• Fri. Jun 9th, 2023

जगातील पहिला मोबाईल कॉल…!

३ एप्रिल १९७३ रोजी जगातील पहिला मोबाईल फोनवरून कॉल केला गेला. पोर्टेबल फोन या संकल्पनेची सुरूवात १९४६ मध्ये अमेरिकेत झाली होती. बेल सिस्टीम्सच्या मोबाईल टेलिफोन सर्विसने मिसुरी मधल्या सेंट लुईस या शहरात कार टेलिफोन सेवा देण्यास १७ जुन १९४६ रोजी सुरूवात केली. त्या पाठोपाठ इलिनॉईस बेल टेलिफोन कंपनीने हीच सेवा शिकागो शहरात २ ऑक्टोबर १९४६ पासून सुरू केली.
तत्कालीन मोबाईल फोन्स आताच्या फोन्सच्या तुलनेत अजस्त्र म्हणता येतील इतके मोठे आणि वजनाला अंदाजे ८० पाऊंड (३६ किलो) होते. सुरूवातीला या फोन्सवर फक्त ३ चॅनल्सच्या माध्यमातून संवाद साधता येत असे. ही सेवा १९७०-७२ पर्यंत केवळ कार्ससाठीच मर्यादित होती. पण १९७३ मध्ये मोटोरोला च्या पोर्टेबल कम्युनिकेशन प्रॉडक्टस चे चीफ जॉन एफ. मिशेल यांनी छोटेखानी मोबाईल डेव्हलप करण्यात मोलाची भुमिका बजावली.
३ एप्रिल १९७३ रोजी जॉन एफ. मिशेल यांचे साथीदार मार्टिन कूपरने आपल्या प्रतिस्पर्धी कंपनी बेल लॅब्सच्या डॉ. जोएल एनगेल याला छोटेखानी मोबाईलवरून जगातला पहिला मोबाईल कॉल लावला. या कॉल बद्दल मार्टिन म्हणाला होता, “जेव्हा मी न्यूयॉर्कच्या रस्त्यावरून हातात फोन धरून बोलत चाललो होतो, तेव्हा रस्त्यावरील लोकांनी मला भर गर्दीतही वाट मोकळी करून दिली होती. त्या वेळी चालता चालता मी बरेच कॉल्स केले, ज्या पैकी एक मी रस्ता ओलांडताना न्यूयॉर्क रेडिओ च्या निवेदकाला केला होता, जी तो पर्यंत मी केलेली सर्वात धोकादायक गोष्ट होती.”
हा जगातला पहिला मोबाईल फोन त्या काळी $३९९५ ला विकला गेला होता आणि त्याचं नाव होतं, ‘द ब्रिक’. त्या नंतर या क्षेत्रात अतिशय वेगाने बदल घडत गेले. १९७९ साली जपान मध्ये टोकियोच्या काही भागांसाठी सेवा देणारं NTT हे जगातलं पहिलं कमर्शियल सेल्युलर नेटवर्क उभं राहिलं. तरीही, नागरिकांसाठी पहिला फोन जवळपास १० वर्षांनी बाजारात आला. तो होता मोटोरोला Dyna TAC 8000X. ६ मार्च १९८३ रोजी हा फोन बाजारात आला. हा फोन $२९९५ ला विकला गेला. गंमत म्हणजे याचा टॉकटाईम होता फक्त ३० मिनीटं आणि याची बॅटरी चार्ज करण्यासाठी वेळ लागत असे १० ते ११ तास.
भारतात मोबाईल फोन्स यायला ९०चे दशक उजाडावं लागलं होतं. ३१ जुलै १९९५ रोजी भारतातील मोबाईल सेवा सुरू झाली. कोलकात्यातून ३१ जुलै १९९५ रोजी पहिला मोबाईल कॉल लावण्यात आला, हा कॉल केला होता पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री ज्योती बसू यांनी. मोबाइलचे जाळे देशात पहिल्यांदा कोठे अंथरले जाईल तर ते कोलकात्या मध्येच, हा त्यांचा हट्टाग्रह होता. ते सुरू झाले तेव्हा त्यांनी रायटर्स बिल्डींग मधून तेव्हाचे केंद्रीय दूरसंचारमंत्री सुखराम यांना पहिला मोबाईल फोन केला.
भारतातील पहिली मोबाईल ऑपरेटर कंपनी मोदी टेल्स्ट्रा (आताची स्पाईस) होती. त्याच्या सेवेचे नाव मोबाईल नेट असे होते. व यासाठी नोकिया-२११० हा हॅंडसेट वापरला गेला होता. त्यावेळी फक्त मूलभूत सुविधा असलेला मोबाईल तब्बल २५ ते ४५ हजारांना होता. देशातील पहिला मोबाईल कॉल याच नेटवर्कवरून करण्यात आला होता. अन्य देशांच्या तुलनेत भारतात मोबाईल सेवा अधिक लोकांपर्यंत पोहचण्यास वेळ लागला. याचे सर्वात महत्त्वाचे कारण म्हणजे महाग कॉल दर होते. सुरुवातीच्या काळात एका आऊटगोइंग कॉलसाठी प्रती मिनिटाला १६ रुपये मोजावे लागत. आऊटगोईंग कॉल्स बरोबरच इनकमिंग कॉल्ससाठी देखील पैसे द्यावे लागत होते.
-संजीव वेलणकर,
पुणे
९४२२३०१७३३
*संदर्भ : इंटरनेट
*संकलन :
मिलिंद पंडित, कल्याण*

gauravprakashan1@gmail.com

Maharashtra News, Braking News, Marathi News, Most Popular Marathi News, Latest Marathi News,Today News,Marathi Article, Marathi Poem, Marathi Story,

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *