• Wed. Jun 7th, 2023

झाडातील माणुसकीचं महादान : ‘पिंपळ व्हायचंय मला ‘!

  सामान्य माणूस, संत, महापुरूष, तत्ववेते,समाजसुधारक, यांच्या कार्यात, विचारात,जीवनसंघर्षात झाडाची प्रतिमा पहात विचार,त्याग,समर्पन,परोपकार यांच्यामुळेच समाज टिकून आहे, असे सांगत पिंपळ होऊ पहाणारा अरुण विघ्ने सर यांचा “पिंपळ व्हायचंय मला ” याची सार्थकता पटविणारा काव्य संग्रह.

  मानवी जीवन हे निसर्गाच्या सानिध्यात फुलतं असतं. हिरवळ डोळ्यात साठवतच माणूस मोठा होतो.माणूस स्वार्थ ,आपलेपणाच्या दहशतीच जगत आहे.माणसालाच माणसापासून भीती वाटू लागली आहे.पाशवी कृत्याच्या आहारी जाऊन तो जीव मुठीत घेऊन जगत आहे.मानवी जीवनाचा हा जीवघेणा प्रवास एका शुन्यापासून दुस-या शुन्यापर्यंतचा आहे. हीच जीवनाची शोकांतिका आहे.

  नाती, बंध, मानवता,परोपकार, समता,न्याय, स्वातंत्र्य याची बीजे रुजवण्यासाठी माणसाने पिंपळ व्हायला हरकत नाही.असे कवी अरूण विघ्ने यांना वाटते.म्हणूनच ते मनोगतात म्हणतात, “चला तर झाडं होण्याचा प्रयत्न करुया. झाड खूप काही देतं,कधीच कुणाचं नुकसान करीत नाही.त्याचे जीवावर आपण कु-हाड चालविली तरी ते कधीच कुरबुर करीत नाही ,की तक्रार करीत नाही.मला तरी किमान मनापासून झाडं व्हावंसं वाटतयं. म्हणूनच मी आणि माझ्या कवितेने त्या दिशेने प्रवासाला सुरवात केली आहे.ते सर्वांना ऊर्जा देत राहिल,सर्जनशीलतेचा आनंद देत राहिल. सामाजिक जाणिवेतून काळजी वाहात, उपेक्षितांची,समाजाच्या व्यथा,वेदना,प्रश्न मांडत व्यवस्थेशी भांडून जाब विचारेल. यासाठी माझ्या कवितेला आणि मला पिंपळ व्हायचंयं.मी लिहिलेलं पचायला जड असण्यापेक्षा ते अधिक लोकांना कसं रुचेल ? याचाच विचार करुन मी काही लिहिलं ते तुमच्या पुढ्यात ठेवण्याचा प्रयत्न केला आहे.

● हे वाचा – Karanja Lad : आमचे लाडाचे कारंजे ….आधुनिक कारंजा महात्म्य

  “पिंपळ व्हायचंय मला “या काव्य संग्रहात एकूण त्र्याऐंशी कवितांचा समावेश आहे.यातील ब-याच कविता झाडाभोवती पक्षासारख्या घिरट्या घालताना दिसते. मनातला दाह सहज सोप्या शब्दात मांडतांना मुक्तछंद,गझल यातून पिंपळातील वैज्ञानिक तत्व आणि महासूर्याकडून लढण्याची ऊर्जा घेऊन आवाहन करीत दीक्षाभूमीला माणुसकीची युध्दशाळा आणि क्रांतीज्वाला संबोधून डाॅ.बाबासाहेबांचे तत्वज्ञान व माणुसकीचा सिध्दांत सहजसोप्या भाषेतील कविता वाचतांना अस्सल अनुभवाचा साक्षात्कार होतो.ह्दयातील वेदना अंगार होऊन कवितेच्या रुपाने अवतरतात,सामाजिक भान जपत भविष्यात येणा-या विनाशाचा संकेत देऊन कविता पानावर विराजमान होते.

  आपल्या पायातील पादत्राणात जर एखादा खडा शिरला तर आपण काढतो .कारण प्रत्येक पावलागणिक तो रुतणार असतो.तो खडा काढतो.काय खुपतय हे एकदा लक्षात आले की,ते दूर करणे शक्य होते.ह्याच विचाराचा गाभा अरुण विघ्ने यांच्या कविता वाचतांना दिसून येतो.समाजात असे बरेच खडे खुपणारे असतात ते वेळीच बाजूला काढले तरच आदर्शाची जीवनवाट सुखकर होते.या सिध्दान्ताची रूजवण व्हावी असे कवीला वाटते.

  रगतपित्या व्यवस्थेच्या छाताडावर स्वयंदीप प्रकाशण्यासाठी,अमानुषतेच्या बुडखावर माणूसकी,बंधुता, मैत्रीच्या पालवीच्या छायेत जाती ,धर्म, वर्ग,पंथाची पाखरे निर्भयपणे मुक्तकंठाने गाणे गाण्यासाठी, विषमतेची जमीन नांगरून समविचाराची बाग फुलविण्यासाठी कवी अरूणला झाड व्हायचंय.निर्भपणे अत्याचार गाव,माणसे,मनाच्या श्रीमंतीवर,असण्यावर,नसण्यावर,जगण्यावर करतात.हक्कावर फास आवळला जातोय,थंड झालेल्या चुलीला या कवितेत कवी म्हणतात,

  “राख झाली घराची
  माणसाच्या नशाने
  थंड झाल्या चुलीला
  पेटवावे कशाने ?”

  सामाजिक जाणिवेचा वेदनेचा दाहक अनुभव अर्थ आणि लयता घेत अनुभूतीच्या धाग्यानी शब्द विणत वास्तव अनुभवानुसार अभिव्यक्त होतात.आयुष्याच्या पायवाटेवरुन चालत कवी काळाबरोबर ‘उजेडाच्या दिशेने’ ,’वादळातील दीपस्तंभासारखे’ हातात निळा ध्वज घेऊन उजेडाची ‘जागल’ करीत जातो. अंधारवस्त्यातील काळोख रुजवतो, म्हणून गतकाळातील भीती त्यास वाटत नाही.

  निळ्या पाखरानी नभाला भिडण्यासाठी प्रसंगी उपाशी राहून शिकावे. कमाई करुन थोडे महादान द्यावे,स्वाभिमान जपत विहारात जावे.भिमाच्या रथाला पुढे नेत दिशादर्श होत लेखनिने समाजाला जागवावे .कारण आपणास बोधी वृक्ष जपायचा आहे .सम्यक संबुध्द विचार पेरत स्त्रीचा सन्मान करायचा आहे.एकतरी बोधिवृक्ष अंगणात लावावा, अशी अपेक्षा व्यक्त करत म्हणतात,

  या भूमीत विचार बुध्दाचा पसरावा लागेल
  पंचशील अष्टांगीक मार्ग अंगीकरावा लागेल.

  दीक्षाभूमी आमच्यासाठी उजेडाचं झाड होत विज्ञानवादी विचाराची सावली होत धम्मचक्र प्रवर्तदिन १४आँक्टोबर१९५६ पासून अशोक विजया दशमीला साजरा करातांना दीक्षाभूमीला युध्दाशाळा,क्रांतीज्वाला संबोधीत ,बुध्द व भीमाचा विचार पेरत कवी निघायाय,

  “येथे येताना आम्ही डोके
  रिते घेऊन येत असतो
  येथून जातांना मात्र
  प्रज्ञेची शिदोरी डोक्यात
  घेऊन घरी जात असतो”

  निळा ध्वज फडकविण्याची धडपड, वागण्यात,बोलण्यात,जगण्यातील स्पंदनात महासूर्याकडून लढण्याची ऊर्जा घेत आहे.कारण घरी बसून चळवळ लोप पावत आहे . अज्ञान ,अंधार यात श्वास कोंडतो आहे.काळोख पांघरून गावकुसाबाहेर खितपत मळलेल्या कापडाप्रमाणे जिंदगी झाली आहे.अशा वेळी..‌

  “तेव्हा एका सूर्याने अंधार दूर करीत
  उजेडाच्या दिशेने जाण्याची प्रेरणा दिली,
  दिली होती पुस्तकांची ओळख करुन
  आणि अंगुलीनिर्देश केला होता
  दिल्लीच्या तख्ताकडे
  आतातरी तू त्या बोटाचा
  अर्थ समजून घे
  त्या दिशेने तुझी पावलं वळू दे !”

  असं पोटतिडकीनं कवी सांगतोय.कारण आपणास उजेडाच्या दिशेने स्वयंदीप होऊन स्वयंप्रकाशीत होत , समता,स्वातंत्र्य, बंधुता,न्याय ही संवैधानीक मूल्य रुजविण्यासाठी “शिका, संघटीत व्हा ,संघर्ष करा” या महामानवाच्या संदेशाने नवयुगाची पहाट उजळू लागली आहे.उत्कर्षाच्या जिद्दीने मुकी पाखरे बोलू लागली आहेत .अष्टांग मार्गाने काया,वाचा,चित्त शुध्द होत आहे.’पेरलं होतं एक स्वप्न ‘ ही कविता वाचतांना काळजात चर्रर्र होते.वेदना लाह्या सारख्या उड्या मारतात .सोसन्याची सीमा संपते तेव्हा एक कविता जन्म घेते,

  “चार दान्यांचे शंभर दाने
   उगवते तुझी कुस
    प्रश्न टांगले आकाशाला
     आयुष्य पोखरते घुस !”

      आई विषयी ब-याच कविता आहेत. कविता भाषिक कौशल्याचा, यमकांचा,विषय ,आशय अभिरुची,गझल याची मांडणी फारच अप्रतिम आहे. डाॅ.युवराज सोनटक्के सर यांची परिपूर्ण प्रस्तावना कवीच्या पिंपळपानाला न्याय देवून जवळच्या काळजातील वेदनेचे हुंकार टिपत कवीच्या निर्मम वेदनांपासून मुक्ती देण्याच्या लढाईत आपणास सहभागी करते असे म्हणत, “समकालीन आंबेडकारी कवितेत सुसंबंधित विविध भावना व विचारासोबत अनेक मनस्वी रचना पैलूनी लिहिल्या गेल्या आहेत.माय जन्मदाती संस्था नाही तर माय अशी ऊर्जा आहे जी अश्रूंच्या चिखलास जमिनीसारखी कडक करीत असते. माय वर्तमान आणि भूतकाळाला जोडणारी एक श्रृंखला आहे. जी इच्छा असूनही कदाचित नियंत्रण आणि नियमन करण्यास असमर्थ असण्याचा अनुभव करते.आईच्या डोळ्यातील उदार आभाळ प्रत्ययास येते,नदीच्या स्वच्छंद प्रवाहासोबतच मायेने दाखविलेल्या प्रेम स्वातंत्र्याची हमी दृग्गोचर होते.आईचे अश्रू धारदार हत्यार आहे.जे सगळ्या संकटांना व कंटकांना चराचर कापत सुटते ” चुकीचं वास्तव आणि विस्तव या कवितेत बापाविषयी कवी म्हणतो,

      “बाप मात्र
      नुस्ताच बिडी फुंकत
      शरीरात गर्मीचा जाळ
      प्रजोलित करीत असतो भाकरीशिवाय”

      अशा बापाला बाबासाहेबामुळेच रोजगार मिळाला. दुःखाचा निचरा करायला बुद्धाचा धम्म दिला,स्वयंप्रेरणादायी लेखनी दिलीस.असा म्हणणारा कवी खिळे कवितेत … लेखनीला कडीबंद करून ,मनाच्या अंतर्कुपीत गुलामासारखे खिळे ठोकताहेत
      प्रसार माध्यमावर,कवी म्हणतो….

      “खुर्चीत रुतलेल्या तमाम खिळ्यांनो
      आतातरी सावध व्हा रे!
      झोपले असाल तर जागे व्हा रे!
      सुलटे होऊन तुमचं अस्तित्व जाणवू द्या !
      खुर्चीतील डोक्यांना झिनझिन्या येईस्तोवर एल्गार पुकारा
      शेतक-यांच्या आंदोलनात
      एकमुखाने सामील व्हा रे,
      एकमुखाने सामील व्हा !”

      कारण शेतकरी पोशिंदा जगाचा असून त्याच्या तोंडचा घास दुसरेच पळवतात .लाभार्थी दुसराच असतो, कष्टकरी हातानी पिकवलेले गहू, तांदूळ,डाळीचे पदार्थ श्रीमंत लोक रस्त्यावर फेकतात ,त्यावेळी पोशींद्याचे काळीज चिरत जातं.अशा वेळी कवीला राजे आठवतात,त्यांनी एकदा यायला हवे आणि अन्याय,अत्याचार,बलात्कार, दडपशाही,सोशीकता,आत्महत्या,भ्रष्टाचार, विकृतीकरण,दुरावस्था, हे बघावे .कारण जाणता राजा आता येथे कुणीही उरला नाही .अशा वेळी एकच मागणं कवी महाराजांना म्हणतो…

      “राजे
      बस्स तुम्ही एकच करा
      तुमचा एखादा मावळाच पाठवा
      आत्ताच्या घडीला आपण फक्त एवढचं करा.”

      अशी कळकळीची विनंती करत.अरेरावी थांबवण्यासाठी तुमचा मावळाच पुरेसा आहे कवी शब्दांच्या ह्दयात भाव पेरतो.कितीही जखमा होऊ देत त्याची पर्वा आता न करता मगरुर व्यवस्थेच्या बुडावर घाव पेरत,”चल रेशीमबागेतील टाॅवर हलवून बघू दिल्ली आपोआप हलेल” कारण सोबतीसाठी मुक नायकाचे विचार आहेत,

      “पायरीचा दगड होतास बा तू
      गाठला शिक्षणाचा कळस तू
      कालचे बोलके आज मुके झाले
      लेखनिक अशी चालविलीस तू .”

      मनाच्या मलीनतेला झळाळी बाबासाहेबांचे विचार देतात.नऊ रसाच्या रथावर स्वार होऊन आयुष्य अनंत खाचखळगे,चढउतार,सुख दु:खाचे अडथळे पार करीत जीवनाचा प्रवास करायचा आहे.माझ्या कवितेतील शब्दच माझे वारसदार बनतील,कवितेच्या रुपाने कवी जीवंत राहणार आहे.तो सूर्यकळाचा वारसा चालवणार आहे.तर,आपणही लढ्यासाठी सज्ज होण्याचे आवाहन कवी करतोय.लोकशाही व्यवस्थेत मुस्कटदाबी सहन करीत बसायचे नाही .आता व्यवस्थेचा बैल व्हायचे नाही.आपली वाटचाल बाबासाहेबांनी दाखवलेल्या बोटाच्या दिशेने व्हायला हवी,निळ्या आकाशाकडे झेपावणारा विचार तिक्ष्ण अक्षरचोची निळी पाखरं विचारवृक्ष जपत आहेत.”अच्छे दिन “ची वाट बघत रक्ताचा अखेरचा थेंब संपेपर्यंत या व्यवस्थेशी लढायचे आहे.

      “व्यवस्थेच्या छाताडावर
      घाव घातला लेखनाने
      झोपडीतील दिवे पेटले
      प्रकाशस्पर्शाच्या ऊर्जेने !”

      कारण निष्ठावंताच्या विज्ञानिष्ठ विचारात आता बुद्धाचे विचार दिसणार आहेत.

      “मैत्रीने डवरलेलं महाकाय
      असं झाड व्हायचंय मला
      सम्यक विचार रुजविण्या
      पिंपळ व्हायचंय मला !”

      अशा प्रकारे नविन रस्ता शोधत मानवी मूल्यांची किरणे असलेल्या रस्त्यावरून जात ,अनुभूतीच्या धाग्यांनी विणलेली सार्थक कविता केवळ विचारच नाही तर सौंदर्य बोधही देते.म्हणूनच अरुण विघ्ने सरांचा हा अस्सल कवितेचा नजरांना वाचायलाच हवा.या कविता संग्रहात झाडं व्हायचंय मला,निळ्या पामरांनी, अशोक विजयादशमी,हे क्रांतीसूर्या,स्वयंप्रकाशित व्हा,माय,खिळे,राजे, व्यवस्थेचा बैल,प्रज्ञेची पाखरे,इशारा, पहारेदार, क्रांतीपुरुष, पिंपळ व्हायचंय मला या कविता पुन्हा पुन्हा वाचाव्या अशा आहेत. प-हाटीची बोंडे,कुरापती,गोधडी,बोथट,सूर्यकुळ,
      खोटे बोला पण रेटून बोला, कमलपुंजके,च्याऊम्याऊ वैश्विक, आलबेल,उंटावरुन शेळ्या हाकणे, उदरभरण,वाँलकंपाऊंड,टुकुरटुकुर,गल्ली ते दिल्ली,बँकरनी,टाँवर,भुकेकंगाल,सैतानी,क्षुधा, युध्दशाळा,क्रांतीज्वाळा,अशा अनेक शब्दांचा वापर खुबीने करुन कविता संग्रहास विचाराचा चांगला साज कवीने सहज चढवला. ती निळ्या झेंड्याचे प्रतिनिधित्व करते.एकंदरीत हा कविता संग्रह संग्रही असावा ,पुन्हा पुन्हा वाचावा असा आहे. ही कविता कवी माणसातील झाडांना व झाडातील माणुसकीला समर्पित करतो आहे ,मुखपृष्ठ अरविंद शेलारनी एकदम परिपूर्ण असे काढले असून कवितेतील विषयाला न्याय देणारे असा आहे.मलपृष्ठावर डाॅ.यवराज सोनटक्के यांची पाठराखण वाचण्याजोगी आहे.प्रस्तावना डाॅ.युवराज सोनटक्के यांची साहित्यिक मुल्य जपत सच्च्या विचाराची बिजे पेरत पुस्तकाचा आशय स्पष्ट करणारी अभ्यासपूर्ण अशी आहे.परिस पब्लिकेशन, सासवड पुणे ०१,रेखाचित्रे संजय ओरके यांची आशयपुर्ण अशी आहेत.परिपूर्ण कवितासंग्रह वाचल्याचा आनंद होऊन मनाला विचाराच्या साखळीत जोडणारा असा आहे.अरुण विघ्ने सरांनी साहित्यलेखनात अशाच विचारांची पेरणी करीत राहावे, अशी शुभेच्छा देतो.हार्दिक शुभेच्छा…!

      ◾आस्वादक
      मुबारक उमराणी
      सांगली
      ९७६६०८१०९७.
      ◾पिंपळ व्हायचंय मला
      ◾अरुण विघ्ने
      ◾प्रकाशन :परिस पब्लिकेशन,सासवड,पुणे ०१,
      ◾मुझपृष्ठ : अरविंद शेलार
      ◾आवृती : १४आँक्टोबर,२०२१.
      ◾अशोक विजयादशमी
      ◾स्वागत मुल्य : १५० रुपये मात्र
      ◾मो.८३२९०८८६४५

     ● हे वाचा –Dr Sujay Patil : डाॅ सुजय पाटील, अकोला मानसोपचार तज्ञ शेतक-याचा खरा मित्र

      ————–

      तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? आम्हास आपल्या परिसरातील बातम्या, लेख अवश्य पाठवा आणि प्रतिनिधी बना ! ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Gaurav Prakashan फेसबुकपेज !

      ——————–

      आम्ही तुमच्यासमोर बातम्या, कथा, कविता, वाचनीय लेख अश्या खूप साऱ्या लेखामार्फत भेटत असतो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा, कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते, तसेच आमचे फेसबुक पेज ही नक्की लाईक करा, गौरव प्रकाशन युट्यूब चॅनेल लाईक Subscribe करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याचबरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद…!

      -बंडूकुमार धवणे
      संपादक गौरव प्रकाशन
      ——————–

gauravprakashan1@gmail.com

Maharashtra News, Braking News, Marathi News, Most Popular Marathi News, Latest Marathi News,Today News,Marathi Article, Marathi Poem, Marathi Story,

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *