Translate

Recent in Technology

Advertisement

Breaking News

राष्ट्रीय मतदार दिवस आणि सुजाण नागरिक


भारतीय निवडणूक आयोगाचा स्थापना दिवस 25 जानेवारी हा राष्ट्रीय मतदार दिवस म्हणून साजरा केला जातो .भारत देश हा लोकसंख्येच्या दृष्टीने जरी मोठा असला तरी भारतामध्ये दिवसेंदिवस मतदानाविषयी वाढणारी उदासीनता व घसरलेली मतदानाची टक्केवारी विचार करण्याजोगी आहे. भारतातील प्रत्येक नागरिकाने आपल्या देशाच्या निवडणूक मध्ये सहभागी होऊन आपली जबाबदारी पार पाडण्यासाठी सज्ज असायला पाहिजे, पण असे दिसून येत नाही. त्यामुळे भारतीय निवडणूक आयोगाने लोकांमध्ये जनजागृती करण्याच्या दृष्टीने 25 जानेवारी हा राष्ट्रीय मतदार दिवस म्हणून घोषित केला आहे .मतदारांना आपल्या मतदानाच्या कर्तव्याची जाणीव व्हावी यासाठी शासनाकडून व विविध सामाजिक संस्थांकडून या दिवशी जनजागृती केली जाते.
 
भारतीय राज्यघटनेने प्रत्येक भारतीयाला मतदानाचा सर्वोच्च अधिकार प्रदान केला आहे. भारतात लोकशाही अस्तित्वात आहे म्हणजे लोक लोकांसाठी राज्य चालवतात. कुणाला सत्तेवर ठेवायचे आणि कुणाची सत्ता उलथून टाकायची याची सर्वोच्च संधी प्रत्येक नागरिकाला आपल्या मतदानातून व्यक्त करता येते. देशाची लोकशाही मजबूत करण्यासाठी सर्वच भारतीय नागरिकांना मतदान प्रक्रियेमध्ये सहभागी होणे आवश्यक आहे. त्यामुळे खरे प्रतिनिधी देशाला मिळेल. 

आजही असंख्य लोक 
मतदान प्रक्रियेमध्ये सहभाग घेत नाही त्यामुळे देशाला मिळालेल्या प्रतिनिधित्वाबद्दलचा कल लक्षात येत नाही. प्रसंगी बहुमत नसताना सुद्धा अनेक सरकारे आपल्या मित्र पक्षाला सोबत घेऊन राज्य चालवितात म्हणून प्रतिनिधी निवडताना योग्य व्यक्तीची निवड जर करावयाची असेल तर प्रत्येकाने मतदानाच्या प्रक्रियेत सक्रिय सहभागी होणे अत्यंत गरजेचे आहे आणि भारतीय संविधानाने हा दिलेला आपल्याला सर्वात मोठा हक्क आहे .

देशाची प्रगती करण्यासाठी प्रत्येक मतदाराने जागृत असणे गरजेचे आहे देशाच्या उज्वल भविष्यासाठी तसेच लोकशाहीला बळकट करण्यासाठी प्रत्येकाने मतदान प्रक्रियेत सहभाग नोंदविणे गरजेचे आहे. ज्याप्रमाणे शेतकरी आपल्या शेतात अहोरात्र मेहनत करून देशसेवा करतो, देशाच्या सीमेवर सैनिक सुद्धा डोळ्यात तेल घालून आपल्या देशाचे रक्षण करतो ,शास्त्रज्ञ मंडळी अहोरात्र मेहनत करून संशोधन क्षेत्रात आपले अमूल्य मार्गदर्शन देतात, अनेक उद्योगपती देशातील आर्थिक स्थैर्याला हातभार लावतात त्याचप्रमाणे मतदान प्रक्रियेत सहभागी होऊन, आपले कर्तव्य पार पाडून प्रत्येक नागरिकांनी एक प्रकारची देश सेवा करावी लागेल.

 ज्याप्रमाणे आपण 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिन, 26 जानेवारी प्रजासत्ताक दिन , 1 मे महाराष्ट्र दिन साजरे करतो त्याप्रमाणे 25 जानेवारी हा राष्ट्रीय मतदार दिवस हा सुद्धा मोठ्या उत्साहाने साजरा करूया. राष्ट्रीय सणाला जशी आपली देशभक्ती ओसंडून वाहते त्याप्रमाणे मतदानाच्या दिवशी सुद्धा त्यामध्ये हिरिरीने सहभागी आपण आपली देशभक्ती सिद्ध करूया. मतदानाच्या बाबतीत लोकांच्या मनामध्ये एक सुरक्षित भावना निर्माण करूया. आणि याची कळाला गरज आहे. भारतीय निवडणूक आयोग दरवर्षी 25 जानेवारीला विविध उपक्रम राबवून राष्ट्रीय मतदार दिवस साजरा करण्यासाठी पुढे सरसावत असते, यासाठी गावात प्रभात फेरीचे आयोजन करणे, शाळा महाविद्यालयातून मतदानाविषयी जनजागृती करणे असे अनेक उपक्रम दरवर्षी राबविले जातात  पण जोपर्यंत भारतातील प्रत्येक नागरिक हा स्वतःच्या इच्छेने मतदान प्रक्रियेमध्ये सहभागी होणार नाही तोपर्यंत राष्ट्रीय मतदार दिवस साजरा झाला असे म्हणता येणार नाही.

 मतदान करणे हा नागरिकांचा मूलभूत अधिकार आहे मतदानाद्वारेच आपण आपले प्रतिनिधी निवडत असतो त्यावरच आपल्या गावाचा किंबहुना देशाचा विकास होत असतो. पण प्रत्येकाने मतदान प्रक्रियेमध्ये सहभागी न झाल्यामुळे कधी कधी चुकीचा उमेदवार निवडला जातो आणि त्याची झळ सर्वसामान्यांना पोहोचते परिणामी आपला विकास होऊ शकत नाही. म्हणून जर राष्ट्रीय मतदार दिवस हा उत्सव साजरा करायचा असेल तर प्रत्येकाने संकल्प करूया की दरवर्षी होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये मतदानाचा हक्क बजावून देशाच्या विकासाला हातभार लावूया म्हणून शेवटी एवढेच म्हणावेसे वाटते की आता तरी मतदार राजा जागा हो.......

-अविनाश अशोक गंजीवाले
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा करजगाव 
पं स तिवसा जि अमरावती

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

People

Ad Code