• Tue. Jun 6th, 2023

स्त्री मनाच्या हळव्या भावभावनांचा काळजातून पाझरलेला कोंडमारा… चांदणं शब्दांचे

  * सौ.सायराबानू चौगुले यांचा कविता संग्रह

  सुखाचे माप ओलांडत ऐटीत काट्याकुट्यातून चालत, मनात आस धरून जीवनातला वसंत बहरत जाणारी कवयित्री. माणूस होऊ चला अशी हाक देतांना नात्याचे चटके सोसत विश्वासाने, श्रद्धेने, स्त्रीत्वाचा वारसा जपत, शेती मातीच्या पोशिंद्याच्या रंगमहाली स्त्रीमनाच्या कवितांची बरसात करीत अनेक विषय सहजतेने आणि सोप्या भाषेत मांडत आपल्या प्रतिभेच्या स्वच्छ प्रतिमानी मनातला कल्लोळ शब्दरूपात उतरवत विचाराचे एक एक बीज पेरत कवियित्री जाते. प्रेम,राग,वात्सल्य,आशा , आकांक्षा, हताशपणा, छळ, पिळवणूक, हव्यास, अत्याचार, बंधुभाव, माया अशी जीवनातील अनेक शल्ये सौ.सायराबानू मांडत जातात.

  कविता वाचतांना ओढूनताणून शब्दांची गंजी रचत न जाता त्यास भावनिक व हृदयातील झालर चढवत कविता वर वर चढत जाते. तिचा सुरवातीच्या प्रवासाचे अवलोकन केले तर आपणास लक्षात येईल जसजसे आपण कवितेचा आस्वाद घेत जातो तसतसे त्याची आशयातील चव वाढत जाते. ती सर्वसामान्यांचे प्रश्न घेऊन सजते. शब्दांचे चांदणे जरी शितल असले तरी त्यात सूर्याच्या तेजस्वी स्वत्वाची भावनिक धार आहे. शब्दांच्या चांदण्यात कविता पारीजातकासारखी उमलते, बहरते, तिच्या भावार्थाचा सुगंध मनाला मोहविल्याशिवाय राहत नाही. स्त्री मनात सलत असलेले दु:ख, आनंद यांचे काटे जरी बोचरे असले तरी तिचा शब्दांर्थ गुलाबपुष्पासारखा हवा हवासा वाटणारा आहे. असा हलकाफुलका कविता संग्रह वाचण्याचा मोह प्रत्येकांची होणारच.’

  अशा शब्द चांदण्याच्या शितल प्रकाशाचा आस्वाद देत असतांना कवयित्री सौ.सायराबानू चौगुले म्हणतात, “जीवन जगण्याचे अनेक कंगोरे मी माझ्या कवितेत रेखाटण्याचा प्रयत्न केला आहे. अशा भावना व्यक्त करतांना त्याला सामाजिक समस्यांची व उपायांची किनार आहे. मला मराठी संस्कृती, चालीरीती सण ,समारंभ प्रथा, परंपरा, उत्सव यांची पूर्ण व विशेष जाण आहे.त्यामुळे मी कोणत्याही विषयावर मराठीतून बोलत असते. बोलण्यातूनच वास्तवतेचा अंकुर फुटत असतो. ते अंकुरणे अस्सल असते आणि जे अस्सल असते ते दीर्घकाळ टिकते. ब-याच कविता अनुभवाच्या मुशीतून भाजून पक्क्या होऊनच येतात त्याचं पदार्पण साधे असेल पण ते ते अस्सल आहे हे नाकारता येत नाही.

  नक्षत्रांचे देणं काव्यमंचचे राष्ट्रीय अध्यक्ष कवी वादळकार प्रा. दशरथ सोनावणे सर हे, ‘ सामाजिक जाण असलेल्या संवेदनशील कवयित्रीचा स्वभाव संयमी, आत्मचिंतन करणारा मनमिळावू, अभ्यासू, समजूतदारपणे भरलेला आहे. त्यांचे व्यक्तिमत्त्व हे अष्टपैलू असून दुस-यांना समजून घेतांना त्या शांत संयमी असतात, स्वभावत: उत्तम कवयित्री असून कवितेवर प्रेम करत सर्व विषयांना स्पर्श करणाऱ्या जाणीवांचे आहे. ज्ञानदान करत सामाजिक कार्यातील सहभाग उत्तम असून संवेदनशील कवयित्री.’ अशा शब्दांत सायराबानूचे कौतुक करतात.

  कवयित्री फरझाना इकबाल, कराड या आपल्या प्रस्तावनेत लिहितात, “कविता लिहिणे म्हणजे मनातील भावनांचा कल्लोळ शब्दरुपाने कागदावर लिहून काढणे असे म्हटले तर ती वाचकाच्या हृदयापर्यंत पोहचू शकत नाही. तर भावनांचा कोंडमारा मनात झाल्याने अनेक विषयात कविता लिहिल्या आहेत. एक आदर्श शिक्षक सभोवताली घडणाऱ्या घटना जेंव्हा डोळसपणे पाहतो तेंव्हा निश्चितच तो समाजातील वाईट गोष्टींचा विरोध करतो. हे कविता वाचतांना जाणवते. उद्याच्या युवा पिढीकडून देशाचे चांगले भविष्य घडविण्याचे स्वप्न त्या पाहतात. आजचे राजकारण बदलून परत एकदा धर्म निरपेक्ष भारत घडवतील असा विश्वास वाटतो. स्त्रीवर अत्याचार होतो तेंव्हा त्यांचे ह्दय हेलावून जाते. व्यसानामुळे कित्येकांचे संसार उद्ध्वस्त होतात त्यावेळी व्यसन करु नये अशी कळकळीची विनंती त्या करतात.”

  सुखाचे माप ओलांडून या माझे हृदयाचे दार सदैव उघडेच आहे. कष्टास न घाबरता, भोवताली राबत्या झळा फिरत आहेत, आव्हाने झेलूनच भाग्य घडविले आहे तर तुम्ही श्रमाच्या मोत्यांची ढाल बनून या,काट्यातून फुले वेचते अशा वेळी वेदनावर शाल बनून या फुलांच्या ताटव्यातून सप्तसूरातून होकाराचे शब्द बनून माझी कसोटी पाहण्यास या अशी आव्हानात्मक पहिलीच कविता वाचतांना आतील कवितांचे विषय काय असतील ते कळते.अथांग सागरालाही किनाऱ्याची बांध असतात. हाच बांध उसळलेल्या लाटा शांत करतो, अर्धे विश्व जरी सागराने व्यापलेले असले तरी त्यास किनारा आहेच. सात्विकतेचे विचार पेरताना पुरूषार्थ लागतोच, अशा वेळी मती गुंग होते, चौकशाच्या नौबती झडतात, मन बधीर होते, चंगळवादाचे ग्रहण दाटते, अंधार वाढतो, सामाजिक जाणिवा वरवतात, गरिबांच्या चिता सदैव पेटत राहतात. अशा स्थितीत एकटीच नवी वाट शोधत राहते, वादळवारा साद घालतो, पर्वतासमान स्थितप्रज्ञ राहतांना सायराबानू म्हणते,(पृ.क्र.१३)

  “सागरात घेईन
  मी विलीन होऊन
  तरीही राहीन मी
  माझे वेगळेपण राखून”

  असे स्वत्व राखत, हसत खेळत, जीवन नव्याने जगण्याचा निश्चय करते. अशा वेळी विष ओकणारे असले तरी समरसून जीवन जगतांना म्हणते.(पृ क्र.१५)

  “मीच मुक्त माझ्या नभांगणी खुशाल
  थांबविण्याची मज कुणाची काय मजाल”

  कारण आईने कष्टाचे गीत गाण्याचा मंत्र दिला आहे. फाटक्याला टाके घालत, पै पै जमवत, दु:खाचे वारे पचवत, जगण्याचा मंत्र सोबत आहेच. आईचा, बहिणीचा, आजीचा, वहिनीचा पदर सदैव जीवनात जगण्याचे रंग भरत, जीवनातील वाटेवर सोबती होतात. कधी कधी सोबतीचे तोडून जातानाच्या वेदना “आस “, ‘त्या तिथे’, ‘चटके’ या कविता वाचतांना मन बधीर होते तरीही आशावाद हृदयात ठासून भरला आहे म्हणूनच त्या म्हणतात,(पृ.क्र.२४)

  “जपण्यास माणुसकीचे नाते
  थोडे माणूस होऊ चला.”

  आपलेपणाचे बंध स्वार्थाने दुरावतात, खोटा टेंभा मिरवतात, जगण्याची आशाच संपते, पाय खेचले जातात अशा बिकट परिस्थितीत घरटे जपत म्हणते,(पृ.क्र.२९)

  राहू सारे आनंदाने
  प्रेमाची गुंफण विणून
  कधी सैल न व्हावा
  एखादा धागा तुटून

  असा आशावाद पेरत असतांना हरवलेला गाव आठवतो अन् मन निराशेच्या खाईत जाते. शेती माती आठवत सुखाने घास भरवत राहते. रंग मैफलीत नरडीतल्या वंदना दाबल्या जातात , पाय नाचत राहतात टीचभर पोटासाठी, वासनेच्या भयानक नजरा सोसाव्या लागतात, अशी स्त्री जन्माची कहाणी, हुंडा, हव्यास, बलात्कार, अन्याय हे पायदळी तुडविण्यास सावित्री, फातिमाने शिकविले हे अभिमानाने सांगतांना, (पृ.क्र.४६)

  करूनी संघर्ष कर्मठाशी
  उघडलीस स्त्री शिक्षणाची दारे
  झेप घेण्या गगनी तिला
  खुली केलीस ज्ञानाची भांडारे
  तर फातिमा विषयी म्हणतात,(पृ.क्र.१२)
  सावित्रीसोबत फातिमाही जुन्या
  रितीपरंपराशी होती लढली
  मनी जातीपाती भेद सोडाच
  अक्षरांशी होती मैत्री जडली

  यांच्याच कर्तबगारीने आजची नारी साक्षरतेचा मंत्र जपते, प्रगती करतेय, पुरूषांच्या बरोबरीने राबते, कष्टाला घाबरत नाही, चुल आणि मूल याचा उंबरा ओलांडून दाही दिशा, स्वावलंबनाने आपले विश्व निर्माण करीत आहे. म्हणूनच सा-या आयांना त्या सांगतात,(पृ.क्र.६०)

  “घेवूनी सावित्रीचा वसा
  लेकी शिकवू चला
  मुलगा मुलगी एक मानूनी
  समानतेचा पाया रोखू चला
  या गं या गं सयानो
  एक प्रण करु चला”

  म्हणून माणसाला म्हणते, ‘अरे माणसा थोडं बदलून बघ, अनाथांचा नाथ हो, कुडकुडणा-याना शाल पांघर, अनवाणी पायात जोडा देवून बघ, भाजी विकणाऱ्या ताईच्या दोन जुडी घेऊन बघ, भुकेल्या जखवास दोन घास भरवं, असं जगलास तर तुझ्या माणुसकीला दुनिया सलाम करेल, स्त्रीचा सन्मान अजुनही होत नाही अशी खंत व्यक्त करतांना त्या म्हणतात,(पृ.क्र.७६)

  अबला समजूनी सा-यांनी तीस लुटले
  तिचे स्त्रीत्व आजही कुणा न पटले
  पुरुषी अहंकारात आजही ती होरपळत आहे’

  असे म्हणत कवयित्री एकटीच चालत राहते. वादळ वा-याशी लढते, संकटाचा सामना करते, पर्वतशिखरावर यशाचा झेंडा लावते, कारण तुला आपले वेगळे अस्तित्व जगाला दाखवायचे आहे म्हणून ती एकटीच चालते नव्या वाटा शोधत…चालतांना स्त्रीविषयक भान, आत्मसन्मानाने, कधी व्याकुळ होत, कधी निसर्ग संवर्धनाची आस धरत, कोणीच समजून न घेतलेल्या क्षणांची बोच मनावर घेत, आयुष्याच्या नव्या वाटेवर अबलाची सबला बनत कवयित्री जाते आहे.कवितेतील यमक उच्च प्रतीचे असून कवितेचा भावार्थ योग्य व अचूक मांडतात, साध्या सोप्या भाषेत आपल्या मनातील भाव कवितेत प्रतिमा आणि प्रतिभेच्या साह्याने मांडतात. सहज अर्थबोध होत जाणारी ही कविता नक्कीच सर्वांना आवडेल.

  ‘चांदणं शब्दांचं ‘ या कविता संग्रहात एकूण बाहत्तर कविता असून त्यातील काही कविता मनातला भावकल्लोळ उत्कटपणे मांडणाऱ्या कविता आहेत. उल्लेख करण्यासारख्या म्हणजे सुखांनो माप ओलांडून या, पेटण्या रक्त.., फातिमा ताई, शब्द, काट्यातून चालणे तुझे, आस, बहरु दे, माणूस होऊ चला, नाती, विश्वास, चिमणी, पदर, व्यसन, शिल्पकार, गाव, शेतीमाती, बंधन, त्याग, सावित्री, बुरखा, सय, बाधा, रान, मन चांदणं, शिवाजी, पैसा, माहेर, वारसा स्त्रीत्वाचा, स्वातंत्र्य गीत, बाबासाहेब आपले, घाव, बाबा, घर, शिल्पकार या कविता पुन्हा पुन्हा वाचाव्या अशा आहेत.

  ‘चांदणं शब्दांचं ‘हा काव्यसंग्रह सौ.सायराबानू वजीर चौगुले यांचा असून नक्षत्राचे देणं काव्यमंच यांच्या तर्फे साईराज पब्लिकेशन, भोसरी, पुणे येथून प्रकाशित झाला असून (मो.९३७३७४ ६५ ३३व ९६५७३४८६२) कवितासंग्रहाचे मुखपृष्ठ अप्रतिम असून ते चित्रकार संतोष घोंगडे याचे आहे. ते आतील कवितेला न्याय देणार असे आहे. कवयित्री फरझाला इकबाल,कराड यांची समर्पक आणि अभ्यासपूर्ण अशी प्रस्तावना असून कविता संग्रहातील अनेक कविता वाचनीय आहेत अशी शाब्बासकी त्या देतात, तसेच नक्षत्राचं देणं काव्यमंचचे राष्ट्रीय अध्यक्ष कवी वादळकार,प्रा.राजेंद्र दशरथ सोनवणे यांनी कवयित्रीच्या संयमी, आत्मचिंतन, मनमिळाऊ, अभ्यासू, समजूतदारपणा, अशा अष्टपैलू व्यक्तिमत्वाचे कौतुक करुन, मोजक्या शब्दात आभाळभर शुभेच्छा दिल्या आहेत. तसेच मलपृष्ठावर कवयित्रीच्या अभिव्यक्तीच्या पैलूची ओळख करुन देतात. एकंदरीत काव्य संग्रह वाचावा व संग्रही ठेवावा असा आहे.

  कवयित्री सायराबानू चौगुले यांचा काव्य संग्रह जेष्ठ साहित्यिक बा.ह.मगदूम सर, पुणे, जवळचे स्नेही यांच्यामुळे कवितासंग्रह वाचण्याचा आनंददायी योग आला. मी माझ्या अल्प बुध्दीने कवितांचा आस्वाद घेण्याचा जो प्रयत्न केला तो आपल्याला भावेल हीच अपेक्षा. कवयित्री सायराबानू चौगुले यांच्याकडून दर्जेदार साहित्याची निर्मिती व्हावी अशी अपेक्षा करुन त्यांच्या साहित्य प्रवासास मनापासून शुभेच्छा..!

  *कविता संग्रह : चांदणं शब्दांचं
  *कवयित्री : सौ.सायराबानू वजीर चौगुले,
  माणगाव, जि .रायगड
  मो.८४ ८४ ९३ २१ ४६.
  *प्रकाशक : नक्षत्राचं देणं काव्यमंच,
  साईराज पब्लिकेशन, भोसरी,पुणे.३९.
  मो.९६५७३४८२२ व ९३७३७४६५३३.
  *मुखपृष्ठ : संतोष घोंगडे
  *स्वागत मुल्य : १००रुपये.
  *आस्वादक
  मुबारक उमराण
  शामरावनगर, सांगली
  मो. ९७६६०८१०९७.
  ————–
  Tag :#article
  ————–

  तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? आम्हास आपल्या परिसरातील बातम्या, लेख अवश्य पाठवा आणि प्रतिनिधी बना ! ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Gaurav Prakashan फेसबुकपेज !

  ——————–

  आम्ही तुमच्यासमोर बातम्या, कथा, कविता, वाचनीय लेख अश्या खूप साऱ्या लेखामार्फत भेटत असतो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा, कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते, तसेच आमचे फेसबुक पेज ही नक्की लाईक करा, गौरव प्रकाशन युट्यूब चॅनेल लाईक Subscribe करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याचबरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद…!

  -बंडूकुमार धवणे
  संपादक गौरव प्रकाशन
  ——————–

gauravprakashan1@gmail.com

Maharashtra News, Braking News, Marathi News, Most Popular Marathi News, Latest Marathi News,Today News,Marathi Article, Marathi Poem, Marathi Story,

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *