Header Ads Widget

भूक छळते तेव्हा... एक संघर्ष गाथा

  भूक छळते तेव्हा... सदर संग्रहास ज्येष्ठ साहित्यिक डॉ. नयनचंद्र सरस्वते यांची सखोल प्रस्तावना, ज्येष्ठ साहित्यिक कवी चंद्रकांत दादा वानखेडे यांची शुभेच्छारुपी पाठराखण आणि ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांचा शुभसंदेश लाभलेला असून कवी संदीप राठोड यांचा "भूक छळते तेव्हा" हा पहिलाच काव्यसंग्रह..!

  जन्म आणि मृत्यू दरम्यानचा खडतर प्रवास पूर्ण करत असताना आपल्याला भाकरीच्या शोधात दररोज धडपड करावी लागते, किंबहुना यास समुद्रमंथन जरी म्हणालो तरी चुकीचे वाटणार नाही. कवी संदीप राठोड हेही याच चाकोरीतून जीवन जगलेले आहे आणि आजही याच परिस्थितीतून जीवन व्यथित करत आहेत. भटक्या समाजात जन्माला आल्यानंतर त्यांनी जे भोगले, अनुभवले, बघितले त्याचेच प्रतिबिंब म्हणजे “भूक छळते तेव्हा” हा वास्तवदर्शी काव्यसंग्रह. समुद्रमंथन केल्यानंतर ज्याप्रमाणे अमृताची उत्पत्ती झाली, त्याचप्रमाणे भाकरीच्या शोधात असताना आलेल्या परिस्थितीस दोन हात करणे समुद्रमंथन करण्यापेक्षा कितीतरी अवघड असते असे मला वाटते आणि त्यानंतर या काव्यसंग्रहाचा जन्म व्हावा आणि वाचकांना वास्तविक काव्यकुंभ प्राप्त व्हावे आणि त्यातला एक घोट मलाही मिळावा असेच काहीतरी हा काव्यसंग्रह माझ्या हाती आल्यानंतर मला वाटले. ही केवळ कल्पकता नसून वास्तव आहे कारण, या संग्रहातील प्रत्येक कविता वास्तवाशी संबधित असून वाचकाला कवितेत आपणच आहोत आणि हे सर्व मी देखील अनुभवलेले आहे असे वाटते आणि एक महत्वाची बाब म्हणजे कवी संदीप राठोड यांचा जीवन परिचय येथे सांगायची आवश्यकता नाही असे मला वाटते कारण, हा काव्यसंग्रह वाचल्यानंतर सहजच वाचकाला कळून येईल.वास्तविक घडामोडींचे जिवंत चित्रण कवी संदीप राठोड यांनी कवितेत मांडण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला आहे त्यामुळे सर्वप्रथम मी कवी संदीप राठोड यांचे अभिनंदन करतो आणि पुस्तकाच्या गाभ्याकडे वळतो.

  कुठल्याही अतिशयोक्ती शिवाय एखादी कविता जेव्हा वाचकाच्या काळजाचा ठाव घेत असते खऱ्या अर्थाने तीच कविता असते आणि या संग्रहातील प्रत्येक कविता वाचकाच्या काळजाचा ठाव घेणाऱ्या आहेत यात कुठेह संदेह नाही. अनुक्रमणिकेच्या आधीच्या पानावर ‘दास’ या कवितेतील एक चारोळी पुरावा म्हणून देत आहे, यात कवीने लिहिले आहे की…..,

  घामाचा भाव कोसळल्यावर
  काळजाचे वाढायचे ठोके
  बाप बसायचा चिंतातूर
  घालून गुडघ्यात डोके

  अपार कष्ट करून मातीत घाम गाळत राबणारा बाप( शेतकरी ) पिकांना लेकराची माया देत असतो, परंतु पिकांचे भाव जेव्हा कोसळतात तेव्हा शेतकऱ्याच्या जीवाची होणारी तगमग वरील ओळीत व्यक्त झालेली आहे. यात हुबेहूब प्रसंग समोर मांडल्याचे दिसत आहे आणि हिच ताकद कवी संदीप राठोड यांच्या लेखणीत आहे.

  मला एक गोष्ट खूप विशेष वाटली ती म्हणजे ज्या घरात आपण वास्तव्य करतो त्या घरालाही कवीने चक्क बापाची उपमा दिलेली आहे आणि यात तिळमात्रही शंका नाही , कारण जोवर डोक्यावर घराचे छत आणि बापाचा हात आहे तोवर माणसाला आपणच या जगात भाग्यवान असल्याचा अनुभव येत असतो आणि ज्याच्या डोक्यावर बापाचा हात नसतो, घराचे छत नसते त्याचे दु:ख त्यालाच माहिती. त्यामुळे कवी संदीप राठोड आपल्या ‘साक्षीदार’ या कवितेत घराचे वर्णन करताना म्हणतात,...

  हार मानून वादळ वाऱ्यात
  डोळे मिटले नाही
  बापासारखे घर कधी
  मागे हटले नाही

  बाप लेकराच्या पाठीमागे ज्याप्रमाणे खंबीर उभा असतो, त्याच्यासाठी अनेक संकटाना सामोरे जातो अगदी त्याचप्रमाणे वादळ, वारा, पाऊस झेलून आपले संरक्षण करणारे घर बापासारखेच आहे. पुढील कवितेत कवीने घराची तुलना करताना म्हटले आहे कि,

  माय बापाने बांधले
  देवळावाणी घर
  येईल कशी माझ्या घराची
  इंद्रपुरीला सर

  वरील कवितेत कवीचा आपल्या माय बापाने कष्टाने बांधलेल्या घराविषयी जिव्हाळा व्यक्त होतो आणि या घरापुढे इंद्रपुरीसुद्धा त्यास फिकी वाटते, हेच घर माझ्यासाठी स्वर्ग आहे ज्या घरासाठी माझ्या माय बापाचे कष्ट खर्ची पडलेले आहेत.

  भाकरीच्या शोधात असताना जीवनात अनेक संकटांना सामोरे जाऊन काबाडकष्ट करावे लागतात, कधी मजुरी करावी लागते तर कधी उसतोड करावी लागते, पण उसतोड करताना सोसावे लागणारे कष्ट फार वेदनादायी असतात, त्यामुळे हि वेदना कशी छळते याचे वर्णन करताना कवी संदीप राठोड म्हणतात,

  छातीत निघायची कळ
  दिवसभर तोडून ऊस
  रात्रभर छळायची वेदना
  अदलून बदलून कूस

  वेदना खरंच किती क्रूर असते असे वरील ओळीतून स्पष्ट होते, दिवसभर उन्हात राबताना कधी अंगाला पाचट लागते, तर कधी धारदार कोयत्याने एखाद्या बोटाला इजा होते तरीही कमालीची सहनशीलता दाखवून उसतोड केली जाते. परंतु, वेदनेला काय ? ती रात्री सुखाने झोपूसुद्धा देत नाही, आणि आराम मिळावा म्हणून सारखी कूस बदलावी लागते पण तरीही वेदना कमी होत नाही कारण, वेदनेने अख्या देहावर विळखा घातलेला असतो. आणखी एक विशेष बाब म्हणजे वास्तवदर्शी कवितेत केवळ स्वभावोक्ती अलंकाराचा विशेष वापर केला जातो , पण बऱ्याच कवितेत कवी संदीप राठोड यांनी इतर अलंकार वापरले आहेत त्यामुळे कविता आणखीच प्रभावी वाटते, त्याची काही उदाहरणे बघूया....,

  खणखण ऐकून कोयत्याची
  कावरा बावरा व्हायचा
  तरणाबांड उभा ऊस
  डोळे टवकारून पहायचा
  किंवा
  बोर दुरून खुणवी
  बांधावर राखलेली
  तिच्या पोरांच्या भाराने
  कमरेत वाकलेली

  वरिल दोन्ही उदाहरणे “चेतनागुणोक्ती” अलंकाराची आहेत आणि पहिल्या चारोळीत कोयत्याची खणखण ऐकून ऊसाची होणारी अवस्था व्यक्त केली आहे आणि त्यातही ‘तरणाबांड ऊस’ हा शब्द अधिकच प्रभावी वाटतो. म्हणजे वनस्पतींना देखील संवेदना असते, त्यांनाही वेदना होतात, त्यांनाही घाव होण्याची भीती वाटते म्हणून तर ऊस डोळे टवकारून पाहत असल्याचे वर्णन कवीने केले आहे तसेच, ऊस तोडणीची योग्य वेळ कोणती असते याचाही उल्लेख नकळत झाला आहे. दुसऱ्या चारोळीत बोरांनी व्यापलेले झाड कुटुंब वत्सल असल्याचे वर्णन आहे. आपल्या लेकरांच्या भाराने बोरी कमरेत वाकलेली आहे अगदी आईसारखी.

  भुकेचा प्रश्न सुटावा म्हणून गावोगावी हिंडणारे मायबाप नेहमीच आपल्या मुलांच्या भविष्याबाबत जागरूक असतात . त्यांची एकच इच्छा असते की, जीवनात आपण जे भोगले आहेत, ते आपल्या लेकरांच्या वाट्याला येऊ नये, त्यासाठी वाट्टेल ते करायला तयार असतात. असंख्य वेदनांशी भिडतात, अगदी आतड्यांना पीळ पडेपर्यंत राबतात. मायबाप जरी अडाणी असले, कधी शाळेत गेले नसतील तरीही आपल्या लेकराने खूप शिकावं, खूप खूप मोठ्ठ व्हावं यातच त्यांना समाधान वाटते. त्यांच्या मनातील हे भाव रेखाटताना कवीने म्हटले आहे,

  शिकून मोठ्ठा हो तू
  बाप सांगायचा मला
  गहाण ठेवून देह
  शिकवीन लेकरा तुला

  आपल्या लेकराला शिकविण्यासाठी बाप आपला देह गहाण ठेवायला तयार आहे. यामागे कारणही तसेच असावे. कारण त्यांनी जे भोगले ते असहनीय आहे आणि त्यांच्या वाटेला जे दु:ख आले ते आपल्या लेकराच्या वाट्याला यावं असे कोणत्याही मायबापाला वाटणार नाही. पुढे कवी संदीप राठोड वर्णन करतात,,,

  उन्हातान्हात उपाशीपोटी
  काळजाला लागुस्तोर धाप
  तुझ्याचसाठी लेकरा हा
  मरमर राबतोय बाप

  वरील ओळीतून बापाची शिक्षणाविषयीची आस्था दिसून येते. त्याच्या अडाणीपणाची सल सदैव त्याला सलते म्हणून आपल्या लेकराने अडाणी राहू नये असे बापाला वाटते.

  कधीकधी शिकून मोठे झाल्यावर मूलं आपल्या आईबापाला विचारतात. काय कमावलं तुम्ही ? फार कष्ट केलेत न तुम्ही, मग तुमच्या कष्टाचं काहीच का दिसत नाही? कुठ ठेवलं ? खरे तर असे प्रश्न मायबापाला विचारणे म्हणजे त्यांना जिवंतपणी नरकयातना देणे होय. परंतु कवी संदीप राठोड यांनी नेहमीच आपल्या मायबापांनी जे काही केलं त्यातच समाधान मानलं, जरी आपल्या बापाने पैसा कमवला नाही पण त्याची खरी दौलत काय होती याचे वर्णन कवी मोठ्या अभिमानाने करतात,

  धनवान होता बाप माझा
  पैसा अडका नसला तरी
  दावणीत उभी होती
  दौलत त्याची खरी

  गोठ्यात उभी गुरंढोरं हिच माझ्या बापाची खरी दौलत आहे असे कवी अभिमानाने सांगत आहे आणि माझाच बाप खरा धनवान आहे असे कवी म्हणत आहे. यावरून 'भूतदया' हा महत्वाचा संदेश कवीने दिलेला आहे. जीवनात केवळ पैसाच महत्वाचा नाही असे कवीला येथे म्हणायचे आहे. पैसा कधीहि दगा देऊ शकते, म्हणून कवीने माती आणि दावणीला असलेली गुरंढोरं यांना प्राधान्य दिले आहे. कारण पैशासाठी सगेही दगा देतात पण माती आपल्या लेकराला कधीच दगा देत नाही आणि दावणीला असलेली गुरंढोरं नेहमीच आपल्या मालकाच्या सोबतीला असतात आणि मालकाचे उपकार ते कधीही विसरत नाहीत ....

  अश्रू भरल्या डोळ्याने
  कोणी धोका देईल सगा
  माय माती लेकराला
  कधी देत नाही दगा.

  मायबापाकडून मिळालेला वारसा आपणही जपला पाहिजे, असे कवीला वाटते म्हणून ते म्हणतात,

  जन्मभर पुरणारे
   दिले इमान गाठीशी
   मार्ग दाखवाया होता
   बाप विठ्ठल पाठीशी

   बाप परिस्थितीने जरी दुबळा होता पण विचारांनी फार मोठा होता. त्याची इमानदारी, त्याची नेकी, त्याचे कष्ट, त्याची सहनशीलता, त्याचे मातीवरील प्रेम सारे काही घेण्यासारखे आहे. म्हणूनच माझा बाप साक्षात विठ्ठल आहे असे कवीला वाटते आणि त्याने देलेले इमानाचे गाठोडे मी मोठ्या मनाने आणि अभिमानाने स्वीकार करतो आणि माझा बाप नेक होता या विचाराने छाती फुगून येते. मी अशा मायबापाच्या पोटी जन्माला आलो आणि धन्य झालो.

  आणि कवी संदीप राठोड शेवटी अभंगातून म्हणतात,
   मायबाप तीर्थ
   नाही दुजे अन्य
   मिळे जागी पुण्य
   सेवकास....

   या जगात मायबापाच्या ठायी सारी तीर्थे आहेत. ते इतर कुठेही नाहीत. त्यांची सेवा करण्यात सारे पुण्य आहे. बाकी काही योगयाग, पूजापाठ करण्याची आवश्यकता नाही. काय पुण्य कमवायचे ते आई बापाची सेवा करून कमवा यातच जीवनाचे सार्थक आहे.

   एकंदरीत कवी संदीप राठोड यांचा "भूक छळते तेव्हा” हा काव्यसंग्रह वाचताना अतिशय भाऊक झालो. हा काव्यसंग्रह आशयगर्भित असून यमक आणि व्याकरणदृष्ट्या परिपूर्ण आहे.भावी पिढीसाठी मार्गदर्शक आहे. सर्वांनी हा संग्रह नक्कीच वाचवा अशी विनंती करतो. कवी संदीप राठोड यांचा हा पहिलाच काव्यसंग्रह जरी असला तरी अतिशय दर्जेदार कवितांचे एकत्रीकरण असून वेगवेगळे काव्यप्रकार वाचायला मिळतात आणि या संग्रहाने कवी संदीप राठोड यांना खरी ओळख प्राप्त होईल असा विश्वास आहे. हा काव्यसंग्रह नसून “वेदना संग्रह”, “संघर्ष संग्रह” आहे असे मला वाटते.

   कवी संदीप राठोड यांचे पुन्हा एकदा अभिनंदन करतो आणि लवकरच त्यांचा पुढील काव्यसंग्रह वाचकांच्या भेटीस यावा अशी अपेक्षा करतो आणि पुढील लिखाणास अनेक अनेक शुभेच्छा देऊन माझ्या शब्दांना विराम देतो.

   मी कुणी समीक्षक नाही, तरीही माझ्या अल्पमतीने मी माझ्या आयुष्यात पहिल्यांदा एखाद्या पुस्तकाचे रसग्रहण केलेले आहे, त्यामुळे काही चुकले असल्यास क्षमस्व !!!!!

   शब्दांकन
   -आकाश वा. जाधव,
   चंदनपुरी, ता. नांदगाव, नाशिक.
   (साहित्य तारा)
   मो. ९६०४५३१४८८
   ------------
   * पुस्तक - भूक छळते तेव्हा... (काव्यसंग्रह)
   * कवी - संदीप राठोड, निघोज,
   ता. पारनेर, अहमदनगर.
   * प्रकाशन - पारनेर साहित्य साधना
   मंच, राळेगणसिद्धी.
   * मुखपृष्ठ - शीतलकुमार गोरे.
   * आवृत्ती - प्रथम.
   * एकूण कविता - ७२.
   * एकूण पृष्ठे - ११२.
   * मूल्य -. १५० रू मात्र.
   --------------

   तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? आम्हास आपल्या परिसरातील बातम्या, लेख अवश्य पाठवा आणि प्रतिनिधी बना ! ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Gaurav Prakashan फेसबुकपेज !

   --------------------

   आम्ही तुमच्यासमोर बातम्या, कथा, कविता, वाचनीय लेख अश्या खूप साऱ्या लेखामार्फत भेटत असतो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा, कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते, तसेच आमचे फेसबुक पेज ही नक्की लाईक करा, गौरव प्रकाशन युट्यूब चॅनेल लाईक Subscribe करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याचबरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद...!

   -बंडूकुमार धवणे
   संपादक गौरव प्रकाशन
   --------------------

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या