परभणी येथे २३-२४-२५ डिसेंबर रोजी मराठा सेवा संघाचे भव्य अधिवेशन होणार आहे.त्या निमित्याने देशभरातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांची मांदियाळी परभणीत पहायला मिळणार आहे.१ सप्टेंबर १९९० साली अकोला येथे पुरुषोत्तम खेडेकर या स्थापत्य अभियंता असलेल्या सरकारी कर्मचाऱ्याने आपल्या काही निवडक सवंगड्यांना सोबत घेवून मराठा सेवा संघ नामक संघटनेची स्थापना केली होती.कदाचित तेव्हा त्यांनाही वाटले नसेल की ही संघटना भविष्यात इतिहास निर्माण करेल.परंतु नंतर या संघटनेने अशी काही भरारी घेतली की, आज महाराष्ट्राच्या पुरोगामी चळवळींच्या इतिहासात मराठा सेवा संघाचे नाव अग्रक्रमावर आहे.एका अभियंत्याने निर्माण केलेली ही संघटना आज अभियंते,डाॕक्टर,वकील,प्राध्यापक,शिक्षक,शेतकरी,कष्टकरी,व्यावसायिक,उद्योजक,विद्यार्थी,महिला,साहित्यीक,प्रबोधनकार,नाटककार,पत्रकार,कलाकार या सर्वांसाठी एक आशेचा आणि आस्थेचा विषय ठरली आहे.म्हणूनच अॕड.पुरुषोत्तम खेडेकर साहेब हे अभियंता ते युगपुरूष या उपाधी पर्यंत पोहचले आहे.मराठा सेवा संघाबद्दल अनेकांचे समज-गैरसमज आहेत.यातील बहुतांश गैरसमज हे केवळ ऐकीव माहिती आणि अपप्रचारावर आधारीत आहेत.ज्या लोकांनी सेवा संघाचा एकही कार्यक्रम ऐकला,पाहिला नाही तेच लोक यामधे आघाडीवर आहे.त्यामुळे मराठा सेवा संघ मुळातून समजून घ्यायचा असेल तर सेवा संघाचे कार्यक्रम प्रत्यक्ष ऐकणे,सेवा संघाने निर्माण केलेले अफाट साहित्य तटस्थ बुध्दीने वाचणे,सेवा संघाच्या लोकांसोबत समोरासमोर चर्चा करणे हे पर्याय पारखून घेतल्याशिवाय खरा सेवा संघ आपल्याला समजून घेता येणार नाही.
मराठा सेवा संघाने महाराष्ट्राला काय दिले आणि काय नाही याचे मोजमाप इतिहासात होईलच.परंतु मराठा सेवा संघाने आपल्या डोक्यात मेंदू नावाची एक अत्यंत महत्वपूर्ण गोष्ट असते आणि तिच्यावर आपले स्वतःचे नियंत्रण असले पाहिजे व तो मेंदू कोणाच्या इशाऱ्यावर नाचता कामा नये ही एक अभूतपूर्व शिकवण बहुजन समाजाला दिलेली आहे.त्यासाठी शिक्षणाची अट नाही.एखादा अशिक्षित माणूसही तर्कशुद्ध विचार करू शकतो आणि एखादा उच्चविद्याविभूषित व्यक्तीही मेंदू गहाण टाकू शकतो.याची असंख्य उदाहरणे आपल्याला अवतीभवती पाहायला मिळतात.सेवा संघाने तर्कशुद्ध विचार करायला लावणारी पिढी निर्माण केली.कोणतीही गोष्ट तर्काची चाळणी लावून तपासून घेतली पाहिजे हे समजावून सांगितले.त्यासाठी विज्ञानवादी विचारांच्या महापुरुषांचे शेकडो दाखले पुराव्यासहीत कार्यकर्त्यांच्या समोर ठेवले.महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात प्रशिक्षण शिबीरे आयोजित केली.अभ्यासू विचारवंतांची हजारो व्याख्याने घेतली.शेकडो पुस्तकांची निर्मिती केली.त्यातून चिकित्सक व्याख्याते,लेखक,विचारवंत,साहित्यीक निर्माण केले.त्यांच्याव्दारे समाजाचे खरे प्रबोधन केले.लोकांमधे भाषणे ऐकण्याची गोडी निर्माण केली.जी माणसे कधीच भाषणे ऐकत नव्हती,ती स्वतःतर ऐकायलाच लागली पण दुसऱ्यांनाही सोबत घेवून यायला लागली.एकाच जाग्यावर बसून तासनतास एकाग्रतेने भाषणे ऐकणारा श्रोतृवर्ग सेवा संघाने निर्माण केला.आज शिवजयंतीच्या कार्यक्रमात प्रबोधनाची परंपरा ही केवळ मराठा सेवा संघामुळेच निर्माण झाली.सेवा संघानेच महिलांना घराच्या चौकटीतून बाहेर काढले.तरुणांना जागृत केले.त्यांना स्वतःच्या अस्तिवाची आणि अस्मितेची जाणीव करुन दिली.सुप्त कलागुण असणाऱ्या असंख्य लोकांना संधी देवून समोर आणले.
मराठा सेवा संघाने महाराष्ट्राच्या पुरोगामी चळवळींना आधार दिला आहे.त्यांना पाठबळ दिले.कारण अनेक पुरोगामी संघटना कमजोर होत असतांना मराठा सेवा संघाच्या ताकदीमुळे जागृत होवून नव्याने काम करायला लागल्या.त्यांच्यात नवचैतन्य निर्माण झाले.आपल्याला एक शक्तीशाली मित्र मिळाला आहे असे त्यांना वाटू लागले.सेवा संघ ही वर्षभर कार्यक्रम राबविणारी चळवळ आहे.त्यामुळे सेवा संघाच्या कार्यक्रमात विविध पुरोगामी संघटनांच्या विचारवंत,व्याख्यात्यांना सन्मानपूर्वक निमंत्रित करण्यात येते.बऱ्याच पुरोगामी संघटना मराठा सेवा संघापासून अंतर राखून काम करतात.बरेच तथाकथित पुरोगामी विचारवंत मराठा सेवा संघापासून स्वतःला वेगळे दाखविण्याचा प्रयत्न करतात.सेवा संघावर जातीयवादी असल्याचा आरोप करतात.परंतु सेवा संघाने मात्र बहुजनांसाठी काम करणाऱ्या पुरोगामी चळवळींवर व त्यांच्या नेत्यांवर कधीही टिका न करण्याचे पथ्य कटाक्षाने पाळले आहे. सेवा संघाने पुरोगामी चळवळीतील लोकांना कधीही वेगळे न मानता नेहमीच सन्मानाने आपल्या विचारपिठावर आमंत्रित केले आहे.पुरोगामी चळवळींनी हातात हात घालून एकत्रितपणे काम केले पाहिजे ही सेवा संघाची सदैव भावना आणि भूमिका राहिलेली आहे.पुरोगामी चळवळीतील लोकांनी एकमेकांचे दोष दाखवून एकमेकांविरुध्द आपली वाणी,नाणी आणि लेखणी झिजविल्यापेक्षा समान मुद्यांवर संघटीतपणे काम केले पाहिजे,तेव्हाच कुठे आपण खऱ्या शत्रूला तोंड देवू शकतो ही खेडेकर साहेबांची भूमिका राहिलेली आहे.त्यामुळे प्रत्येक पुरोगामी संघटनेच्या माणसाने या गोष्टीचा गांभीर्याने विचार करणे गरजेचे आहे.
मराठा सेवा संघ ही रचनात्मक काम करणारी चळवळ आहे.या चळवळीचा कृतीशीलतेवर जास्त भर आहे.त्यामुळे महाराष्ट्रात एखाद्या राजकीय पक्षापेक्षाही या चळवळीने खूप मोठे रचनात्मक काम उभे केले आहे.आज प्रत्येक जिल्ह्यात सेवा संघाच्या मालकीच्या स्वतःच्या सांस्कृतिक इमारती उभ्या आहेत.अनेक जिल्ह्यात वसतिगृहे उभी झाली आहे.शेकडो पतसंस्था आणि बँका आहेत.हजारो वाचनालये, ग्रंथालये,अभ्यासिका आहेत.नागपूरचे पाच मजली भव्य दिव्य पंचतारांकीत बळीराजा संशोधन केंद्र महासचिव मधुकर मेहेकरे व त्यांच्या सहकाऱ्यांनी निर्माण केले आहे.मातृतीर्थ सिंदखेडराजा येथील अकरा हजार कोटींच्या जिजाऊ सृष्टी प्रकल्पाचेही काम सुरु आहे.त्या ठिकाणी आता महिलांसाठी भव्य असे हाॕस्पिटल उभे झाले आहे.प्रत्येक जिल्ह्यात सेवा संघाची स्वतःची कार्यालये आहेत.जागा आहेत.कोणीही या सर्व रचनात्मक कामांचे निरीक्षण आणि परिक्षण करु शकतो.एखादी सामाजिक संघटना लोकसहभागातून व प्रबोधनातून किती भव्य दिव्य असे रचनात्मक काम उभे करु शकते यासाठी मराठा सेवा संघ ही चळवळ पुरोगामी संघटनांसाठी माॕडेल आहे.
मराठा सेवा संघ विविध क्षेत्रात काम करणाऱ्या ३२ कक्षांच्या माध्यमातून आपली चळवळ चालवितो.युवक,विद्यार्थी,महिला,शेतकरी,पत्रकार,कलाकार,डाॕक्टर्स,शिक्षक,उद्योजक,वकील,साहित्यीक,प्रबोधनकार यासारख्या वेगवेगळ्या ३२ विभागातील लोकांसाठी मराठा सेवा संघ काम करतो.या माध्यमातून अनेक नामवंत,बुध्दीवंत,प्रज्ञावंत लोकांना संधी देवून पुढे आणतो.त्यांना विचारपीठ उपलब्ध करुन देवून नावलौकिकास आणतो.असे विविध क्षेत्रातील हजारो स्त्री-पूरुष सेवा संघाने पुढे आणून त्यांना राज्यात सन्मानजनक स्थान प्राप्त करुन दिले आहे.त्यामुळे मराठा सेवा संघ ही चळवळ सामान्य व्यक्तीला असामान्यत्व मिळवून देणारी बहुजन समाजातील एक फार मोठी चळवळ आहे.या चळवळीने लोकांना इतिहासाकडे नव्या दृष्टीने पाहण्याची चालना दिली आहे.योग्य-अयोग्य यामधील फरक जाणून घेण्याची दृष्टी दिली आहे.आपले मित्र कोण आणि शत्रू कोण हे समजण्याची नजर दिली आहे.सामाजिक क्षेत्रात कशा पध्दतीने काम केले पाहिजे याचे अभ्यासपूर्ण प्रशिक्षण दिले आहे.त्यामुळे मराठा सेवा संघाची चळवळ आज महाराष्ट्राच्या पुरोगामी चळवळीचा आधारवड झालेली आहे व याचा एक कार्यकर्ता म्हणून आम्हाला अभिमान आहे.मराठा सेवा संघासाठी ३२ वर्षापासून तन-मन-धनाने कार्य करणाऱ्या असंख्य कार्यकर्त्यांना अधिवेशनाच्या हार्दिक सदिच्छा.
तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? आम्हास आपल्या परिसरातील बातम्या, लेख अवश्य पाठवा आणि प्रतिनिधी बना ! ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Gaurav Prakashan फेसबुकपेज !
आम्ही तुमच्यासमोर बातम्या, कथा, कविता, वाचनीय लेख अश्या खूप साऱ्या लेखामार्फत भेटत असतो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा, कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते, तसेच आमचे फेसबुक पेज ही नक्की लाईक करा, गौरव प्रकाशन युट्यूब चॅनेल लाईक Subscribe करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याचबरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद...!
Copyright (c) 2022 Gaurav Prakashan All Right Reseved
0 टिप्पण्या