- * मराठी भाषा पंधरवडा
- गौरव प्रकाशन वृत्त संकलन
अमरावती (प्रतिनिधी) : प्राचीन, मध्ययुगीन व अर्वाचीन या तिन्ही कालखंडात अमरावती जिल्ह्याच्या भूमीत मराठी भाषेत मोठी व अक्षर वाङमयनिर्मिती झालेली आहे. महाराष्ट्रीय संस्कृतीत या भूमीचे महत्व अनन्यसाधारण आहे, असे प्रतिपादन विद्यापीठातील स्त्री अभ्यास केंद्राचे प्रा. भगवान फाळके यांनी आज येथे केले.
मराठी भाषा संवर्धन पंधरवड्यानिमित्त मराठी भाषा विभाग, भाषा संचालनालय, विदर्भ साहित्य संघ आणि संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या पदव्युत्तर मराठी विभागातर्फे विद्यापीठात प्रा. फाळके यांचे 'मराठी साहित्यात अमरावती जिल्ह्याचे वाङ्मयीन योगदान' या विषयावर व्याख्यान झाले, त्यात ते बोलत होते. विद्यापीठाच्या मानव विज्ञान विद्या शाखा अधिष्ठाता व मराठी विभाग प्रमुख डॉ. मोना चिमोटे अध्यक्षस्थानी होत्या. भाषा सहायक संचालक हरिश सूर्यवंशी, स्नेहा पुनसे, धनंजय कानेड, मनोज तायडे, डॉ. हेमंत खडके आदी उपस्थित होते.
प्रा. फाळके म्हणाले की, जागतिकीकरणाने जगाचे वैश्विक खेडे झालेले असताना मानवी मनोविश्व व व्यवहारात आभासी बाबींचा शिरकाव झाला आहे. अशा काळात भोवतालाचे व आपल्या परंपरेचे भान जागृत ठेवणे आवश्यक आहे. या भूमीतील वाङमयीन परंपरा थोर आहे. त्याची जाणीव आपल्याला असली पाहिजे. चक्रधर, म्हाईंभट, महंदबा यांच्या महानुभाव साहित्यापासून ते राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, संत गाडगेबाबा, प्रज्ञाचक्षू गुलाबराव महाराजांपर्यंत मोठी परंपरा जिल्ह्याला लाभली आहे. सत्यशोधक चळवळीतही येथे मोठी साहित्यनिर्मिती झाली.
कविभूषण ब. ग. खापर्डे, वीर वामनराव जोशी, लेडी यशोदाबाई जोशी, उद्धव शेळके, सुरेश भट, मधुकर केचे, शरच्चंद्र सिन्हा, तुळशीराम काजे, सुशीला पाटील, माणिक कानेड, वसंत आबाजी डहाके, प्रभा गणोरकर, मधुकर वाकोडे, सुखदेव ढाणके, बबन सराडकर, सुभाष सावरकर, अशोक थोरात, रमेश अंधारे आदी अनेक साहित्यिकांचा योगदानाची मांडणी त्यांनी केली.
कोशनिर्मिती व नाट्यक्षेत्रातही जिल्ह्याचे स्थान मोठे आहे. अचलपूर शहराला एकोणविसाव्या शतकाच्या पूर्वार्धापासूनची परंपरा आहे. याबाबत अधिक संशोधन गरजेचे असल्याचे डॉ. चिमोटे यांनी सांगितले. शासन व्यवहारात मराठी भाषेचा वापर वाढावा म्हणून भाषा संचालनालय विविध उपक्रम राबवत असल्याचे श्री. सूर्यवंशी यांनी प्रास्ताविकात सांगितले. अभिजित इंगळे यांनी सूत्रसंचालन केले.
- --------------
तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? आम्हास आपल्या परिसरातील बातम्या, लेख अवश्य पाठवा आणि प्रतिनिधी बना ! ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Gaurav Prakashan फेसबुकपेज !
- --------------------
आम्ही तुमच्यासमोर बातम्या, कथा, कविता, वाचनीय लेख अश्या खूप साऱ्या लेखामार्फत भेटत असतो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा, कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते, तसेच आमचे फेसबुक पेज ही नक्की लाईक करा, गौरव प्रकाशन युट्यूब चॅनेल लाईक Subscribe करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याचबरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद...!
- -बंडूकुमार धवणे
- संपादक गौरव प्रकाशन
- --------------------
0 टिप्पण्या