• Tue. Jun 6th, 2023

आमचं प्रेम होतं की नाही हे सांगता नाही येणार…!

आमचं प्रेम होतं की नाही हे सांगता नाही येणार, पण ती सुरूवातीची दोनेक वर्षे मला तिचं कमालीचं आकर्षण होतं. म्हणजे पहिल्यांदा तिला पाहिलं ना, तेव्हा मनात काय काय फिलिंग्स आल्या होत्या, हे सांगायला शब्द पण नाहीत. म्हणजे अगदी ती भेटायच्या अगोदर किती तरी वेळा तिचा माझ्या मोबाईल मध्ये असलेला फोटो मी पुन्हा पुन्हा बघायचो. भेट झाल्यावर तेव्हा आमचा सहवासही खूप होता.
तिच्याबरोबर कुठे आणि काय काय धमाल केली हे लिहायचं ठरवलं तर, एखादी दीर्घकथाच तयार होईल. ती सोबत असली की मला अगदी परिपूर्ण असल्याचं फिलिंग येत असे. कारण ती होतीच तशी.
मला ती कायमच हवीहवीशी वाटायची. तिची सोबत खूप आनंद द्यायची. ती सोबत असली की, चारचौघांत रूबाबदारपणा यायचा. पण पुढे तिने स्वतःहून संबंध कमी केले. तिनं का असं केलं, समजलं नाही. माझ्यावर ती का नाराज झाली, कळले नाही. दर दिवसाआड होणारी आमची भेट महिना-दोन महिन्यातून कधीतरी व्हायला लागली. आणि त्यावेळी सुद्धा आधीचा जिव्हाळा नी आवेग ओसरल्याचं स्पष्टपणे जाणवत असे. कदाचित तिला अन्य कोणी सोबती मिळाले असावेत. पण मी कधी त्याबद्दल विचारलं नाही. आणि मग माझाही तिच्यातला इंटरेस्ट कमी कमी होत गेला. मी माझ्या मनाला दुसरीमध्ये गुंतवायला सुरू केले. पण तरी तिची नेहमी मनापासून आठवण यायचीच. तिचा चेहरा डोळ्यांसमोरून तरळून जायचा.
तिची खूप आठवण यायची.
दिल के अरमान, एक एक करके टूटे है
आंखों मे बसे ख्वाब सभी झूठे है
कैसे भूला दूं मैं उनकी यादों को
मुंह से लगे जाम भी कभी क्या छूटें है?
गेल्या तीन-चार वर्षांत तर आमची एकदाही भेट झाली नव्हती. आणि काल अचानक ती गेल्याचं कळलं. पण खरं सांगायचं तर हे ऐकून धक्का बसला नाही, आणि फार दुःखही वाटलं नाही. प्रत्येकाला कधीतरी जायचंच आहे. त्यामुळे आयुष्यात या गोष्टी घडत राहणार.. One has to accept it.
बाकी तिच्याबरोबर घालवलेला काळ हा कायमच सुखाची आठवण करून देणारा असेल यात शंका नाही.
*दोन हजाराची_नोट
-विष्णू औटी,
संभाजीनगर

gauravprakashan1@gmail.com

Maharashtra News, Braking News, Marathi News, Most Popular Marathi News, Latest Marathi News,Today News,Marathi Article, Marathi Poem, Marathi Story,

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *