• Mon. May 29th, 2023

प्रखर वास्तव ….

    आंधळ्या प्रेमात नव्हे विकृत वासनेत वाहत चाललेल्या तरूणाईला थोपवायचे तरी कसे ? ही ज्वलंत समस्या घराघरात, मनामनात आजमितीला भस्मासूरासारखा ऊभी आहे. या स्वैराचारी वागण्याची कारणं तरी काय ! कुणी आधुनिक जीवनशैली म्हणतो कुणी पालकांना दोष देतो तर कुणी सोशलमिडीयाला कारणीभूत समजतो कुणी कुणी पाश्चात्यांचे अनुकरण म्हणतो अजून बरीच मतमतांतरे कारणमीमांसा ऐकायला मिळतात खरे तर अवस्था इतकी बिकट झालीय कि कुठे आणि किती कसे कारणे शोधावीत कळेनासे झाले यामागची नेमकी खरी मानसिकता काय आहे हे लक्षात घेणं गरजेचे वाटते…

    मला वाटते ….विभक्त कुटुंबपध्दती ! मी माझा नवरा/बायको अन् मुलं एक चौकोनी कुटुंब बस्स् बाकी कुणी नको ! ही धारणा असणारा एक वर्ग जोमाने वाढतोय किरकोळ कारणांमुळे नवरा बायकोत होणारे वाद दोघेही नोकरी कमवते असले तर मुले माझ्या / माझी एकटीची जबाबदारी नाही ही मुलांकडे दुर्लक्ष होणारी तटस्थता कारणीभूत असू शकते !

    पूर्वी दोन दोन चार चार पिढ्या एकत्र कुटुंबात राहायच्या थोरामोठ्यांचा घरातील सदस्यांवर वचक होता एक आदरयुक्त धाक असायचा ऐकमेकांचा विचार घेतला जायचा मानसन्मान दिला जायचा थोडक्यात सांगायचे तर कुटुंबाची प्रतिष्ठा अबाधित राखण्यासाठी कुटुंबातील प्रत्येक घटक काळजी घेऊन वागायचा चुकून कुणी गैरमार्गाला जात आहे हे लक्षात आले की सगळे मिळून त्याला योग्य मार्गावर आणण्यासाठी सजग असायचे एकजूट असल्याने चुकणारा सुधारून वळणावर यायचा….

    एकत्रित कुटुंबात वेगळे संस्कार करण्याची अथवा संस्कार वर्ग लावण्याची गरजचं कधी पडत नसे मागच्या पिढीकडून पुढच्या पिढीकडे ते आपोआप मनोमनी हस्तांतरित होत त्यासाठी वेगळे काही करण्याची आवश्यकता भासत नव्हती हल्ली हीचं गोष्ट दुर्मिळ झालीय मी आणि माझे एवढीच जीवनाची व्याख्या असलेल्या जगात आपलेपणा उरलायं तरी कुठे हो ! मायेचा ओलावा नसलेल्या व्यवहारिक जगात जन्मदाते सहन होईना तिथे पिढ्यांची बात तर सोडाचं….

● हे वाचा – Ravishkumar : रवीश,तू जीवंतपणीच इतिहास झालाय !

    असो ! मूळ विषयावर बोलू या विचित्र प्रवृत्ती कशा तयार होतात आणि कशामुळे ! यावर मंथन होणे आवश्यक आहे. गरजेपेक्षा जास्त सुविधा निर्माण करून देणारे पालक कि एकमेकांचे अनुकरण करणारे व गरजेपेक्षा जास्त मागणी करणारे मुले ! इथे दोन्हीही चुकीचे म्हणायला हरकत नाही बऱ्याचदा आपल्याला जे मिळाले नाही ते सर्व आपल्या लेकरांना मिळायला हवे ! भावना चांगली जरी असली तरी मुलांना अयोग्य वळणावर घेऊन जाणारी आहे हे उशिरा लक्षात येते सगळं आयतं मिळतयं मग कशाला कष्ट करा ! मुबलक आहे सर्व मग भविष्याची चिंता का करू ! ही मानसिकता दृढ होत जाते त्यातूनच बेफिकीरी निर्भिड वृत्ती बळावते इथूनच सुरू होतो बेजबाबदार जगण्याचा प्रवास…

    ऐषोआरामाची एकदा सवय जडली कि सुटणं कठीण तेही दुसऱ्याच्या जीवावर असेल तर महाकठीणच ! मुलांच्या प्रेमापोटी दूरदृष्टी न ठेवणारे पालकांना शेवटी पश्चातापाच्या, नैराश्याच्या खाईत जाऊन गपगुमान सगळं सोसण्याशिवाय पर्याय उरत नाही वेळीच काही गोष्टींना प्रतिबंध करणे गरजेचे असते परंतु बऱ्याचदा लक्षात येऊनही दुर्लक्षित केल्याने मुलांचा काँन्फिंडन्स वाढतो आणि एकदा तो अंगात मुरला कि पुढे ते काही केल्या बाहेर काढणे कठीण होऊन बसते. पाल्यांना नकार पचवायला जड जातो मग आक्रमक होऊन घरातंच तोडफोड कर कुठे रात्रभर बाहेरच थांब, खोटं बोलणं, टाळणं असे प्रकार सुरू होतात…

    एकमेकांचे बघून मुलंही नको त्या मागण्या करून पालकांना वेठीस धरतात धनदांडग्या मित्रमैत्रिणींची बेलगाम जीवनशैली पाहून त्यांच्या सहवासात राहून आपल्यालाही असे स्वछंदी जगता यावं यासाठी प्रयत्न सुरू होतात छानछौकी मित्रमैत्रिणींची उधळपट्टी बघून इतर मुलेमुली आर्थिक ऐपत नसणाऱ्या पालकांना सळो कि पळो करून सोडतात जे हवे ते मिळवण्यासाठी कुठल्याही थराला जातात पालकांना मरणाची घर सोडून जाण्याची भिती दाखवून वेळप्रसंगी दमदाटी करून म्हणजे एकप्रकारे ब्लँकमेलिंगचं नाही का? हवं ते साध्य घेण्याची प्रवृत्ती मूळ धरू लागते याला सहाय्यक मित्रमंडळीही असतात तु असे करं… मी तसं केले होते… माझे पालक सरळ झाले आता जे पाहिजे ते लगेच मिळतं वगैरे वगैरे विविध प्रकार सांगून पालकांना वेठीला धरणारे फंडे देतात परिस्थितीचा विचार न करणारे मुलेमुली यात वाहवत जाऊन बिथरतात पालकांना वेठीला धरून हवं तसं मोल्ड करून पाहिजे ते उपलब्ध करून घेतात फक्त स्वतःच्या स्वछंद वागण्यासाठी आणि मित्रमैत्रिणींत फुकटच्या श्रीमंतीचा तोरा मिरवण्यासाठी….थोडक्यात खोट्या अस्तित्वाची हवा करण्यासाठी वाट्टेल त्या थराला काही वेळा पालकांवर हात वर करण्यापर्यंत मजल मारतात…यात खरी गोची होते ती सामान्य परिस्थिती असलेल्या पालकांची….हतबलता, अगतिकता लपवून ही लपवून राहत नाही.

● हे वाचा – स्थूलतेचे दुष्परिणाम जाणा ..!

    प्रेम काही आजच्या जमान्यात तयार झालेली भावना नाही पूर्वीपासून प्रेम आस्तित्वात आहे आणि पुढेही राहील… फरक इतकाच पूर्वीच्या प्रेमाचा फार गवगवा नसायचा दोन जीवांचा निखळ, निर्मळ भावनांचा सुरेख सुंदर संगम असणाऱ्या प्रेमाला स्वतःच्या मर्यादा होत्या, संयम होता, एकमेकांच्या भावनांचा आदर होता भल्याबुऱ्याचा विचार होता दोन्ही कुटुंबाची प्रतिष्ठा मलिन होणार नाही यासाठीची दक्षता, काळजी होती.. मग भलेही प्रेम मनातल्या मनातंच कोंडून ठेवायला लागले तरी इतरांना त्याचा त्रास होता कामा नये ही जबाबदारीची समंजस भावना प्रबळ असायची खरे प्रेम कधीच कुणाला वेदना, दुःख देणारे नसते आक्रस्ताळे अविचारी विध्वंसक तर नक्कीच नसते शुद्ध प्रेम निखळ प्रेम करायला शिकवते दुसऱ्याला अपमानित किंवा अवमान करून कुणाला मान खाली घालायला भाग पाडत नाही.

    खरं तर,आजच्या या पिढीला प्रेम आणि आकर्षण यातला फरकचं कळेना निव्वळ वरच्या सौदर्याला भुलून शारीरिक सुखाची ओढ ठेवणारे प्रेम कधीतरी मनापर्यंत पोहचेल का हो ! वासनेच्या आहारी गेलेल्या झगमगीत भौतिक गोष्टींची अभिलाषा ठेवणारे प्रेम कधी शेवटाला जाईल का हो ! हा साधा विचार ही नवथर तरूणाईच्या मनाला शिवत नसेल का ? अर्धवट शिक्षण सोडून पळून जाऊन लग्न करणाऱ्या थिल्लर लबाड लांडग्यांनी तर अक्षरशः हैदोस घातलायं धुमाकूळ चाललायं पळापपळीचा सध्या… आपल्या घराबाहेर घडणाऱ्या अपप्रवृत्तीचे पेव कोणत्याही क्षणी आपल्या घरी धडकेल कि काय ! या दडपनाखाली अनेक पालक, कुटुंबे चिंताग्रस्त आहेत.

    कुठलेही उचित भविष्य नसलेली पळकुटे कंपनी म्हणजे समाजाला लागलेली किड म्हणावी लागेल लाजलज्जा सोडलेल्या उथळपणाला म्हणावे तरी काय ! जन्माला घालून पालनपोषण करून जी मुलं आईबापाची फसवणूक करतात ती कुणाशी प्रामाणिक राहू शकतील का ? नाही कधीच नाही ! स्वतःच्या हाताने स्वतःचा विध्वंस करणारे हे कर्मदरिद्री कार्टी घरच्यांना जराही मागमूस लागू न देता अचानक गायब होतात आपल्या अशा बदफैली वागण्याचा आपल्या कुटुंबातील लोकांना काय काय भोगावे लागेल हा विचारही मनात येऊ नये ! किती विदारक परिस्थिती निर्माण करून ठेवतात अरे लेकरांनो 20/25 वर्षे ज्यांनी तुम्हाला पोसलं अगदी जीवापल्याड ! त्यांनाच बदनाम करून जाता तुम्ही क्षणिक सुखासाठी दूर लोटता! कुणासाठी तर काल परवा जडलेल्या पायपोस नसलेल्या प्रेमासाठी ! मुळात हे प्रेमच नसते रे वासनायुक्त भावना आहे ती …ज्यावर तुम्ही संयमाने विजय मिळवू शकता पण तुम्ही तसे करत नाही कारण तुमची बुध्दी गहाण पडलीयं कुणाच्या तरी बेगडी प्रेमात…

● हे वाचा – हृदयविकाराबाबत पूर्वकल्पना देणारा स्टेथॅस्कोप ; अमरावतीच्या युवकाचे संशोधन

    रोज बातम्या कानावर येतात अमक्याची पोरगी पळाली तमक्याच्या पोरासोबत…काय चाललंय हे तुमचे मुलांनो ! आपल्या पाल्यांला उच्चशिक्षित करण्यासाठी पाठवलेल्या काँलेजमधे तुम्ही वेगळेच ऊद्योग करून कुटुंबाची मानहानी करताना जराही शरम नसावी ही आजची मोठी शोकांतिका म्हणावी लागेल…जिथे भविष्य घडावयचे असते तिथेच बिघडून जाणार असेल तर शिकून तरी काय उपयोग ! नाही का असे म्हणण्याची वेळ आली आहे ….असा कसा रे हा तुमचा काळ आला जो चहूकडे अंधकार पसरवतोयं…

      आईबापाच्या पैशावर मजा मारणारे पोरं पोंरीना इंप्रेस करण्यासाठी लाख लाखाच्या रेसर गाड्या घेऊन शिक्षण सोडून शाळा काँलेजच्या गेटवर घिरट्या घालणारे कावळे हे दुसऱ्याच्या कष्टावर मौजमजा करणाऱ्या मुलांना ना जबाबदारी घेता येते ना कुणाची जबाबदारी सांभाळता येते काळे चष्मे घालून पोरींना भुलवायचे मित्रांच्या मदतीने पळवायचे कोर्टमँरेज करून काही दिवस लपत फिरायचे पुन्हा एक दिवस निर्लज्जपणे तोंड घेऊन घरी यायचे तोपर्यंत दोन्ही कडच्यांनघ यांना शोधण्यासाठी जीवाचा आटापिटा करायचा समाजात होणारी मानहानी नातेवाईकांचे टोमणे ऐकून घ्यायचे अचानक एक दिवस हे पोलीस ठाण्यात हजर होणार कायद्याचे संरक्षणात आईबापापुढे सांगणार आमचे एकमेकांवर प्रेम आहे वर निडरपणे सांगणार आम्ही लग्न केले ….हतबल झालेल्या पालकांना कायदा समजावून देत हे मवाली पुन्हा पालकांच्या स्वाधीन करणार…
      पोटचे गोळे धड मारताही येत नाही अन् हाकलूनही देता येत नाही या अवस्थेत गेलेले पालक नाईलाजाने या टोणग्यांना घरात घेण्यापासून स्वतःला रोखू शकत नाही.

    ● हे वाचा – आयुष्याच्या वाटेवर,अनुभव संपन्न कविता संग्रह

      खरं तर पालकांनी अशा मुलामुलींना पुन्हा आपल्या आयुष्यात घेऊच नये जेव्हा दोन वेळच्या अन्नासाठी आणि दैनंदिन गरजांसाठी काय काय कष्ट करावे लागते याची जाणीव करून दिली पाहिजे तुम्ही तुमचे बघा म्हणून हात वर केले पाहिजे . खा रोज प्रेम म्हणावं किती दिवस जगतात बघा …थोड्याच दिवसात हवा उतरेल प्रेमाची अन् तेचं एकमेकांच्या जीवावर ऊठतील बघा …ही ऐतखाऊ जमात कुठल्याचं लायकीची नसते ना कष्ट करू शकत ना जीवनातील खाचखळगे पचवू शकत…

      एक गोष्ट प्रामुख्याने नमूद करावीशी वाटते पळकुट्या प्रकरणात मुली जरा जास्तच आघाडीवर आहेत. चांगल्या सुखवस्तू घरातल्या शिकलेल्या मुली मोलमजुरी करणाऱ्या मुलांसोबत पळून जातात नव्याचे नऊ दिवस सरले की मग यांची धुंदी उतरते पुन्हा आईबापाकडे बोंबलत येतात पालकांना भावनिक करून बिनकाम्या नवऱ्याचा व ऐतखाऊ स्वतःचा भार वाहायला भाग पाडतात नतंर यांची पिलावळही पालकांचीच जबाबदारी होऊन बसते खरं तर अशा औलादींना पालकांनी थाराच नाही द्यायला पाहिजे तुमच्या मर्जीनुसार सगळं केलतं नं मग कशाला आधार हवा आता आमचा ! आणि आम्ही मुळीच तुमचा भार घेणार नाही हे ठणकावून सांगायला हवे …पंरतु असे चाप लावणारे पालक खूप कमी दिसतात…हा झाला एक वर्ग…

      दुसरा वर्ग बड्या घरातल्या मुलांना आपल्या कृत्रिम सौदर्याने मोहित करून हौसमौज हिंडणे फिरणे हाँटेलिंग , पार्ट्या करायच्या जास्तीत जास्त स्वार्थ साधून झाला कि ब्रेकअप करून दुसरा बकरा पकडायचा त्याचीही हौस झाली की भलत्यासोबत लग्न करून नवीन साळसूद आयुष्य सुरू करायचे या प्रकरणात मुलगा कोलमडून पडतो बरबाद होतोतर कुणी एखादा दुसरा सावरतो तर कुणी सूडभावनेतून निरपराध मुलींचा बळी घेतो अनेकींचे आयुष्य उध्वस्त करतो आणि स्वतःही संपतो.

    ● हे वाचा – एसटी महामंडळाला सवलत योजनेतून लाखोंचा फटका…!

      स्वैराचारी वागण्याला खतपाणी घालणारा नवीन एक पाश्चात्य प्रकार आपल्याकडे ही जोमाने वाढतोय तो म्हणजे लिव्हिंग रिलेशनशिप अरे किती भयंकर हा प्रकार ! संस्कार संस्कृती च्या चिंधड्या उडवून वेशीला टांगणारा अघोरी कारभार ! काय तर म्हणे एकमेकांना जाणून घेण्यासाठी आम्ही लग्न न करता एकत्र राहतो पटलं तर ठिक नाहीतर तू तिकडे मी ईकडे…कसला थिल्लरपणा म्हणायचा हा…विशेष म्हणजे याला कायदेशीर ना हरकत असते म्हणे ! कायदे जनमाणसाचे आणि सामाजिक हित जपण्यासाठी असतात नं ! मग यात नेमकं कुणाचे हित पाहिले गेले ….शिक्षण नोकरीच्या निमित्ताने शहरात राहणारे मुलेमुली याचा गैरवापर करताना अधिक दिसतात. मला एक कळत नाही तरूण मुलगा मुलगी दोघेच एकाच छताखाली स्वतःवर ताबा ठेवून राहू शकतील ?

    कुठेतरी हे थांबायला हवे असेल तर रजिस्टर कोर्ट मँरेज करताना दोन्हीकडचे पालक आधार कार्डासह प्रत्यक्ष उपस्थित हवेत ही कायदेशीर अट असली पाहिजे शिवाय पालकांच्या ईच्छेनुसार वडिलोपार्जित संपत्तीतून बेदखल करण्याचा पर्याय उपलब्ध करून द्यायला हवा अजून एक समाजकार्य म्हणून काम करणाऱ्या अवैध लग्न लावून मुलामुलींना पाठीशी घालणाऱ्या देणाऱ्या संस्था त्वरित बरखास्त केल्या पाहिजेत…

● हे वाचा – Rahul Gandhi : राहुल, संतांच्या पवित्र भूमीत तुझे स्वागत करतांना ……..

    अशा घटनांनी पालकांनी खचून न जाता कठोर निर्णय घेऊन संबंध तोडून त्यांच्या कृत्याची संपूर्ण जबाबदारी त्यांची त्यांनाच उचलू द्या …तसेही लव्हमँरेज करून आलेली मुलगी ना घरच्यांचा आदर करत ना रितीरिवाजाप्रमाणे वागते अन् पोरगं ही पुरतं फसलेले असल्याने त्याचेही तिच्यापुढे काही चालत नाही कायद्याने नवरा बायको झालेले असतात तिच्या तालावर नाही घेतले तर पुढे आहेचं घटस्फोट ठरलेला पालकांच्या मालमत्तेतला वाटा घेऊन पोबारा करून मोकळ्या …आईबापाच्या मेहनतीने ऊभी केलेली संपत्ती अशी वाया घालवायची का ? जरा विचार करा. अशा प्रसंगी काट्याचा नायटा होण्याअगोदर पालकांनी ठोस भूमिका घेणं महत्त्वाचे असते प्रेमाच्या नावाखाली वासनांध झालेल्या तरूणाईला धडा शिकवणे गरजेचे झाले आहे. या भपंक विचारसरणीने खऱ्या प्रेमाला बदनाम केले आहे करत आहेत हे वास्तव नाकारून चालणार नाही ….यांना वेळीच रोखले पाहिजे अन्यथा कौटुंबिक,सामाजिक विनाश अटळ आहे. सगळीच तरूणाई बेपर्वा आहे असे मी म्हणणार नाही प्रत्येक गोष्टीला अपवाद असतो तसाच याबाबतीत देखील आहे.आजही सुसंस्कृत, समंजस तरूण /तरूणी जाण,भान ठेवून समाजात वावरताना दिसतात.

● हे वाचा – Karanja Lad : आमचे लाडाचे कारंजे ….आधुनिक कारंजा महात्म्य

    -सौ. मीनाताई शेळके
    संगमनेर जिल्हा अहमदनगर
    मो. 9637737774
    ————–

    तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? आम्हास आपल्या परिसरातील बातम्या, लेख अवश्य पाठवा आणि प्रतिनिधी बना ! ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Gaurav Prakashan फेसबुकपेज !

    ——————–

    आम्ही तुमच्यासमोर बातम्या, कथा, कविता, वाचनीय लेख अश्या खूप साऱ्या लेखामार्फत भेटत असतो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते, तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याचबरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद…!

    -बंडूकुमार धवणे
    संपादक गौरव प्रकाशन
    ——————–

gauravprakashan1@gmail.com

Maharashtra News, Braking News, Marathi News, Most Popular Marathi News, Latest Marathi News,Today News,Marathi Article, Marathi Poem, Marathi Story,

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *