Featured Post

Translate

Gaurav Prakashan

Recent in Technology

Advertisement

Breaking News

खरे वारकरी...

  वारकरी धर्म हा महाराष्ट्राच्या मातीतील अत्यंत लोकप्रिय धर्म आहे.आमच्या संतांनी वारकरी धर्माची पताका संपूर्ण देशभरात पोहचवली आहे.संत नामदेव,संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम,सावता महाराज, संत गोरा महाराज,सेना महाराज,जगनाडे महाराज यासारख्या अनेक संतांनी १३ व्या शतकापासून तर आधुनिक काळामधे संत गाडगेबाबा आणि राष्ट्रसंत तुकडोजी महाराज या सर्व संतांनी वारकरी धर्माचा प्रचार आणि प्रसार केला आहे.या संतांनी आपापल्या कालखंडात आपल्या भजन,कीर्तन,प्रवचन आणि साहित्यातून लोकांचे खरे प्रबोधन केले.लोकांना भक्तीचा खरा मार्ग समजून सांगितला.देव कुठे आहे आणि खरी देवाची भक्ती कशात आहे हे अतिशय सोप्या पद्धतीने आमच्या संतांनी येथील कष्टकरी,कामकरी, शेतकरी वर्गाला समजावून सांगितले. विठ्ठल हे समस्त बहुजन समाजाचे दैवत आहे.या विठ्ठलाला केंद्रस्थानी ठेवून आमच्या अनेक संतांनी बहुजन समाजाची वैचारिकदृष्ट्या नांगरणी आणि वखरणी केली आहे.पंढरपूर हे वारकऱ्यांचे मुख्य केंद्र ठरवून या केंद्रातून दरवर्षी आषाढी आणि कार्तिक एकादशीला वारकऱ्यांची मांदियाळी पंढरपुरात भरते.लाखो वारकरी त्या ठिकाणी एकत्र होतात आणि संत विचारांनी प्रेरित होऊन आपापल्या गावी परत जातात.

  खेळ मांडीयेला वाळवंटी घाई ! नाचती वैष्णव भाई रे !!
  क्रोध,अभिमान केला पावटणी ! एक एका लागतील पायी रे !!

  तुकोबांच्या या अभंगानुसार क्रोध, अभिमान,गर्व,अहंकार,जात,धर्म या गोष्टी बाजूला ठेवून सर्व एकाच ईश्वराची लेकरे आहेत या समतेच्या तत्त्वानुसार सर्व संतांनी आम्हाला शिकवण दिली आहे.

  संतांची हीच शिकवण आमच्या महापुरुषांनी सुद्धा आचरणात आणली. छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज,त्यानंतर महात्मा ज्योतिराव फुले,राजर्षी शाहू महाराज,डॉ.बाबासाहेब आंबेडकर,डॉ. पंजाबराव देशमुख,कर्मवीर भाऊराव पाटील,साहित्यसम्राट अण्णाभाऊ साठे यासारख्या अनेक महापुरुषांनी या संत विचारानुसार आपले कार्य केले आहे.संतांच्या या विचारांनाच आपल्या सामाजिक कार्याचा पाया बनवून आधुनिक काळामधे आमच्या महापुरुषांनी लोकांमध्ये जागृती केली आहे.महापुरुषांच्या आधी आमच्या संतांनीच खऱ्या अर्थाने समाज प्रबोधन करून अंधश्रद्धा,घातक रूढी, परंपरा, कर्मकांड,विषमता,धर्मांधता, पुरोहित शाही यावर आसूड ओढले आहे. *हे विश्वची माझे घर* ही या संतांची व्यापक विश्वात्मक संकल्पना होती.मानवतावाद हा या संतांच्या विचाराचा गाभा होतात. समतावाद हा संतांच्या शिकवणुकीचा पाया होता. विज्ञानवाद हा त्यांच्या प्रबोधनाचा आत्मा होता.बहुजनवाद ही या संतपरंपरेची विचारधारा होती आणि या सर्व संतांचा धर्म होता *वारकरी धर्म*. या वारकरी धर्माचे पाईक असलेले लोक असत्यावर,अंधश्रद्धेवर, विषमतेवर,बुवाबाजीवर आणि पुरोहितशाहीवर आपल्या प्रबोधनातून आसूड ओढायचे.वारकरी धर्म हा माणसाला माणुसकीचे दर्शन घडवून देणारा महान मानव धर्म आहे.या धर्माचे पाईक असणारे लोक इतरांना कमी लेखत नाही.जात,धर्म मानत नाही.सर्व मानवप्राणी एकच व समान आहे या विचारातून विठ्ठलाच्या नामस्मरणाने त्यांचा दिवस सुरू होतो.

  वारकरी धर्माचे लोक हे अतिशय साधे,सरळ,निर्व्यसनी,निगर्वी,सर्वसामान्य कष्टकरी कामकरी गोरगरीब शेतकरी कुटुंबातील असतात. पंढरपूरच्या वारीत चालणारा वारकरी हा ग्रामीण भागातील असतो.अतिशय साधी राहणी आणि मानवतावादी विचार घेऊन हे वारकरी चालत असतात.इतरांविषयी द्वेष,घृणा,असुया त्यांच्या ठिकाणी अजिबातही नसतो.आपल्या शत्रूविषयी सुध्दा ते नेहमी प्रेमाची व मित्रत्वाची भावना ठेवतात.अहंकार आणि गर्व तर त्यांना शिवत सुद्धा नाही.त्यामुळे हे गुण ज्यांच्या ठिकाणी आहे आणि जो पांडुरंगाचा भक्त आहे तो आपोआप वारकरी बनतो.तो वारीत पाय गेलाच पाहिजे असे बंधन नाही.त्यामुळे जे लोक वारकऱ्यांच्या नावावर समाजामध्ये भेदभाव,धर्मांधता, कट्टरता निर्माण करतात,स्त्रियांना कनिष्ठ समजतात,पुरुषांच्या तुलनेत त्यांना समान हक्क व अधिकार नाकारतात, ते लोक वारकरी असू शकत नाही. ते फक्त *वारकरी* या शब्दाची झूल आपल्या अंगावर पांघरतात आणि त्या आडून समाजामधे विषमतेची,अंधश्रद्धेची आणि बुवाबाजीची पेरणी करतात.हा आमच्या संतपरंपरेचा घोर अपमान आहे.

  संतांनी शिकवलेली शिकवण नाकारून मनुवादी व्यवस्थेचे वाहक व समर्थक असलेले काही लोक वारकरी धर्मात घुसलेले आहे व त्यांनी आमच्या पवित्र वारकरी परंपरेला अपवित्र करण्याचा विडा उचललेला आहे.केवळ भगवा फेटा बांधून,माळा घालून, टिक्का बुक्का लावून कोणीही वारकरी होत नसते.त्यासाठी त्या प्रकारचे सत्वशील व सत्यशील आचरण असणे गरजेचे असते.नाहीतर भगव्या कपड्यातील बऱ्याच तथाकथीत संतांनी किती घाणेरडे कृत्य केले आहे हे आपण सर्वांनी मागील काही वर्षात अनुभवले आहे.त्यामधील अनेक बुवा तुरुंगाची हवा खात आहे.परंतु स्वतःला वारकरी धर्माचे पाईक समजणारे काही तथाकथित वारकरी बुवा,महाराज,तात्या या शोषण करणाऱ्या बाबांविषयी कधीच आवाज उठवत नाही, त्यांचा निषेध करत नाही. उलट त्यांचे समर्थन करतात आणि संत विचारांचे खरे प्रबोधन करणाऱ्या लोकांना मात्र त्रास देतात.जगतगुरू तुकोबारायांच्या विचारांचे अनुयायी असणाऱ्या छत्रपती शिवरायांची वेळोवेळी बदनामी होत असतांना तोंडात बोळा कोंबून बसणारे लोक खरे वारकरी असूच शकत नाही. त्यामुळे वारकऱ्यांच्या नावावर वारकरी धर्मात घुसलेले हे लोक वारकरी धर्माचे शत्रू असून संतपरंपरेचा विचार नासविण्याचे काम हे लोक करीत आहेत.परंतु आमचा खरा वारकरी साध्याभोळ्या वृत्तीचा असल्यामुळे वारकऱ्यांच्या दिंडीत घुसलेल्या स्वार्थी व व्देषी *अवारकऱ्यांचे* कारस्थान त्यांच्या लक्षात येत नाही.राजकारणी लोकांचा अजेंडा राबविणाऱ्या अशा तथाकथित वारकऱ्यांना ओळखून त्यांना बाजूला करणे ही सध्याची गरज आहे.तरच आमच्या संतांचा विश्वकल्याणाचा व विश्वबंधुत्वाचा विचार आम्ही सर्वत्र पसरवू शकतो.त्यामुळे थोडक्यात वारकरी म्हणजे काय हे तुकोबांच्या शब्दात,

  अवघी एकाचीच वीण ! तेथे कैसे भिन्नाभिन्न !!
  हा विचार प्रमाण मानून जीवन जगणारा प्रत्येक व्यक्ती हाच खरा वारकरी होय.
  -प्रेमकुमार बोके
  अंजनगाव सुर्जी
  ९५२७९१२७०६
  --------------

  तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? आम्हास आपल्या परिसरातील बातम्या, लेख अवश्य पाठवा आणि प्रतिनिधी बना ! ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Gaurav Prakashan फेसबुकपेज !

  --------------------

  आम्ही तुमच्यासमोर बातम्या, कथा, कविता, वाचनीय लेख अश्या खूप साऱ्या लेखामार्फत भेटत असतो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते, तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याचबरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद...!

  -बंडूकुमार धवणे
  संपादक गौरव प्रकाशन
  --------------------
  (छाया : संग्रहित)

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

People

Ad Code