आधारकार्ड काढून 10 वर्षे पूर्ण असल्यास कार्ड अपडेट करावे – जिल्हाधिकारी पवनीत कौर
गौरव प्रकाशन वृत्त संकलन
अमरावती (प्रतिनिधी) : आधारकार्ड काढून 10 वर्षे पूर्ण झालेल्या नागरिकांनी आपले कार्ड अद्ययावत करून घ्यावे, असे आवाहन जिल्हाधिकारी पवनीत कौर यांनी केले आहे.
आधारकार्डधारकांना स्वत:चे ओळखपत्र व रहिवाशी पत्त्याचा पुरावा अद्ययावत करण्यासाठी कार्डशी संलग्न मोबाईल क्रमांकावर एसएमएस पाठविण्यात आले आहेत. अद्ययावतीकरणासाठी कार्डधारकांनी स्वत:चे ओळखपत्र (निवडणूक ओळखपत्र, वाहन चालविण्याचा परवाना, पॅनकार्ड आदी) व रहिवासी पुरावा (वीज देयक, निवडणूक मतदार ओळखपत्र, बँक पासबुक, पाणी देयक, शिधापत्रिका आदी) कागदपत्रांसह आधार केंद्रावर जाऊन अपलोड करून घ्यावे. त्यासाठी 50 रूपये शुल्क आकारण्यात येईल.
तथापि,myaadhaar.uidai.gov.inया संकेतस्थळावर स्वत:हून कागदपत्रे अपलोड करता येतात. स्वत:हून कागदपत्रे अपलोड केल्यास 15 जूनपर्यंत ही सेवा विनामूल्य वापरता येईल. mAadhaar ॲपमार्फतही कागदपत्रे अपलोड करता येतील. हे ॲप गुगल प्ले स्टोरला मिळू शकेल.
विविध योजनांमध्ये पात्र व्यक्तींना शासकीय अनुदान व लाभ मिळण्यासाठी आधारकार्ड अपडेट असणे अत्यंत आवश्यक आहे. त्यामुळे आधारकार्ड काढून दहा वर्षे पूर्ण झालेल्या नागरिकांनी ते तत्काळ अद्ययावत करून घ्यावे, असे आवाहन जिल्हाधिकारी श्रीमती कौर यांनी केले.