• Mon. Jun 5th, 2023

महाराष्ट्राची भाग्यरेखा

    संपर्क, सातत्य व संवाद हा विकासाचा मूलमंत्र आहे. महाराष्ट्राची राजधानी मुंबई आणि उर्वरित प्रदेश यांच्यातील संपर्क, सातत्य, संवाद अधिक बळकट व गतिमान करण्याच्या दृष्टीने राज्य शासनाने योजनाबद्ध पावले उचलली आहेत. ‘समृद्धी महामार्ग’ हा त्याचाच एक भाग. समृद्धी महामार्ग हा विदर्भ मराठवाड्यातील शेतकरी, सामान्य जनता, नव उद्यमी, लहान उद्योजक, व्यापाऱ्यांच्या महत्त्वाकांक्षांना पूर्ततेकडे नेणारा राजमार्ग आहे. हा प्रकल्प आता लवकरच लोकार्पित होणार असून विदर्भ, मराठवाड्यापासून मुंबईचे अंतर यामुळे लक्षणीयरित्या कमी होणार आहे. यानिमित्त हा विशेष लेख…

    महाराष्ट्राचा औद्योगिक विकास प्रामुख्याने मुंबई, पुणे, नाशिक या भागात अधिक झाला आहे. कारण या ठिकाणी मिळणाऱ्या प्राथमिक सुविधा, चांगल्या रस्त्यांचे जाळे. गुंतवणुकदारांनी मराठवाडा- विदर्भाकडे आगेकूच करण्यासाठी सुसाट वेगाची गरज असल्याचे लक्षात आले. त्यातून सातशे किलोमीटर लांबीच्या या महामार्गाचा जन्म झाला. चार डिसेंबरला जेव्हा या रस्त्याची पाहणी करायला विद्यमान मुख्यमंत्री व तत्कालीन नगरविकास मंत्री व सार्वजनिक बांधकाम (उपक्रम) मंत्री एकनाथ शिंदे आणि तत्कालीन मुख्यमंत्री व विद्यमान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्रत्यक्ष समृद्धी महामार्गावर उतरले, त्यावेळी दोघांच्या आनंदाला पारावार नव्हता. हा आनंद कर्तव्यपूर्तीचा होता, मनातली स्वप्न प्रत्यक्ष पूर्ण होताना पाहण्याचा होता.

    वेदनेची कोंडी फोडणारा मार्ग

    नागपूर, भंडारा, गडचिरोली, गोंदिया, यवतमाळ या भागांतून मुंबईला पोहोचण्यासाठी दोन-दोन दिवसांचा कालावधी लागल्याच्या आठवणी आता जुन्या झाल्या आहेत. नागपूरवरून दिल्ली काय आणि मुंबई काय, सारखेच. पण राज्य कारभार चालणारे स्थळ मात्र मुंबई… विदर्भात कापूस, सोयाबीन, कडधान्य, तेलबियांचे उत्पन्न मोठ्या प्रमाणात होते. मात्र, सर्व कारखानदारी मुंबई, पुण्याकडे. महाराष्ट्रातील सर्वात जास्त खनिज संपदा असणारा प्रदेश चंद्रपूर, गडचिरोली, यवतमाळ व आसपासचा परिसर. मात्र, खनिजावर आधारित कारखानदारी एक हजार किलोमीटरवर. पूर्व विदर्भात मोठमोठ्या नद्या, हजारो मामा तलाव. त्यातून गोड्या पाण्यातील मासळीचे मध्य भारतातील सर्वात अधिक उत्पन्न विदर्भात. मात्र, ताज्या मासळीच्या निर्यातीला जवळचे रस्ते नाहीत. विदर्भातील तरुणाईचे, सुशिक्षितांचे, शेतकऱ्यांचे हे दुःख समजून तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या दूरदृष्टीच्या नेत्याने या महामार्गाची कल्पना मांडली व विद्यमान द्रष्ट्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ती पूर्णत्वास नेण्यासाठी पूर्ण पाठबळ दिले. अशा कितीतरी दुःखांवर फुंकर घालण्याची ताकद या समृद्धी मार्गात आहे.

    डोळ्यात भरणारी समृद्धी

    समृद्धी महामार्गाच्या वैशिष्ट्यातच विकासाचा मूलमंत्र आहे. 14 ते 16 तास मुंबईपर्यंत पोहोचण्याला लागणाऱ्या काळामध्ये या सर्वात जवळच्या मार्गाने ७ ते ८ तासांत मुंबईला पोहोचता येणार आहे. कच्चा माल, खनिज, दूध, मासळी, शेतमाल या मार्गाने मुंबईसारख्या मोठ्या बाजारपेठेत लवकरात लवकर पोहचणार आहे. त्यामुळे समृद्धी मार्ग महाराष्ट्राची खऱ्या अर्थाने भाग्यरेखा ठरणार आहे.

    701 किलोमीटरची विस्तीर्ण लांबी, 6 मार्गिकांसह 120 मीटरची डोळ्यात भरणारी रुंदी, वाहन गतीने चालवण्यासाठी प्रत्येक मार्गिकेची आखणी, कुणी मध्येच येणार नाही याची शाश्वती देणारे सुरक्षा कठडे, त्यामुळे काही क्षणात डोळ्यासमोरून गतीने वाहन दिसेनासे होणे ही आता समृद्धी महामार्गाची ओळख होईल. समृद्धी महामार्गाच्या पाहणीच्या निमित्ताने नुकतेच हे दृश्य बघायला मिळाले. प्रत्यक्षात जेव्हा ताफ्यामध्ये वाहने धावायला लागली, तेव्हा स्पीडोमीटरच रस्त्याच्या प्रेमात पडते की काय, असे वाटायला लागले. रस्त्यांची रुंदी, प्रत्येक मार्गिकेची आखणी, दर्जा, सजावट, दिशादर्शक फलके, सुरक्षा मानके , नजरेत भरत होती.

    नागपूर आणि विदर्भला राजधानी मुंबईच्या जवळ नेणारा हा महामार्ग मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या स्वप्नांना मूर्तरुप देणारा ठरणार आहे. आता प्रतीक्षा आहे, या स्वप्नपूर्तीवर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी लोकार्पणाची मोहोर उमटविण्याची….

    -श्री. प्रवीण टाके,
    जिल्हा माहिती अधिकारी,
    नागपूर.
    ————–

    तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? आम्हास आपल्या परिसरातील बातम्या, लेख अवश्य पाठवा आणि प्रतिनिधी बना ! ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Gaurav Prakashan फेसबुकपेज !

    ——————–

    आम्ही तुमच्यासमोर बातम्या, कथा, कविता, वाचनीय लेख अश्या खूप साऱ्या लेखामार्फत भेटत असतो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते, तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याचबरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद…!

    -बंडूकुमार धवणे
    संपादक गौरव प्रकाशन
    ——————–

gauravprakashan1@gmail.com

Maharashtra News, Braking News, Marathi News, Most Popular Marathi News, Latest Marathi News,Today News,Marathi Article, Marathi Poem, Marathi Story,

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *