अमरावती (प्रतिनिधी) : गोवर रूबेला लसीकरण मोहिमेचा पहिला टप्पा दि. 15 ते 25 डिसेंबरदरम्यान राबविण्यात येणार असून, लसीकरणापासून 9 महिने ते 5 वर्ष वयोगटातील एकही बालक वंचित राहता कामा नये, असे स्पष्ट निर्देश जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अविश्यांत पंडा यांनी आज येथे दिले.
गोवर प्रतिबंधासाठी मिशन मोडवर काम करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी पवनीत कौर यांनी दिले आहेत. त्यानुसार उपाययोजनांच्या अनुषंगाने बैठक श्री. पंडा यांच्या अध्यक्षतेखाली महसूलभवनात झाली, त्यावेळी ते बोलत होते. जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. दिलीप सौंदाळे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दिलीप रणमले, डॉ. सुभाष ढोले, नप प्रशासन अधिकारी गीता वंजारी यांच्यासह तालुका आरोग्य अधिकारी उपस्थित होते.
गोवर- रूबेला लसीचा डोस चुकलेल्या नऊ महिने ते पाच वर्षांदरम्यानच्या सर्व बालकांचे लसीकरण करण्यात येणार आहे. मोहिमेचा दुसरा टप्पा दि. 15 ते 25 जानेवारीदरम्यान राबविण्यात येईल. प्रजासत्ताक दिनापूर्वी लसीकरण पूर्ण करावयाचे आहे. त्यासाठी लसीकरणापासून वंचित बालकांची यादी करावी व लसीकरण सत्र राबवावे. आंतरविभागीय समन्वय राखून कामे करावीत, असे निर्देश श्री. पंडा यांनी दिले.
ते म्हणाले की, गोवर प्रतिबंधासाठी सप्लिमेंट म्हणून जीवनसत्व अ देणे आवश्यक आहे. ही बाब कटाक्षाने पाळावी. विशेषत मेळघाटातील बालकांत कुपोषण व त्यात अ जीवनसत्वाचा अभाव आढळतो. त्यामुळे मेळघाटसाठी स्पेशल ड्राईव्ह राबवावा. कोरकू भाषेतून पाड्यापाड्यांवर जनजागृती करावी. आयुष्मान भारत योजनेच्या अंमलबजावणीतही गती आणण्याचे निर्देश त्यांनी दिले.
जिल्ह्यात गोवरचे आठ व रुबेलाचे चार रूग्ण आढळून आले आहेत. अमरावती जिल्ह्यात यावर्षी एप्रिल ते नोव्हेंबर या काळात 31 हजार 562 बालकांना पहिला डोस व 27 हजार 575 बालकांना दुसरा डोस देण्यात आला आहे.
तालुक्यातील यंत्रणा व आरोग्य अधिका-यांमध्ये समन्वय नसल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे कामांत अनेक त्रुटी राहतात. ज्या बाबींचे निराकरण तालुकास्तरावर शक्य आहे, त्या तेथील समन्वयाअभावी जिल्हास्तराकडे प्राप्त होतात. त्यामुळे तालुका आरोग्य अधिकारी, वैद्यकीय अधिक्षक, वैद्यकीय अधिकारी यांनी कामांबाबत सातत्यपूर्ण परस्पर समन्वय ठेवावा व जबाबदारीने काम पूर्ण करावे, असे स्पष्ट निर्देश श्री. पंड्या यांनी दिले.
तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? आम्हास आपल्या परिसरातील बातम्या, लेख अवश्य पाठवा आणि प्रतिनिधी बना ! ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Gaurav Prakashan फेसबुकपेज !
आम्ही तुमच्यासमोर बातम्या, कथा, कविता, वाचनीय लेख अश्या खूप साऱ्या लेखामार्फत भेटत असतो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते, तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याचबरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद...!
Copyright (c) 2022 Gaurav Prakashan All Right Reseved
0 टिप्पण्या