संसार तुझा पाहिला
नकळत डोळ्यांतून
अश्रूंचा पूर वाहिला//धृ//
आम्हां मिळते सहज आज
हक्काची तूप नि पोळी
कसे विसरावे समाजाने
तू खाल्लीस भाकरी शिळी
समर्थ तुझ्या बाहूंनी
भार कष्टाचा साहिला
काल राजगृहावर रमाई
संसार तुझा पाहिला
नकळत डोळ्यांतून
अश्रूंचा पूर वाहिला//1//
किती लाचारतेने भरले
असतील तू पाण्याचे माठ
स्पर्शाने हो जेव्हा माणसांच्या
माणसालाच कसा होतसे बाट
असत्याशी लढा तुझा
मात्र मार्ग सत्याचा दाविला
काल राजगृहावर रमाई
संसार तुझा पाहिला
नकळत डोळ्यांतून
अश्रूंचा पूर वाहिला//2//
फाटकेच तुझे पातळ
किती असतील त्याला गाठी
वेचल्यास तू शेण गोवऱ्या
बा भीमाच्या संसारासाठी
फळ तुझ्या निष्ठेचे
राजगृह उभा राहिला
काल राजगृहावर रमाई
संसार तुझा पाहिला
नकळत डोळ्यांतून
अश्रूंचा पूर वाहिला //3//
त्यागाची तू मूर्ती अशी
आता ती घडणे नाही
थोर तुझे उपकार
ते कधी फिटणे नाही
जयंती दिनी रमाई तुझ्या
गुणांचा पोवाडा वर्षाने गायिला
काल राजगृहावर रमाई
संसार तुझा पाहिला
नकळत डोळ्यांतून
अश्रूंचा पूर वाहिला//4//
सौ .वर्षाताई इंगळे
जिल्हाध्यक्ष अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद जिल्हा बुलढाणा
0 टिप्पण्या