• Mon. Jun 5th, 2023

नवीन वर्षाच्या औपचारिक सदिच्छा देतांना ….

    काल मध्यरात्रीपासूनच आपले सर्वांचे फोन नवीन वर्षाच्या शुभेच्छांनी खणखणीत असतील. नवीन वर्षाच्या असंख्य संदेशांनी अनेकांचे फोन हँग झाले असतील. आपल्या जिव्हाळ्याच्या,आपुलकीच्या माणसांना सदिच्छा देऊन त्यांच्या आरोग्याची,समृद्धीची,सुखाची मनोकामना करणे काहीच गैर नाही. प्रत्येकाने तशा प्रकारच्या सदिच्छा एकमेकांना दिल्याच पाहिजेत.परंतु हे करत असताना नवीन वर्षात आपल्याला आणखी काय नवीन करायचे आहे,कोणत्या नवीन संकल्पना या देशातील प्रत्येक व्यक्तीच्या मनात रुजवायच्या आहे याचाही विचार आम्ही सर्वांनी करणे आवश्यक आहे.नाहीतर नवीन वर्षाच्या सदिच्छा केवळ औपचारिकता म्हणून दरवर्षी सुरूच राहील व त्यातून फार काही साध्य होणार नाही.मित्रांनो,आमचा देश सध्या अतिशय भीषण परिस्थितीतून वाटचाल करत आहे.तरुणाईच्या डोक्यात जाती धर्माचे जहाल विष पेरणे दररोज सुरू आहे.सुशिक्षित वर्ग केवळ ऐकीव माहितीवर एकमेकांच्या धर्माचा द्वेष करत आहे.त्याला दररोज खतपाणी घालणे सुरू असून एक नवीन विषारी आणि विखारी पिढी या देशात तयार करण्याचे मनसुबे काही लोकांनी आखले आहे.देशहितासाठी हे दुष्ट मनसुबे उधळून लावण्याचा संकल्प प्रत्येकाने नवीन वर्षात केला पाहिजे.

    आमच्या शेतकरी बांधवांची अवस्था अत्यंत वाईट आहे.त्याच्या घरात पीक आल्याबरोबर त्या पिकाचे भाव पाडणारी एक क्रूर व निष्ठूर यंत्रणा या देशामध्ये अनेक वर्षापासून कार्यरत आहे.तिचा बंदोबस्त करण्यासाठी आम्ही काही निर्धार नवीन वर्षात केला पाहिजे.चुकीच्या सरकारी धोरणाविरुद्ध आवाज उठवणारे पत्रकार,लेखक,साहित्यिक,कलाकार,विचारवंत यांना टार्गेट करुन तुरुंगात टाकणे सुरू आहे.एखादा पत्रकार सत्यासाठी आपले प्राण पणाला लावत असतांना तो आपल्या ताकदवान सत्तेसमोर झुकत नाही, वाकत नाही म्हणून तो ज्या चॅनेलमधे काम करतो ते अख्खे चॅनलच आपल्या बेईमानीच्या पैशावर विकत घेणारी एक देशद्रोही यंत्रणा भारतामध्ये सध्या कार्यरत आहे.महापुरुषांचा दररोज जाणूनबुजून अपमान सुरू आहे.तरीसुद्धा कोणतीही कारवाई होत नाही. विज्ञानाचे सर्व फायदे घेत असतांना अनेक तथाकथित बुवा,बापू,महाराज लोकांना दररोज अवैज्ञानिक गोष्टींमध्ये गुंतवून त्यांच्यामध्ये भय आणि अंधश्रध्दा निर्माण करीत आहे.या गोष्टी विरुद्ध लढण्याचा संकल्प आम्ही नवीन वर्षात करणार आहोत की नाही ? नवीन वर्षाच्या सदिच्छा म्हणजे केवळ आर्थिक, शारीरिक दृष्टीने समृद्ध होणे एवढ्यावरच न थांबता वैचारीक आणि सामाजिक दृष्टीने सुध्दा समृध्द आणि परिपक्व होणे गरजेचे आहे.

    या शुभेच्छा देताना आमच्या मनामधे आमचा देश,आमचे देशबांधव,आमचा ग्रामीण भागामध्ये राहणारा कष्टकरी,कामकरी गोरगरीब वर्ग,आमचा आदिवासी बांधव,आमचा अल्पसंख्यांक समाज असला पाहिजे. दहा दहा मैल पायी चालून डोक्यावर पाण्याचे हंडे आणणाऱ्या आमच्या भगिनी,एसटीच्या पास साठी पैसे नाही म्हणून आत्महत्या करणारे आमचे विद्यार्थी,सरकारच्या अनास्थेमुळे आपले जीवन संपवणारे आमचे असंख्य शेतकरी बांधव,पिडीत महिला हे सगळे लोक नवीन वर्षाच्या शुभेच्छा देतांना आमच्या डोळ्यासमोर असणे एक संवेदनशील नागरिक म्हणून अत्यंत आवश्यक आहे.भारत हा संत महापुरुषांचा देश आहे.या संत महापुरुषांनी आपल्या प्रबोधनातून प्रत्येक कालखंडात सर्वसामान्य गोरगरीब जनतेचाच विचार केला आहे. आम्ही जर त्या संत महापुरुषांच्या विचारांचे पाईक असू आणि उठता बसता त्यांचा जयजयकार करत असू तर या संत महापुरुषांनी दिलेली वैचारिक व सामाजिक शिकवण थोडीफार का होईना प्रत्यक्ष कृतीमधून आचरणात आणणे हीच नवीन वर्षाची शुभेच्छा ठरू शकते.या महापुरुषांनी आमच्यासाठी आपल्या आयुष्याचा होम केला.त्यांच्या प्रती आम्ही खरोखर मनापासून कृतज्ञता व्यक्त करतो का याचा सुद्धा नवीन वर्षा निमित्त गांभीर्याने विचार केला पाहिजे.

    ज्या कोट्यावधी स्त्रियांना महात्मा फुले,सावित्रीबाई,शाहू महाराज,डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यामुळे जनावरासारख्या कष्टप्रद जीवनातून माणूसकीचे जीवन प्राप्त झाले,असंख्य हक्क आणि अधिकार मिळाले त्यांच्याप्रती खरोखर आमच्या मनात आदर आहे का याच्यावर सुद्धा नवीन वर्षात या देशातल्या उच्चविद्याविभूषित महिलांनी चिंतन केले पाहिजे. हे महापुरुष जर नसते तर आम्ही या उंचीवर पोहोचलो असतो का याचे मंथन करणे म्हणजेच नवीन वर्षाचा संकल्प करणे होय. आमच्या हातामध्ये असलेली मोबाईल नावाची यंत्रणा आम्ही कशाप्रकारे वापरू शकतो आणि त्या माध्यमातून देशातील धर्मांधता,जातीयता,विषमता या गोष्टी मुळासकट उखडून टाकण्यासाठी आम्ही कशाप्रकारे प्रयत्न करू शकतो हा विचार नवीन वर्षात या देशातील स्वतःला सुशिक्षित समजणाऱ्या वर्गाने करणे आवश्यक आहे.अशिक्षित वर्गाला दोष देऊन स्वतःचे दोष झाकणारी नवीन उच्चशिक्षित जमात आमच्या देशामधे निर्माण झालेली आहे.त्याच्यावर सुद्धा विचारवंतांनी,अभ्यासकांनी चिंतन करणे नवीन वर्षाची गरज आहे.हा विचार जर सर्वमावेशक पद्धतीने झाला तर निश्चितच भारताला महासत्ता बनवण्यासाठी आमची जी धडपड सुरू आहे ती धडपड पूर्ण होण्यास आमचा प्रत्येकाचा थोडाफार हातभार लागू शकतो.अन्यथा दरवर्षीप्रमाणे नवीन वर्षाच्या शुभेच्छा या केवळ एक सोपस्कार म्हणून सुरूच राहतील आणि देश अधोगतीला जाण्याची प्रक्रिया वेगाने चालू राहील.त्यासाठी कोणत्या सरकारला दोष देण्यापेक्षा आम्ही सुद्धा त्यामधे दोषी राहू हे खेदाने नमूद करावे लागते.म्हणूनच नवीन वर्षात देश जोडणारे व देशाला एकसंघ ठेवणारे नवीन समाजशील संकल्प करण्यासाठी आपल्या सर्वांना मनःपूर्वक हार्दिक सदिच्छा.

    -प्रेमकुमार बोके
    अंजनगाव सुर्जी
    १ जानेवारी २०२३
    ९५२७९१२७०६
    ————–

    तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? आम्हास आपल्या परिसरातील बातम्या, लेख अवश्य पाठवा आणि प्रतिनिधी बना ! ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Gaurav Prakashan फेसबुकपेज !

    ——————–

    आम्ही तुमच्यासमोर बातम्या, कथा, कविता, वाचनीय लेख अश्या खूप साऱ्या लेखामार्फत भेटत असतो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा, कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते, तसेच आमचे फेसबुक पेज ही नक्की लाईक करा, गौरव प्रकाशन युट्यूब चॅनेल लाईक Subscribe करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याचबरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद…!

    -बंडूकुमार धवणे
    संपादक गौरव प्रकाशन
    ——————–

gauravprakashan1@gmail.com

Maharashtra News, Braking News, Marathi News, Most Popular Marathi News, Latest Marathi News,Today News,Marathi Article, Marathi Poem, Marathi Story,

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *