• Mon. May 29th, 2023

डॉ. बाबासाहेब आंबेडकर

डॉ. बाबासाहेब आंबेडकर
आपल्या भारत देशाचा इतिहास महान आहे. ह्या पवित्र भूमीवर अनेक महापुरुषांनी जन्म घेऊन देशातील बांधवांसाठी अहोरात्र कार्य करून सामाजिक बांधिलकी व राष्ट्रनिष्ठा जोपासली आहे. त्या महान कार्याचा वारसा आजही देशवासियांसाठी आदर्श, मार्गदर्शक व दिशा दर्शक ठरलेला आहे. अशा त्या थोर महापुरुषात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव सर्वात वर आहे.
भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म वडील रामजी व आई भीमाबाई यांच्या पोटी १४ एप्रिल १८९१ रोजी इंदूर जिल्ह्यातील महू या गावात झाला.
रामजी वडिलांनी आपल्या मुलांवर चांगले संस्कार केले होते. त्यांना स्वतःला वाचनाची आवड असल्याने घरात ग्रंथसंग्रह होते. त्याच बरोबर मुलांना ही चांगली पुस्तके ते आणून द्यायचे. त्या कारणाने बाबासाहेबांना वाचनाची, अभ्यासपूर्ण चिंतनाची सवय लागली असावी.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुस्तकांचे खरे भोक्ते होते.त्यांनी हजारों पुस्तके वाचून , आपल्या आयुष्यात आचार आणि विचार यांची सांगड घातली आणि आपल्या तत्वज्ञानाला कृतीची जोड दिली. त्यांनी मनुष्य मात्रांच्या जीवनातील दुःख, दारिद्रय आणि क्लेश दूर करण्यासाठी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत आपले पूरे ज्ञान माहिती व बळ लावले आणि रंजल्या गांजल्या जनतेच्या तसेच स्त्री वर्गाच्या शेतकरी, मजूर वर्गाच्या आणि पददलितांच्या उद्धारार्थ आपले प्राण पणाला लावून समतेची मंगलवाट दाखविली आणि मानवतेची दिव्य ज्योत निर्माण केली अशी व्यक्ती केवळ वंदनीय नव्हे तर ती व्यक्ती प्रेरक, उद्धारक व तारक शक्ती ठरते.
डॉ. बाबासाहेब म्हणजे अष्टपैलू व्यक्तीमत्व होते. त्यांना प्रत्येक क्षेत्राचे परिपूर्ण ज्ञान व माहिती होती. सामाजिक, राजकीय, आर्थिक, शैक्षणिक धार्मिक, पत्रकारिता, कायदे अशा विविध क्षेत्रात आपल्या अमोघ वक्तृत्वाने व कुशल नेतृत्वाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दीन, दलितांच्या, श्रमिकांच्या विस्थापितांच्या, शोषितांच्या अंधकारमय जीवनाला प्रज्ञेचा संदेश दिला. गलितगात्र झालेल्या मनामनांतून समाजक्रांतीचे स्फुलींग चेतवून डॉ. आंबेडकर यांनी मुर्दाड झालेल्या समाजाला आपल्या हक्काप्रती जागृत करण्याचे महान कार्य केले.
महात्मा फुले, शाहू महाराज व आंबेडकर यांची विचारधारा एखाद्या अभेद्य साखाळीसारखी आहे. या तीनही महापुराषांवर युरोपमध्ये होऊन गेलेल्या प्रबोधनाच्या चळवळीचा परिणाम झाला होता. यालाच पुनरुज्जीवनवादी चळवळ म्हणतात. सन १८२७ ते १९५६ म्हणजे फुले-शाहू-आंबेडकरी विचारांनी म्हणजे जवळपास शे-सव्वाशे वर्षे समाजात बदलासाठी, परिवर्तनासाठी विचारांचे चैतन्य निर्माण केले होते.
फुले-शाहू-आंबेडकर यांच्या विचारांना कधीच प्रादेशिक, धर्मिक, जातीय सीमा नव्हत्या. त्यांचे बहुतेक विचार हे स्वातंत्र्य, समता, बंधुता, करुणा, शिक्षण हि वैश्विक मानवी मुल्ये आहेत. या मूल्यांचा जागर, प्रसार, प्रचार आणि नवनिर्मिती करण्यात या महापुरुषांनी आपले आयुष्य वेचले यात शंका नाही. जगातल्या अनेक राष्ट्रांनी आणि समाजाने या तीन महापुरुषांच्या विचारांची ढाल करून आपापल्या ठिकाणी लढण्याचा प्रयत्न केला आहे.
शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे. ते जो पिल तो माणूस गुरगुरल्या शिवाय राहणार नाही,” असे ते समाज बांधवांना सांगत. शिक्षण हे समाज परिवर्तनाचे प्रभावी शस्त्र आहे. शिक्षणाने माणसाला आपले कर्तव्य व हक्कांची जाणीव होते. समाजातील अस्पृश्य समाजाला स्वत्वाची जाणीव व्हावी या साठी त्यांनी शिक्षणाचे महत्व समाजात विशद केले.
शिक्षण प्राप्त झाल्याने व्यक्ती बौद्धिक दृष्टा सशक्त होतो. व्यक्तीला चांगले आणि वाईट यातील फरक समजायला लागतो.
प्रज्ञा, शील आणि करुणा हे गुण प्रत्येकाच्या अंगी आणण्यासाठी शिक्षणाची गरज त्यांनी प्रतिपादन केलेली आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर सत्याच्या मार्गावर चालणारे खरे मार्गदर्शक होते. भ्रष्टाचार, अनीति, अत्याचार, अन्यायास त्यांचा प्रखर विरोध होता. जातीभेदाच्या ते विरोधात होते. जातीभेद म्हणजे समाजाला लागलेली किड ते मानत असत. ही सामाजिक किड नष्ट केल्याशिवाय समाज एकसंघ होणार नाही असे ते समजत. डॉ. आंबेडकर म्हणजे तळागळातील लोकांना बौद्धिक व समाजिक गुलामगिरीतून मुक्त करुन त्यांना मंत्र देणारे एक पथदर्शक होते. शिकल्याशिवाय आपल्यावरील न्याय, अन्याय, आपले हक्क ही आपल्याला कळत नाही अशा प्रकारे त्यांनी सामाजिक क्रांतीचे रणशिंग समाजात फुंकले.
स्त्रियांना पुरुषांप्रमाणे समान हक्क मिळावेत यासाठी त्यांनी अनेक चळवळी केल्या. स्त्रियांची गुलामगिरी डॉ. आंबेडकरांनी दूर केली. १९२७ ते १९५६ पर्यंतच्या काळात बाबासाहेबांनी भारतीय स्त्रीचा सामाजिक, कायदेशीर आणि राजकीय दर्जा, वाढावा म्हणून सतत प्रयत्न केला. १९४२ साली भरलेल्या नागपूर येथील परिषदेत त्यांनी महिलांना सांगितले की, स्वच्छता पाळा, सर्व दु्र्गुणांपासून दुर रहा, मुलामुलींना शिक्षण द्या त्यांना महत्वाकांक्षी बनवा, त्यांचा न्यूनगंड दूर करा असा महत्वाचा उपदेश केला.
दलितांना त्यांचे हक्क मिळावे यासाठी त्यांनी त्यांच्या हक्कासाठी लढा दिला. श्रमजिवीच्या साठीही ते खंबीरपणे उभे राहिले. दलितांना मानाचे जीवन जगता यावे म्हणून ते सातत्याने संघर्ष करीत राहीले. केवळ दलितासाठीच नव्हे तर शेतकरी व मजूर यांच्या प्रश्नासंबंधी जोरदार लढा दिला.
अशा या महामानवाचे महान कार्य म्हणजे देशासाठी व समाजासाठीचे सामाजिक बांधिलकीचे कर्तव्य होय. डॉ. बाबासाहेब आंबेडकर या विश्वाला मिळालेली महान देणगी होय. अशा या महामानवाने 6 डिसेंबर 1956 साली अखेरचा श्वास घेतला आणि आपल्या कार्याचा ठसा मागे उमटवला.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना विनम्र अभिवादन
जय भीम जय भीम जय भीम
शोभा वागळे
मुंबई.
8850466717

gauravprakashan1@gmail.com

Maharashtra News, Braking News, Marathi News, Most Popular Marathi News, Latest Marathi News,Today News,Marathi Article, Marathi Poem, Marathi Story,

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *