काही दिवसांपुर्वीच उदघाटन करण्यात आलेल्या समृद्धी महामार्गावर अपघातांचं सत्र सुरूच आहे. वाशिम जिल्ह्यातील कारंजाजवळ भीषण अपघात झाल्याची माहितीसमोर आली आहे. यामध्ये दोन जण जागीच ठार तर दोन जण गंभीर जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. मृतकांमध्ये एक महिला आणि एका लहान मुलीचा समावेश आहे. नागपुरच्या दिशेने जाणारी कार पलटी होऊन हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.
राज्य सरकारचा महत्वाकांक्षी प्रकल्प समृद्धी महामार्गाचं लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झालं. या महामार्गाचं लोकार्पण झाल्यापासूनच या महामार्गावर अनेक अपघात होत आहेत. त्यामुळे हा समृद्धी महामार्ग हा अपघातांचा महामार्ग झाला आहे का? असा सवाल आता उपस्थित केला जात आहे.आता पर्यंत या मार्गावर १७ अपघात झालेले आहेत.
विदर्भ आणि मुंबईला जोडणाऱ्या समृद्धी महामार्गामुळे राज्यातील अनेक जिल्ह्यात समृद्धी येईल, असं म्हंटलं जात होतं. पण गेल्या आठ दिवसांपासून या महामार्गावर अपघातांची मालिका सुरू झाली आहे, जी चिंताजनक आहे. खरं तर या महामार्गाची रचना १५० किमी प्रतितास या वेगानं वाहनं धावू शकतील, अशी तयार करण्यात आली आहे. पण याठिकाणी १२० किमी प्रतितासाची वेग मर्यादा असल्यानं यावर फक्त याच वेगात वाहनं चालविण्याची मुभा आहे. अतिशय सरळ रेषेत हा महामार्ग असल्यानं आणि गुळगुळीत रचना असल्यामुळे वाहन चालकाला आपण निर्धारित वेग मर्यादेच्या पलीकडे गेलोय, हे लक्षातच येत नाही. त्यामुळे या महामार्गावर आतापर्यंत १७ अपघात झाल्याचं समोरआल आहे. गेल्या आठ दिवसांत तीस वाहनांना अपघात होवून दोन ठिकाणी वाहनांना आग लागली.
या महामार्गावर काही वाहन चालक निर्धारित वेग मर्यादेपेक्षा अधिक वेगाने वाहने चालवत असल्याचे समोर आले आहे. मात्र आता नियमांचे उल्लंघन करणे वाहन चालकांना महागात पडणार आहे. कारण समृद्धी महामार्गावर ठिक-ठिकाणी पोलिसांचे इंटरसेप्टर वाहन तैनात करण्यात आले असून वाहन मर्यादा ओलांडल्यास दोन हजार रुपये दंड भरावा लागणार आहे.
छोट्या कारसाठी १२० किमी प्रतीतास, मालवाहतुक वाहनांसाठी ८० किमी प्रतितास तर मोठ्या प्रवासी वाहनांसाठी १०० किमी प्रतितास असा वेग निश्चित करण्यात आला आहे. ही वेगमर्यादा ओलांडल्यास दोन हजार रुपये दंड आकारला जाणार आहे. नागपूर ते शिर्डी प्रवास करताना कारसाठी ९०० रुपये टोल आहे. मात्र वेगमर्यांदा ओलांडल्यास दोन हजार रुपये दंड भरावा लागणार आहे. नागपूर ते शिर्डी या ५४० किमी अंतरात ठिकठिकाणी महामार्ग पोलिसांची इंटरसेप्टपर वाहने तैनात करण्यात आली आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मोठ्या थाटामाटात जनतेसाठी समृद्धी महामार्गाचा शुभारंभ केला. मात्र उद्घाटनाच्या पहिल्याच दिवशी महामार्गावर अपघात झाला, त्यात एका माकडाचा मृत्यू झाला. ही घटना समोर आल्यानंतर पुन्हा एकदा वण्य प्राण्यांच्या सुरक्षेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण होऊ लागले आहे.
वन्य प्राण्यांचा या मार्गावर संचार मोठ्या प्रमाणात होत असल्याने अपघात होत आहे.या महामार्गावरील वन्यप्राण्यांसाठी शमन योजना सुरुवातीपासूनच वादग्रस्त ठरली आहे. हा महामार्ग वन्यप्राण्यांच्या अधिवासातून जातो. जेव्हापासून महामार्ग बांधण्याची योजना होती, तेव्हापासून वन्यजीव तज्ञांनी वन्यजीवांसाठीच्या शमन योजनांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.
या प्रश्नांबाबत राज्याच्या मुख्य वन्यजीव वॉर्डनच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली होती. त्यात भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे अधिकारी, वन विभागाचे अधिकारी, वाइल्डलाइफ इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया डेहराडूनचे अधिकारी, राज्य वन्यजीव मंडळाचे सदस्य आणि स्वयंसेवी संस्थांच्या प्रतिनिधींचा समावेश होता. या समितीने महामार्गाची पाहणी केली आणि आवश्यक तेथे वन्यजीवांसाठी ओव्हरपास आणि उड्डाणपूल अशा विविध शमन योजना सुचवल्या. वाइल्डलाइफ इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाच्या संशोधकांच्या देखरेखीखाली हे तयार करण्यात आले. मात्र असे असतानाही त्यात अनेक त्रुटी समोर आल्या. रस्त्याच्या दोन्ही बाजूला कठडे लावण्यात आले तरी ते अपूर्ण असून अधून मधून वन्य प्राणी या मार्गात संचार करतात.त्यामुळे अपघात होत आहे.
समृद्धी येथे अपघातात वन्य प्राण्याचा मृत्यू होण्याची ही पहिलीच वेळ नाही. उद्घाटनापूर्वीच जून-जुलै महिन्यात अज्ञात वाहनाने हरणांना उडवले, त्यात त्याचा मृत्यू झाला. यासोबतच या महामार्गावर अनेक हरणेही धावताना दिसत आहेत.समृध्दी महामार्गावरील अपघातांची मालिका रोखण्यासाठी आता निर्णायक उपाययोजना करणं गरजेचं आहे. त्यासाठी या मार्गावरील तांत्रिक अडथळे दूर करण्याबरोबरच त्यावरून प्रचंड वेगाने गाडी हाकणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याची गरज आहे. अन्यथा नागपूर आणि मुंबई या शहरांमधील ही लाइफलाइन, ‘डेथलाइन’ व्हायला वेळ लागणार नाही!
- -प्रा डॉ सुधीर अग्रवाल
- --------------
तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? आम्हास आपल्या परिसरातील बातम्या, लेख अवश्य पाठवा आणि प्रतिनिधी बना ! ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Gaurav Prakashan फेसबुकपेज !
- --------------------
आम्ही तुमच्यासमोर बातम्या, कथा, कविता, वाचनीय लेख अश्या खूप साऱ्या लेखामार्फत भेटत असतो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा, कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते, तसेच आमचे फेसबुक पेज ही नक्की लाईक करा, गौरव प्रकाशन युट्यूब चॅनेल लाईक Subscribe करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याचबरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद...!
- -बंडूकुमार धवणे
- संपादक गौरव प्रकाशन
- --------------------
- (छाया : संग्रहित)
0 टिप्पण्या