• Mon. Jun 5th, 2023

अस्सल जीवनानुभूतीचा चिंतनशील आविष्कार करणारा कविता संग्रह ‘नाती वांझ होताना ‘

  वाटा सांजवल्या तरी
  सोडवत नाही हा ऋणानुबंध
  म्हणून मोहाची वल्कले सोडून द्यावीत
  तिथल्या- तिथे…..मनिषा पाटील

  ‘नाती वांझ होताना’ जीवन चिंतनाच्या व्यामिश्र अनूभूतीने व सौंदर्याप्रधान प्रतिमांनी परिपूर्ण झालेली मनिषा पाटील यांची कविता एकूण साहित्य प्रवाहात दुर्मिळ दिसते.

  -डाँ.श्रीपाल सबनीस

  भयग्रस्त वर्तमानात आपण आपापल्या वाट्याचा सूर्यप्रकाशात सांभाळावेत ऋतू कारण हा ऋतू आपल्या ओळखीचा नाही. कोरड्यामातीचे वर्तमान तळहातावर जपणे सोपे नाही.प्रारल्धाच्या सावल्यात सूर्यवाटेवरची मोहाची वल्कले वाचायला हवीत विसरभोळा झालेल्या गावात शोधायला हवेत ओल्या सरींचे पाऊल तेव्हाच कळेल सावलीही तुझी नाही ,शोधायला हवेत नियतीच्या आदिम गुहांध्ये तुझ्या ओंझळीतले शापीत दु:ख,उंबरट्याच्या आतल्या कोषातल्या आळीतला चेहरा, हरवलेल्या लेकी,वाचायला हवेत राहून गेलेले हरेक ऋतू ,अशा शोधाच्या उन्हाच्या कवितातून दुःखाचा अंगार धगधगत राहतो मनिषा पाटील यांच्या कवितेतून. नुकताच मनिषा पाटील यांचा “नाती वांझ होताना “कविता संग्रह वाचण्यात आला.पुन्हा पुन्हा वाचल्यावरच कवितेला भाव स्पष्टपणे कळतो.कवितेला आपली स्वतःची अशी विशिष्ट लय आहे .ती त्या लयीत वाचली तरच त्यातील विदारक सत्य सहज कळत जाते. शहरापासून दूर खेड्यातील जगणे अजूनही किती दयनिन आहे ते कळते. अनेक नात्याचे बंध सोडवत कविता वेदनेची सल कमी करण्याचा प्रयत्न कौतुकास्पद असाच आहे.कविता संग्राहात एकूण साठ कविता आहेत.कवितेतील मांडणी उच्चप्रतीची असून प्रत्येक कविता परिपूर्ण अर्थबोध करीत आपला वेगळा ठसा ह्दयपटलावर उमटवते.त्यात ती तसूभरही कमी पडत नाही.

  कविता कशी फुलते ते स्प़ट करतांना मनिषा पाटील लिहितात, “गेल्या वीस वर्षापासून मी काव्यनिर्मिती करीत आहे .कवठेमहांकाळ तालुक्यातील हरोलीमध्ये मी राहते.माझ्या परिसरामध्ये परंपरेच्या परिघात जीवन जगतांना स्त्रीचे विविध पातळ्यावर होणारे शोषण, तिची होणारी घुसमटत जशी माझ्या कवितेत येते तसेच नात्यांमधला ओलावा कमी झाल्यामुळे वांझ होऊ लागलेली नाती माझ्या कवितेत येतात .माणसामाणसातील वाढत चाललेला विसंवाद, स्वार्थलोलुपतेने माणसाची बदललेली नैतिकता, या सर्वांचा परिणाम हरवत चाललेला गाव माझी कविता शब्दबध्द करते.

  आजचे हे विलक्षण अस्वस्थ करणारे वास्तव माझ्या कवितेच्या केंद्रस्थानी आहे.”तर,अस्सल जीवनानुभूतीचा चिंतनशील आविष्कार करणारी कविता ” असा समर्पक उल्लेख करुन मा.डाॅ.श्रीपाल सबनीस सर, अतिशय सुंदरपणे कवितेतला भावार्थ उलगडा करतांना फारच अप्रतिम शब्दांत ओघपुर्ण व समर्पक अशी प्रस्तावना लिहून काव्यसंग्रहास योग्य न्याय दिला आहे.सर,म्हणतात,” मानवी जीवन आणि निसर्ग जीवनाच्या गाभ्याला भिडणारी मनिषाताईची अव्वल प्रज्ञा ज्ञात -अज्ञाताला हादरे देऊन थेट जोडते. त्यातील अंतर्मनाच्या व्यामिश्र कळा गुंतागुंतीसह प्रश्नचिन्ह घेऊन अभिव्यक्त होतात.असंख्य प्रश्नांचे मोहळ वाचक मनाला प्रभावित करते.प्रश्नांच्या मुळाशी असलेली कवयित्रीच्या अंतरंगाचा अनुबंध तत्वज्ञान, परंपरा,संस्कृती, संकेत,धर्म,कायदे अशा अनेक घटकाशी जुळून आहे.जीवनातील क्रौर्य,हिंसा,वेदना,दु:ख शोषण,अन्याय अशा सर्वच विकृत वास्तवाचे सूक्ष्म आकलन मनिषा पाटील यांच्या काव्यविश्वातून सूचकपणे स्वयंसिद्ध आहे.

  आयुष्याची कणीक तिंबणारी बोटं आणि मानेवर जू घेऊन वृषभजीणं यांची अपरिहार्यता “तरीही वाटते ” या कवितेत व्यक्त झालीय. तरीही आपल्याच अंत:करणातून ‘ मुक्ततेचा हुंकार ‘येत असल्याची जाणीव आशादायक म्हणावी लागेल अनुभूतीसोबत अनुभवाच्या शहाणपणाची सूत्रेही कविता निर्मिती प्रक्रियेत जन्माला घालतात.आणि हे कविता वाचतांना लक्षात आल्यावाचून राहत नाही.

  प्रदीप पाटील सर कविता संग्रहाविषयी म्हणतात ,”अनुभवाच्या आंतरिकीकरणामुळे अनुभसवाला प्राप्त झालेले कलानुभवाचे रुप कवितेचे सौंदर्य वाढविते.’स्त्री ‘चे विविध पातळ्यांवर होणारे शोषण त्यांची कविता चित्रित करतेच,पण समाजामध्ये झालेल्या नव्या बदलालांनाही ती संयतपणे थेट भेटते.जीवनाकडे पाहण्याची चिंतनात्मक दृष्टी त्यांना लाभली आहे.त्यामुळे स्वभावतःच चिंतनशील असलेल्या त्यांच्या कवितेतून जगण्याचा नवा अन्वयार्थ अनुभवाला येतो.”याचा अनुभव कविता वाचतांना नक्की होतोच यावरून कवितेचा आशय,प्रतिमा,अभिव्यक्ती, संवाद विसंवाद, नैतिकता, शोषण, होरपळ, फसवणुकीचा दाहक प्रत्यय,वेदना, हक्क, स्त्री जीवनातील क्रौर्य, या सा-या आशयाला स्पर्श करीत कवितेचा प्रवास अस्वस्थ जीवनाचे विदारक वास्तवाद ज्योती -सावित्रीचा वसा घेऊन मनिषाताईनी समर्थपणे मांडल्या आहेत.हे आपणास फक्त कवितेचे शीर्षक वाचताच प्रत्ययास येतेच,कवितेने कोणतेही बंधन. न पाळता. यमक, साचेबंधाच्या कुंपनाच्या बंधनात न अडकता ह्दयातील शल्य कवितेत उतरवण्यात मनिषाताई यशस्वी झाल्या आहेत.हाच कवितासंग्रहाचा मुख्य गाभा आहे. संघर्ष असतोच सदाहरित वनांचा सूर्यप्रकाशासाठी, किणा-याला महापूराने कापाव्यात तसे आपण कापत जातो परोपकाराच्या कडवस्यात झाकाळून टाकतो आपण दुस-याचे अस्तित्व असे म्हणून त्या म्हणतात,( पान क्र.१८)

  “म्हणून सुखाचा पाऊस
  झेलू द्यावा ज्याचा त्याला
  इतकेही लुटू नये मधाचे पोळे
  मधमाशांचा शाप घेऊन
  फोडू नयेत पहारीने
  वारुळांचे महाल
  करु नये मुंग्याची वंशावळ बेघर”

  रानात पेरलेल्या बिया श्वासाला जीव लावून पुनर्जन्म होतात आपले हिरवेपणा जपत मनिषाताईना वाटते आपणासही असे जगण्यावर प्रेम करता यायला हवे. आपण नेहमी कसलेतरी ओझे घेऊनच फिरत असतो,आयुष्याची कणीक तिंबत,बंदिस्त अवयवाच्या बाहेर जबाबदारीचे जू मिरवतोच,कधी आपणास एकाकी करुतो आपलाच सूर्य, आभाळ निघून जाते,मनातला गलका वाढत जातो, युगाचं मौन पाळत वळणावरच्या वाटासुध्द एकमेकीना भेटत नाहीत.शपथांचा गुलमोहर गळून पडतो,हिरव्या काकणांचे स्पर्श वाटून जातात,विश्वासाची चिलखतं गळून पडून नात्यांचा पूर ओसरू लागतो अशा वेळी आपण टाळू शकत नाही आपल्याच परिघाचे बदललेले संदर्भ, नाकारलेपण वाईट असते हे सांगतांना ‘ज्याच्या त्याच्या (पान क्र.२३) म्हणतात,

  रस्ते बदलले तरी
  उपरेपणाचे कुरूप
  लसत राहते टाचेला
  तेंव्हा कुठलीच दिशा
  आपली वाटत नाही

  कोणतेच प्रहर नसलेले वर्तमान,प्रत्येक हक्क कोणीतरी हरवून घेत आहे.अंगण,परसदार,माजघर,स्वयंपाक घर यातील आँक्सिनवाहीन्याचे श्वास निर्दयपणे कापले गेले आहेत,जीवनांचा वनवास सोपा केलाय अशावेळी मनिषा म्हणतात,

  एक करशील?
  वारा बनूनही
  नको येऊस
  माझ्या वाळवंटात

  मन निरतंर, कुढतं ओली पापणी टाळत राहते नजर,पदरात घेतलेले शापीत आईपण जपतांना जड जाते, मनात घुमसणारा ज्वालामुखीचा लाव्हा, जखमांची डबडब, वेदनांची ठसठस, आपल्या भल्याबुऱ्या क्षणांची लगोरी,आयुष्य बर्फात ठेवलेल्या प्रेतासमान,मनातल्या पटलावर शांत झोपत नाहीत,तिरकस कुचकट बोलणे,प्रेमाची करंगळी लागावी गोवर्धनाला अशी अपेक्षा करीत लिपत राहत असतांना आशेच्या भिंतीचे मातीपण कळेल. अर्ध्यवरच करपून गेलेल्या सुखाच्या पारंब्या, चैत्रातील पानगळ,उद्वध्वस्त श्रावण,गळ्यातलं मंगळसूत्रही कधी कधी फितूर होते,श्वासाचा पदर धरून चालावे लागते,तव्यावरच्या वाफेसारख्या वेळा निघून जातात,’बायका टाळतात बायकांना (पान क्र.५२)

  बायका फुलत नाहीत
  कोणत्याच बहरात मोकळेपणाने
  त्या खुरट्या झाल्यात
  बोराटीसारख्या
  बायका विसरताहेत
  एकमेकींचा हात हातात घेणं
  झिम्मा,फुगडी खेळणं …
  झोपाळ्यावर हिंदळणं…
  मूठभर मोगरीला वाटून घेणं ….
  दिवसभर गंधार वाहत राहणं …

  बायका एकमेकींस ओळख न देता कठपुतळीसारख्या मात्र नटलेल्या वरवर चाललेला गाव मनिषाताईना अस्वस्थ करतो.विसरभोळा झालाय गाव यात त्या म्हणतात (पान क्र.५३)

  टोकरुन काढावी म्हटलं
  तरी सापडत नाही
  चिमुटभर ओल
  कुणाच्या काळजात !

  विषारी ढगानी गाव धगधगत राहतं.घरे मुकी झाली आहेत .कर्फ्यू लागल्यागत गल्लीबोळ कोरड्या विहिरीसारख्या प्रत्येकाचा विद्रुप चेहरा, द्वेशाचा अंगार त्याच्यात प्रज्वलित होतोय, पारावर पानेही फिरकत नाहीत, रक्ताची चटक लागली आहे, त्यांना पसायदान आठवत नाही,जीवनाच्या कुरूक्षेत्रावर प्याद्यासारखे लढत राहते गाव,टेकड्यांचे कवचकुंडले द्वेषाच्या सुरुंगात तुटून पडतात,संकटाच्या खोल दलदलीत प्रयत्नांची चाके रुतून बसली आहेत, उपाशी चिमणीचा आवाज चिरत जातो पानासारखा अशा वेळी कोणीतरी वांझोट्या नात्यांना पाणी घालत राहतो. कोरड्या मातीचे वर्तमान बदलावे म्हणून.असा हा कवितेचा प्रवास मनाला सुन्न करुन जातो.बदलाची आस मनात रुजावी म्हणून मनिषाताईचा प्रयत्न प्रत्येक पानातील कविता, आत्मचिंतन आणि सृष्टीच्या अस्तित्वाचे विचारमंथन काव्याविश्वातील प्रश्नांकित मेंदूला झिणझिण्या येतात.सर्वस्पर्शी प्रतिभेची साक्ष उजळपणाने दिसते.म्हणूनच कवितासंग्रहाचे वाचन करावे कारण हे निरीक्षण व आकलन फारच समृद्ध असल्याचे निश्चित जाणवतेच.

  या काव्यासंग्रहातील आपापल्या भाड्याचा सूर्यप्रकाश, तरीही वाटतं, हे कसले वर्तमान, तुझे सरीचे पाऊल, उंबरठ्याआड, मोनिपाँज, नांदी, तुझ्या ओंजळीत, आदिम गुहामध्ये,उन्हांच्या कविता,बाई पाऊस वंशाचा,हवाय मला जन्म,तळहातावर,अंतिम सत्य,नाती वांझ होताना, चेहरा हरवलेल्या लेकी, आजही बाई सती जातेच की या कविता पुन्हा पुन्हा वाचाव्या अशा आहेत तसेच पारंब्या,वांझोट्या,रुजवे, आदिम, फोटोक्लिक, स्क्रीनवर,तळमुक्कामी,धूळपाटी,ठसठस,पापुद्रे,मार्गस्थ, सुरवंटी,टोचावी,अँसिडिक,खुरप्याने,कवचकुंडले,सुगंधी रेषा, ठिणगी, विखार, अग्निहोत्र, कर्फ्यु, चंद्रमौळी, फडफड, तुळी, टळटळीत, स्टँच्यु, फितूर, कोल्ड, बिसलेरी, सेफ्टी पिन, बोन्साय, अँपेन्डिक्स, टिटव्या, ज्वालामुखी, टी.आर.पी, क्राईम अशा अनेक शब्दांची योजना अतिशय उत्कृष्टपणे करुन काव्यातील भावछटेला उजळ करण्यात मनिषा पाटील यशस्वी झाल्या आहेत.

  मुखपृष्ठावर वरचे चित्र अतिशय समर्पक असून कविता संग्रहासाठी न्याय देणारा असा आहे सुनील यावलीकर याचे आहे.सुनिताराजे पवार यांनी संस्कृती प्रकाशन नारायण पेठ,पुणे येथून प्रकाशित केले आहे,मनिषा पाटील यांना सदर काव्य संग्रह आपले पती प्रा.एस्.एस्.पाटील आणि आपले बंधू अँड.पृथ्वीराज पाटील यांना अर्पण केले आहे.प्रदीप पाटील सर यांनी अतिशय मुद्देसूद असे मलपृष्ठ सजवले आहे.डाॅ.श्रीपाल सबनीस यांची प्रस्तावना काव्यातील भावछटा अतिशय उत्कटपणे मांडली आहे प्रस्तावना पुन्हा पुन्हा वाचावी अशीच आहे.

  एकंदरीत संग्रही असावा असा काव्यासंग्रह असून साहित्यक्षेत्रात सर्वच साहित्यिक व वाचक स्वागत करतीलच व अनेक पुरस्कारानी सन्मानित होईल हीच अशा व्यक्त करुन मनिषाताईना लेखनासाठी हार्दिक शुभेच्छा .आपण सर्वांनी करून वाचा हीच अपेक्षा !

● हे वाचा – आयुष्याच्या वाटेवर,अनुभव संपन्न कविता संग्रह

  नाती वांझ होताना
  मनिषा पाटील -हरोलीकर
  संस्कृती प्रकाशन, पुणे
  मुखपृष्ठ : सुनील यावलीकर
  स्वागत मुल्य :१५० रुपये.
  मो.९७३०४८३०३२.
  आस्वादक
  -मुबारक उमराणी
  सांगली
  ९७६६०८१०९७.
  ————–

  तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? आम्हास आपल्या परिसरातील बातम्या, लेख अवश्य पाठवा आणि प्रतिनिधी बना ! ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Gaurav Prakashan फेसबुकपेज !

  ——————–

  आम्ही तुमच्यासमोर बातम्या, कथा, कविता, वाचनीय लेख अश्या खूप साऱ्या लेखामार्फत भेटत असतो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा, कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते, तसेच आमचे फेसबुक पेज ही नक्की लाईक करा, गौरव प्रकाशन युट्यूब चॅनेल लाईक Subscribe करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याचबरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद…!

  -बंडूकुमार धवणे
  संपादक गौरव प्रकाशन
  ——————–

gauravprakashan1@gmail.com

Maharashtra News, Braking News, Marathi News, Most Popular Marathi News, Latest Marathi News,Today News,Marathi Article, Marathi Poem, Marathi Story,

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *