली जात आहे .राजकारणात भक्ती कशी धोकादायक आहे हे वास्तव सांगताना डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की ,”भक्तीला राजकारणात विभूती पुजेने रूप येते. त्यातून सर्वाधिकारशाही निर्माण होण्याचे भय असते. म्हणून आपण फार जागृत राहिले पाहिजे .पुढे ते म्हणतात की, “धर्माच्या क्षेत्रात भक्ती ही संकल्पना उद्दात असेल ,पण राजकारणात मात्र भक्ती हुकूमशाहीची सुरुवात ठरू शकते”. हा इशारा भारतीय जनतेने लवकरात लवकर समजून घ्यावा नाहीतर भारताचे राजकीय धोक्यात येऊ शकते . राजकीय भक्त देशाला डुबवू शकतात अशा भक्तापासून देशाला वाचवण्याची अधिक गरज आहे. पुन्हा डॉ . बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की,” राष्ट्राचे भवितव्य निर्धारित करताना लोकांची प्रतिष्ठा, नेत्यांची प्रतिष्ठा, पक्षांची प्रतिष्ठा या हुकूम बाबींना कोणतेही मूल्य नसते. देशाच्या भवितव्याचा विचार हाच सर्वेतोपरी असावा.”
ही भूमिका सर्व भारतीयांनी समजून घेणे काळाची गरज आहे.
* धार्मिक कट्टरता
 आज देशाच्या राजकारणात धार्मिकतेचा उपयोग होऊ लागला आहे .धर्मनिरपेक्ष राष्ट्रात धार्मिक नेत्यांनी मोठी मजल मारलेली आहे. देशातील काही पक्ष स्वतःला हिंदूंचे तारणहार म्हणतात .तर काही पक्ष अल्पसंख्यांकाचे तारणहार म्हणतात. यातून धार्मिक कट्टरता निर्माण होत आहे ..देशाचे प्रधानमंत्री प्रचारात धार्मिक ध्रुवीकरणाचा उपयोग करतात. यातून त्यांना जरी फायदा झाला तरी देशाची संविधानिक चौकट उध्वस्त होते हे समजून घ्यायला हवे. राम मंदिर आणि बजरंग बली अशा धार्मिकतेचा उपयोग आज होत आहे. हे देशासाठी नक्कीच धोकादायक आहे. देशाचे नाव भारत असताना अनेक नेते व लोक हिंदुस्तान या शब्दाचा उपयोग करतात .काही नेते अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती व अल्पसंख्यांक समाजा विषयी वाईट प्रवृत्तीने बोलत असतात. त्यांना गुलाम करण्याची भाषा बोलत असतात .अशा धार्मिक कट्टरतेने आपल्या मुलांची माथी भटकवल्या जात आहे .याकडे देशातील नागरिकांनी लक्ष द्यावे. धार्मिक कट्टरता हे देशाला तोडण्याचे एक अघोरी शस्त्र आहे.
* खोट्यांचे आश्वासन
आज देशातील नेत्यांमध्ये खोटे बोलण्याची पैज लावलेली दिसते. वरचा नेता खोटा बोलतो तसाच खालचा नेता खोटा बोलतो. इतिहासातील खोट्या विचारांना एनसीईआरटी विद्यार्थ्यांच्या मनावर बिंबवत आहे. विज्ञानाला नाकारून अवैज्ञानिक विचारांना पुढे आणले जात आहे. विज्ञानाची तत्वे वेदांमधून घेतली असे मत इस्रोचे प्रमुख म्हणत असतील तर देशाची किती नाचक्की होते हे त्यांनी समजून घ्यावे.जर वेद हेच सत्य आहे तर त्यानी आपल्या मुलांना वेद शिकवावे.विज्ञान शिकवू नये असे शास्त्रज्ञ किती पूर्वग्रहदूषित आहेत हा एक उत्तम नमुना आहे.सत्य दडपून स्वतःच्या विचाराचा टेंबा मिरवला जात आहे. आमचे तत्त्वज्ञान श्रेष्ठ अशी वल्गना केल्या जात आहे. बहुजन विद्यार्थ्यांनी शिक्षणाच्या प्रवाहातून बाहेर पडावे म्हणून नव्या भांडवलदारी राजतंत्राची निर्मिती केल्या जात आहे. ही भारतीय राजकारणासाठी धोक्याची घंटीच आहे .म्हणून खोट्यांचे आश्वासन हे भारतीय राजकारणाला लागलेला एक कलंकच आहे .
* जातीय दंगली
 भारत हा सहिष्णू देश आहे. भारतीय संविधानाने सर्वांना समान अधिकार दिले आहेत .पण अजूनही देशात शांतता पाहायला मिळत नाही. जातीय तेढ निर्माण करून आपल्या राजकारणासाठी जातीय दंगली घडवल्या जात आहेत. कोणी घोड्यावर बसून वरात नेतो म्हणून, कोणी पाणी पिण्यासाठी माठाला हात लावतो म्हणून, कोणाची सावली अंगावर पडल्यामुळे ,कुणी सरपंच झाल्यामुळे अशा विविध गोष्टीतून जातीय अहंकार फोफावत आहे. अनुसूचित जाती व जमातीच्या लोकांवर अन्याय आणि अत्याचार केले जातात. आपल्या नेत्यानी जातीय राजकारणाची मिरासदारी मानली जात आहे .यामुळे जातीय दंगली घडवून स्वतःची पोळी शेकल्या जात आहे. यापासून भारतीय जनतेने सावध राहायला हवे.
* अंधभक्तीची खोगीरभर्ती
 आज नव्या मीडियामुळे, व्हाट्सअप युनिव्हर्सिटीमुळे अंध भक्ताची खोगीरभर्ती निर्माण झाली आहे .ही खोगीरभर्ती वास्तव व सत्य न ओळखता व्हाट्सअप वरच्या मेसेज मधून देशातील वातावरण बिघडवत आहेत.मणिपूर दंगल ,सोलापूर दंगल, दिल्ली दंगल ,मालेगाव दंगल, अमरावती दंगल ,अकोला दंगल इत्यादी दंगल्याचे मास्टरमाईंड वेगळाच असतो. हा मास्टरमाईंड स्वतःच्या राजकारणातील पाॅवर चा उपयोग करून अंधभक्ताना खुराक पुरवण्याचे काम करतो .अंधभक्तीची खोगीरभरर्ती नव्या विचारांना आत्मसात न करता. नेता जसा सांगेल तसे वागतात . या खोगीरभर्तीमुळे देशातील संविधानिक वातावरण धोक्यात येत आहे .मनुव्यवस्थेची निर्मिती होण्याच्या दिशेने देश जात आहे .अनेक बाबा धार्मिक कार्य सोडून मतांचा जोगवा मागत आहेत. पण भारतीय जनता खुळी नाही. एक दिवस त्यांच्या कुकर्माचा घडा फुटणार आहे .नव्या संसद भवनात त्यांना जागा मिळणार नाही कारण त्याची सत्ता भारतीय जनता उखडून फेकणार आहेत .भारतीय नवीन संसदेत येणारे कोणतेही पक्ष असो त्यांनी भारतीय संविधानाचे रक्षण करावे. तरच भारतीय नव्या भारतीय संसद भवनाला महत्त्व प्राप्त होईल.
* लोकशाही व्यवस्थेवर हल्ला
 देशातील सत्ताधारी पक्ष हा भारतीय संविधानाची शपथ घेऊन आरुढ झाला. तरी तो खऱ्या लोकशाहीवादी आहे का हा प्रश्न जनतेला पडलाय. कारण अनेक राजकीय पक्ष स्वतःच्या विचाराला श्रेष्ठ मानत असल्याने .त्यांनी लोकशाहीच्या मुळावर आघात केलेला आहे .आर्थिक आरक्षणाची व्यवस्था नसतानाही आर्थिक आधारावर आरक्षण देऊन खऱ्या लोकशाही मूल्यावर आघात केला आहे. संविधानिक प्रोटोकॉल न जुमानता स्वतःचाच प्रोटोकॉल निर्माण केला आहे. स्वतःच्या मनमर्जीने राज्य कारभार केला जात आहे .स्वतःला श्रेष्ठ ठेवण्यासाठी साऱ्या मंत्रिमंडळाला हाशीयावर सोडून दिले आहे. सारी मंत्री हुजुरी करताना दिसतात आहेत. प्रधानमत्र्याचे गुलाम झाले आहेत. आपल्या मंत्रालयावर दुसऱ्याची मतेदारी नसावी पण आज सारेच मंत्रालय गुलामीच्या जोखंडात चालत आहेत. यासाठी भारतीय जनतेने कोणत्याही एका पक्षाकडे बहुमत देऊ नये. कारण आसुरी बहुमत लोकांचे कल्याण करण्यापेक्षा लोकांचे भंजन करते हे आता आपल्याला समजून आलेले आहे.
* लोकशाहीतील नैतिकता
भारताला नव्या शिखरावर घेऊन जायचे असेल तर सर्व भारतीयांनी लोकशाहीतील नैतिकता जपली पाहिजेत. संविधानिक नैतिकतेशिवाय देश प्रगतीपथावर जाऊ शकत नाही. यासाठी आपल्यातील भेदाभेद, वादविवाद ,भ्रष्टाचार, जातिवाद, धर्मवाद, प्रांतवाद ,भाषावाद यापासून आपण अलिप्त राहायला हवे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर सवैंधानिक नैतिकतेचा प्रश्न मांडताना म्हणतात की,” संविधानात्मक नैतिकतेचे सर्वदूर अभिसरण फक्त बहुसंख्य समुदायातच नव्हे. तर सर्वदूर अभिसरण हे स्वातंत्र्य आणि शांतीच्या स्थापनेसाठी कटिबंध असलेल्या शासनाकरिता अनिवार्य अशी अट आहे .कारण एखादा समर्थ पण दुराग्रही अल्पसंख्यांकाचा वर्ग हा स्वतंत्र व्यवस्थांना कार्य करणे अव्यवहारिक आणि अशक्यप्राय करू शकतो .जरी सत्ता प्राप्तीचे सामर्थ्य या वर्गाकडे नसले तरी .” हा आशावाद नक्कीच देशाला पुढे नेणार आहे. राजकर्त्यांनी संविधानिक नैतिकता जोपासली तर हा देश नक्कीच शिखरावर पोहोचल्याशिवाय राहणार नाही.
* आम्ही भारताचे लोक
 आपल्या संविधान प्रास्ताविकतेची सुरुवात आम्ही भारताचे लोक यापासून झालेली आहे. म्हणजेच हे संविधान जनतेने स्वतः प्रति अर्पण केलेले आहे .आम्ही भारताचे लोक हाच खरा प्राण आहे .आपल्या संविधानाची प्रस्तावनाच आपल्या जगण्याचे खरे सार आहे.
* राजकारणाचा शोध आणि बोध
 आपण राजकारणाचा शोध आणि बोध घेतला. यातून आपल्याला धर्मनिरपेक्ष देशाची संकल्पना यशस्वीपणे राबवावी लागेल. भारत हा कुणाच्या मालकीचा देश नाही. कुण्या राजकर्त्याची मिरासदारी नाही. स्वतःच्या व्यक्तिगत विचारातून देशाला तुम्ही बांधून ठेवू शकत नाही. भारत हा एक सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य देश आहे .राजकर्त्यांनी देशाला हिंदू राष्ट्र करण्याचे स्वप्न पाहिले असले तरी त्यांचे स्वप्न पूर्ण होऊ शकणार नाही .आज त्यांनी सारेच निर्णय घेतले असले तरी पुढे त्यांचे सर्वच निर्णय बदलू शकतात .कारण संसद नियम बदलवणारी आणि संविधानानुसार काम करणारे एक संविधानिक संस्था आहे .
आज समाजामध्ये एकोपा निर्माण करण्यासाठी खऱ्या राजकारणाने आपले हेवेदावे सोडून बंधुभावाचे नाते जोपासले पाहिजे. नाहीतर भारतीय लोक तुमच्या निष्ठेवरच प्रश्नचिन्ह निर्माण करतील .आता तरी सर्व भारतीय लोकांनी आपापले हेवेदावे सोडून भारतीय लोकशाहीला वाचवायला हवं .आपल्या समाजाला लोकशाही प्रधान शिक्षण देण्यासाठी आपण पुढे आला पाहिजेत .भारताला उन्नत, प्रगतशील, शांतता मार्गाने यशस्वीपणे पुढे नेण्यासाठी सर्वांनी मदत करावी. आम्ही भारताचे लोक हा एकच पासवर्ड घेऊन आपण चालावे. तरच या देशाचे यश निश्चित आहे….
– संदीप गायकवाड
नागपूर
९६३७३५७४००