Header Ads Widget

तू चाल पुढं...

    नसतेस जवळ तू जेव्हा
    जीव तुटका तुटका होतो
    जगण्याचे विरती धागे
    संसार फाटका होतो

    संदीप खरे यांचं हे गीत ऐकलं आणि मन विचार करू लागलं कि खरंच स्री अभावी पुरुष एकाकी होतो आणि संसार नावाचा रथ त्याच्याच्याने ओढता ओढवत नाही.त्याची त्रेधा तिरपिट उडते. सगळ घर उदास वाटायला लागतं.पण याच्या नेमकं विरुद्ध विचार करायला गेलो तर आपल्याला काय दिसतं.काल आणि आजही समाजात असंख्य स्त्रिया या कोणत्या ना कोणत्या कारणाने तरुण वयात एकट्या राहत असतात.

    काहींचा जोडीदार अकाली जातो,काहींचा जोडीदार त्यांना अर्ध्या वाटेवर सोडून देतो. म्हणजेच त्यांच्या नशिबी परित्यक्ता स्रीचं जीवन येत.काही जणींना आयुष्यात पुरुषांकडून प्रेमाच्या नावाखाली फसवलं जातं तर कधी व्यसनी,आणि मारहाण करणारा नवरा असतो.झालेल्या लेकरांची जबाबदारीही त्या स्रीवरच येते आणि मग तिचा एकटीचा संसार संघर्ष सुरू होतो.

    आपल्या आजू बाजूला अशा अनेक महिला आपल्याला दिसतील. ज्या पुरुष आणि स्त्री असे दोघांचेही कर्तव्य त्या एकट्याच निभावत असतात.त्यांच्या वाट्याला किती दुःख,किती त्रास,किती कष्ट येत असतील याचा विचार तरी संसारात सुखी असणाऱ्या आणि नवरा मुठीत असणाऱ्या स्त्रिया करीत असतील का ? एखादी क्षुल्लक वस्तू लागत असली तरी नवऱ्याला फोन करून हे आणा असे फर्मान सोडणाऱ्या स्त्रियांना या एकट्या राहणाऱ्या स्त्रिया कशा स्वच्छंदी जीवन जगतात,कशी मजा करतात हेच फक्त दिसत असतं. पण त्यांनी डोळ्यातले अश्रू बाहेर येऊ नये म्हणून मनाला घातलेला बांध कधीच दिसत नसतो.एखादं काम बिघडलं तर नवऱ्याच्या नावाने शंख करणाऱ्या स्त्रियांना या एकट्या राहणाऱ्या महिलांचे हाल का दिसत नसतील.खरं तर या महिला त्यांच्या पुरुषाविना असणाऱ्या घराचं भक्कम छत होतात आणि संकटरुपी वादळ वारा अडवतात.या महिला त्यांच्या घराचा कणखर उंबरा होतात आणि कित्येक वखवखलेल्या नजरा उंबऱ्यातच अडवतात.

● हे वाचा – Ravishkumar : रवीश,तू जीवंतपणीच इतिहास झालाय !

    घरात माया,ममता करणारी ही महिला बाहेर मात्र कठोर पुरुषीपणाच्या आवरणात राहते.कारण तिला माहित असतं या जगात हिंस्र श्र्वापद पावलोपावली सावज शोधित असतात.एकटी असणारी स्री म्हणजे काहीना आयती संधी आहे अस वाटत असतं.दोन चार घटिका मनोरंजनाचे साधन म्हणून काही जण तिचा विचार करत असतात.तिच्या एकटेपणाचा, असहाय्यतेचा प्रसंगी गोड बोलून फायदा घेण्याचा देखील प्रयत्न नराधम प्रवृत्तीचे काही पुरुष करीत असतात. समाजामध्ये स्वतः व्हाईट कॉलर मध्ये वावरणारे हे राक्षसी चेहरे प्रत्यक्षात आतून मात्र खूप वेगळे असतात. याचा प्रत्यय देखील अशा गांजलेल्या महिलांना आलेला असतो.सहानुभूती आणि मदतीच्या नावाखाली आपली वासना शमविण्याचा प्रयत्न समाजातील असे हे लबाड लांडगे करीत असतात. यातून काही जणी वेळीच सावध होतात तर काही जणींचा हकनाक बळी देखील जातो. पण त्याच वेळी ती कोणत्या संघर्षातून जातेय,तिला कोणत्या अडचणींना तोंड द्यावं लागतय याचा विचार करायला मात्र कोणीच तयार नसतं.आलेल्या अनेक अनुभवातून मग ही स्री जाणती होते,शहाणी होते. मृगजळ कोणतं आणि वास्तव कोणतं यातला फरक तिला चांगलाच कळू लागतो. मग एकटी असताना जो काही भावनांचा कल्लोळ उठतो त्याची एकमेव साक्षीदार ही तीच असते.पण असे रडून कडून जीवन कडेला जाणार नाही हे मात्र तिला पक्कं ठाऊक असतं. म्हणूनच आपल्या लेकरांची जबाबदारी ती अगदी सक्षमपणे पार पाडते.

    ठाऊक आहेत मजला
    माझ्या काय मर्यादा
    म्हणूनच आयुष्याकडे
    मी मागत नाही जादा

    आपल्या काही मर्यादा आहेत हे तिला माहीत असतं. पण पुरुषांच्या सारखीच सगळी कर्तव्ये ती अचूकपणे पूर्ण करीत असते.एकटी दुकटी स्त्री ही किती तरी कर्तृत्ववान असते हे आपल्याला समाजात दिसत असते.व्यवहार,कुटुंब, बाजारपेठ अशा सगळ्या ठिकाणी ती लीलया वावरत असते आणि यातून आलेल्या अनुभवातून ती आणखी समर्थ होत असते.

    मनातली खंत व्यक्त न करता येणाऱ्या प्रत्येक क्षणाला ती आत्मविश्वासाने सामोरे जात असते.लोकांना ती दिसत असते एक कणखर आणि लढावू स्री,पण हिला ही एक मन आहे जे हळवे आहे याचा कोणी विचार करतो का ? उलट समाजात आपल्याला असं दिसतं कि स्री हिच स्रीची शत्रू असते.म्हणून तर पुरुष आणि स्त्री अशी दुहेरी भूमिका निभावणाऱ्या स्त्रियांना त्रास देऊन,दुषणं लावून त्या मोकळ्या होतात. जगाचा खरा चेहरा एकटया जगणाऱ्या महिलांनी अनुभवलेला असल्याने कोण कोणत्या भावनेने बोलतो हे त्या ओळखून असतात.चकाकणारे सोने नसते हे वास्तव त्यांनी पाहिलेले असते.म्हणूनच त्या त्यांच्या घराचा भक्कम कणा असतात.संसारात जोडीदाराची साथ असून ही जरा काही टेंशन झालं की आकांतांडव करणाऱ्यांनी कधी यांचा विचार करून पाहावा कि यांनी कुणावर ओरडावे ? आपली दुःख उरात दाबून पुरुषी स्वभावाचं पांघरून वापरून या महिला आपल्या लेकरांचा भक्कम आधार होतात.म्हणूनच यांना म्हणावंसं वाटतं कि -

    -सुजाता नवनाथ पुरी
    अहमदनगर
    8421426337
    --------------

    तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? आम्हास आपल्या परिसरातील बातम्या, लेख अवश्य पाठवा आणि प्रतिनिधी बना ! ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Gaurav Prakashan फेसबुकपेज !

    --------------------

    आम्ही तुमच्यासमोर बातम्या, कथा, कविता, वाचनीय लेख अश्या खूप साऱ्या लेखामार्फत भेटत असतो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते, तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याचबरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद...!

    -बंडूकुमार धवणे
    संपादक गौरव प्रकाशन
    --------------------
● हे वाचा – एसटी महामंडळाला सवलत योजनेतून लाखोंचा फटका...!
    (छाया : संग्रहित)

टिप्पणी पोस्ट करा

2 टिप्पण्या

Unknown म्हणाले…
मला हा लेख आवडल्याचे खूप वाचकांचे फोन आले.. सर्वांचे खूप खूप धन्यवाद
Unknown म्हणाले…
लेख खूप वाचकांना आवडला