• Tue. Jun 6th, 2023

प्रेम उठाव: प्रीतीचा ‘उठाव’दार रंग

  नावात काय असतं! नावाप्रमाणे वागणारी माणसे दिसतात तरी कुठे? नाव वेगळे व कृती वेगळी! अशी काहीशी चर्चा आपणांस ऐकायला मिळते. परंतु समाजात अशी काही माणसे असतात की, नावाप्रमाणे आपले अस्तित्व निर्माण करतात. त्यास आकार देतात. नावाला सार्थकी ठरवतात. मग नावात सर्वच काही नसेलही परंतु खूप काही असतं; अशी खात्री पटायला लागते. त्यातलंच महाराष्ट्रातील काव्यक्षेत्रात नावारुपाला आलेलं नाव म्हणजे कवी नवनाथ रणखांबे!

  प्रेम हे संजीवन आहे. प्रेम जीवनाचे जीवन आहे. प्रेमावाचून माणूस जगूच शकत नाही. प्रेम जीवनाच्या वृक्षाला पोसते; वाढवते; इतरांना मोहरून टाकते व उल्हासही देते. प्रेम म्हणजे जीवनाची परिपूर्णताच! अशीच प्रेम संवर्धनाची भाषा बोलणारा कवी नवनाथ रणखांबे आपल्या ‘प्रेम उठाव’ या काव्यसंग्रहातून ‘प्रीतीच्या उठावदार रंगाची’ उधळण करत ‘प्रेम’ या संकल्पनेला आणखी समाजाभिमुख करतो. त्याच्या कवीमनाने प्रेमाचा परीघ विस्तृत केला असून त्यास सभ्यतेनं, संयमानं, सेवावृत्तीनं, श्रमानं, ॠजूभावानं वलयांकित केले आहे. या काव्यसंग्रहातील गजल, चारोळी, मुक्तछंद, गीत अशा वेगवेगळ्या काव्यप्रकारातून प्रेमाचा बहर फुललेला दिसतो. अशाचप्रकारे प्रेमकाव्यातून भावबंधाचं ‘नातं’ जोडताना,

  हृदयाचं नातं
  तुझ्यासोबत जोडले
  जगाशी नातं
  मी सारेच तोडले

  अशी समर्पक भावना प्रियकर आपल्या प्रेयसीसंदर्भात व्यक्त करतो. प्रेमबंध सहजच जुळतात, असे मुळीच नाही. त्यात अनेक विघ्ने असतात, ‘वेदनेचे डंख’ असतात. आधुनिक काळातही दोन जिवांना मीलनाची मुभा नसते. आप्तस्वकीय जेव्हा प्रेयसीवर ‘नजरकैदेच्या पहा-यात’ पाळत ठेवतात, तेव्हा तर प्रेमाला बाधा पोचवणारे असे तुघलकी मात्र कवीला ‘निखा-याचे जग’ वाटू लागते. जीवाला घोर लागलेल्या प्रियकराला प्रेयसीच्या ‘उणिवे’मुळे त्याची संभ्रमावस्था आणखी विकल होत गेलेली पाहायला मिळते.

  का हा विरह
  का हा दुरावा
  तुझ्या आठवांचा
  हृदयात ओलावा

  अशी कैफियत मांडून तुझ्याप्रति आस्था असल्याचे निक्षून सांगतो. तिच्या विरहात प्रियकराचं मन झुरत असल्याने तो भेटीसाठी आतुरलेला दिसतो. ‘दाही दिशास, मी तुला शोधतो’ अशा भटकंतीतून तिचा ‘पत्ता’ शोधण्यात आपली वेड्यागत अवस्था करून घेतो. ख-या प्रेमात अडथळे असले तरी प्रेमवीर एकमेकांशिवाय जास्त काळ दूर राहू शकत नाहीत कारण प्रेम हे जगण्याला सुंदर हेतू देतं. प्रेयसी जेव्हा प्रियकराच्या कुशीत स्थिरावते तेव्हा मात्र प्रियकर,

  प्रीत धुंदीत
  प्रीत लहरीत
  व्याकुळ मन झाले तृप्त
  अशी संतुष्टी व्यक्त करून प्रेमाच्या विजयाला साजरा करतो.

  भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार व महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे कवीचे आदर्शस्थान आहेत; हे निर्विवादपणे मनोगतातून व्यक्त केले आहे. कवीने डॉ. आंबेडकरांची नितीमूल्ये, जीवनमूल्ये आपल्या जीवनात रुजविली आहेत. म्हणूनच कवीने बाबासाहेबांच्या परिवर्तनवादी विचारांचे, सम्यक कृतींचे, शाश्वत मूल्यांचे प्रतीक असलेल्या ‘निळ्या रंगाचे निशाण’ हाती घेऊन मानवमुक्ती लढ्यासाठी सिद्ध होत मानवी मूल्यांवर अतूट प्रेम असल्याची साक्ष पटवून देतो. व्यवस्थेने दिलेल्या ‘बहिष्कृत जखमांच्या दंशाच्या’ शतकानुशतके उमटलेल्या ‘जुनाट खुणा’ भोगवटा सांगत असल्या तरी हा तरूण त्यांच्या फसव्या डावांना ओळखून,

  रणांगणात उभा
  मी नवनाथ रणखांबे आहे
  लढवय्या योद्धा
  मी अजिंक्य रणसम्राट आहे
  असे व्यवस्थेला खडसावून सांगतो.

  नावातील अन्वयार्थानुसार ‘नवनाथ’ म्हणजे विचारमूल्यांचा रक्षण करणारा ‘नवा रक्षक’ व ‘रणखांबे’ म्हणजे संघर्षमय ‘रणसंग्रामा’तील अविचल ‘खांब’! असा अर्थ साधून स्वनामाला सार्थकतेचे सृजनरूप देतो. काव्यसंग्रहात एकूण ३८ कविता आहेत. अल्पाक्षरी व छोटेखानी कवितांतून कवीने प्रेमभावाला व्यापक स्वरूप प्रदान केले आहे. शब्दसौंदर्य, आशय सघनता, सौंदर्यानुभूती, भावपूर्णता यांचे कोंदण दिल्यास कविता अधिक ‘उठाव’दार होतील; यात मुळीच शंका नाही. कवीच्या पुढील सकस व सुदृढ काव्यनिर्मितीस अनंत शुभेच्छा!

  – प्रभाकर तांडेकर ‘प्रदत्त’
  52-ब, साईनगर, दिघोरी नाका,
   नागपूर- 440034
   ……………………………
   कवितासंग्रह- प्रेम उठाव
   कवी- नवनाथ रणखांबे,
    गौरगाव,जि.सांगली
    प्रकाशक- शारदा प्रकाशन, ठाणे
    मुखपृष्ठ- सतीश खोत
    एकूण पृष्ठ- 62
    किंमत- 90/- रू.
    ————–

    तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? आम्हास आपल्या परिसरातील बातम्या, लेख अवश्य पाठवा आणि प्रतिनिधी बना ! ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Gaurav Prakashan फेसबुकपेज !

    ——————–

    आम्ही तुमच्यासमोर बातम्या, कथा, कविता, वाचनीय लेख अश्या खूप साऱ्या लेखामार्फत भेटत असतो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा, कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते, तसेच आमचे फेसबुक पेज ही नक्की लाईक करा, गौरव प्रकाशन युट्यूब चॅनेल लाईक Subscribe करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याचबरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद…!

    -बंडूकुमार धवणे
    संपादक गौरव प्रकाशन
    ——————–

gauravprakashan1@gmail.com

Maharashtra News, Braking News, Marathi News, Most Popular Marathi News, Latest Marathi News,Today News,Marathi Article, Marathi Poem, Marathi Story,

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *