भूतमारे गुरुजी..!

जुन्या काळातील गोष्ट आहे. बोडकी नदीच्या काठी एक गाव वसलेले होतं. त्या गावाचे नाव होते भुताचीवाडी. भुताच्यावाडीभोवती घनदाट झाडी होती. त्यात काही मोठी मोठी झाडे होती. काही खुरटी झुडपे होती. अनेक जातीच्या वेली होत्या.
 त्या घनदाट जंगलात वेगवेगळे प्राणी व पक्षीही राहत होते.रात्रीच्या वेळी जंगलातून वेगवेगळ्या प्रकारचे गुढ, रहस्यमय आवाज येत राहायचे. शंभर दिडशे घरं असलेलं गाव रात्रीला काळाकुट्ट अंधारात बुडालेलं असायचं. त्याकाळी गावात विज आलेली नव्हती. जंगलातले आवाज हे चित्रविचित्र असल्यामुळे त्यांना ते भुताचेच आवाज आहेत असे वाटायचे. गावात फार कमी लोक शिकलेले होते.शिकलेले होते म्हणजे अक्षर ओळख होती. बाकी सगळे काला अक्षर भैंस बराबर होतं. त्या गावातील लहान मोठी माणसं, बाया, पोरी, पोरं , म्हातारे, म्हातारी हे सर्वजण भुताच्याच गोष्टी करायचे.
. गाव अंधश्रद्धेत बुडालेलं होतं. त्या गावात नेहमीच भुताच्या गप्पा चालायच्या. तसेच करणी, भानामती यावरही भलताच विश्वास होता. कोणाला थोडं ताप आलं. कोणाला थंडी वाजाय लागली तर लोक म्हणायचे ,” हे काम त्या सुंदरीचं हाय. ती डाकीन हाय.गावात जे काही घडूलालेय ते केवळ सुंदरी मुळचं.” सुंदरी त्या गावातील एक विधवा बाई होती.ती दिसायला सुंदर होती. डोळे घारे होते.डोक्यावर लांबसडक केस होते.गावात कोणाच्या घरात काहीही घडलं तर चर्चा व्हायची ,”काल सुंदरी इतं आल्ती वाटतंय” गावात कोणाची गाय ,म्हैस ,शेळी दुध देईना गेली की लोक म्हणायचे सुंदरीनं करणी केली.दुसरं ठासून सांगायचा केली म्हणजे काय तीनं केलीच.गावात दुसरी किंवा दुसरं कोण हाय सांगा करणी करणारी.
 या गावाच्या पूर्वेला प्राथमिक शाळा होती. तर पाश्चिमेला स्मशानभूमी होती. गावाच्या शाळेत दोन शिक्षक होते. त्यापैकी एकाची बदली झाली. त्याच्या जागी नविन शिक्षक येणार होते. गावातील बदली झालेले गुरुजी या गावच्या शाळेतून दुसऱ्या गावी रुजू झाले. व त्याच्या जागी नविन गुरुजी रुजू व्हायला येणार होते. येणारे गुरुजी बऱ्याच दूर अंतरावरून येणार होते. भूताचीवाडी तालुक्याच्या ठिकाणापासून दूर होती. गावात येण्याजाण्यासाठी प्रवासाची काहीही साधनं नव्हती. कोठूनही या पायी पायी यावे लागे. गावाला यायला पाऊल वाट. नविन आलेले गुरुजी तालुक्याच्या ठिकाणाहून पायी निघाले. दिवस शनिवार होता. त्या दिवशी अमोशा होती. गुरुजीचं नाव होत सदाशिव दादाराव भुतमारे. गुरुजी लगबगीनं पायवाट तुडवत भूताच्या वाडीला निघाले.
 गुरुजीनं गावाबदल बरीच माहिती जमा करून घेतली होती. ते गाव भूताचं गाव म्हणुन ओळखलं जात होतं. गुरुजी झपाझप चालत होते. आंग घामाघुम झालं होतं. कपाळावरचं घाम पुसत, धोतर सावरत गुरुजी चालत होते. दिवस मावळतीला गेलेला. सूर्य टेकडी आड लपला तसा अंधार पडल्यासारखं झालं. स.दा. भूतमारे गुरुजी अंधविश्वासू नव्हते. तरी मनात भूताची भिती वाटत होती.आमोशेची रात. अंधार दाटून आलेलं. एकटेच गुरुजी पाऊल वाटेने चालत होते. आता जंगलातून रस्ता पार करायचा होता. रस्त्याच्या दोन्ही बाजूला काटेरी झुडपं होती. गुरुजीच्या धोतराचा सोगा काट्यात आडकत होतं. गुरुजीचं काळीज पाणी पाणी झालेलं तरी गुरुजी गाव लवकरात लवकर गाठण्यासाठी धडपडत होते. ठेचाळत होते. जंगलातून प्राणी व पक्ष्यांचे चित्रविचित्र आवाज येत होते.
गुरुजी भूतमारे आडनावाचे होते पण तेही घाबरले होते. शेवटी ते गावाजवळ आले. अंधुकसं प्रकाश घराघरातून दिसत होतं. कुत्री भुंकत होती. गुरुजीला खात्री पटली की आलो एकदाच गावाजवळ. स.दा. भूतमारे ज्या पाऊलवाटेने येत होते.ती पाऊलवाट स्मशानभूमीतून येत होती. गुरुजीला हे माहित नव्हतं. गुरुजी स्मशानभूमीत आले. किर्र अंधारात तेथे पाऊलवाटेच्या बाजूलाच कोणीतरी तिघं बसलेले होते. त्यांना निट बोलता येत नव्हतं. स दा भूतमारे त्यांच्या जवळ येवून थांबले. अंधारात गुरुजीला ते निट दिसत नव्हते. चेहराही दिसत नव्हता. गुरुजी म्हणाले , ” रामराम, मी नविन गुरुजी म्हणून भूताचीवाडी येथे आलोय. हे गाव भूताचीवाडी आहे का ?समोरून उत्तर आलं , ” आमाला नाही माहित गा, आमाला मरून लई वरसं झालीय.”भूतमारे गुरुजीने हे शब्द ऐकल्याबरोबर दातखीळी बसली. गुरुजी धोतर सावरत पळत सुटले व गावात पोहचले.
 गुरुजीनी गावाच्या पाटलाच्या घरी गेले. पाटलांनी गुरुजीची चांगली बडदास्त केली. जेवन झाल्यावर पाटील म्हणाले , गुर्जी बरीच हिंमत केलाव आज आमवश्या हाय. समशानातून पाऊलवाट येते बरं झालं सुखरूप आलाव. गुरुजी गावाजवळ भूतंखेतं काही भेटली नाहीत ना. हे ऐकून गुरुजी मनातून टरकलेच ;पण वरवर आव आणत म्हणाले , ” काय पाटील तुमी बी भूतावर विश्वास ठेवताव का ?भूतबीत काय बी नसत्यात ” पाटील म्हणाले , “काय सांगताव गुरुजी भूत असत्यात .आमच्या गावात तर हाईत बगा.”
 स.दा. भूतमारे यांनी मानात ठरवलं की या गावतील लोकांची अंधश्रध्दापासून मुक्ती केली पाहिजे. गुरुजीला किरायाने खोली सुंदरीच्या घराजवळ मिळाली. सुंदरीच्या घराजवळ पाण्याची आड होती. सर्व गाव तेथेच पाणी भरण्यासाठी येत. आड लहान होती. पाणी भरण्यासाठी गर्दी व्हायची. सुंदरीला सगळं गाव भीत होतं. तरी आड़ावर पाणी भरण्यासाठी बायाचे भांडणं व्हायचे. सुंदरी तर लईच घाग बाई होती.सुंदरीचं व एका बाईचं भांडण सुरु झालं. तेथे गुरुजी ही पाणी भरण्यासाठी आले. भांडण चालू होतं. गुरुजी म्हणाले , ” कशाला भांडण करताव एकेकांन भरा की ” तेवढयात एक बाई म्हणाली , ” ए मास्तर गप्प बैस. ती बाई करणी करतीया ”
 गुरुजी म्हणाले, ” ही बाई करणी करते का मग मीही हिची बेरीज करतो , वजाबाकी करतो , गुणाकार, भागाकार करतो. चौकोण त्रिकोण पंचकोण, षटकोण काढतो. हिची करणीभरणी काढतो. कर्ण काढतो.” हे शब्द ऐकल्यावर सगळेच शांत थांबले. गुरुजी सुंदरीपेक्षाही भारी आहेत आशी चर्चा गावात चालू झाली. सुंदरीही घाबरली. तिला करणी भानामती काहीही माहित नव्हतं. ती अंधश्रध्देची बळी ठरली होती.आता गावातील सगळेच गुरुजीला भिउन वागू लागले.
एकदा गावात चावडीवर बसलेले लोक चर्चा करत होते.आमोशेच्या दिवशी भूत निघतात. ते समशानभूमीत एकत्र येतात. नाचतात , गातात त्यांचा बाजार भरतो. त्याचे पाय उलटे असतात. दात नागराच्या फाळासारखे असतात. डोळे बैलगाडीच्या चाका ऐवढे मोठे असतात . ते कधी मुंगी एवढे लहान होतात तर कधी त्याचं डोस्क आभाळाला टेकते. भूतं हे समशान भूमीतील ते मोठं पिंपळाचं झाड हाय का नायी त्यावर राहतात . काही तर उलटे टांगल्यासारखे झांडावर असत्यात . भूतमारे गुरुजी हे सर्व ऐकत थांबले होते. त्यांचं बोलणं भुतमारे गुरुजीला पटलं नाही. गुरुजी म्हणाले , ” उगीच खोटया गप्पा का मारताव गा. या जगात भूत बीत कायी बी नसतया.” चावडीवर जमलेल्या पैकी एकजण म्हणाला, ” काय गुर्जी काय म्हणुलालाव भूत नायी मग जाताव का आमोसेच्या रातीला गावाचे मेलेले माणसं जाळतात तिथं. उगीच काय बी बोलू नका.” दुसरं माणुस म्हणाला , ” आरे गुर्जीची पुंगी बंद झाली गा. काय गुर्जी आता बोलताव का नायी ? “
 भुतमारे गुरुजीला भूत नसतात हे सिद्ध करायचं होतं. त्यांनी लोकांना सांगितलं, ” मी आमोशेच्या राती एकटाच स्मशानभूमीत जावून येताव.” लगेच कोणीतरी बोललं , इ राहू द्या गा. तुमी तितं गेलाव हे हामाला कसं कळल गा.” तेव्हा दुसरा म्हणाला, ” त्यात काय लई मोठी गोस्ट हाय होय . गुर्जीला एक लोखंडी मोठासा खिळा देवू गुर्जी त्या पिंपळाच्या झाडाच्या बुडाला खिळा ठोकून येत्यात आपुण सकाळी पाहुन मग सांगू गुर्जीनं खरं सांगिलय म्हणून. होय पटूलालेकी नायी म्या काय म्हणूलालाव ते.” सगळ्यांनी हो म्हणुन होकार दिला. भुतमारे गुरुजीनी गावाचं अव्हान स्विकारलं. गुरुजी म्हणाले , येणाऱ्या आमावशाला मी एकटाच रातच्या बाराला जावून खिळा ठोकून येताव “
गुरुवारचं दिवस होता. त्या दिवशी आमोशा होती. गावतली मंडळी दिवस बुडण्याची वाट पहात होती. दिवस एकदाचं टेकडीमागं गडप झालं. उजेडाची जागा हळूहळू अंधारानं घेतली. जंगलातून गुढआवाज येवू लागले . हिवाळा चालू होता बोचरी थंडी वाढत होती.
 चावडीवर लोक जमा होऊ लागले. थंडी वाढत होती .भूतमारे गुरुजी आले . अंगावर शाल पांघरली होती. गावातील एकाने मोठा खिळा आणलेला होता. तो खिळा गुरुजीच्या हातात देत म्हणाला, ” गुर्जी हे घ्या मोळा जावा झाडाला मारून या . आमी सगळे तुमची इतचं वाट बघताव.”
 भूतमारे मास्तराने खिळा घेतला. स्मशानभूमीकडे चालू लागला. भूतं नाहीत हे गुरुजीला गावातील लोकांना सिध्द करुन दाखवायचं होतं. अंधार मी मी म्हणत होतं. गुरुजी ठेचाळत चालत होते . ते त्या पिंपळाच्या झाडाखाली गेले. एक मोठासा दगड घेवून खिळा पिंपळाच्या बुंध्यावर ठोकून गावाकडे जाण्यासाठी निघाले ;पण त्यांना कोणीतरी शाल धरून ओढले . त्यांना सुरुवातीस भेटलेल्या तीन दारूडयांची आठवण झाली. ते तीनजण भूत होते की काय . ते काही भूत नव्हते.ते गावातील आट्टल दारुडे होते. त्याबरोबर गुरुजी जमीनीवर कोसळले ते उठलेच नाही.
गावकरी गुरुजीची रातभर वाट पाहिली. गुरुजी परत आलेच नाहीत. लाली फुटली. दिवस उजाडला. पक्षी किलबिलाट करु लागले. गावकरी स्मशानभूमीकडे निघाले .पिंपळाच्या झाडाखाली गुरुजी कायमची झोप घेत होते. लोकांनी त्यांना उठवण्याच प्रयत्न केला . गुरुजी ऊठले नाही . गुरुजीला लोकांनी उचललं तेव्हा लोकांना कळलं की गुरुजीची शाल खिळ्यासह बुडाला ठोकली गेली होती. तेथे भुत नव्हतं : पण गुरुजीला कोणीतरी ओढल्याचा भास झाला. त्यातच त्यांना हृदयविकाराचा झटका आला व गुरुजी गेले ;पण गाववाले म्हणत राहीले , ” जगात भूतं हाईत गा . मास्तराचं जीव भूतानचं घेतलया.”
– राठोड मोतीराम रुपसिंग
नांदेड -६
९९२२६५२४०७ .