• Sat. Jun 3rd, 2023

बुद्ध धम्म व बुद्ध धम्माची शिकवण

भारतीय तत्त्वज्ञ,शांततेचे महासागर,मानवतावादी – विज्ञानवादी बौद्ध धम्माचे संस्थापक तथागत सिद्धार्थ गौतम बुद्धांना जयंती निमित्त विनम्र वंदन ! बुद्ध पौर्णिमेच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा !
बुद्ध हे नाव नाही तर ज्ञानाची उपाधी आहे.बुद्ध या शब्दाचा अर्थ ‘आकाशाएवढा प्रचंड ज्ञानी असा आहे .ही उपाधी सिद्धार्थ गौतम बुद्धांनी स्वप्रयत्नांनी मिळविली आहे . संबुद्ध म्हणजे बुद्धत्व – संबोधी ( ज्ञान ) प्राप्त – स्वतःवर विजय मिळविलेला आणि स्वतः उत्कर्ष करू शकणारा महाज्ञानी बुद्ध आणि संमासंबुद्ध म्हणजे बुद्धत्व संबोधी (ज्ञान ) प्राप्त असलेला, स्वतः सोबतच संपूर्ण जगाचा उत्कर्ष – उद्धार करू शकणारा महाज्ञानी बुद्ध.बौद्ध अनुयायी तथागत गौतम बुद्धांना वर्तमानातील सर्वश्रेष्ठ बुद्ध म्हणजेच संमासंबुद्ध मानतात. जगाच्या इतिहासातील महामानवांमध्ये तथागत गौतमबुद्ध हे सर्वश्रेष्ठ मानले जातात.
 आशिया खंडात बौद्ध धम्म हा मुख्य धर्म असून सर्व खंडातील देशांमध्ये बौद्ध अनुयायी मोठ्या प्रमाणात आहेत.अनुयायांच्या तुलनेत येशू ख्रिस्तानंतर जगात सर्वाधिक अनुयायी तथागत गौतम बुद्धांना लाभलेले आहेत.याशिवाय भारतातील कोट्यवधी दलित व हिंदू धर्मियांनी आणि जगभरातील अनेक मानवतावादी -विज्ञानवादी लोकांनी गौतम बुद्धांचे अनुयायित्व पत्करले आहे .
 यापूर्वीच्या 10,000 वर्षांमध्ये ज्यांनी आपली बुद्धिमत्ता वापरून मानव जातीच्या उत्थानासाठी महान कार्य केले अशा जगातील टॉप 100 विश्वमानवांची यादी इंग्लंड मधील ऑक्सफोर्ड विद्यापीठाने तयार केलेली आहे.या यादीत विद्यापीठाने प्रथम स्थानी तथागत गौतम बुद्धांचे नाव आहे.जगातील पहिल्या शंभर अत्यंत महान विश्वमानवांमध्ये तथागत गौतम बुद्ध प्रथम स्थानी आहेत.आचार्य रजनीश (ओशो) तथागत गौतम बुद्धाबद्दल म्हणतात की,
” बुद्धानंतर त्यांच्या जवळपास जाऊ शकेल असा महामानव भारताने किंवा जगाने आजपर्यंत निर्माण केलेला नाही .”
तथागत गौतम बुद्धांची जीवन कहाणी,त्यांची प्रवचने,त्यांचे तत्त्वज्ञान आणि त्यांनी घालून दिलेले विहाराचे नियम पवित्र मानून ते त्यांच्या अनुयायांनी गौतम बुद्धाच्या महापरिनिर्वाणानंतर संकलित केले.तथागत गौतम बुद्धांच्या मानल्या जाणाऱ्या विविध शिकवणी एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे पाठांतराद्वारे सुपूर्द होत गेल्या.त्यांच्या महापरिनिर्वाणानंतर साधारणतः 400 वर्षांनी ही शिकवण लेखी स्वरूपात प्रथम मांडली गेल. तथागत गौतम बुद्धांचे तत्त्वज्ञान पाली भाषेमध्ये मांडले गेले आहे. त्रिपिटकाच्या माध्यमातून या तत्त्वज्ञानाची माहिती मिळते. भारत हे बौद्ध धम्माची मूळभूमि असली तरी भारताबाहेरही मोठ्या प्रमाणात बौद्ध धम्माचा प्रसार आणि प्रचार भरपूर झालेला आहे.आजही अनेक देशांमध्ये बौद्ध धम्म हा खूप चांगल्या स्थितीमध्ये असलेला बघायला मिळतो.
ऐतिहासिक दृष्टिकोनातून बौद्ध धम्म हा भारतातील एक अतिप्राचीन धम्म आहे. तत्त्वज्ञानाच्या दृष्टिकोनातून हा जगातील सर्वात महान धम्म आहे कारण बौद्ध तत्त्वज्ञान हे मानवतावादी आणि विज्ञानवादी आहे.भारताच्या इतिहासात आणि परंपरेच्या घडणीत बौद्ध धम्माच्या उदयाला – तत्त्वज्ञानाला अतिशय अनमोल स्थान आहे . बौद्ध धम्माचा सर्वाधिक विकास इ.स.पूर्व ६ वे शतक ते इ.स. ६ वे शतक या कालावधीत झाला.
बौद्ध संस्कृतीचे सर्वात मोठे योगदान मौर्य कला,गांधार कला व मथुरा कला यात आढळते. बौद्ध धम्माचा व तत्वांचा प्रसार भारताबरोबरच शेजारच्या अनेक देशांमध्ये झालेला आहे. त्रिपिटकाच्या स्वरूपातील साहित्य व विविध पंथीय साहित्य हे बौद्ध संस्कृतीच्या रूपाने भारतीय संस्कृतीचा जगातील अनेक देशांमध्ये प्रसार झाला. बौद्ध संस्कृतीचा ठसा हा विहार, स्तूप,मठ व ( लेणी ) या मौर्य कलेच्या प्रतीकांच्या रूपाने स्पष्ट दिसतो.त्याच्या विकासाला जवळपास 1100 वर्षे लागली . जगाच्या आणि भारतीय जीवनाच्या सामाजिक,
सांस्कृतिक,राजकीय आणि विशेषता धार्मिक बाजूंवर बौद्ध धम्माची खोलवर छाप पडलेली आहे जी न पुसता येण्यासारखी आहे.
तथागत गौतम बुद्धांनी पाली या लोकभाषेतून अत्यंत साध्या आणि सोप्या पद्धतीने बौद्ध धम्माची शिकवण,आचार विचार सांगितलेले आहेत. तथागत गौतम बुद्धांनी बौद्ध धम्माची शिकवण व आचरण यासाठी चार आर्यसत्ये,आर्य अष्टांगिक मार्ग (मध्यम मार्ग )व पंचशील सांगितलेली आहेत.
तथागत गौतम बुद्ध म्हणतात की ,” मानवी जीवन हे दुःखमय आहे,दुःखाची निर्मिती तृष्णेतून(वासना,आसक्ती,इच्छा ) होते म्हणून या तृष्णेवर म्हणजे आपल्या इच्छांवर नियंत्रण ठेवले पाहिजे,त्यासाठी मध्यम मार्गाचा अवलंब केला पाहिजे.मानवी व्यवहाराच्या मुळाशी चार आर्य सत्य आहेत.
चार आर्य सत्य :
१ ) दुःख :
 मानवी जीवन हे दुःखमय
 आहे.
२ ) तृष्णा :
मनुष्याच्या न संपणाऱ्या
 इच्छा हे दुःखाचे कारण
 आहे.
३ ) दुःख निरोध :
दुःखाचे निराकरण अथवा अंत
 सर्व प्रकारची आसक्ती
 सोडण्याने होतो.
४ ) प्रतिपद : –
दुःख निवारण्यासाठी
सदाचरणाचा मार्ग
म्हणजे अष्टांग मार्ग आहे .
आर्म अष्टांगिक मार्ग : –
 तथागत गौतम बुद्धांनी सारनाथ येथे धम्मचक्रप्रवर्तनाचे विवेचन करताना नीती व सदाचाराला महत्त्व देऊन मानवाचे जीवन सुखकर होण्यासाठी ,निर्वाणाच्या समीप पोहोचण्यासाठी तसेच षड्विकार दूर करून जीवन निर्मळ करण्यासाठी हा अष्टांगिक मार्ग ( मध्यम मार्ग ) सांगितला आहे .अष्टांगिक मार्ग हा सदाचाराचा मार्ग आहे.या आठ गोष्टींच्या पालनामुळे मानवाचे जीवन सुखमय होते ते अष्टांगिक मार्ग असे :-
१ ) सम्यक दृष्टी :
निसर्ग नियमाविरुद्ध कोणतीही गोष्ट होऊ शकते ही गोष्ट न मानणे . (चांगली दृष्टी ) कोणतीही गोष्ट बघताना ती विकारग्रस्त मनाने बघू नये त्यामुळे तिच्याबाबतीतील आपले आकलन दूषित होते तर पूर्वग्रह विरहित दृष्टीने प्रत्येक गोष्ट बघावी.
२ ) सम्यक संकल्प :
 सम्यक संकल्प म्हणजे योग्य निर्धार व विचार .संकल्पा मध्ये दुराग्रह असू नये . अहंकारापाई अमुक एक करून दाखवीन आणि मगच विसावेन या संकल्पामुळे आयुष्यातील मौल्यवान काळ फुकट जाऊ शकतो .म्हणून पात्रतेनुसार समतोल ध्येय म्हणजे सम्यक संकल्प आवश्यक असतो.
३ ) सम्यक वाचा (वाणी) : –
आपली वाचा सत्य ,सरळ करुणयुक्त व प्रिय ठेवण्याचा प्रयत्न करणे.असत्य वाणीमुळे माणसाचे विविध प्रकारचे नुकसान होते म्हणून सम्यक वाचा असणे आवश्यक आहे
४ ) सम्यक कर्मांत :
उत्तम कर्म,उच्च कर्म म्हणजे योग्य कृत्य करणे.सम्यक कर्मांत म्हणजे आत्महत्या,चोरी, हिंसा,परस्त्रीविषयी लोभ ही सर्व कर्म निषिद्ध आहेत.जीवनाचे जे योग्य ध्येय ठरविले आहे ते ठरवल्यानंतर त्या दिशेने शांतपणे कर्म करीत राहणे म्हणजे सम्यक कर्मांत होय.
५ ) सम्यक अजीविका :
वाईट मार्गाने आपली उपजीविका न करता ती सन्मार्गानेच करणे.त्यापासून इतरांना त्रास, दुःख ,कष्ट, कोणतीही इजा होता कामा नये म्हणून उपजीविका सन्मार्गानेच करावी.चोरी,फसवाफसवी, पाप,हिंसा करून उपजीविका करू नये असा व्यक्ती समाधानी , शांत जीवनापासून वंचित होतो .
६ ) सम्यक व्यायाम :
 वाईट विचार निर्माण झाल्यास त्याचा त्वरित नाश करणे कारण वाईट विचारांनी फक्त विद्ध्वंस होतो.यासाठी चांगली कर्म करणे,मनात सुविचार उत्पन्न होतील असा प्रयत्न करणे,ते सुविचार मनात रुजविणे आणि ते पूर्णत्वाला नेऊन जीवनात त्याचा अंतर्भाव करणे या मानसिक प्रयत्नांनाच सम्यक व्यायाम म्हणतात.
७ ) सम्यक स्मृती :
तात्त्विक गोष्टींचे स्मरण करून चित्तास ( मन ) जागृत ठेवणे.जे अयोग्य आहे ते विसरणे आणि जे योग्य आहे ते स्मरणात ठेवणे असे दैनंदिन जीवनात घडले पाहिजे.कोणी आपल्याकरिता काय केले हे लक्षात राहत नाही पण काय केले नाही तेवढे मात्र लक्षात राहते. दैनंदिन जीवनात हेच दुःखाला कारणीभूत ठरते म्हणून मन सावध,जागृत व संतुलित असणे म्हणजे सम्यक स्मृती होय.
८ ) सम्यक समाधी :
 कोणत्याही वाईट विकारांना स्पर्श होऊ न देता दुष्ट प्रवृत्तीपासून मन अलग ठेवून चित्त प्रसन्न व शांत ठेवणे.दुःख व षडू रिपूंच्या पलीकडे जाऊन अंतिम सत्यापर्यंत पोहोचण्यासाठी सात्विक मार्गाने जगता जगता हळूहळू मनाची तयारी होऊन ‘ हर्ष खेद ते
मावळले ‘अशी स्थिती आली कि मन विशुद्ध आनंदाने भरून जाते अंतर्यामीच्या या स्थितीला सम्यक समाधी म्हणता येईल.
पंचशील :
पंचशील हे बौद्ध धम्मातील एक आचरण नियमावली आहे . सामान्यतः पाच तत्वांना पंचशील म्हणून संबोधले जाते.पंचशील हे पाच नियम आहेत.पाच गुण आहेत.तथागत गौतम बुद्धांनी सामान्य माणसांकरिता आपल्या शरीरावर नियंत्रण ठेवण्यासाठी व शाब्दिक कृती नियंत्रित करण्यासाठी त्यापासून परावृत्त करण्यासाठी हे पाच गुण सांगितले आहेत या पंचशीलाची शिकवण तथागत गोतम बुद्धांनी आपल्या शिष्यांना दिली होती .
१ ) पाणातिपाता वेरमणी सिक्खापदं समादियामी :
मी जीव हिंसेपासून अलिप्त राहण्याची प्रतिज्ञा करत आहे .
२ ) अदिन्नदाना वेरमणी सिक्खापदं समादियामी :
मी चोरी करण्यापासून अलिप्त राहण्याची प्रतिज्ञा करत आहे .
३ ) कामेसुमिच्छाचारा वेरमणी सिक्खापदं समादियामी :
मी कामवासनेच्या अनाचारापासून अलिप्त राहण्याची प्रतिज्ञा करत आहे .
४ ) मुसावादा वेरमणी सिक्खापदं समादियामी :
मी खोटे बोलण्यापासून अलिप्त राहण्याची प्रतिज्ञा करत आहे .
५ .सुरा – मेरय -मज्ज पमादठ्ठाना वेरमणी सिक्खापद समादियामी :
मी मद्य (दारु )त्याचप्रमाणे मोहात पडणाऱ्या इतर मादक वस्तूंच्या सेवनापासून अलिप्त राहण्याची प्रतिज्ञा करत आहे.
व्यक्तीने मन व शरीरावर संयम ठेवून या पंचशीलाचे आचरण केले तर ती व्यक्ती शीलवान बनते.
 तथागत गौतम बुद्धांनी जात, संप्रदाय,वर्ण,सामाजिक दर्जा ह्या कोणत्याही बाबींचा विचार न करता सर्व व्यक्तींमध्ये समता प्रस्थापित करण्याविषयी धर्मोपदेश केला.विज्ञानवादी बौद्ध धम्माने लोकांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन बिंबवण्यासाठी सहाय्य केले आहे.लोकांमध्ये वैज्ञानिक दृष्टी येण्यास हातभार लावला आहे.विसाव्या शतकातील विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर आणि अल्बर्ट आईन्स्टाईन सारख्या अनेक विचारवंतांनी बौद्ध धम्मच खरा विज्ञानवादी धम्म असल्याचे सांगितलेले आहे ,म्हणूनच विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी बुद्ध धम्माचा स्वीकार करून प्रचार व प्रसार केला.बौद्ध धम्माने शिक्षण प्रसारास प्रोत्साहन दिले.बौद्ध विहार व बौद्ध मठ यांनी शिक्षण प्रसारणाचे केंद्र म्हणून कार्य केले. तथागत गौतम बुद्धांची शिकवण जगाला शांततेकडे नेणारी आहे आणि म्हणूनच आज जगाला युद्धाची नव्हे तर बुद्धाची गरज आहे .अशा या शांततावादी, मानवतावादी,विज्ञानवादी बुद्ध धम्माचे संस्थापक तथागत गौतम त्यांच्या जयंतीनिमित्त विनम्र वंदन ॥ आणि बुद्ध पौर्णिमेच्या सर्वाना हार्दिक शुभेच्छा ॥
डॉ.बाबासाहेब आंबेडकर राज्यस्तरीय साहित्यरत्न गौरव पुरस्कार प्राप्त साहित्यिक
 -प्रा.अरुण बाबारावजी बुंदेले,
रुक्मिणी नगर , अमरावती.
 भ्रमणध्वनी :८०८७७४८६०९

gauravprakashan1@gmail.com

Maharashtra News, Braking News, Marathi News, Most Popular Marathi News, Latest Marathi News,Today News,Marathi Article, Marathi Poem, Marathi Story,

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *