• Sat. Jun 3rd, 2023

जिंदगी भाकरीच्या दबावात आहे सामाजीक भान जपणारी गझल !

  “हासणे हे जरी या स्वभावात आहे
  जिंदगी भाकरीच्या दबावात आहे”
  कोणत्या पापणी मी तुला साठवावे
  स्वप्न सारेच माझे लिलावात आहे !

  हा मतला आणि शेर यवतमाळचे प्रख्यात गझलकार,निवेदक किरणकुमार मडावी यांच्या नुकत्याच प्रकाशीत झालेल्या ‘ जिंदगी भाकरीच्या दबावात आहे’ या पहिल्याच गझलसंग्रहातील आहे. जिंदगी भाकरीच्या दबावात असली तरी गझलकार मात्र व्यवस्थेच्या दबावाखाली येतांना दिसत नाही . गझलकार हे स्वत: शेतकरी असल्याने त्यांनी या देशातील कष्टक-यांची व पोशींद्याची व्यथा,वेदना जवळून अनुभवली आहे. स्वत: हे जीवन ते जगताहेत,भोगताहेत, अनुभवताहेत. त्यामुळे त्यांच्या गझलेत याचा जागर झालेला दिसतो. त्यांची गझल म्हणजे त्यांचं मनोगत आहे. आणि ती वंचीत समाजाच्या, शेतक-यांच्या व्यथा,वेदनेचे प्रतिनिधित्व करते.न्याय मागण्याचा प्रयत्न करते. यापुर्वी गझल लेखनात विषयाचा तोच तोपणा असायचा, सारख्याच धाटनीच्या गझल वाचायला मिळायच्या पण अलीकडे नवपिढीने आगुल लाऊन वेगळा जोश यात भरलेला दिसतो. वैदर्भीयकरांची गझल ही अलिकडे कात टाकताना दिसते. तिने आपल्या कक्षा रुंदावल्या आहेत. आंबेडकरी गझलेने मराठी गझल अधीक समृद्ध होतांना दिसते. वामनदादा कर्डक यांनीही गझला लिहिल्या व गायल्या देखील. त्यामुळे मराठी गझल अनेक विषय कवेत घेऊन यशस्वीतेच्या दिशेने वाटचाल करतांना दिसते. गझलकार आपल्या सभोवतालचं विश्व अभ्यासतो आहे,अवलोकन करतो आहे, वाचन करतो आहे, चिंतन,मनन करतो आणि गझलेला नवी उभारी देण्याचं काम करतो आहे. सुरेश भटसाहेबांपासून गझल म्हणजे काय ? लोकांना समजायला लागले. गझलकार, रसीक,वाचक,गायक तिचा आस्वाद घ्यायला लागले. हे अलीकडे झडणा-या गझल संमेलनावरून, मुशाय-यावरून आपणास दिसून येते. गझलकार रसीक,वाचकांना आकर्षीत करण्यात यशस्वी होतांना दिसते आहे. याचे श्रेय कुण्या एकाला देता येणार नाही ,तर यात गझलकार,संगीतकार,गायक, आयोजक,रसीक, वाचक इत्यादींचा सिंहाचा वाटा आहे. गझलेचा वृक्ष बहरतो आहे. कुणी फांद्या छाटण्याचा प्रयत्न केला तरी तो दमाने बहरत राहील. यात गझलकारांना शंका वाटत नाही.

  “मी पुन्हा बहरेन येथे पूर्ण माझ्या ताकदीने
  छाटल्या फांद्या जरीही छाटले हे खोड नाही !”

  किरणकुमारसारखे मुरलेले अनेक गझलकार गझलेविषयी ताकदीने बोलायला ,लिहायला लागलेत, त्यामुळे गझलेला चांगले दिवस येत आहेत. हाच शेर शेतक-याच्या कष्टालाही लागू पडतो. शेतक-यावर अनेक असमानी,सुलतानी संकटे येत असतात. त्यात तो चालतो,पडतो, हरतो, खजील होतो,दु:खी होतो, निराश होतो पण तरीही तो न थांबता ताकदीने चालत राहतो. कारण थांबणे हे त्याच्या रक्तात आणि स्वभावात बसत नाही. कुटुंबप्रमुख हरला तर इतरांना जगविण्याचे आश्वासन तो कसे देणार ? सरकारी योजना शेतक-याच्या धु-यापर्यंत जशाच्या-तशा पोहचतीलच याची खात्री वाटत नसल्याने गझलकारातील शेतकरी व्यथीत होतांना दिसतो.

  “एल्गार आतड्यांनी,केला जरी किती
  अडतात फायलींच्या,दातात योजना‌!”

  भूकेने कितीही एल्गार केला तरी ,जे व्यवस्था करते तेच येथे होतांना दिसते,याची जाणीव गझलकाराला आहे. तो हे जीवन भोगतो , जगतो आणि भूकेचा आगडोंब सहतो आहे . जिंदगी भाकरीच्या दबावात असली तरी तो न जुमानता आपला प्रवास अव्याहत सुरूच ठेवतो. व्यवस्थेच्या नाकर्तेपणाची झलक त्याच्या शब्दातून दिसून येते. वंचीतांच्या जगण्यातील ठणक तो आपल्या शब्दातून दमदारपणे मांडण्याचा प्रयत्न करतो . शेतकरी व्यवस्थेचा बळी ठरतो आहे .म्हणूनच व्यवस्थेविषयीची चिड शब्दातून व्यक्त करताना म्हणतो….

  “भारता ही तुझी काय रे दुर्दशा?
  माकडांना दिला कासरा वाटतो !”

  यापेक्षा आणखी कोणत्या शब्दात साहित्तिकांनी व्यवस्थेविषयी व्यक्त व्हावे ? तरीही परिस्थीती सुधारताना दिसत नाही .ही खंत गझलकाराच्या मनात आहे. गझलेतील प्रत्येक शेराचा विषय वेगवेगळा ,स्वतंत्र असतो. ती एक स्वतंत्र कविता असते. एवढी ताकद दोन ओळीच्या एका शेरात असते. फक्त त्यात गझलकाराला आशय, विषय, शब्दयोजन ,जगण्यातलं वास्तव शब्दात पकडता आलं पाहिजे. तरच शेराची ताकद (वजन) वाढते. तो रसीक,वाचकांच्या हृदयात घर करून जातो. यात किरणकुमार आघाडीवर दिसतात.त्यांचा एक मतला एक शेर बघू.

  “नाहीच भास माझा,पक्का कयास आहे
  मातीतही फुलांचा, नक्की सुवास आहे
  तोडू नका कळीला,बागेपरी फुलू द्या
  हा हक्क जीवनाचा, त्याही जिवास आहे!”

  यातील मतला व शेर हा येथील मातीचं मोठेपण अधोरेखीत करतो .शेवटी माणसाची नाळ मातीशी जोडली असते. एवढंच नाही तर तो मानवी स्वभावाविषयीही भाष्य करू पाहतो. पूर्वी लींगभेदातून बालीका भ्रूणहत्या मोठ्या प्रमाणावर व्हायच्या. आता प्रमाण कमी झाले असले तरी व्यभीचार,अत्याचार,बलात्काराच्या घटना पेपरच्या हेडलाईन होताना दिसतात . त्यामुळे मुलींनी आणि स्त्रियांनी स्वत: कणखर होण्याची गरज पुढील शेरातून तेवढ्याच ताकदीने व्यक्त होतो.

  “समजू नको स्वत:ला कमजोर,शूद्र ,अबला
  तू सर्व या धरेचा, रेखांश अक्ष पोरी !
  उद्धार या जगाचा आहे तुझ्याच हाती
  राहा सदैव येथे कर्तव्यदक्ष पोरी !”

  सामाजीक जाणीवेतून हा गझलकार ताकदीने लिहीतो. तो प्रथम माणूस,नंतर शेतकरी,आणि गझलकार तर आहेच पण एक सजग ,कणखर,दूरदृष्टी असलेला बापही आहे. म्हणून तो लेकीला सजगतेचा कानमंत्र देतांना दिसतो. गझल ही केवळ तंत्र सांभाळून शब्द कोंबून भरण्याचा विषय नाही तर, तो व्यवस्थेविषयी, परिस्थितीविषयी ,मनस्थितीविषयी व्यक्त झाला पाहिजे. त्याच्या लेखणीने प्रसंगी एल्गार पुकारला पाहिजे. त्याने आपल्या शब्दातून समाजमनातील वेदना,व्यथा,दु:ख ,सल मांडली पाहिजे. निव्वळ शब्दांचे गोडाऊन असून उपयोग नाही. किरणकुमार यांच्या गझला गजलनवाज भिमरावदादा पांचाळे, गायक रुद्रकुमार रामटेके यांनी गायलेल्या आहेत. गझल आपल्या कर्तृत्वाने मोठी होतेच पण सोबतच तिला स्वर आणि संगीत लाभले तर ती रसीकांच्या ओठांवर रुंजी घालत राहते. आणि गझलकाराचे शब्द रसीकांच्या हृदयावर राज्य करतात. गाझलगायकीमुळे गझल मोठी झाली आहे. सुरेश भटसाहेबांच्या किंवा इतरांच्याही गझला भिमरावदादा पांचाळे,सुधाकर कदम किंवा ज्या ज्या गायकांनी गायल्या, त्या सर्वांमुळे रसीकांना गझल आवडू लागली आहे. किरणकुमारच्या गझलेचं साधं व रास्त मागणं आहे. काय मागते आहे ती निर्मीकाकडे ? तर…

  “दे मला अंधार सारा
  तू जगाला तांबडे दे
  जाहल्या नजरा विखारी
  इज्जतीला कापडे दे !”

  हा दिलदार मनाचा गझलकार स्वत:साठी दुनीयेचा अंधार मागतो आणि इतरांसाठी प्रकाशाची अपेक्षा करतो. भूकेसाठी मोजकेच आतडे आणि इज्जत झाकण्यासाठी कपडे मागतो. हा एका शेतक-याच्या मनाचा मोठेपणा ,परोपकारी भाव,त्याग व समर्पणाची भावना आहे . गझलकार उजेडाच्या कुळाशी नातं सांगतो आहे. त्याला उजेडाची जाण आहे. त्याला भूकेची जाण आहे. तो कधी फाटक्या वस्त्रानिशी उन्हातान्हात जीवन कंठतो. आणि जो हे जाणतो, जो राबतो तोच हे लिहू शकतो. त्याच्या गझलेचा सूर्यकिरण प्रश्नाच्या मुळापर्यंत जातो. किरणकुमारची गझल ही पोपटीच्या शेंगा नसून भूईमुंगाच्या दाणेदार शेंगेसारखी भरीव आहे. डोळ्यासाठी आसवाचे दान मागणा-या किरणकुमारची गझल संस्कारही सांगून जाते. पाखरांसाठी, आदरणीय व्यक्तीसाठी, छोट्यांसाठी आणि स्त्रीयांसाठीही ती दान मागतो आहे.

  “माणसांचे कर भलेही सर्व अभयारण्य तू
  पाखरांना पाखरांचे,मोकळे तू रान दे
  मान दे मोठ्यास आणिक,प्रेम कर छोट्यांवरी
  येथल्या नारीस सा-या, मायचा सन्मान दे !”

  ही गझल वाचताना छत्रपती शिवाजी महाराजांच्या कर्तृत्वाची आठवण झाल्याशिवाय राहत नाही. राजा/राज्यकर्ता असावा तर असा. समाजाला आपल्या लेखनीतून चांगलं देण्याचा प्रयत्न गझलकारांने केलेला दिसतो. तो नव्या पिढीला नवी ऊर्जा देऊ इच्छितो. याचाच अर्थ त्याच्यात ही कुवत त्याच्या काळ्या आईकडून आली असावी, मातीने त्याला हे संस्कार दिले आहेत. अनेक संत, समाजसुधारक, महापुरुषांनी सममाजातील अनिष्ठ गोष्टींना कायम विरोध केला आहे. आपल्या लेखनीने सडकून प्रहार केले आहेत. त्या समाजमनातून हद्दपार करण्याचा प्रयत्न केला असल्याचे आपण जाणतो. त्यांच्याच विचारांची कास धरून गझलकार ते विचार गझलेत रुजवितांना दिसतो. तो फुले,शाहू,आंबेडकर विचारसरणीचा पुरस्कर्ता आहे. म्हणूनच आजही अनिष्ट गोष्टी समाजात दिसल्या की त्याच्या मनाचा संताप होतो. तेव्हा तो शब्दाद्वारे सहज व्यक्त होतो. त्याला अनेक प्रश्न पडतात. आपल्या मनातील प्रश्नांची उत्तरे बाबासाहेबांना विचारताना तो म्हणतो….

  “पुसतात रोज माझी,जे जात आज बाबा
  आहेच काय त्यांची, औकात आज बाबा
  धमन्यात धम्म आणिक,श्वासात संविधाना
  भिनवून चालतो मी, रक्तात आज बाबा
  तू सूर्य शिक्षणाचा, गात्रात पेरला अन्
  आल्यात काळरात्री, धाकात आज बाबा!”

  रंजल्या गांजल्यांच्या जीवनात बाबासाहेबांच्या रुपाने प्रज्ञासूर्याचा उजेड आला. संविधानाद्वारे सर्वांना समान अधिकार प्राप्त झाले. बाबासाहेबांनी येथील लोकांना बुद्धाचा विज्ञानवादावर आधारीत धम्म दिला . ज्यामुळे सर्वांचे जीवन सुखकर ,आनंदी आणि दु:खमुक्त व्हायला मदत होतेय. कायद्यामुळे गुलामीच्या बेड्या,साखळदंड गळून पडले. ही सम्यक चेतना सर्वांनी आपल्या मनात जागवावी. तसेच निळ्या पाखरांनी बुद्धाचा विचार अनुसरून या निळ्या नभाच्या वस्तीचे वेगळेपण संपूर्ण जगात जपले पाहिजे. असेही गझलकाराला वाटते.‌ आता संकटापुढे झुकायचे नाही. कारण झुकण्याची वेळ केव्हाच निघून गेली . तसेच आता कुणीही आमच्यावर अन्याय करण्याचा विचार करू नये. असेही व्यवस्थेला ठणकाऊन सांगतो. त्याचा विद्रोही बाणा परिस्थितीशी,व्यवस्थेशी लढणारा आहे. हे बळ त्याला शिक्षणाच्या जाणीवेने व संविधानाने दिले असावे,यात शंका नाही. गझलकाराने आपल्या गझलेत समता,स्वातंत्र्य, बंधुता,न्याय या संवैधानीक मूल्यांचा अजिंठा कोरलेला दिसतो. याच विषयाच्या अनुषंगाने समस्त मानवाच्या हक्काचे रक्षण संविधान करेल. असा पूर्ण विश्वास असल्याचे सांगणारा यवतमाळ येथील युवा गझलकार रमेश बुरबुरे, यांचा सुचक मतला मला आठवतो. तो म्हणतो…

  “जे हक्क पाहिजे ते सारेच दान करते
  रक्षा तुझी नि माझी हे संविधान करते !”
  -रमेश बुरबुरे

  किरणकुमार मडावी यांची गझल मानवाच्या अवतीभोवतीच्या सर्वच विषयाला हात घालते . या पैकी युवकाविषयी चिंता व्यक्त करतांना तो म्हणतो…

  “खेड्यात होतास चाबूक मित्रा,
  शहरात झालास नाजूक मित्रा
  भेटून बापास, ये तू जरासा
  डोळे जहालेत, अंधूक मित्रा”

  किरणकुमार मडावी यांच्या गझलेत वैदर्भीय बोलीच्या शब्दांचा अंतर्भाव झालेला दिसतो. हा गझलकार विदर्भातील यवतमाळ जिल्ह्यातील,केळापूर तालुक्यातील, मोहदा येथील रहीवाशी आहे. तो आपल्या वैदर्भीय (व-हाडी) मायबोलीचा हात हातात घेऊन गझलेचा गड सर करायला निघालेला आहे. बोलीतील शब्दांचे खुबीने उपयोजन करून, उपमा, प्रतिमांनी त्याने गझलेचे सौंदर्य फुलविले आहे. जसे ‘काळजीचे पीक’, ‘फुलावर आलेली व्यथा’ ,’हसण्याचे दान’,’जिंदगीची झोळी’, ‘वयाचा बहर’ , ‘शेतात अश्रू उगवले’.ही त्याच्या गझलेची विशेषता व जमेची बाजू म्हणावी लागेल . त्यामुळेच किरणकुमारची गझल ही रसीक,वाचकांच्या हृदयाचा ठाव घेते. ज्यांची वेदना,व्यथा आपण समाजासमोर मांडतो, ती त्याला समजली पाहिजे. त्याच्या काळजाला भिडली पाहिजे. याच हेतूने त्याने गझलेचे पीक प्रसविलेले दिसते. म्हणूनच किरणकुमारच्या रचना प्रभावी ठरतांना दिसतात. लोकांना आवडतात.‌त्याच्या रचनेशी समरस होतांना दिसतात. त्याची गझल ही त्याची न राहता ती रसीक,वाचकांची होऊन जाते . त्याची गझल आशावाद पेरते, ती हारतांना, रडतांना दिसत नाही. तर ती इतरांनाही लढण्याची ऊर्जा प्रदान करते. हे वैशिष्ट्ये आहे.

  “षंढ झाले मर्द सारे,थंड झाले रक्त सारे
  लेखणीवर आळ आला,का कुणाला बोलवेना ?”
  किंवा
  “घासून सज्ज ठेवा, आपापले विळे
  विश्वासघातक्यांची खोदायची बिळे
  भडवेगीरीत गेली त्यांची हयात अन्
  देशात पोसले मी,खाऊनिया शिळे !”

  किरणकुमारची गझल वाचकांना अशी अस्वस्थ करते. विचार करायला भाग पाडते. लढाऊ बाणा जपते. शेतक-याच्या,कष्टक-याच्या मनातील चिड,आक्रोश,आर्तता,विद्रोह,काळजी,जिव्हाळा, प्रेम,खदखद व्यक्त करते . तिचा स्वभाव डरपोक नसून ती निडर होऊन वास्तवतेशी भिडते. ती धाडसाने समाजात काय वाईट, काय चांगलं, कुणाचं कोठे चुकतंय? , कष्टक-यांची ठणक, दुखणं या बाबी समाजासमोर मांडते. तिने सामाजीक भान जपले आहे. समाजाप्रती आपण काहीतरी देणं लागतो, ही जाणीव गझलकाराला असल्याचे दिसून येते. त्याचे शब्द त्याच्यासारखेच खरमरीत असले तरी, तो गावच्या मातीचा स्वभाव आहे. गावखेड्याच्या माणसाला शहरासारखं गुळगुळीत व्यक्त होता येत नाही, जगता येत नाही,वागता येत नाही,बोलता येत नाही. कारण रोज तो वादळाशी दोन हात करीत असतो. हे गावातील माणसाचं वास्तव गझलकारांने जसच्या तसं आपल्या गझलेत उतरवलं आहे. तो माय, बाप, युवक, शेतकरी, कष्टकरी, मुलगी, स्त्री,पशू,पक्षी,निसर्ग यांचे मनोगत ,हुंकार शब्दातून व्यक्त करतो. म्हणून त्याची गझल व्यवस्थेशी थेट भिडतांना दिसते . तो समष्टीला उद्देशून म्हणतो..‌..

  “गौतमाचा अन् भिमाचा,घ्या जरा आदर्श अन्
  थांबवा आता तरी या, जात धर्माच्या चुका !”
  किंवा
  “कोण म्हणतो जात नाही जात व्यवस्थे
  फक्त बुद्धाचा जरा धर हात व्यवस्थे !”

  जगाला युद्ध नको बुद्ध हवा. प्रत्येकालाच आयुष्यात सुख,समृद्धी, शांततापूर्वक व दु:खमुक्त जगणं हवं . त्यासाठी जात-धर्मंना झुगारून कलह दूर करावा लागेल. आणि हे तेव्हाच शक्य आहे, जेव्हा लोक बुद्धाचा विज्ञानवादी विचार स्विकारतील. बुद्धाच्या धम्मात जातीला थारा नसून कर्माला महत्व आहे. त्या दिशेने जगाने वाटचाल करावी.ही रास्त अपेक्षा येथे व्यक्त होतांना दिसते.

  शेवटी शेतकरीपुत्र गझलकार किरणकुमार मडावी यांनी आपल्या स्वाभिमानी व बाणेदार स्वभावाप्रमाणे घरच्या खात्रीलायक बियाण्याला कुणाच्या प्रमाणपत्राची वाट न बघता गझल पेरून आडतास घेतले आणि वरून फसाटीने मायेचा हात फिरविला. शेवटी खात्रीलायक बियाणं शंभर टक्के उगवलं आणि पीक टरारून आलं . मनोगताच्या चार काकरात तो म्हणतो ” माझी प्रत्येक गझल हे माझं मनोगत आहे. मग वेगळे मनोगत कशाला हवे ? “खरच त्याची प्रत्येक गझल ही समाजमनाचं प्रतिनिधीत्व करते. गझलेत त्याने समाजमनाची व्यथा पेरली आहे , पुस्तकही वाचकांच्या स्वाधीन केले आहे. लोक वाचून चिंतन करताहेत,समजून घेताहेत. पण ज्याप्रमाणे मुलगी उपवर झाली की बापाला तिची काळजी वाटते त्याचप्रमाणे त्याने पेरलेली व्यथा फुलांवर आल्याने त्यालाही काळजी वाटणे स्वाभाविक आहे . कारण हे पुस्तक त्याचे पहिलेच अपत्य आहे. त्याच्या मनात थोडं कुतूहल व हुरहुर जरूर आहे.परीक्षा दिल्यावर विद्यार्थी जशी निकालाची आतुरतेने वाट बघतो तसा प्रत्येक कवी,लेखक वाचकांच्या प्रतिक्रियेची स्वाभाविकपणे वाट बघत असतो. असे म्हटल्यास वावगे नसावे.

  “मी पेरली व्यथाही, आली अता फुलांवर
  लागेल काळजीचे, हे पीकही निघाया !”

  किती बोलका शेर आहे हा ? शेतक-याने जसे मातीत बियाणे पेरावे आणि ते मोठं होऊन त्याच्या फळाची वाट बघत राहावी. तसेच काहीशे गझलकाराच्या मनाला वाटत असावे. शेती हा एक जुगार आहे. हार -जीत काहीही होऊ शकते. ते निसर्गावर अवलंबून आहे. याची त्याला जाणीव आहे. पण पर्वा करू नये. निसर्गनियमानुसार भूक आहे, तर भाकरही मिळेलच .याची इतरांनाही तो जाणीव करून देऊ इच्छितो.

  “दिसतो तसाच साधा,नाही प्रकार मित्रा
  आहे खरा जिवाचा, शेती जुगार मित्रा !”

  कामाच्या याही रगाड्यात तो त्याच्या कुटुंबावर,मुलाबाळांवर फार प्रेम करतो. गझलकार या देशातील समस्त मुलींना उद्देशून काय म्हणतो ? बघा …

  “तू दान हसण्याचे पदरात टाक ना
  लावीन जिंदगीला झोळी करायला !”
  पूर्वीपरी इथे ना बाजार राहिला
  तू लागलीस पोरी,मोळी करायला !”

  किती गर्भीत भावार्थ दडलेला आहे या ओळीत. दुनीयेच्या चालीरीतीचे आपले अनुभव नव्या पिढीला तो देऊ इच्छितो. बाप आपल्या मुलीला शिक्षणाबरोबरच या दुनीयेत जगण्याची रीतही शिकवितो . हा विचार, ही कल्पकता गझलेत यायला पाहिजे. नव गझलकारासाठी ही एक ऊर्जा आहे. माय-बापाच्या मेहनतीलाही तो विसरत नाही . त्यांच्यामुळेच हे शेतातील पीक दिसते. हे ही कबूल करायला विसरत नाही.

  “गाडून बाप येथे,गाडून माय आहे
  तेव्हाच इज्जतीने, फुलतेय शेतमाती !”
  किंवा
  “चतकोर भाकरीच्या तुकड्यात माय शोधू
  ठिगळात जोडलेल्या लुगड्यात माय शोधू
  जळत्या चुलीत जेथे विरतात आसवेही
  नयनात कोंडलेल्या धुरड्यात माय शोधू !”

  शेतक-याच्या मुलांचं जगणं फुलविणारे मायबाप महान आहेत . दिवसरात्र कष्टाची होळी केल्याशिवाय , घाम व रक्त आटविल्याशिवाय पेपरमेटची गोळीही मिळत नाही. हे कष्टक-यांच्या जिवनातलं वास्तव गझलकार किती सहजपणे मांडून जातो ? टुकार कारणासाठी राजकारण्यांचे मोर्चे ,आंदोलने तेवढे प्रभावी ठरतात. पण शेतक-यासाठी कुणी उभे राहत नाही. अनेक आंदोलने, मोर्चे दडपले जातात,चिरडले जातात. हे वास्तव लोक विसरणार नाहीत. असा उपरोधीक टोलाही गझलकार लगावल्याविणा राहत नाही.

  “रस्त्यास टाळुनी हा मोर्चा कुठे निघाला?
  सत्त्यास टाळुनी हा मोर्चा कुठे निघाला ?”

  या व्यवस्थेत केवळ दिखाऊपणाच ठासून भरलेला आहे काय? रास्त विषयावर का कुणी बोलत नाही,सत्याच्या बाजूने का कुणी उभे राहत नाहीत. असा प्रश्न कुणालाही पडल्याशिवाय राहणार नाही . लेक जशी हासत हासत माहेरी येते तशीच गरीबीही येते. गरीबीने कष्टक-यांच्या घरी पाहुण्या मुलीसारखं जरूर यावं पण तिने कायम मुक्काम ठोकू नये. असं गझलकारालाच काय ? कुणालाही वाटल्याशिवाय राहणार नाही. कारण गरीबीचा फायदा घ्यायला अनेक लोक टपलेले असतात पण अशावेळी स्वत:च सजग रहिलं पाहिजे, स्वाभिमानाने जगलं पाहिजे.असेही सुचवू इच्छितो.

  “आमंत्रणे जराशी,घे रे तपासुनी ही
  पत्रावळीत उष्ट्या, ते मांडतात पंगत
  जमतील माणसेही, तुझिया सभोवताली
  जगण्यासवे नको बस,लिहिणे कधी विसंगत !”

  हे गावखेड्यातील माणसाचं भोगलेपण गझलकार मांडायला विसरत नाही. तद्वतच सजगतेचा व स्वाभिमानाने जगण्याचा इशाराही देतो. एवढेच नव्हे तर लेखक,कवींनी आपण जे जगलो ते लिहिले तर बरेच. जगण्यात आणि लिहिण्यात विसंगती असू नये. वागण्या-बोलण्यात गफल्लत होऊ देऊ नये , असेही परखड मत गझलकार मांडतांना दिसतो. मडावी यांचा हा गझलसंग्रह मला पूर्ण पॅकेज वाटतो.

  गझलकार किरणकुमार मडावी यांचे गझलेत विषय, आशय,कल्पकता,शब्दयोजन, वास्तवता,सत्य,परिस्थिती ही ठासून भरलेली असल्याचे दिसते. केवळ शब्दांची जुळवाजुळव नाही . तर ती समाजाला काही सांगू इच्छिते. ती वाचक, रसीकांना समाजाची व्यथा प्रातिनिधीक स्वरूपाने कथन करू इच्छिते. संवाद साधू इच्छिते .चर्चा करू इच्छिते, तिला असंख्य प्रश्न पडलेले आहेत. ती त्या प्रश्नांच्या उत्तराच्या शोधात आहे .आपण तिचं ऐकलं पाहिजे. तिच्या प्रयत्नांना हातभार लावला पाहिजे. तिची व्यथा,वेदना ,म्हणनं ,तिची भूमीका समजून घेतली पाहिजे. तरच साहित्याला न्याय दिल्यासारखा होईल. पुस्तकाच्या मुखपृष्ठावर स्वत: गझलकाराचा आपल्या बैलासह,आऊतासह फोटो आहे. हे चित्र गझलेतील वास्तव मांडण्याचा प्रयत्न करते. या पुस्तकाची पाठराखण गजलनवाज भिमरावदादा पांचाळे यांनी मोजक्या पण समर्पक शब्दात केली आहे. ते म्हणतात….

  “तू सूर्य शिक्षणाचा गात्रात पेरला अन्
  आल्यात काळरात्री धाकात आज बाबा !

  किरणकुमारचा हा शेर ऐकला आणि शहारून गेलो. काय ती पेशकश,काय तो जोश,काय ती आशयघन शब्दकळा…! त्याचबरोबर आत्यंतिक कळकळीच्या त्याच्या सामाजिक जाणिवांनी डोळ्यांच्या कडा कधी ओलावतात तेही कळत नाही.” हे पुस्तक अष्टगंध प्रकाशन, ठाणे यांनी प्रकाशीत केले आहे. मुखपृष्ठ डिझाईन व शीर्षक सुलेखन आकाश सरकाटे यांनी केले आहे. या संग्रहात एकूण ९८ गझल रचना आहेत. हे पुस्तक गझलकाराने “पेनाच्या टोकातून निरंतर झिरपणा-या निळ्या शाईस” समर्पण केले आहे. तो पुस्तकाविषयी म्हणतो “मी या संग्रहाचा तारू साहित्य प्रवाहात विनाशेडेनेच सोडलेला आहे. झुंजूंन उरायचे आदिम सत्व त्याच्यात असेल, तर ते किना-यावर लागेलच.” असा आत्मविश्वास बाळगून आहे. या आशावादासाठी व सुंदर ,दमदार पुस्तकासाठी त्यांचे मनस्वी अभिनंदन व मंगलकामना देतो.

  अरुण हरिभाऊ विघ्ने
  रोहणा,आर्वी,जि.वर्धा
  मो.८३२९०८८६४५
  (मी समीक्षक नाही, याची वाचकांनी नोंद घ्यावी)
  ◾गझलसंग्रह:जिंदगी भाकरीच्या दबावात आहे
  ◾गझलकार : किरणकुमार मडावी
  ◾प्रकाशन :अष्टगंध प्रकाशन,ठाणे
  ◾पाठराखण : गजलनवाज भिमराव पांचाळे
  ◾सुलेखन :आकाश सरकाटे
  ◾मूल्य : २००/-₹
  ◾पृष्ठसंख्या : १०६
  ◾गझलकार मो.९०२१२६०१८५
  ————–

  तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? आम्हास आपल्या परिसरातील बातम्या, लेख अवश्य पाठवा आणि प्रतिनिधी बना ! ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Gaurav Prakashan फेसबुकपेज !

  ——————–

  आम्ही तुमच्यासमोर बातम्या, कथा, कविता, वाचनीय लेख अश्या खूप साऱ्या लेखामार्फत भेटत असतो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा, कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते, तसेच आमचे फेसबुक पेज ही नक्की लाईक करा, गौरव प्रकाशन युट्यूब चॅनेल लाईक Subscribe करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याचबरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद…!

  -बंडूकुमार धवणे
  संपादक गौरव प्रकाशन
  ——————–

gauravprakashan1@gmail.com

Maharashtra News, Braking News, Marathi News, Most Popular Marathi News, Latest Marathi News,Today News,Marathi Article, Marathi Poem, Marathi Story,

0 thoughts on “जिंदगी भाकरीच्या दबावात आहे सामाजीक भान जपणारी गझल !”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *