• Sat. Jun 3rd, 2023

बदलते लग्न सोहळे..!

    असं म्हणतात कि लग्नाच्या गाठी स्वर्गातच बांधल्या जातात. पृथ्वीवर फक्त काडीमोड होतो.गमतीचा भाग सोडून देऊ. भटक्या अवस्थेतील माणूस जेव्हा पाण्याचे साठे पाहून स्थिर झाला त्या वेळी लग्न हा प्रकार अस्तित्वातच नव्हता. एखादी सुंदर दिसणारी स्री असेल तर टोळीचा म्होरक्या तिच्यावर आपला हक्क सांगायचा.कोणीही कोणाबरोबर राहू शकत होते. पण मग यातून होणाऱ्या संततीचे काय ? तिची जबाबदारी नेमकी कोणी घ्यायची हा प्रश्न पडला. मग पुढे जाऊन गाळपेरात पीक घेण्याची म्हणजेच शेतीची पद्धत सुरू झाली. गावे वसली आणि त्यानंतर एक हक्काचा जोडीदार असावा, कुटुंब असावं यासाठी लग्न पद्धतीची सुरुवात झाली. हा झाला खूप प्राचीन इतिहास. त्या काळी लग्न म्हणून स्थानिक देवतेपुढे हार घालणे वगैरे खूप मर्यादित विधी होते.

    त्या नंतर आपल्या आजी आजोबांच्या काळात तर बैलगाडीने वऱ्हाड निघायचं नवरीच्या गावी.मजल दर मजल करीत हा काफिला चालायचा आणि वाटेत जिथं रात्र होईल तिथं मुक्काम व्हायचा.तीन दगडांची चूल. त्यावर बायका भाकरी बडवणार आणि पिठलं हटणार. हाच मेनू असायचा.त्या काळी लग्नं सात,सात दिवस चालायची. झगमगाट नसला तरी आनंदाची मात्र कमतरता नव्हती. सगळेच वऱ्हाडी काय नव्या कपड्यात नसायचे.जे घरात असतील तेच कपडे,पण स्वच्छ धुतलेले. त्यात यांना कधी कमीपणा वाटला नाही. अहो इतकंच काय, पण कधी कधी नवरदेव सुद्धा थोड्या श्रीमंत असलेल्या मित्राचे कपडे घालायचा. जेवणावळी उठत.प ण त्याही साध्याच असत. अन्न वाया जाणार नाही याची दक्षता घेतली जायची.

    कुठच माजलेपणा नव्हता. नवरी अगदी दोन पळ्या आणि काळ्या मण्यात ओवलेल्या मंगळसूत्रात ही खुश व्हायची.फुलांच्याच मुंडावळ्या असायच्या. अशी ही छोटी आटोपशीर लग्नं.पूर्वीचे लोक किती काटकसरी होते. त्या नंतर भौतिक प्रगती, वाहतुकीच्या सुविधा वाढल्या आणि लग्नं सोहळे थोडे बदलले. लग्नात सनई चौघड्याचे मंजुळ स्वर वाजू लागले. ही प्रथा बरेच दिवस होती.त्या नंतर आला बॅण्ड. बॅण्ड म्हणजे लग्न हे नवे समीकरण तयार झाले. त्या काळी पुण्याचा दरबार बॅण्ड तर काय प्रसिद्ध होता. आर्थिक परिस्थिती चांगली असणाऱ्यांनाच तो परवडायचा. हुंडा, मानपान, देणं घेणं हा तर मांडवा मागचा सावळा गोंधळ असायचा. सद्या तो आपला विषय नाही.

    लग्न लागले कि लगेच त्या मंडपातच व-हाडी पाठ फिरवून जेवायला बसायचे.वाढणारे मापात वाढायचे. त्या नंतर झालेली भौतिक प्रगती लग्न सोहळ्यात दिसायला लागली. दोन दोन हजार पत्रिका छापल्या जायच्या. त्या गावोगावी असणाऱ्या आप्तेष्टांना वाटणे हे मोठं कठीण काम. भर उन्हाळ्यात ही ते करावंच लागायचं. लग्नात सगळीकडे श्रीमंती दिसायला लागली. नटलेले, सजलेले व-हाडी, करवल्या, सगळं काही थाटात. नवरदेव घोड्यावर मिरवायला न्यायचा. त्यानंतर आताच्या काळात डीजे चा जमाना आला. आणि लग्न सोहळयाचा प्रवास मंजूळ सनई वादनाकडून कर्णकर्कश डीजे वर येऊन थांबला. दोन तीन हजार पब्लिक तर लग्नाला असणारंच असं गृहीत धरले जाऊ लागले. महागडा मंडप, महागडी सजावट,फोटो आदी गोष्टी महत्वाच्या ठरू लागल्या.

    झाला तर होऊ दे खर्च
    वाटल्यास लग्नाला काढू कर्ज

    असा विचार समाजात रुजला. मध्यंतरी आलेल्या कोरोनाने मात्र खूप मोठा धडा आपल्याला खूप छोट्या काळासाठी शिकवला. त्या दरम्यान अगदी घरातल्या घरात पाच माणसात आणि ते ही चहा पोह्यांवर शुभ मंगल उरकले.पण तो धडा आपण लगतच्या काळात लगेच विसरलो. आता परत धुमधडाक्यात चार चार हजार माणसात लग्न लागायला सुरुवात झाली.तू जास्त खर्च करतो कि मी. अशी जणू स्पर्धाच सुरू झाली. नाही म्हणायला आता पत्रिके साठी व्हॉटसअप, फेसबुक सारख्या तंत्रज्ञानाचा वापर होऊ लागला.पण खर्च काही कमी झाला नाही. मग लग्नाअगोदर नवरा नवरी जाऊन एखाद्या किल्ल्यावर, नैसर्गिक ठिकाणी फोटो सेशन करणार. ज्याला प्री-वेडिंग फोटोशूट असे म्हटले जाते. त्यानंतर त्याचे बॅनर बनवून गावात, शहरात लावले जातात आणि शहर विद्रूप करण्याच्या स्पर्धेत वाढ होते.

    जेवणासाठी आता पंगती बसणे खेडवळ असल्याचे लक्षण मानले जाऊ लागले. उभ्या उभ्याने जेवणे सुरू झाले. त्याला बुफे हे नाव दिले व त्यातूनही मोठ्या प्रमाणात अन्नाची नासाडी व्हायला लागली. मंडपात तर श्रीमंतीचे प्रदर्शन करणे आणि आमचा लग्न सोहळा इतरांपेक्षा कसा वेगळा होईल याचा आटापिटा करणे आणि त्या नादात किती पैसा खर्च होतो हे विसरणे आता खूप सामान्य बाब झाली आहे.

    खरं पाहता कोरोनाने शिकवलेला धडा आपण सदैव लक्षात ठेवायला हवा होता.पण तसे झाले नाही आणि आपण पुन्हा ये रे माझ्या मागल्या असं वागू लागलो. खरंच इतका मोठा देखावा करण्याची गरज आहे का ? याचा विचार आणि आत्मचिंतन करण्याची गरज आहे. लग्न म्हणजे दोन मनांचे, दोन घराण्यांचे मिलन असते. त्याला इतका तामझाम आणि बडेजाव का दिला जावा?

    -सुजाता नवनाथ पुरी
    अहमदनगर
    8421426337
    ————–

    तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? आम्हास आपल्या परिसरातील बातम्या, लेख अवश्य पाठवा आणि प्रतिनिधी बना ! ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Gaurav Prakashan फेसबुकपेज !

    ——————–

    आम्ही तुमच्यासमोर बातम्या, कथा, कविता, वाचनीय लेख अश्या खूप साऱ्या लेखामार्फत भेटत असतो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते, तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याचबरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद…!

    -बंडूकुमार धवणे
    संपादक गौरव प्रकाशन
    ——————–

gauravprakashan1@gmail.com

Maharashtra News, Braking News, Marathi News, Most Popular Marathi News, Latest Marathi News,Today News,Marathi Article, Marathi Poem, Marathi Story,

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *