• Tue. Sep 19th, 2023

प्रत्येकाची आई महान, तेवढीच महत्वाची.!

  आई म्हटलं तर आई या शब्दातच महान अर्थ दडलेला आहे. आ म्हणजे आधार देणारी व ई म्हणजे ईमानदारी शिकविणारी. आ चा अर्थ आधार देणे असा लावल्यास खरंच आई आधार देते का? असा प्रश्न पडतो. त्याचं उत्तर होय असंच आहे. आई ही आपल्या बाळाला बापापेक्षा जास्त प्रमाणात आधार देत असते. ती सर्वप्रथम आपल्या बाळाला स्वगर्भात नऊ महिने ठेवते. अन्न पाणी पुरवते. त्याचं नवही महिने संरक्षण करते. त्याला त्रास होवू देत नाही. चांगलं संगोपन करते. त्यानंतर ते बाळ जेव्हा गर्भातून बाहेर पडतं. तेव्हा मात्र तिच आई उन्हातून सावलीत नेल्यागत त्याचं गर्भाबाहेरही संगोपन करते. अगदी त्याचा विवाह होईपर्यंत. एवढंच नाही तर विवाह झाल्यानंतरही ती जेव्हापर्यंत आपले डोळे मिटत नाही. तेव्हापर्यंत आपली आई आपल्याला सांभाळून घेत असते. मग आपल्या कितीही मोठ्या चुका असल्या तरी आपली आई त्या पदरात घेवून आपल्याला माफ करते. हा झाला आधाराचा विषय. आता ई चा विषय. ई या विषयानुसार प्रत्येकच आई ही प्रत्येकाला ईमानदारी शिकवीत असते नव्हे ती ईमानदारीने जगायला लावते.

  Thank you for reading this post, don't forget to subscribe!

  आपण कितवंही तिचं मुल असलो तरी ती आपल्याला वाढवितांना भेदभाव करीत नाही. ती सर्वांनाच प्रेमानं वाढवतेआणि आपली आई जेव्हा जन्म देते ना. तेव्हा तिच्या मनात राग नसतोच आपल्या जन्माबद्दल. आपण तिचं कितवंही मुल असलो तरी. प्रचंड आनंद असतो. त्या आनंदासाठीच ती अतिशय वेदना सहन करते प्रसववेळी आणि आपल्याला जन्म देत असते.

  आई आपल्याला आधार देते एखाद्या वृक्षाच्या बुंध्यासारखी. बदल्यात आपण तिला काय देतो. आपण तिला राग द्वेषाची शिकार बनवतो. आपण तरुण झालो की आपल्या वागण्यात प्रचंड चीड निर्माण होते. वाटतं की आपल्या आईनं आपल्याला जन्माला घालून फार मोठी चूक केली. अशावेळेला आपल्या घरात आलेली व जिची ओळख नव्हती, ती मुलगी आपल्याला सर्वस्व वाटायला लागते. मग तिनं जर म्हटलं की तुमची आई जास्त वटवट करते, तिला वृद्धाश्रमात टाका तर आपण आपल्याच आईला तिचे सर्व उपकार विसरून वृद्धाश्रमात टाकायला तयार होतो. ही आपली वास्तविकता. होय, आपण मानावं की आपली पत्नी आपले सर्वस्व आहे. आपल्या आईनंतर तिच जगण्याचं साधन आहे. आपल्याला जीवनात जगण्यासाठी व आपल्या जीवनात विरंगुळा आणण्यासाठी आपली आई आपली पत्नी माता बनून आपल्या जीवनात बहार आणत असते. याचा अर्थ असा नाही की आपण आपल्या आईला पत्नीच्या म्हणण्यानुसार वृद्धाश्रमात टाकावे. आपण आपल्या पत्नीच्या म्हणण्यानुसार तिला वृद्धाश्रमात टाकू नये.

  आपली आई ही आपली आई असते. इतरांच्या मातेला कितीही आपण आई म्हटलं आणि कितीही तिच्यावर प्रेम केलं तरी ती आपली आई होवूच शकत नाही. ती कधी ना कधी रंग दाखवतेच. कधी एखाद्या वेळी महाभयंकर संकट आपल्यावर आलं की आपल्या आईला जेवढे दुःख होईल, तेवढे दुःख मानलेल्या आईला होणार नाही. तसंच कोणालाही कोणतीही आई विकत मिळूच शकत नाही. सर्वकाही मिळू शकेल.

  आपल्या आईला ईमानदारी आवडते. तसंच कोणत्याही आईला तिचा मुलगा चोर वा गुंडा बनावा असं वाटत नाही. तिचा मुलगा जर असा गुंडा वा चोर बनला तर तिला भयंकर राग येतो. तसंच जर तिचा मुलगा चोर वा गुंडा बनलाच तर तिला जे दुःख होतं. ते दुःख ती विषद करु शकत नाही वा तिला ते दुःख व्यक्त करता येत नाही. याचाच अर्थ असा की आपल्या ब-यावाईट वागण्यावर आपल्या आईचं दुःख वा सुख अवलंबून असतं. मग असं जर आहे तर तिला आपण दुःख का द्यावं? तिचे उपचार असतात आपल्यावर. मग तिला वृद्धाश्रमात का टाकावं? आपल्याला आई जर आवडते, मग आपण गुंड वा चोर का बनावं?

  आपली आई आपल्याला जगवते. मग ती प्रसंगी आपल्याला जगविण्यासाठी कोणतंही काम करते. याचा अर्थ असा नाही की ती आपल्याला चोर, बदमाश बनवते? ती आपल्याला जगविण्यासाठी प्रसंगी चोर, बदमाश बनूही शकते कदाचीत. परंतू ती आपल्याला चोर, बदमाश बनायला शिकवीत नाही. असे असतांना आपण तिच्यापासून चांगला बोध घ्यावा. आपल्या स्वतःत संस्काराचं बीजारोपण करावं. आपल्या आईच्या इच्छा पुर्ण कराव्यात. ती आपल्याला आधार देते लहानपणापासूनच. आपल्यासाठीच कर्तव्य करते. मग आपणही तिच्या कर्तव्याचे देणे लागतो. आपण तिला त्रास देवू नये. तिला वृद्धाश्रमात टाकू नये. तिला वृद्धापकाळी आधार द्यावा. तिच्याकडून ईमानदारी शिकावी व आपलं स्वतःचं कल्याण करुन घ्यावं. हं, पत्नीची गोष्ट अवश्य मानावी. जी आईविरोधी नसेल. जर आपली पत्नी आपल्या आईच्या विरोधात गोष्ट करीत असेल तर त्या गोष्टी ऐकू नये. तिला समजावून सांगावे. यातच तुमचं भलं आहे. तसंच पत्नी बनणा-या महिलेनंही एक गोष्ट लक्षात घ्यावी. ती म्हणजे आपला पतीदेव जर आपल्या आईबापाचा उद्धार करीत असेल तर ते ऐकू नये. कारण आपले मायबाप व आपल्या पतीचे मायबाप देवच असतात. त्या दोघांमिळून आपला संसार बनत असतो. तसेच आपला संसार फुलत असतो.

  महत्वाचं सांगायचं म्हणजे आपली आई महान असते शिवरायांना घडविणारी. आईनंही तसंच सांगायला हवं की संपुर्ण हिंदवी स्वराज्य निर्माण होईल. याचा अर्थ असा की आईनंही बाळाच्याही कल्याणाचा विचार करावा. तसं ती करतेच. तसंच त्या बाळाचं जीवनही उध्वस्त करण्याचा विचार करु नये.

  आज आपल्याला घराघरात पाहायला मिळत असतं सासू सुनेचं भांडण. का होतं? कारण प्रत्येक जण स्वतःला थोर समजतं. सासूला वाटते की मी महान आहे. कारण मी जन्म दिला माझ्या मुलाला व मी लहानाचं मोठं केलं. मग मुलानं माझंच ऐकावं. परंतू मुलगा जेव्हा ऐकत नाही. तेव्हा भ्रमनिरास होतो, निराशा येते व भांडण होतं. कारण मुलगा घरात येणा-या नव्या नवरीचं म्हणजे पत्नीचं ऐकत असतो. तसंच पत्नीलाही वाटत असते की तिच्या पतीनं तिचंच ऐकावं. कारण ती त्याला सांभाळणार आहे शेवटपर्यंत. तिनं त्याला सर्वस्व बहाल केलं आहे. एखाद्या पुरस्कारासारखं. ते पती असलेला व्यक्ती जेव्हा ऐकत नाही. तेव्हाही भ्रमनिरास होते पत्नी. पदरी निराशाच येते. मग सूर निघतो. कशाला केलं लग्न? आपल्या आईलाच ठेवायला हवं होतं. अशावेळेस भांडण होतं. ते भांडण विकोपाला जातं. त्यातूनच घटस्फोटाची प्रकरणं उभी राहतात मुलगा जर आईचं ऐकत असेल तर. नाही तर आई वृद्धाश्रमात जाते मुलगा जर पत्नीचं ऐकत असेल तर. सर्व इगोचा प्रश्न. माझंच ऐका. मलाच मोठं स्थान द्या म्हणून भांडण. यात सासू आणि सून एकाच नाण्याच्या दोन बाजू. दोघांनीही एकमेकांशी जुळवून घ्यायला हवं. परंतू तसं होत नाही. म्हणून वाद येतो.

   विशेष सांगायचं म्हणजे घरात येणा-या सुनंनं आपण मोठे असल्याचा आव आणू नये व त्यावरुन त्यानुसार भांडण करु नये. तिनं हे लक्षात घ्यावं की आपणही उद्या सासू बनू. तेव्हा परमेश्वर आपल्याकडून असाच बदला घेईल. कारण जशास तसं ही आजची पद्धत आहे. जी परमेशालाही आवडते. तो तसाच निकाल देतो याबाबत बरीच प्रकरणं घडली आहेत. आज इथंच करावं लागतं आणि इथंच भरावं लागतं. तसंच सासूनंही लक्षात घ्यावं की आपल्याला आता म्हातारपण येणार. आपले हालहाल होणार. त्यात आपली सूनच आपल्याला सांभाळणार. तेव्हा आपण जास्त वटवट करु नये. म्हातारपण चांगलं जायला हवं. असा जेव्हा विचार सर्वजण करतील. तेव्हाच सासू सुनाचे नातेपण टिकेल. वाद होणार नाहीत व आईपणालाही किंमत येईल. प्रत्येकाची महान असते आणि तेवढीच महत्वाचीही. हे तेवढंच खरं.

   -अंकुश शिंगाडे
   नागपूर
   ९३७३३५९४५०
   ————–

   तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? आम्हास आपल्या परिसरातील बातम्या, लेख अवश्य पाठवा आणि प्रतिनिधी बना ! ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Gaurav Prakashan फेसबुकपेज !

   ——————–

   आम्ही तुमच्यासमोर बातम्या, कथा, कविता, वाचनीय लेख अश्या खूप साऱ्या लेखामार्फत भेटत असतो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा, कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते, तसेच आमचे फेसबुक पेज ही नक्की लाईक करा, गौरव प्रकाशन युट्यूब चॅनेल लाईक Subscribe करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याचबरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद…!

   -बंडूकुमार धवणे
   संपादक गौरव प्रकाशन
   ——————–

gauravprakashan1@gmail.com

Maharashtra News, Braking News, Marathi News, Most Popular Marathi News, Latest Marathi News,Today News,Marathi Article, Marathi Poem, Marathi Story,