• Mon. Jun 5th, 2023

’विठोबा’ला तरी कोठे, खरे स्वातंत्र्य आहे का?

  जसजशी लोकसभेची निवडणूक जवळ येत आहे, तसतशी सज्जन आणि सभ्य लोकांची अस्वस्थता वाढतांना दिसते आहे. तिकडे मंबाजीच्या हालचालीही वाढत आहेत. मंबाजीची पिलावळ सर्वशक्तीनिशी कामाला लागली आहे. त्यांची भिस्त त्यांच्या स्वतःच्या कुटीलपणावर आहे. देशाच्या लुटीतून गोळा केलेल्या पैशावर आहे. द्वेष हा त्यांचा सर्वात मोठा आधार आहे. चन्द्रभागेच्या पाण्यात विष मिसळण्याची धडपड ते जिवाच्या आकांताने करताना दिसत आहेत. पंढरीचे पावित्र्य अबाधित राखण्याची जशी शेवटची संधी वारकऱ्यांसाठी आहे, तशीच मंबाजीच्या पिलांसाठी देखील, पंढरपूर आणि संपूर्ण चंद्रभागा ताब्यात घेण्याची ती शेवटची संधी आहे. दोन्ही बाजुंनी ’करा अथवा मरा’ अशीच २०२४ची लढाई आहे. विमान विकलं, रेल्वे विकली, एलआयसी विकली, जंगलं विकली, समुद्र विकला, तसे पंढरपूर आणि चंद्रभागा अडाणी-अंबानीच्या नावाने करण्याच्या हालचाली सुरू असण्याची शक्यता नाकारता येत नाही. काशी-विश्वनाथ कॉरिडॉरच्या निमीत्ताने गंगा घाटावरील सुमारे अडीचशे मंदिरं उद्ध्वस्त करण्याचा तगडा अनुभव त्यांच्या गाठीशी आहेच! त्यांना तुमच्या श्रद्धाही कॉर्पोरेटच्या हातात द्यायच्या आहेत.

  महाराष्ट्रातील मतदार भोळा आहे. साधा आहे. त्याला राजकारणातले छक्के पंजे फारसे कळत नाहीत. नेत्यानं खांद्यावर हात ठेवला की आमचा माणूस विरघळून जातो. त्याच्या घरच्या लग्नाला, बारशाला, तेरविला नेता हजर असला की, त्याला स्वर्ग मिळाल्याचा आनंद होतो. नेत्यासोबत फोटो काढला की बनियनला पडलेली सारी छिद्रं बुजून जातात. अंगावर मूठभर मांस चढते. तर काहींच्या अंगावर किलोच्या भावाने चरबी देखील चढते! ही सारी मानसिक दिवाळखोरीची किंवा मेंदू बधिर झाल्याची लक्षणं आहेत. आमच्या सामाजिक आणि राजकीय जाणिवा किती बालिश आहेत, याचे जिवंत पुरावे आहेत. आणि हे केवळ अशिक्षित किंवा खेडवळ लोकांना लागू होते असं नव्हे, तर तथाकथित विचारवंत, बुद्धिजीवी, लेखक वगैरे लोकांनाही जवळपास सारख्याच प्रमाणात लागू होते. कारणं काहीही असली तरी देश आणि तुमच्या आमच्या भवितव्याच्या दृष्टीनं २०२४ हे जीवन मरणाचे वर्ष आहे. देश या महाप्रलयाच्या तडाख्यातून वाचवायचा असेल, तर महाराष्ट्राची भूमिका मोलाची ठरणार आहे.

  अलिकडच्या काळात देशात जी संकटांची मालिका सुरू झाली आहे, त्याला जबाबदार केवळ संघ, भाजपा आहे, असं नव्हे. ते अर्धसत्य आहे. त्याला उद्धव ठाकरे जबाबदार आहेत, तसेच शरद पवार देखिल जबाबदार आहेत. हे कठोर सत्य मान्य केल्याशिवाय आपल्याला महाराष्ट्राच्या राजकारणाचा खरा आणि भयानक चेहरा ओळखता येणार नाही. देवेंद्र फडणवीस तेव्हाही महाराष्ट्र पातळीवरचे नेते नव्हते, आताही नाहीत. लोकशाहीमध्ये राजकीय अपघात होतच असतात. अशाच एका अपघातचं आणि शह-काटशहाचं राजकीय प्रॉडक्ट म्हणजे देवेंद्र फडणिविस आहेत! शरद पवार यांनी त्यांच्या सरकारासमोर बिनशर्त लोटांगण घातले नसते, तर २०१४लाच फडणविस सरकार धोक्यात आले असते. नरेंद्र मोदी सारख्या दैदिप्यमान(?) इतिहास असलेल्या माणसाला बारामतीला आमंत्रित करून त्यांच्या गळ्यात पडण्याचा राष्ट्रीय कार्यक्रम पवारांनी घडवून आणला नसता, तर कदाचित खुद्द शरद पवारांनाच झोप आली नसती. महाराष्ट्राच्या भवितव्यापेक्षा पवारांची झोप जास्त मोलाची आहे.

  सुदैवानं विदर्भ आणि मराठवाड्यातील राजकारण पवारांच्या तावडीत तेवढ्या मोठ्या प्रमाणात सापडले नाही. पण मोदी-शहा आणि संघ यांच्या विळख्यात मात्र सापडले आहे. त्यासाठी जातीय अस्मिता आणि वैयक्तिक स्वार्थाची प्रेरणा जास्त कारणीभूत आहे. आपला तेली, आपला कुणबी, आपला माळी, आपला मराठा, आपला धनगर, आपला वंजारी, आपला बंजारा ह्या आत्मघाती जाणिवा हल्ली जास्त प्रखर आहेत. जातीसमोर भल्याबुऱ्याची जराही काळजी करण्याची आम्हाला गरज वाटत नाही. हीच भारतीय लोकशाहीच्या पतनाची मुख्य कारणे आहेत. ज्या समाजाला केवळ ’आपल्या जातीचा आहे’ एवढ्या एकाच कारणासाठी चोर, डाकू देखिल पूजनीय वाटत असेल, तो समाज देशाच्या अध: पतनासाठी सर्वात जास्त जबाबदार असतो, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. विशेषतः सामाजिक चळवळी चालवणाऱ्या लोकांनी याचा गांभीर्यानं विचार करण्याची गरज आहे. गोपीनाथ मुंडे असोत की आणखी कुणी खडसे असोत, भाजपसारख्या पक्षाला वाढवण्यात हेच बहुजनातील लोक कारणीभूत आहेत.

  ह्या दुष्टचक्रातून महाराष्ट्राचं राजकारण बाहेर काढता येईल का..? नक्कीच काढता येईल..! बडवे आणि मंबाजीच्या पिलांची छुपी युती आणि त्यांची कारस्थान मोडून काढायची असतील, तर आपल्याला पुंडलिकाला जागं करावं लागेल. नवे ’तुकाराम’ शोधावे लागतील. खरे वारकरी ओळखावे लागतील. बडव्यांची दलाली करणारे तुमच्याआमच्यातले राजकीय वारकरी कोण आहेत, हेही तटस्थपणे समजून घ्यावं लागेल. व्यक्तीपुजेतून बाहेर यावं लागेल. केवळ इतिहास, इतिहास आणि इतिहास या चक्रव्यूहात फसलेल्या आणि गटांगळ्या खात असलेल्या आमच्या तथाकथित चळवळी आम्हाला कठोरपणे शुध्द करून घ्याव्या लागतील. त्यांची फेरमांडणी करावी लागेल. साऱ्याच पक्षात एक साचालेपणा आलेला आहे. पाणी सडायला लागले आहे. दुर्गंधी पसरु लागली आहे. ते थांबवावे लागेल.

  वेळ अजून गेलेली नाही. महाराष्ट्राच्या राजकारणात नव्या दमाचे समंजस असे १०० नवे तरुण नेते जरी समोर आलेत, तरी महाराष्ट्रात नवा इतिहास लिहिला जाऊ शकतो. मात्र त्यासाठी शेतकरी हाच या नव्या मांडणीचा केंद्रबिंदू असायला हवा.

  अर्थात्, शेतकऱ्यांच्या लढाईला जसजशी धार येत जाईल, तसतसे गैरसमज पसरवले जातील. संभ्रम निर्माण केला जाईल. काही तकलादू किंवा चुकीची माणसं घुसवली जातील. तेवढी काळजी आपल्याला घ्यावीच लागेल. महाराष्ट्राच्या राजकारणाच्या दृष्टीने पुढील तीन महिने म्हणा किंवा येत्या पावसाळ्याआधीचा हंगाम फार महत्त्वाचा ठरणार आहे. वातावरणात हालचाली सुरू झालेल्या आहेत. एक अनोखा पाऊस, एक अनोखा हंगाम, नवे मोसमी वारे महाराष्ट्राच्या भूमीतून थेट दिल्लीच्या दिशेने निघालेले आहेत. अशावेळी ’विठ्ठल’ही सावध असायला हवा, तसे ’वारकरी’ही सावध असायला हवे आहेत. जिथून जिथून दिंडी जाणार आहे, त्या वाटेवरची गावेही सज्ज हवी आहेत. बडव्यांच्या तावडीतून लोकशाहीची पंढरी मुक्त करण्यासाठीची आरपारची लढाई आता सुरू झालेली आहे. त्यासाठी आपणही तयार राहू या..!

  नको तो टाळ तंबोरा, नको वारी तुकारामा
  विठूचे वाढले आहे, बिपी भारी तुकारामा !
  तिथे फासावरी कोणी, नवा राघू पुन्हा मेला
  पुन्हा आसू, पुन्हा टाहो, घरीदारी तुकारामा !
  नभीच्या सावल्या बघुनी, किती धास्तावल्या गाई
  गिधाडे केवढी जमली, किती घारी तुकारामा ?
  कशाला पंढरी जाऊ, नको स्वर्गातही जागा
  तनाची पंढरी माझी, मला प्यारी तुकारामा !
  विठोबाला तरी कोठे, खरे स्वातंत्र्य आहे का
  पहा बडवेच लुटती रे, मजा सारी तुकारामा !
  तूर्तास एवढंच..!
  ज्ञानेश वाकुडकर
  अध्यक्ष,
  लोकजागर अभियान 9822278988
  (दैनिक देशोन्नती साभार)
  ————–

  तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? आम्हास आपल्या परिसरातील बातम्या, लेख अवश्य पाठवा आणि प्रतिनिधी बना ! ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Gaurav Prakashan फेसबुकपेज !

  ——————–

  आम्ही तुमच्यासमोर बातम्या, कथा, कविता, वाचनीय लेख अश्या खूप साऱ्या लेखामार्फत भेटत असतो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा, कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते, तसेच आमचे फेसबुक पेज ही नक्की लाईक करा, गौरव प्रकाशन युट्यूब चॅनेल लाईक Subscribe करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याचबरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद…!

  -बंडूकुमार धवणे
  संपादक गौरव प्रकाशन
  ——————–

gauravprakashan1@gmail.com

Maharashtra News, Braking News, Marathi News, Most Popular Marathi News, Latest Marathi News,Today News,Marathi Article, Marathi Poem, Marathi Story,

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *