कवी महेंद्र गायकवाड यांचा तिसरा कवितासंग्रह "जगणे असह्य झाले "हा नुकताच वाचण्यात आला. महेंद्र गायकवाड हे संवेदनामय जाणिवांचे कवी आहेत. त्यांच्या जीवनातील उत्कट भावनेचा क्रांतिकारी विचारगर्भ त्यांनी जगणे असह्य झाले या कविता संग्रहात रेखाटला आहे.
या कवितासंग्रहातील एकंदर कविता वाचकाच्या मनाचा ठाव घेणारी आहे. दीर्घत्तम आणि लघुत्तम शब्दछटा या कवितेची जमेची बाजू आहे. मानवी मनातील आंदोलनाची क्रांतीऊर्जा ती प्रस्फोटीत करत आहे.
चाळीस कवितेच्या माध्यमातून कवीने नवभांडवलदाराच्या बदलत्या जाणीवांच्या शोध घेतला आहे. जागतिकीकरणात माणुस दुभंगण्याची प्रक्रिया मोठ्या खुबीने मांडली आहे.
ही कविता आशयाच्या व मूल्यसापेक्ष प्रणालीवर खरी उतरलेली आहे असे वाटते. पृथ्वी नावाच्या खगोलावर राहणार हा माणूस कसा पृथ्वीला नष्ट करत आहे. यांची संवेदना त्यांनी अधोरेखित केली आहे. सुंदर माणसाचे जग कसे विद्रुप होत आहे .माणसाचे कसे लचके तोडत आहे. याची जाणीव त्यांनी मांडली आहे. ते पृथ्वी या कवितेत लिहितात की,
- कसा लागला असता शोध
- जीवजंतू /वनस्पतीचा
- कुणी शोधले असते जग !
- कसे झाले असते नायक/ खलनायक
- हे पृथ्वी
- तू महान आहेस !
अत्यंत व्याकुळ मनाने चितारलेले ही कविता पृथ्वीची यशोगाथा गाणारी आहे .मानवाने आता तरी बदलावे याची जाणीव करून देणारी आहे.,
आज साऱ्या जगात जागतिकीकरणाचे वारे मोठ्या जोराने वाहू लागले आहेत .जगाचे दोन भाग झाले आहेत एक भांडवलदार माणूस अन् कामगार माणूस .भांडवलदार माणूस कामगार वर्गाचे शोषण करत आहे . कामगार माणूस या शोषणाला बळी पडत आहे. संविधानात्मक हक्काचा बळी जाताना इथला माणूस चिडचूप आहे. क्रांतीची मशाल न घेता भांडवलदाराचा गुलाम होत आहे .पण हाच कामगार जागतिकीकरणाला ठोकारून कामगार सत्तेचा निर्माता होणार आहे. माणसाचे नंदनवन फुलवणार आहे. लोक हो ! या कवितेत मानवावर अन्याय करणाऱ्या विविध भूमिकेचा वेध कवीने घेतलेला आहे.ते लिहितात की,
- जागतिकीकरणाचा नवा वार
- कामगार कमी करा
- रोबो भरा !
- भुकेगंगालाचा सोमालिया करा
- ..................
- अद्यापही अस्वस्थ
- माणसाचा समूह
- भूगर्भातील तप्त लाव्यासारखा बाहेर पडेल
- सम्यक क्रांतीच्या पठारावर
- प्रेम /शांती /करूणा/ मैत्री उगवेल
- माणसाच्या माणुसकीचे नंदनवन फुलेल
- हा भाबडा आशावाद कवीने मांडला आहे.
आज सारेच शहर कुरूप होत आहेत. माणसाचे जथ्थेच्या जथ्थे ओथंबून वाहत आहेत. अश्लील व चंगळवादाला उत आला आहे. माणसाच्या स्वप्नाचा चुराडा होत आहे .शहराचे सौंदर्य क्षयग्रस्त होत आहे .पण अशा शहरातही काही कष्टकरी माणसे आपल्या घामाने सौंदर्य फुलवत आहेत. तेच पुढील क्रांतिकार आहेत. तेच क्रांती करू शकतात. कवी लिहितो की,
- उत्सुक झाले पुतळे
- उपोषण /मूक मोर्चा /शोकसभेसाठी
- कष्टकरी एकत्र जमले शहरात
- केव्हाही क्रांती होऊ शकते ..
कवी हे कारखान्यात काम करणारे. त्यांचे काम वेल्डिंगचे आहे. त्यांनी लोकांना जोडले आहे .तसेच ते माणसाला सोडून पाहत आहेत. पण माणसे लोखंडाला जोडणे शक्य नाही त्यासाठी बंधुत्वाचे नवीन नाते निर्माण करावे. अशी आशा वेल्डर कवितेतून त्यांनी मांडलेला आहे.
- ए वेल्डर!
- टूटफूट झालेल्या यंत्राला जोडण्यापेक्षा
- निर्वासित -दुभंगलेल्या मनाला जोड
- अखंड मैत्री अन् करूणेसाठी
- झिजले पाहिजे
- रोहिणीसाठी रक्त सांडू नये
- ब्रोकण मॅन सोबत भांडू नये
- वेल्डर
- बंधुत्वाचे नाते जोडशील ना !
- माणुसकीच्या माणसासाठी ...
आजही सवर्ण व अवर्ण यामधील वाद उफाळून येत असतात.सातत्याने विविध क्षेत्रांमध्ये त्याचे लोन दिसून येत आहेत. मूलतत्त्ववादी व अपरिवर्तनवादी विचारात बदल होताना दिसत नाही. असाच बदल कवीला दिसत आहे. मी वेगळ्या वाटेचा या कवितेतून मुक्तछंदबंध करताना लिहितात की,
- ऋचा कसा सांगू तुला
- प्राचीन सिंधू संस्कृती विरुद्ध वैदिक संस्कृतीचा संघर्ष
- रक्तरंजित इतिहासाच्या व्यथा अजूनही ओल्या आहेत
- ऋचा कसा विसरू
- गळ्यात मडकं अन् कमरेला झाडू! आणि तू म्हणतेस,
- मठ /मंदिरात/ शंकरचार्याच्या पिठातून भटकताना
- आठवण येत होती
- माझ्यासोबत तू हवा होतास
- ते सगळे पाहण्यासाठी
- छे! ॠचा माझी आठवण यावी हे सपशेल खोटे आहे
- मी वेगळ्या वाटेचा...
- असा उपरोधात्मक टोला प्रेयसीला लावला आहे.
कवी महेंद्र गायकवाड हे जातिवंत कवी आहेत. खोटी शब्दछटा लावून कविता करणारे फॅशनेबल कवी नाहीत. तर जगण्यासाठी अविरत धडपडणारे संघर्षवादी कवी आहेत. अन्यायाला आपला विषय बनवून त्यांच्यावर तुटून पडणारे त्यांची लेखणी भारदस्त व अनुकूंचितदार आहे ."कविता" या कवितेत आपली वाट मोकळी करून देताना ते लिहितात की,
- मित्रा इथे माणसांसाठी साप
- अन् सापासाठी मुगूंस पाळले जातात
- म्हणून कविता लिहावी लागते
- रणरागिनी युद्धासाठी
- सुख-समृद्धीच्या सुंदर जगासाठी..
डॉ.बाबासाहेब आंबेडकर हे कवी महेंद्र गायकवाड यांचे प्रेरणास्त्रोत आहेत. त्यांच्या चळवळीतील आंदोलनाची धग कवीच्या हृदयात संचारलेली आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या व्यवस्था परिवर्तनाची अजिंठा त्यांनी आपल्या हृदयावर कोरलेली आहे .पण आज बाबासाहेबांचे अनुयायी स्वार्थी अहंकारी झाले आहेत. ते अनेक कळपात फिरत आहेत. त्यांना आता धडा शिकवायला पाहिजेत किंवा शिकायला पाहिजे. हा त्यांचा आर्त स्वर अध्ययन या कवितेतून प्रस्तुत झालेला आहे. उजेड ही कविता नव्या सूर्याची पेरणी करणारे कविता आहे. या कवितेत कवी लिहितो की,
- माणसानो
- हिरवा /पिवळा/ भगवा /लाल ट्रेडमार्क असलेला
- धर्माची पारायण करीत जा!
- स्वस्त मरणासाठी
- तमयुगासाठी
- मी आता सूर्यच पेरणार आहे ..
कमी शब्दात आशयगर्भ विचारांची गुंफण हे कवी महेंद्र गायकवाड यांच्या कवितेचे वैशिष्ट्य आहे. त्यांची कविता महानगरीय कवितेचा चेहरा उजागर करते .शोषित ,वंचित, कामगार यांच्या जीवनातील दुःख - वेदना यांना वाचा फोडते. डॉ.बाबासाहेब आंबेडकर आणि तथागत गौतम बुद्ध यांच्या विचाराने जग बदलू शकते हा आशावाद या कवितासंग्रात जागोजागी दिसून येतो .या कवितासंग्रहातील अनेक कविता आशयसंपृक्त, भावनाप्रधान, बंडखोरवृत्ती, जीवनातील आक्रोश, व्यवस्थित विरुद्ध आंदोलन, मुजरवृत्तीचा निषेध करणाऱ्या आहेत.
जगणे असह्य झाले या कवितासंग्रहातील भाषा सामान्य वाचकाला समजणारी आहे .ती सेंद्रियत्व घेऊन आलेली आहे. तिचा पोत धरणीमय आहे. माणसाच्या जीवनाला फुलवणारा ओयाशीस आहे. वर्तमान व्यवस्थेतील पसरवणाऱ्या काळोगर्भावर उजेडाची नवीन अजिंठा खोदणारी आहे .कवी महेंद्र गायकवाड हे एक आंबेडकरवादी कवी आहेत. त्यांच्या अनेक कवितासंग्रहातून मानवी मूल्यांची सृर्जनतव प्रणाली विकसित झालेले आहे .साधे राहणे व स्पष्ट बोलणे हाच त्यांच्या कवितेत गाभा आहे. जगणे असह्य झाले हा कवितासंग्रह काळोखमय वेदनेचा आक्रोश आहे.हा आक्रोश कमी व्हावा हा त्यांचा आशावाद आहे.त्यांची पुढील कविता मूल्यासापेक्ष विचारांची नवीन ऊर्जा घेऊन येणार असावी. यासाठी कवीला पुढील नवाकृतीसाठी लाख लाख मंगलकांना चिंतितो....
- प्रा. संदीप गायकवाड,
- नागपूर
- ९६३७३५७४००
- कवितासंग्रह -जगणे असह्य झाले!
- कवी- महेंद्र गायकवाड
- प्रकाशक देवयानी प्रकाशन नवी मुंबई
- सहयोगमूल्य शंभर रूपये
- 9850286905
- --------------
तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? आम्हास आपल्या परिसरातील बातम्या, लेख अवश्य पाठवा आणि प्रतिनिधी बना ! ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Gaurav Prakashan फेसबुकपेज !
- --------------------
आम्ही तुमच्यासमोर बातम्या, कथा, कविता, वाचनीय लेख अश्या खूप साऱ्या लेखामार्फत भेटत असतो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा, कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते, तसेच आमचे फेसबुक पेज ही नक्की लाईक करा, गौरव प्रकाशन युट्यूब चॅनेल लाईक Subscribe करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याचबरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद...!
- -बंडूकुमार धवणे
- संपादक गौरव प्रकाशन
- --------------------
0 टिप्पण्या