• Sun. May 28th, 2023

प्रिय बाबासाहेब,

    प्रिय बाबासाहेब,

    तुमच्या विचारांवर प्रेम करणाऱ्या जगभरातील लोकांसाठी आजचा दिवस तसा दुःखाचा आहे. परंतु तुमच्या विचारांमुळे,संघर्षामुळे व बलिदानामुळेच आज कोट्यावधी लोक मानवी अवस्थेमध्ये आले आहेत.स्वतः दुःख सोसून तुम्ही असंख्य लोकांच्या जीवनात आनंद निर्माण केला आहे.हातात शस्त्र न घेता व रक्ताचा एक थेंबही न सांडवता एक व्यक्ती किती मोठी क्रांती करू शकतो याचे तुम्ही जगातील मोठे उदाहरण आहात. दुर्दैवाची बाब म्हणजे आम्ही अजूनही तुम्हाला समजून घेऊ शकलो नाही.अजूनही आम्ही तुम्हाला जातीच्या बाहेर काढू शकलो नाही. अजूनही आम्ही तुमचे उपकार,तुमचे कार्य,तुमचे देशप्रेम समजून घ्यायला तयार नाही.

    या देशातील वर्चस्ववादी,विषमतावादी व्यवस्थेने आमच्या मनात आणि डोक्यात तुमच्याविषयी विष पेरून ठेवले आहे व आजही ते पेरण्याचे काम ताकदीने सुरू आहे.त्यामुळे तुमचा जीवघेणा संघर्ष अजूनही या देशातल्या लोकांना समजलेला नाही.ज्यांच्यासाठी तुम्ही हा संघर्ष केला तेच तुमचे उपकार समजून घ्यायला तयार नाही ही फार खेदाची बाब आहे.ज्या हिंदू धर्मातील कोट्यावधी स्त्रियांना हिंदू कोड बिलाच्या माध्यमातून तुम्ही स्वातंत्र्याची आणि मुक्तीची कवाडे उघडे करून दिली,त्या महिला तुमचे नाव घ्यायला सुद्धा तयार नाही याचे फार दुःख वाटते.व्यभिचारी, बलात्कारी बुवा,बापूंचे स्टेटस आपल्या मोबाईलवर ठेवणाऱ्या आमच्या भगिनी तुमचे स्टेटस ठेवायला मात्र तयार होत नाही यावरूनच तुमच्याविषयी किती द्वेष आमच्या मनात भरलेला आहे हे लक्षात येते.

    प्रिय साहेब, आम्ही फार कृतघ्न लोक आहोत.तुम्ही आमच्यावर केलेले अनंत उपकार विसरून, ज्यांनी आम्हाला जनावरापेक्षाही वाईट वागणूक दिली त्या व्यवस्थेचे मात्र आम्ही समर्थन करतो यापेक्षा दुर्दैवाची बाब कोणती असू शकते ? जी व्यवस्था या देशातील कोणत्याच स्त्रियांना माणूस आणि माणुसकीचा हक्क द्यायला तयार नव्हती आणि आजही ज्यांची तीच वृत्ती आहे, त्या व्यवस्थेचे आम्ही गुणगान गातो, त्या व्यवस्थेचे वाहक बनतो आणि त्या वर्णवर्चस्ववादी व्यवस्थेच्या छाताडावर नाचून कोट्यावधींच्या जीवनामध्ये प्रकाश निर्माण करणाऱ्या तुमच्यासारख्या महामानवाला आम्ही नाकारतो,तुमचे संविधान जाळतो, संविधान बदलण्याची भाषा करतो ही या देशासाठी धोकादायक बाब आहे.

● हे वाचा – संविधानात धार्मिक स्वातंत्र्याचा अन्वयार्थ

    प्रिय बाबासाहेब, तुम्ही आमच्यासाठी खूप काही करून ठेवले आहे,परंतु आम्ही ते समजून घ्यायला अजूनही तयार नाही.अजूनही तुमची जयंती आणि पुण्यतिथी सार्वत्रिकपणे तयार करायला आमचे मन तयार होत नाही.विशिष्ट लोकांनी ते काम केले पाहिजे अशीच अजूनही आमची कुपमंडूक भावना आहे.त्यामुळे जगाने तुम्हाला स्वीकारले पण आमच्या देशाने अजूनही तुम्हाला पूर्णपणे हृदयात जागा दिली नाही याचे फार दुःख वाटते.एकीकडे तुमच्या संविधानाचा आधार घेऊन सर्वसामान्य घरातील माणसं सर्वोच्च पदावर विराजमान होतात आणि त्या पदावर विराजमान होताच त्या संविधानाला जाळण्याची, बदलण्याची भाषा करतात ही शुद्ध बेईमानी आहे.यापेक्षा मोठा कृतघ्नपणा जगात कोणताच असू शकत नाही

.

    त्यामुळेच आज आमचा देश अतिशय विदारक परिस्थितीतून वाटचाल करत आहे.महासत्ता होण्याचे तर दूरच परंतु जगातील सर्वात गरीब देश म्हणून आता आमची गणना होण्याच्या रांगेमध्ये आम्ही आलेलो आहे.त्यामुळे तुमची जयंती किंवा पुण्यतिथी ही केवळ एक औपचारिकता म्हणून बाकी राहिलेली आहे.बाकी तुमचा विचार दररोज पायी तुडवण्यासाठी आम्ही सज्ज असतो.तुमचा अपमान करण्यासाठी, तुमचे चारित्र्यहनन करण्यासाठी, तुमचे कार्य नाकारण्यासाठी आमची वाणी,नाणी आणि लेखणी सदैव तत्पर असते. चोरांसाठी आम्ही प्राण द्यायला तयार असतो पण तुमच्यासारख्या थोरांसाठी मात्र आमच्या जवळ एक तासही नसतो की फार दुःखाची बाब आहे. असो ! एक दिवस तुमच्या विचारांचे महत्त्व या देशाला नक्कीच समजेल आणि हा देश जेव्हा तुमच्या विचाराचा आणि आचाराचा होईल तीच खरी तुम्हाला भावपूर्ण आदरांजली ठरेल.

    -प्रेमकुमार बोके
    ————–

    तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? आम्हास आपल्या परिसरातील बातम्या, लेख अवश्य पाठवा आणि प्रतिनिधी बना ! ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Gaurav Prakashan फेसबुकपेज !

    ——————–

    आम्ही तुमच्यासमोर बातम्या, कथा, कविता, वाचनीय लेख अश्या खूप साऱ्या लेखामार्फत भेटत असतो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते, तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याचबरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद…!

    -बंडूकुमार धवणे
    संपादक गौरव प्रकाशन
    ——————–

gauravprakashan1@gmail.com

Maharashtra News, Braking News, Marathi News, Most Popular Marathi News, Latest Marathi News,Today News,Marathi Article, Marathi Poem, Marathi Story,

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *