• Tue. Jun 6th, 2023

दुग्धव्यवसाय क्षेत्रात जगाचे नेतृत्व करण्यास भारतसज्ज

    देशाने 26 नोव्हेंबरला राष्ट्रीय दूध दिवस साजरा केला. याचे औचित्य लक्षणीय आहे कारण भारतातील श्वेत क्रांतीचे श्रेय ज्यांना दिले जाते, अशा दिवंगत डॉ. वर्गिस कुरियन यांची 101वी जयंती या दिवशी होती. दुग्धव्यवसाय क्षेत्रातील भारताची प्रगती आणि वाटचाल हे जागतिक नकाशावरील देशाच्या प्रभावाचे आणि परिणामांचे प्रतीक आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली वर्ष 2020-2021 मध्ये देशातील दूध उत्पादन 44 टक्क्यांहून अधिक वाढले आहे. 2020-2021 साली आपण 210 दशलक्ष टन दुधाचे उत्पादन केले, जे जागतिक दूध उत्पादनाचा 23% हिस्सा आहे. भारताची दरडोई दूध उपलब्धता 2020-2021 मध्ये दररोज 427 ग्रॅम होती तर याच कालावधीत जागतिक सरासरी दररोज 394 ग्रॅम होती. भारतातील दुग्धव्यवसाय हा मुख्यत्वे सहकारी पद्धतीत एकवटला आहे आणि सहकारी संस्थांनी दुग्धोत्पादन करणाऱ्या शेतकऱ्यांची वाटाघाटीची शक्ती वाढवण्यात निर्णायक भूमिका बजावली असून आपल्या कार्यक्षेत्रात संकलित दुधाचा तसेच दूधविक्रीचा भाव ठरवण्यासाठी मदत केली आहे.

    सरकार ज्याप्रमाणे गहू, तांदूळ यांसारख्या पिकांसाठी भाव जाहीर करते, त्याप्रमाणे दुधाच्या दरांवर सरकारचे नियंत्रण नसते, तसेच दूध संकलनातदेखील सरकारचा सहभाग नसतो. यामुळे दुग्धव्यवसायातील सहकारी संस्थांची स्वायत्तता टिकून राहिली असून त्यांना बाजारपेठेशी जोडून ठेवण्यास प्रोत्साहन मिळाले आहे. खरे तर , दुग्धव्यवसायातील काही प्रमुख सहकारी संस्थांनी कामगिरी आणि फायदा या दोहोंच्या जोरावर खासगी कंपन्यांना मागे टाकले आहे. अमूल ही भारतातील सर्वात मोठी सहकारी दुग्ध व्यवसाय संस्था हे देशातील सहकारी संस्थांचा दबदबा आणि यश यांचा उत्तम दाखला आहे.

    आता आपण महामारीच्या तडाख्यातून बाहेर पडत असताना, सरकार आणि सहकारी दुग्ध व्यवसाय संस्था यांनी टाळेबंदी काळात आणि त्यानंतर दूध उत्पादक शेतकऱ्यांना दिलेल्या आधाराचा विचार करणे, फारच उद्बोधक ठरेल. महामारी काळात सहकारी दुग्ध व्यवसाय संस्थांच्या दूध संकलनाच्या कार्यात वाढ झाली कारण जे दूध खासगी आणि असंघटित घटकांना वितरित केले जात असे ते दूधही या सहकारी दुग्ध व्यवसाय संस्थांनी या कालावधीत स्वीकारले. 2020-21 मध्ये सहकारी दुग्ध व्यवसाय संस्थांमधील दूध संकलनाने 7.9 % वाढ नोंदवली. भारत सरकारने मदत विस्तारण्याच्या हेतूने सध्याच्या केंद्रीय योजनांअंतर्गत दूध सहकारी संस्था आणि दुग्धव्यवसायातील शेतकरी उत्पादक संघांसाठी ” खेळत्या भांडवल कर्जावर व्याज सवलत” जाहीर केली. अशा उपायांमुळे गेल्या दोन वर्षांमध्ये आपला दुग्धव्यवसाय सक्षम राहिला.

    तंत्रज्ञानातील वाढत्या संधींचा लाभ उठवण्याच्या दृष्टीने ई -गोपाला हा डिजिटल मंच पशुधन व्यवस्थापन अधिक सुलभ आणि सक्षमपणे व्हावे, यासाठी सुरू करण्यात आला आहे. पशु आधार, पशु पोषण, पारंपरिक पशु औषधे ( ईव्हीएम ), पशु प्रजननासारख्या सेवा आणि माहिती, इत्यादी मिळवण्यासाठी या मंचाचा उपयोग होईल.

    तसेच ई-गोपाला अॅपमुळे दुग्धव्यवसाय क्षेत्रातील जनावरांची, वीर्याची, भ्रूणाची खरेदी विक्री करण्यास मंच उपलब्ध झाला आहे. या उपक्रमाला सहाय्य करण्यासाठी राष्ट्रीय डेअरी बोर्डाने सुरू केलेल्या पशुमित्र नावाच्या हेल्पलाईनमुळे जनावरांचे आरोग्य आणि पोषण यासंदर्भातील शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर तज्ज्ञांचे थेट मार्गदर्शन मिळू शकते.

    येत्या 2025 सालापर्यंत भारतातील दूध उत्पादन 270 दशलक्ष मेट्रिक टनाचा टप्पा गाठण्याचा अंदाज असताना, संस्थांनी प्रक्रिया सुविधांमध्ये गुंतवणूक करण्याची गरज आहे. त्यासाठी दुग्धव्यवसाय क्षेत्रात 10 अब्ज अमेरिकन डॉलरच्या गुंतवणूक पर्यायांची उपलब्धता असेल. सध्या 120 ते 130 दशलक्ष मेट्रिक टन इतक्या पायाभूत सुविधांची तूट जाणवत असून त्यामुळे 2.6 अब्ज अमेरिकन डॉलर इतक्या गुंतवणुकीला वाव आहे. आगामी 9-12 वर्षांमध्ये या गुंतवणुकीवर 17-20% फायदा मिळू शकतो.

    निर्यात बाजारपेठेत आपली दमदार पावले उमटत असून त्यामुळे दुग्धव्यवसाय क्षेत्रात गुंतवणूक करण्याला आणखी चालना मिळाली आहे.. उदाहरणार्थ, 2015-2020 या कालावधीत एच एस कोड 0406 अंतर्गत भारताची चीज निर्यात 16% नफा दराने वाढली आहे. संयुक्त अरब अमिरात, भूतान, अमेरिका या देशांमध्ये चीजची निर्यात मुख्यतः केली जाते. सध्या जगभरात दुधाचे प्रमाण कमी असणारे 75 देश असून त्यांच्यापैकी बरेचसे आशिया, लॅटिन अमेरिका आणि आफ्रिकेमध्ये आहेत- यामुळे नवीन बाजारपेठांमध्ये शिरकाव करण्याची भारताला मोठी संधी आहे. राष्ट्रीय डिजिटल पशुधन अभियानासाठी या उपक्रमांमुळे शोध घेण्याच्या मानकांमध्ये संवर्धन होईल तसेच आयातदार देशांनी आखून दिलेल्या गुणवत्ता मानकांचे भारतीय कंपन्यांना पालन करावे लागेल.

    डेअरी क्षेत्रात गुंतवणुकीला चालना देण्यासाठी पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय विभागाने डेअरी इन्व्हेस्टमेंट अॅक्सलरेटरची स्थापना केली असून गेट्स फाऊंडेशन आणि इन्व्हेस्ट इंडिया यांसारख्यांनी समस्या निवारण, गुंतवणूक सुलभीकरण, निर्यात धोरण सहाय्य, बाजारपेठांचा शोध, स्थान चिकित्सा इत्यादी मूलभूत सेवा पुरविण्यासाठी सहकार्य केले आहे. सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे शेतातील पीक वाया गेले असताना पारंपरिक शेतकऱ्यांना दुग्धव्यवसायानेच खात्रीशीर उत्पन्नाचा स्रोत मिळवून दिला आहे. असंघटित दुग्धव्यवसाय उद्योगाचे संघटित क्षेत्रांमध्ये रूपांतर करण्याचा सध्याच्या सरकारचा प्रयत्न असून शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ करणे तसेच मूल्यसाखळीत रोजगार निर्मिती करणे हे अंतिम ध्येय आहे.

    पशुधन पायाभूत सुविधा निधी, राष्ट्रीय गोकुळ अभियान, पशुसंवर्धन ग्रॅन्ड स्टार्ट -अप चॅलेंज आणि पशुधन शेतकऱ्यांना किसान क्रेडिट कार्ड उपलब्ध करून देणे यासारख्या नवीन उपक्रमांमुळे दुग्धव्यवसाय क्षेत्रात अधिक चांगल्या मानकांची आणि नवोन्मेषाची निर्मिती होईल. त्यामुळेच डॉ. वर्गिस कुरियन यांच्या 101 व्या जयंतीला आम्हाला असा विश्वास वाटतो की आगामी काळात दुग्धव्यवसाय क्षेत्रातील प्रमुख निर्यातदार म्हणून भारत नावारूपाला येईल‌.

    -पुरुषोत्तम रुपाला
    (लेखक केंद्रीय मत्स्यव्यवसाय, पशुपालन आणिदुग्ध व्यवसाय मंत्री आहेत.)
    ————–

    तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? आम्हास आपल्या परिसरातील बातम्या, लेख अवश्य पाठवा आणि प्रतिनिधी बना ! ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Gaurav Prakashan फेसबुकपेज !

    ——————–

    आम्ही तुमच्यासमोर बातम्या, कथा, कविता, वाचनीय लेख अश्या खूप साऱ्या लेखामार्फत भेटत असतो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते, तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याचबरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद…!

    -बंडूकुमार धवणे
    संपादक गौरव प्रकाशन
    ——————–
    (Image Credit : Bharatkosh )

gauravprakashan1@gmail.com

Maharashtra News, Braking News, Marathi News, Most Popular Marathi News, Latest Marathi News,Today News,Marathi Article, Marathi Poem, Marathi Story,

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *