Translate

Recent in Technology

Advertisement

Breaking News

कथा सआदत हसन मंटोची..

  धर्माचा माज भारतासह जगभर आज चरम सीमेवर आहे. मध्यममार्गी बोलणारे आणि मानवता महत्वाची मानून लिहिणारे आज नेभळट ठरवले जात आहेत. खून करून जेलात जाणाऱ्यांचे स्वागत होत आहे. स्वतःच्या मयतीचे सामान लोक स्वतः जमा करीत आहेत. अशा उन्मादी आणि वैचारिक दुष्काळात 'सआदत हसन मंटो' ची आणि त्याच्या लिखाणाची चर्चा होणं स्वाभाविक आहे. फाळणीनंतर पाकिस्तानात गेलेला परंतु मानवतेपासून तसूभरही न ढळलेला मंटो मृत्यूच्या 70 वर्षानंतरही त्याच्या लिखाणातून जगाला प्रेमाचा संदेश देतो. जाणून घेऊया कवी लोकनाथ यशवंत यांनी नुकत्याच अनुवादीत केलेल्या मंटोच्या कथेविषयी..

  11 मे 1912 रोजी पंजाब मधील लुधियाना जिल्ह्यातील समबरला येथे सआदत हसन मंटो यांचा जन्म झाला. ते उत्तम कथाकार होते. 1935 साली ते मुंबईला आले. तिथे साप्ताहिक 'पारस' मध्ये त्यांनी काही काळ काम केले. 18 जानेवारी 1955 रोजी त्यांचे निधन झाले. 42 वर्षाच्या आयुष्यात त्यांची 26 पुस्तके प्रकाशित झाली. भारत पाकिस्तान फाळणीत मंटो पाकिस्तानला स्थलांतरित झाले. खरे तर त्यांना पाकिस्तानला जायचे नव्हते. मात्र तत्कालीन परिस्थितीतल्या रेट्यानं त्यांना पाकिस्तानला स्थलांतर करावे लागले. मंटोने त्यांच्या साहित्यात देश विभाजन, दंगली आणि धर्मवादी कडवट व्यवस्थेविरुद्ध लेखन केले आहे.

  विशेषत: फाळणीच्या काळात झालेल्या दंगलीबद्दल मंटो लिहितात की 'हजारो हिंदू मारले गेले असे म्हणू नका, हजारो मुस्लिम मारले गेले असंही म्हणू नका फक्त हजारो माणसे मारले गेली असं म्हणा' मंटोच्या यां लेखनात मानवता दिसते. ते कडवट लिहीत असत. त्यांच्या लिखाणावर ब्रिटिश काळात आणि विभाजनानंतर पाकिस्तानात देखील आक्षेप घेण्यात आले. कारवाई करण्यात आली पण मंटोने लेखन थांबवले नाही. ते म्हणाले, 'कितीही कोर्ट केसेस करा मी लिहिणे थांबवणार नाही. मी सत्य लिहिणे बंद करणार नाही. जर माझ्या कथेने तुम्हाला त्रास होत असेल तर आधी तो समाज बदलून टाका कारण मी सत्य लिहित राहील. तुम्ही नमाज वा पूजापाठ करा तर मी त्यावर लिहील आणि तुम्ही वेश्यागमन कराल तर तेही लिहिल. एक वेळ मी माझे डोळे बंद करू शकेन पण माझं मन मारू शकत नाही.'

  मंटोने दीडशेवर अधिक कहाण्या लिहिल्या आहेत. व्यक्ती चित्रण, चित्रपटांसाठी कथालेखन व संवादसुद्धा लिहिले आहेत. विभाजनानंतर पाकिस्तानी अर्थव्यवस्था अमेरिका मदतीवर पोसली जात असताना मंटोने त्यावर टीका केली आहे आणि बेडरपणे खडे बोल सुनावले आहेत. जगभरात आज मंटोचे लेखन आवडीने वाचले जाते. भारत पाकिस्तान फाळणीच्या रक्तपाताने मंटो दुःखी झाला होता. एकेकाळी ज्या पाकिस्तान सरकारने मंटोवर कारवाई केली त्याच पाकिस्तानने मंटोला 2012 साली मरणोत्तर गुणवत्ता सन्मान दिला आणि पोस्टाचे तिकीट काढले. हे मंटोचं वैचारिक यश!

  मंटोने लिहिलेल्या काही लघुकथाचा मराठीत अनुवाद कवी लोकनाथ यशवंत यांनी केला आहे. 'सआदत हसन मंटो लघुकथा' या नावाने हे पुस्तक नुकतेच प्रसिद्ध झाले आहे. मनोविकास प्रकाशनने ते प्रकाशित केले आहे. 64 पानाच्या पुस्तकात 32 लघुकथा आहेत. मुखपृष्ठावरले चित्र पुस्तकात शिरायला भाग पाडते. संजय मोरे व सुनील यावलीकर यांची आत रेखाचित्रे आहेत. मोहम्मद असलम परवेज यांनी या पुस्तकातल्या कथांची ओळख करून दिली आहे. कवी लोकनाथ यशवंत यांनी यात हृदयस्पर्शी मनोगत लिहिले आहे. कवी लोकनाथ यशवंत यांनी सुद्धा नागपूर मध्ये 1988 साली प्रत्यक्ष दंगलीचा चटका अनुभवला हे त्यातून कळते. सामान्य माणसाची दंगलीत काय अवस्था होते हे त्यात लिहिले आहे. त्यामुळे वाचकांनी हे मनोगत वाचूनच मंटोच्या कथामध्ये शिरलेले योग्य राहील. या पुस्तकात मंटोचा अल्प स्वल्प परिचय आहे. सआदत हसन मंटो या मानवातावादी लेखकाबद्दल तो कुतूहल निर्माण करणारा आहे. आज जगभर सर्वत्र धर्माचे मळभ दाटले असल्याने मंटो आपला वाटू लागतो. मंटोवर आजपर्यंत अनेक पुस्तक आली आहेत. नंदिता दास या गुणी अभिनेत्रीचा एक हिंदी सिनेमाही आला आहे. विविध भाषांमध्ये मंटोच्या लेखनाची भाषांतरे झालेली आहेत. छोट्या छोट्या स्वरूपातील मंटोच्या कथा वाचकाला लोकनाथ यशवंत यांच्या कवीतांसारख्या अंतर्मुख करून जातात. विचार करायला भाग पाडतात.

  मराठी साहित्य प्रांतात अल्पाक्षरी कवितांमधून मजबूत आशय देणारी कविता लोकनाथ यशवंत यांनी लिहिली. त्यांच्या या कवितांचा मराठीत स्वतंत्र चाहता वर्ग आहे. मराठीत अल्पाक्षरी काव्य लिहिणाऱ्या लोकनाथ यांना सआदत हसन मंटो यांच्या कथांनी भुरळ घातली. मंटोच्या लिखाणाचा अवकाश वर्षापासून 70 वर्षांपूर्वीचा असला तरी तो आजच्या वर्तमानाला जसाच्या तसा लागू पडतो. म्हणूनच कदाचित लोकनाथ यशवंत यांनी या कथा अनुवादित करून मराठीत आणल्या असाव्यात. सुंदर मांडणी, रेखाचित्र, बोलके मुखपृष्ठ आणि वेगळा आकार यामुळे हे पुस्तक चित्तवेधक ठरले आहे. नमुन्यादाखल एक कथा अशी आहे..आग लावण्यात आली आणि संपूर्ण मोहल्ला जळून राख झाला. फक्त एकच दुकान सुरक्षित राहिले. त्या दुकानाच्या फलकावर मोठ्या अक्षरांत लिहिले होते, 'इथे घर-सजावटीचे सामान मिळते'.. लोकनाथ यांनी या लघुकथा मराठीत अनुवादीत करून मोठे काम केले आहे. प्रत्येकांनी त्या जरूर वाचाव्यात इतरांना वाचायला द्याव्यात आणि आपल्यातून लोप पावत चाललेली मानवता जागवावी. या कथासुद्धा नेमकं हेच सांगतात.

  सआदत हसन मंटो लघुत्तम कथा
  अनुवाद: लोकनाथ यशवंत मो.9730275152
  प्रकाशक: मनोविकास प्रकाशन मुंबई
  पुस्तक परिचय:
  -रवींद्र साळवे,
   बुलढाणा
  मो 9822262003
  --------------

  तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? आम्हास आपल्या परिसरातील बातम्या, लेख अवश्य पाठवा आणि प्रतिनिधी बना ! ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Gaurav Prakashan फेसबुकपेज !

  --------------------

  आम्ही तुमच्यासमोर बातम्या, कथा, कविता, वाचनीय लेख अश्या खूप साऱ्या लेखामार्फत भेटत असतो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा, कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते, तसेच आमचे फेसबुक पेज ही नक्की लाईक करा, गौरव प्रकाशन युट्यूब चॅनेल लाईक Subscribe करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याचबरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद...!

  -बंडूकुमार धवणे
  संपादक गौरव प्रकाशन
  --------------------

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

People

Ad Code