• Sun. May 28th, 2023

शिक्षकांचे वाढते गैरवर्तन चिंताजनक….!

  शैक्षणीक क्षेत्रात शिक्षकाचा पेशा जितका महत्वाचा आहे तितकाच डॉक्टरचा ऑपरेशन करताना महत्वाचा आहे. केवळ शिक्षकच शिक्षण आणि शिष्याचा उद्देश पूर्ण करतात. म्हणूनच कोणत्याही शिक्षण व्यवस्थेचे किंवा शिक्षण योजनेचे यश किंवा अपयश हे शिक्षण क्षेत्रातील शिक्षकांच्या वृत्तीवर अवलंबून असते. आई-वडील मुलाला जन्म देतात. त्यांची जागा कोणीही घेऊ शकत नाही, त्यांचे ऋण आपण कोणत्याही स्वरूपात फेडू शकत नाही, परंतु आपल्या भारतीय संस्कृतीत शिक्षकांनाच पालकांच्या बरोबरीचा दर्जा दिला जातो.
  विद्यार्थ्यांचे व्यक्तिमत्व घडवण्यात शिक्षकाची महत्वाची भूमिका असते.

  शिक्षक हा समाजात सदैव पूजनीय असतो. शिक्षक ही समाजाची आधारशीला असून तोच राष्ट्राचे भविष्य निर्माण करण्याचे महत्त्वपूर्ण काम करतो. शिक्षकाला ईश्‍वराचा दर्जा दिला आहे. त्यांना अध्ययन, अध्यापन करणार्‍या ऋषीमुनींचे वारसदार म्हटले आहे. राष्ट्रसंपन्न, सामर्थ्यशाली, स्वावलंबी आणि प्रगत होते ते त्या राष्ट्राच्या शिक्षणाच्या दर्जावरून आणि हे कार्य करण्याचे शिवधनुष्य केवळ शिक्षकच पेलू शकतो.पावित्र्य, सदाचार, विश्‍वास, ज्ञान, सुख आदी सगळ्या शब्दांचा पर्याय हा शिक्षकच आहे. नैतिकता आणि चारित्र्य हेच शिक्षकांचे खरे भांडवल असते. तेच संपन्न असले पाहिजे.मात्र अलीकडे शिक्षकांचे वर्तन व चारित्र्य कुठ तरी हरवत असल्याचे दिसून येत आहे.शाळा व महाविद्यालयात शिक्षक गैरवर्तन करत असल्याच्या अनेक घटना समोर येत आहे.

  महाराष्ट्रातील पुरोगामी प्रांत म्हणून ओळख असलेल्या कोल्हापूर,पुणे गोंदिया व बुलढाण्यात शिक्षकांच्या गैरवर्तनाचे अनेक प्रकार समोर आले आहेत.गोंदिया तालुक्यातील जिल्हा परिषद शाळेतील एका शिक्षकाने एक नव्हे तर तब्बल आठ विद्यार्थिनींना अश्लील व्हिडिओ पाठवून वर्गात गैरवर्तन करायचा.२०फेब्रुवारी रोजी ही घटना घडली असून सदर शिक्षकाला अटक करण्यात आली आहे.

  बुलढाण्यातील मिलिटरी स्कूलच्या शिक्षकाने इयत्ता दहावीच्या दोन विद्यार्थ्यांसोबत गैरवर्तन केल्याची घटना समोर आली आहे. ही घटना महाराष्ट्रातील बुलढाणा येथील आहे. जिथे परीक्षेत नापास करण्याची भीती दाखवून शिक्षकाने आपल्यासोबत अन्याय केल्याचे संतप्त विद्यार्थ्यांनी आपल्या कुटुंबीयांना सांगितले होते. याप्रकरणी पोलीस ठाण्यात तक्रार करण्यात आली. तर आरोपी शिक्षक फरार आहे.

  शिक्षकी पेशाला काळीमा फासणारी घटना पुण्यातून समोर आली आहे. शिक्षकाने विद्यार्थीनी वर्गात एकटी असताना अश्लील कृत्य केल्याची घटना घडली आहे. पुण्यातील चंदननगर परिसरातील एका नामांकित शाळेत ही घटना घडली आहे. शिक्षणासाठी पालक शिक्षकांवर विश्वास ठेवून आपले पाल्य शिक्षकांकडे किंवा शाळेत पाठवतात. मात्र शिक्षकानेच असं कृत्य केल्याने मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे आणि शिवाय पालकंही शिक्षकाच्या कृत्यावर संताप व्यक्त करत आहेत.

  भविष्याचे नागरिक व नव्या पिढीला घडविण्याचे मोठे काम शिक्षकांचे असते. पण, शिक्षकांनीच क्रूर कार्य केले तर ती बाब केवळ विद्यार्थीच नाही तर शिक्षण व्यवस्थेला गालबोट लावणारी ठरते. वरील सर्व प्रकरणे त्याची साक्ष आहेत. विद्यार्थ्यांमध्ये जर शिक्षकांविषयीचा आदर कमी झाला तर त्याचा मोठा परिणाम ज्ञानदानावर होतो. त्याची असंख्य उदाहरणे आहेत. तसेच, अशा घटनांमधून वचपा काढण्याची विद्यार्थ्यांची मानसिकताही तयार होते. यातूनच काही विद्यार्थी टोकाचा निर्णय घेतात किंवा काही तरी वाईट कृत्य करतात. अशा अनेक घटना घडल्या आहेत.

  देश आणि राज्याच्या विकासात शिक्षण व्यवस्थेचे योगदान अतिशय मोलाचे आहे. ही व्यवस्था सुदृढ राहणे अत्यावश्यकच आहे. पण, अशा प्रवृत्ती बळावणार नाहीत आणि निर्माणही होणार नाहीत याची खबरदारी समाजावरच आहे. समाज जितका सुदृढ आणि कणखर तितकी अन्य व्यवस्था अधिक बळकट हे सूत्रच आहे. राज्याच्या शिक्षण विभागानेही या साऱ्या प्रकारांची दखल घेऊन कठोर निर्णय घेणे आवश्यक आहे. संबंधितांवर गुन्हा दाखल झाला आहे, म्हणजे सारे काही झाले अशा आविर्भावात राहणे अतिशय चुकीचे आहे. तसेच, केवळ त्या शिक्षकांवर कारवाई करणे इथवरच थांबता कामा नये. तर, असे प्रकार घडू नयेत, असे वातावरण आणि जरब निर्माण करणे ही सुद्धा आजच्या काळाची गरज आहे.

  पराकोटीच्या व्यावसायिकतेमुळे पालकांचा शाळांवर तोकडा विश्वास राहत आहे. अशा काही घटना घडल्या तर आहे तो विश्वासही नष्ट होण्याची भीती आहे. तसे झाले तर शिक्षणावर त्याचे परिणाम तर होतीलच पण नव्या पिढीवरील संस्कार आणि ज्ञानदानाच्या कार्यावरही त्याचे मूलगामी परिणाम होतील. राज्याचा शिक्षण विभाग, राज्य सरकार आणि केंद्र सरकार या सर्वांनी यासर्व प्रकरणात पुढाकार घेणे आवश्यक आहे. राज्यकर्ते तसे करीत नसतील तर लोकप्रतिनिधींनी तसा दबाव तयार करणे आवश्यक आहे. अशा घटना घडल्या तर त्याचे केवळ राजकारण होता कामा नये. किंवा केवळ निवेदन आणि मोर्चा काढण्यापुरता उत्साह राहू नये. अशा प्रकारच्या घटना केवळ उत्तर महाराष्ट्रातच घडल्या आहेत असे मुळीच नाही. राज्याच्या अन्य भागातही या घटना घडतच आहेत. त्याचे गांभीर्य ओळखून आवश्यक ती पावले उचलण्यातच खरे शहाणपण आहे.

  प्रा डॉ सुधीर अग्रवाल
  ९५६१५९४३०६
  ————–

  तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? आम्हास आपल्या परिसरातील बातम्या, लेख अवश्य पाठवा आणि प्रतिनिधी बना ! ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Gaurav Prakashan फेसबुकपेज !

  ——————–

  आम्ही तुमच्यासमोर बातम्या, कथा, कविता, वाचनीय लेख अश्या खूप साऱ्या लेखामार्फत भेटत असतो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा, कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते, तसेच आमचे फेसबुक पेज ही नक्की लाईक करा, गौरव प्रकाशन युट्यूब चॅनेल लाईक Subscribe करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याचबरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद…!

  -बंडूकुमार धवणे
  संपादक गौरव प्रकाशन
  ——————–

gauravprakashan1@gmail.com

Maharashtra News, Braking News, Marathi News, Most Popular Marathi News, Latest Marathi News,Today News,Marathi Article, Marathi Poem, Marathi Story,

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *