Translate

Gaurav Prakashan

Recent in Technology

Advertisement

Breaking News

राष्ट्रपिता महात्मा गांधी अमर रहे !

  महात्मा गांधी या नावाची जादू गेले शतकभर भारत तसेच जगाच्या अनेक भागात चालली,तशीच अजूनही चालूच आहे. आणखी बरीच वर्षे या नावाला विसरणे कुणाला शक्य होणार नाही,अशी चिन्हे सध्या दिसत आहेत. कारण की महात्मा गांधी हे नाव केवळ एखाद्या व्यक्तीपुरते सीमित नाही तर ते एका सार्वत्रिक मुल्याचे प्रतीक ठरलेले आहे. ही सार्वत्रिकता जशी विचारसरणीशी निगडीत आहे,तशीच ती आचारसरणीशीही संबद्ध आहे. विचार आणि आचार यांचा अनुबंध घट्टपणे सांधणाऱ्या व्यक्तीचे नाव आहे, महात्मा गांधी. म्हणून ते जसे अनुयायांना विसरता येत नाही, तसेच ते विरोधकांनाही नाकारता येत नाही. किमान नाकारण्याच्या निमित्ताने तरी गांधीविचार विरोधकांना वारंवार मांडावा लागतो. त्याचा दृश्य परिणाम इतका तीव्र असतो,की शेवटी तो विरोधकांनाही स्वीकारावासा वाटतो. या प्रक्रियेला प्रारंभ होऊनही आता शंभर वर्षे झाली आहेत. अर्थात, या प्रक्रियेचीही शताब्दी झाली आहे.

  १९१८ साली महात्मा गांधी यांच्या पट्टशिष्या अवंतिकाबाई गोखले यांनी महात्मा गांधींचे चरित्र लिहिले. गांधीजींच्या या पहिल्या-वहिल्या चरित्राला प्रस्तावना लिहिली आहे,लोकमान्य टिळकांनी. स्वराज्याच्या चळवळीतील जहाल गटाच्या टिळकांनी मवाळ गटातल्या गांधीजींच्या चरित्राला प्रस्तावना लिहिणे हे वरवर दिसायला विसंगत वाटत असले तरी त्यातही एक प्रकारची सुसंगती आहे. टिळकांनी या प्रस्तावनेत गांधीजींच्या सत्याग्रहाच्या संकल्पनेचे स्वागत करून त्यांना हा मार्ग प्रतिकूल परिस्थितीत सुचला असून तो त्यांच्या कर्तृत्वाने शास्त्रपूत झाला आहे, असे म्हणून एका परीने गांधी विचाराला मान्यताच दिलेली आहे. टिळकांच्या विचारसरणीत अहिंसेला कोणतेही स्थान नव्हते,तरीही गांधीजींच्या अहिंसेच्या मार्गाने करावयाच्या आंदोलनाला त्यांनी या प्रस्तावनेत पाठिंबा दिलेला आहे. गांधीजी जिवंत असताना आणि त्यांचे कार्य पूर्ण व्हायच्या आधीच त्यांचे चरित्र लिहिले जाणे आणि त्याला टिळकांसारख्या विरोधी विचारांच्या माणसाने प्रस्तावना लिहिणे हेही एक अप्रूपच आहे.

  महात्मा गांधींच्या नेतृत्वाचा उदय टिळकांच्या मृत्यूनंतर झाला असे म्हणणारे व लिहिणारे आजही आपणास दिसतात. परंतु, टिळकांच्या हयातीतच गांधी युगाचा प्रारंभ झाला होता हे एक वास्तव आहे. टिळकांच्या मृत्यूनंतर मात्र गांधीजींच्या नेतृत्वाचा स्वीकार अनेकांनी केला, तसाच तो टिळकांच्या काही अनुयायांनीही केला होता. टिळकांची पुणेरी पगडी घालणाऱ्या कृष्णाजी प्रभाकर खाडीलकर,लोकनायक बापुजी अणे यांच्यासारख्या टिळकाईट लोकांच्या डोक्यावर गांधी टोपी दिसायला लागली होती. परंतु,ज्यांना गांधीजींच्या विचारात मिळमिळीतपणा वाटत होता,अशा क्रांतिप्रेमी तसेच हिंसा समर्थक लोकांनी कॉंग्रेसला तिलांजली देउन आपला नवा मार्ग चोखाळला होता. टिळकांच्या अनुयायांची विभागणी सामान्यपणे तीन टोळ्यांमध्ये झाली होती. त्यापैकी एक टोळी साम्यवादी विचाराकडे वळली,दुसरी टोळी समाजवादी विचारांची समर्थक होती,तर तिसऱ्या टोळीने रा.स्व.संघाला जन्म दिला.

  या तीनही टोळ्या आज कळत-नकळत गांधीविचाराचे समर्थन करीत आहेत. ‘गांधी विरुद्ध लेनिन’ हे पुस्तक लिहिणाऱ्या कॉ.श्रीपाद अमृत डांगे यांनी भारतीय साम्यवादी पक्षाची स्थापना केल्यानंतर रशियात जावून कॉ.लेनिनची भेट घेतली होती. या भेटीत लेनिनने डांगेंना प्रश्न केला की, आज भारतीय लोक कुणाला अधिक मानतात ? त्यावर उत्तरादाखल कॉ. डांगे यांनी स्वाभाविकपणे गांधीजींचे नाव घेतले. त्यामुळे तुम्ही त्यांच्यासोबतच राहा असा सल्ला लेनिनने डांगेंना दिला. त्यानंतर साम्यवादी आणि गांधीवादी हे वैचारिकदृष्ट्या तसेच कृतिशीलतेच्या बाबतीतही विळ्या-भोपळ्याचं वैर असलेले लोक काँग्रेससोबत राहत आले,तसेच अजूनही राहतात.

  समाजवादी लोकांनी सतत परस्पर विरोधी विचारांच्या लोकांमध्ये समन्वयाचे कार्य केलेले आहे,त्यामुळे समन्वयाचे प्रतीक म्हणून त्यांना नेहमीच गांधीजींचा आश्रय घ्यावा लागला. त्यातून गांधीविचार अधिक बळकट झाला. समाजवाद्यांच्या व्यक्तीस्वातंत्र्याविषयीच्या अतिरेकी आग्रहामुळे मात्र त्यांची वाताहत झाली. त्यांची अनेक शकले झालीत व ती प्रक्रिया अजूनही चालूच आहे. त्याला त्यांचा अहं कारणीभूत आहे,असे सामान्यपणे मानले जाते. जर त्यांनी खऱ्या अर्थाने गांधीविचार आत्मसात केला असता तर कदाचित त्यांचा पक्षही अबाधित राहिला असता व त्यांची विश्वासार्हताही.

  रा.स्व.संघाने सतत गांधीविचाराचा विरोध करण्याचा पावित्रा घेतला. त्यामुळे कदाचित गांधी हत्येशी त्यांचे नाव जोडण्यात आले असावे. सततच्या अशा आरोपामुळे शेवटी त्यांनी महात्मा गांधी यांचा समावेश आपल्या प्रातःस्मरणीय व्यक्तींमध्ये करून टाकला. म्हणजेच अधिकृतपणे गांधीविचाराला मान्यता दिली. गांधीवादी समाजवाद हा शब्द त्यामुळे पुढे आला. त्यातून संघाच्या कट्टरपंथीय लोकांची पंचाईत झाली. राजकीय सत्ता पूर्णपणे हातात आल्यावर तर त्यांनी महात्मा गांधी यांच्या विचारसरणीवर आधारित उपक्रमांचीही अंमलबजावणी सुरू केली. गांधीहत्येच्या कटात सहभागी होऊन जन्मठेपेची शिक्षा भोगून आल्यावर गोपाल गोडसे यांनी ‘गांधीहत्या आणि मी’ हे पुस्तक लिहिले. त्यात ते म्हणतात :

  “आज गांधीजी जिवंत नाहीत.नथुराम जिवंत नाहीत. नाना आपटे जिवंत नाहीत. उरलेले तीन दंडित आपापले प्रायश्चित्त भोगल्यानंतर मुक्त केले गेले आहेत. 'मरणांतानि वैराणि' या आपल्या विचारसरणीप्रमाणे गांधीजींशी ते जिवंत असताना,कधी कोणाचा द्वेष असलाच,तर आज त्यांच्या स्मृतीशी कटू भावना वागविल्या जाणे योग्य होणार नाही. बंदिगृहातील गांधी जयंतीच्या मेळाव्यात मी सहभागी होत असे. पुष्कळदा अशा मेळाव्यांची योजनाही मी करीत असे. आज हे सांगताना मला कोणताही संकोच वाटत नाही.”

  ज्यांनी गांधीजींचा देह रक्ताच्या थारोळ्यात माखला अशा त्यांच्या वैचारिक शत्रूंनाही गांधीजींबद्दल द्वेष नव्हता,असा हा गांधीविचाराचा महिमा आहे. गांधीजींच्या जन्मानंतर दीडशे वर्षे होऊन तसेच त्यांना जावून एक्काहत्तर वर्षे होऊनही गांधीविचार संपत नाही,हेच स्पष्ट झाले आहे. या विचारात अशी कोणती जादू आहे, हा आता सर्वांच्याच चिंतेचा आणि चिंतनाचा विषय ठरलेला आहे.

  -डॉ.अशोक राणा,
  यवतमाळ
  --------------

  तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? आम्हास आपल्या परिसरातील बातम्या, लेख अवश्य पाठवा आणि प्रतिनिधी बना ! ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Gaurav Prakashan फेसबुकपेज !

  --------------------

  आम्ही तुमच्यासमोर बातम्या, कथा, कविता, वाचनीय लेख अश्या खूप साऱ्या लेखामार्फत भेटत असतो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा, कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते, तसेच आमचे फेसबुक पेज ही नक्की लाईक करा, गौरव प्रकाशन युट्यूब चॅनेल लाईक Subscribe करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याचबरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद...!

  -बंडूकुमार धवणे
  संपादक गौरव प्रकाशन
  --------------------

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

People

Ad Code