• Tue. Jun 6th, 2023

स्वतंत्र कृषी अर्थसंकल्पाची गरज..!

    भारत हा कृषिप्रधान देश आहे हे आपण अनेक वर्षांपासून ऐकत आलेलो आहोत.भारताची अर्थव्यवस्था ही मोठ्या प्रमाणात कृषीवर अवलंबून आहे.कृषी क्षेत्रामधूनच देशात मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध होतो. त्यामुळे कृषी हा भारताचा अतिशय मुख्य आणि महत्त्वाचा विषय व क्षेत्र आहे.परंतु सध्या या क्षेत्राकडे सरकारचे फार दुर्लक्ष होत आहे असे अनेक वर्षापासून जाणवत आहे.सरकार कोणत्याही पक्षाचे असो परंतु शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये सरकारची भूमिका इतर क्षेत्रांच्या तुलनेत दुय्यम राहिलेली आहे.त्यामुळे देशात सर्वात जास्त रोजगार उपलब्ध करुन देणारे हे क्षेत्र डबघाईस आले असून या क्षेत्राकडे पाहण्याचा लोकांचा दृष्टिकोन दिवसेंदिवस बदलायला लागलेला आहे.कृषीकडे लोक आता निराशेच्या भावनेने पाहत आहे.तसेच निसर्गाचे चक्रही बदलल्यामुळे शेतीला मोठा फटका बसत आहे.त्यामुळे या क्षेत्राला पुन्हा चांगले दिवस येण्यासाठी सरकारने नेहमीसाठी ठोस उपाययोजना करणे अत्यंत गरजेचे आहे.

    भारतामधे देशाच्या मुख्य अर्थसंकल्पासोबतच रेल्वेचा सुद्धा स्वतंत्र अर्थसंकल्प मांडण्याची पद्धत आहे.परंतु कृषी सारख्या सर्वात मोठ्या क्षेत्राचा स्वतंत्र अर्थसंकल्प मांडून या क्षेत्रासाठी विशेष अशा प्रकारची तरतूद केली पाहिजे असे कोणत्याही सरकारला वाटले नाही.सर्वात जास्त आयएएस आणि आणि हजारो वेगवेगळे अधिकारी आणि कर्मचारी या क्षेत्राच्या भरवशावर आपला उदरनिर्वाह चालवतात.या क्षेत्रामुळे अनेकांना रोजी रोटी उपलब्ध होते. परंतु या क्षेत्रात जे स्वतः राबतात व कष्ट करतात,त्या धान्य पिकवणाऱ्या लोकांना मात्र अतिशय विदारक अवस्थेला सामोरे जावे लागत आहे. आपल्या मेहनतीने पिकवलेल्या पिकाला योग्य मोबदला न मिळाल्यामुळे लाखो शेतकऱ्यांनी आत्महत्या केलेल्या आहे. त्यामुळे हे क्षेत्र वाचवायचे असेल आणि देशाला सुख संपन्नतेकडे न्यायचे असेल तर कृषी क्षेत्राच्या बाबतीमधे सरकारने विशेष उपाययोजना करणे अत्यावश्यक आहे.

    त्यासाठी स्वतंत्र अर्थसंकल्प मांडून त्यामधे काही ठोस आणि दिर्घकालीन उपाययोजना तज्ञ लोकांना सोबत घेऊन सरकारने मांडल्या पाहिजेत.कृषी क्षेत्रामधे अनेक आयोग आले.आयोगामधील विद्वानांनी सरकारला वेगवेगळे अहवाल दिले. त्यामध्ये शेतीच्या सुधारणेसाठी व शेतकऱ्यांना आर्थिक स्थैर्य प्रदान करण्यासाठी अनेक उपाय सुचवले. परंतु कोणत्याही सत्ताधारी पक्षाने मात्र आयोगाने सुचवलेले प्रस्ताव व उपाय पूर्णपणे स्वीकारले नाही.थातूरमातूर उपाययोजना करून आयोग गुंडाळण्यात आले.त्यामुळे मूलभूत व मुख्य अडचणी समजून घेऊन शेतकऱ्यांच्या सुधारण्यासाठी खरे प्रयत्न झालेच नाही.कोणत्याही सरकारची तशा प्रकारची मानसिकता नाही.स्वामीनाथन आयोगाच्या माध्यमातून अतिशय चांगल्या प्रकारच्या सुधारणा भारताचे कृषीतज्ञ डॉ. स्वामीनाथन यांनी सरकारला सुचविल्या होत्या.परंतु आश्वासन देऊनही आयोगाने सुचवलेल्या उपाय योजना सरकारने स्विकारल्या नाही.निवडणूकीत या आयोगाचा भरपूर वापर झाला.प्रत्यक्षात मात्र अंमलबजावणी कुठेच झाली नाही.

    निवडणुकीच्या काळात सर्वच राजकीय पक्ष शेतकऱ्यांना अनेक प्रकारची आश्वासने देतात व त्यांची मते आपल्या पदरात पाडून घेतात.परंतु निवडणुका संपताच निर्णय मात्र उद्योगपतीच्या बाजूने घेतले जाते आणि शेतकऱ्यांना अंगठा दाखवला जातो हे वर्षानुवर्ष सुरू आहे. त्यामुळे भारतीय शेतकऱ्यांची अवस्था अतिशय बिकट झाली आहे.खते,बी बियाणे,औषधे यांचे भाव भरमसाठ सरकारने वाढवले आहे परंतु त्या तुलनेत शेतकऱ्याने पिकवलेल्या मालाला मात्र अतिशय कमी भाव आहे.तोच माल उद्योगपतीच्या कंपनीमध्ये पॅकिंग करून पुन्हा बाजारात आला की त्याला मात्र चौपटीने विकल्या जाते.हे दुष्टचक्र जोपर्यंत थांबणार नाही तोपर्यंत कृषी क्षेत्राला सुगीचे दिवास येणार नाही.

    भारतीय कृषी क्षेत्र अत्यंत महत्त्वाचे आहे.कोरोनाच्या काळात सर्व उद्योग बंद असताना हेच एकमेव क्षेत्र असे होते की जे चालू होते आणि ज्यामुळे देशाला फार मोठे सहकार्य झाले.लोकांच्या अन्नधान्याच्या गरजा याच क्षेत्राने पूर्ण केल्या.इतर सगळे उद्योग धंदे व त्यातील रोजगार बंद असताना शेतीमधील रोजगार फक्त त्या काळात सुरू होता.त्यामुळे अनेकांच्या पोटापाण्याचा प्रश्न सोडविण्यास फार मदत झाली.एवढे महत्त्वाचे क्षेत्र असताना सुद्धा सरकार याकडे का दुर्लक्ष करते हा फार चिंतनीय प्रश्न आहे.ज्या ठिकाणी गरज नाही त्या ठिकाणी सरकार विनाकारण पैसा खर्च करते आणि जिथे खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांना पैशाची गरज आहे तिथे मात्र पैसे द्यायला सरकार मागेपुढे पाहते.उद्योगपतींचे लाखो कोटींचे कर्ज एका मिनिटात माफ होते परंतु शेतकऱ्यांचे पन्नास हजार रुपयांचे कर्ज सुद्धा माफ होत नाही.उलट त्याच्या घरादारावर थोड्याशा कर्जासाठी जप्ती आणली जाते.परिणामी अनेक स्वाभिमानी शेतकऱ्यांना आपल्या आयुष्याची यात्रा संपवावी लागते. त्यामुळे सरकारने अतिशय गांभीर्याने विचार करून कृषी क्षेत्रासाठी तज्ञांसोबत अभ्यासपूर्ण चर्चा करून काही ठोस पावले उचलली पाहिजे आणि दरवर्षी शेती आणि शेतकऱ्यांच्या संख्येनुसार एक मोठा कृषी अर्थसंकल्प तयार करून शेतकऱ्यांना विशेष निधी उपलब्ध करून दिला पाहिजे.तरच देशाला संपन्न करणाऱ्या व कोट्यावधी लोकांना जगवणाऱ्या कृषी क्षेत्राला पुन्हा आपण चांगले दिवस आणू शकतो.

    प्रेमकुमार बोके
    अंजनगाव सुर्जी
    ————–

    तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? आम्हास आपल्या परिसरातील बातम्या, लेख अवश्य पाठवा आणि प्रतिनिधी बना ! ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Gaurav Prakashan फेसबुकपेज !

    ——————–

    आम्ही तुमच्यासमोर बातम्या, कथा, कविता, वाचनीय लेख अश्या खूप साऱ्या लेखामार्फत भेटत असतो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते, तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याचबरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद…!

    -बंडूकुमार धवणे
    संपादक गौरव प्रकाशन
    ——————–

gauravprakashan1@gmail.com

Maharashtra News, Braking News, Marathi News, Most Popular Marathi News, Latest Marathi News,Today News,Marathi Article, Marathi Poem, Marathi Story,

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *