Header Ads Widget

नव्या दिशा दाखविणारे: पाय आणि वाटा

  सचिन वसंत पाटील, हे आजच्या काळातील एक आश्वासक लेखक. त्यांच्या कथा, ललित या साहित्य प्रकारास वाचकांनी विशेष दाद दिली आहे. त्यांचे हर्मिस प्रकाशन पुणे यांनी प्रकाशित केलेले 'पाय आणि वाटा' हे ललितबंधात्मक पुस्तक नुकतेच वाचले. त्यातून हरवलेल्या गावाच्या पाऊलखुणा नव्याने सापडल्याशिवाय राहत नाहीत. अर्थातच हे सगळं आपण सगळ्यांनी पाहिलेलं, अनुभवलेलं असलं तरी लेखकाने अतिशय सूक्ष्म निरीक्षण करून मानवी जीवनातील भौतिक, अभौतिक बाबींच्या पाऊलखुणा मांडलेल्या आहेत. माणसाची स्वतंत्र अस्तित्वखूण त्याची जिद्द, धडपड, मनोधैर्य यातून व्यक्त होत असते हेच सामर्थ्य या लेखनातून निश्चितपणे दिसते. अनेक जीवघेणी संकटे झेलून आपल्या दुर्दम्य इच्छाशक्तीच्या बळावर माणसानं आपल्या जगण्यात नवा आशावाद निर्माण करावा तो इतरांना प्रेरणादायी ठरावा, हे या कारुण्यमय चिंतनातून समोर येते. याबाबत प्रकाशक मलपृष्ठावरील पाठराखण करताना म्हणतात, "ललित लेखन ही समाधानाच्या सरोवराकडे जाण्याची पायवाट आहे. निकोप, निर्भेळ आणि अभिरुचीसंपन्न आनंद मिळवण्याचा तो एक राजमार्ग आहे."

  एका जीवघेण्या अपघातामुळे त्यांच्या पायांची संपूर्ण ताकत क्षीण होऊन गेल्याने त्यांचे पाय अकाली थांबले. या वेदनेला सहन करत त्यांच्या लेखक मनाने सगळं जग आपल्या कवेत घेतलं. आपल्या आंतरिक दृष्टीने आणि जगण्यातल्या जुन्या चीर आठवणींनी त्यांनी हरवलेल्या गावाचा, सर्वसामान्य माणसाच्या हळुवार, कोमल बालजीवनाचा नवा पट भावबंधात्मकपणे समोर आणला आहे. त्यात प्रत्येक वाचकाला आपलं बालपण, जगणं, आठवणी दिसतील यात शंका नाही. पूर्वायुष्यातील वाटा, पायवाटा शोधण्याचा केलेला हा प्रयत्न विस्मृतीतील नवी पायवाट दाखवतो.

  गाव म्हटलं की गाडी, बैलगाडी आलीच. त्याच्या आठवणीतली बैलगाडी, भावंडांसोबत बैलगाडीत बसून केलेल्या जत्राखेत्रा, उरूस थंडीवाऱ्यात, तर कधी अचानक आलेल्या गारांच्या उन्हाळी पावसातलं भिजणं, गावभर फिरून विकलेली कवळीलुस भाजी, उन्हाळ्याच्या सुट्टीत हमखास गाठलेला मामाचा गाव, शाळेचे दिवस आणि ऐन तारुण्यात हातातून निसटलेले ते गुलाबी दिवस... मागील वीस वर्षांतल्या अनेक संवेदना गोळा करत त्या अनुभवांशी आणि एकंदर ग्रामजगण्याशी एकरूप असणारा लेखक एका जाणिवेने व्यक्त झाला आहे.

  शब्दांशी कधी खट्ट माळरान, कधी गवताळ पाऊलवाट, कधी चटचट पोळणारा तापलेला डांबरी रस्ता. कधी डोंगरदऱ्यातली खडकं. कधी गुडघ्याएवढा पातळबिर्रर्र चिखल. कधी पायात मोडलेला बाभळीचा अणकुचीदार काटा, पाय असताना अशा चाललेल्या अनेक वाटा... हे सगळं अपघातामध्ये पाय गमावलेल्या एका माणसानं आपल्या गतजीवनातील आठवणी लिहिल्या आहेत, असं सकृतदर्शनी वाटत असलं तरी एका हरवलेल्या गावाच्या आडवाटा शोधणारा हा लेखक वाचकांना नवी दृष्टी देतो. ते आपल्या मनोगतात म्हणतात, 'बालपण हे धनुष्यातून सुटलेल्या बाणासारखं असतं, ते कधीच परत येत नाही! हे जरी खरं असलं तरी बालपणीच्या त्या आठवणींचे ठसे मनावर कायमचे उमटलेले असतात. तहहयात ते जिवंत ताजे टवटवीत राहतात. पुन्हापुन्हा ते आठवांच्या डोहावर तरंगत वर येतात. आपण कितीही मोठं होऊन आभाळ शिवलं तरी हृदयातला तो कोपरा तसाच चिरेबंदी असतो. अगदी सगळ्यांसाठीच...' आणि ते सत्य आहे. म्हणूनच या पुस्तकातून आलेल्या करड्याची भाजी, ती बैलगाडी, पाठीराखा, स्पर्श... एक संवेदना, घोडी, पोष्टाचं पत्र हरवलं, झुकुझुकु झुकुझुकु आगीनगाडी, कोरडे डोळे, झाड आणि वाट, चिमणीचं पिल्लू, खरं प्रेम, बदललेलं गाव, पतंगाचे दिवस अशा असंख्य आठवणी असणारे "पाय आणि वाटा" वाचताना निश्चितच डोळ्यांच्या कडा ओल्या करतात.

  लेखक सचिन पाटील यांचे पुरस्कार व सन्मान
  * सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, बीए (भाग एक) मराठीच्या अभ्यासक्रमात 'कष्टाची भाकरी' या कथेचा समावेश.
  * महाराष्ट्र साहित्य परिषद, शाखा इस्लामपूर यांच्या वतीने 'राजारामबापू पाटील - उत्कृष्ट वाङ्मय पुरस्कार' २०१०. ('सांगावा', कथासंग्रह)
  * दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभा, कोल्हापूर यांचा 'शंकर खंडू पाटील पुरस्कार' - २०१६. ('अवकाळी विळखा', कथासंग्रह)
  * महाराष्ट्र शासन व समाजकल्याण कार्यालय सांगली यांच्या वतीने 'दिव्यांग साहित्यिक प्रेरणा पुरस्कार' २०१७.
  * महाराष्ट्र साहित्य परिषद, गुहागर यांच्या वतीने उत्कृष्ट कथासंग्रह पुरस्कार २०१६. ('अवकाळी विळखा', कथासंग्रह)
  * 'साहित्य साधना पुरस्कार' २०१६, उदगीर, जि. लातूर ('अवकाळी विळखा', कथासंग्रह)
  * तुकोबा माणदेश साहित्य प्रतिष्ठान, वाटंबरे, सांगोला उत्कृष्ट वाङ्मयनिर्मिती पुरस्कार २०१६. ('अवकाळी विळखा', कथासंग्रह)
  * अभिव्यक्ती वैदर्भीय लेखिका संस्था, नागपूर यांच्या वतीने उत्कृष्ट कथासंग्रह पुरस्कार २०१६. ('अवकाळी विळखा', कथासंग्रह)
  सचिन पाटील, 8275377049 कर्नाळ (जि.सांगली)
  ***
  ललित: पाय आणि वाटा
  हर्मिस प्रकाशन, पुणे
  स्वागतमूल्य १२० रुपये पोस्टेजसह
  संपर्क +91 72490 08824
  ***
  - बाळासाहेब कांबळे,
  मायणी, जि. सातारा
  --------------

  तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? आम्हास आपल्या परिसरातील बातम्या, लेख अवश्य पाठवा आणि प्रतिनिधी बना ! ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Gaurav Prakashan फेसबुकपेज !

  --------------------

  आम्ही तुमच्यासमोर बातम्या, कथा, कविता, वाचनीय लेख अश्या खूप साऱ्या लेखामार्फत भेटत असतो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते, तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याचबरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद...!

  -बंडूकुमार धवणे
  संपादक गौरव प्रकाशन
  --------------------

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या