सन्माननीय गझलकारा सौ गीतांजली वाबळे यांची विदयगंगा या वृत्ताची गझल वाचनात आली. अत्यंत अर्थपूर्ण अशी गझल त्यांनी लिहिली आहे. या गझलेला वाचक म्हणून मी विविध अंगाने वाचतो तेव्हा त्यातील तरलता मनाला स्पर्श करून जाते. या गझलेचे रसग्रहण करण्याचा अल्पसा प्रयत्न केला आहे.
- नको पाहुस पुन्हा मागे तुझे उरले नसे काही
- हवे तर जा पुसोनी आठवांचे तू ठसे काही
- घुमावे शब्द राहूनी मनाच्या खोल गाभारी
- विसरणे व्हायचे अवघड नको बोलू असे काही
- घडीचा डाव सर्वांचा न कळता मोडतो नंतर
- सुखी दिसती जरी वरवर खरे नसते तसे काही
- अचानक थांबला मृत्यू उभा येऊन पाठीशी
- कळवले ना बिचाऱ्याने मला साधे कसे काही
- अता शोधून घेतो मी जरा संदर्भ जगण्याचे
- नव्याने पाहतो आहे मला नुसते जसे काही
- -गीतांजली सुधाकर वाबळे
- संपर्क- ९५५२७६९२९८
- राळेगणसिद्धी. ता पारनेर जि अहमदनगर
- “रसग्रहण”
मानवाला चौ-याऐंशी लक्ष योनीतून निघाल्यानंतर मानव जातीच्या योनीतून जन्म मिळत असतो अशी अख्यायिका आहे. पृथ्वीतलावरील स्थिर अस्थिर प्राणिमात्रात मानवाला मन, संवेदना, चेतना, वाचा व ज्ञान दिले आहे, या पंचसुत्रीच्या जोरावर मानव चंद्रावर जावून आला आहे. तसेच या जन्मात मानवाने बरीच क्रांती केली आहे. नवनवीन शोध लावले, शास्त्रीय, अशास्रीय, भौगोलिक, अशा क्षेत्रात मानवाने प्रगती केली आहे. निसर्गातील अणूरेणूपर्यंत मानव जावून पोहचला आहे.
एवढे सारे शोध लावूनही मानवाला अमरत्वाचा, चिरंजीवी होण्याचा शोध लावता आला नाही, ही खंत मानवाच्या मनात कायम राहिल त्यामुळे हा मानव नेहमी गतकाळात जावून आपलं अस्तित्व शोधत असतो. एवढं सारं करूनही त्याच्या हाती काही लागत नाही. शेवटी ईहलोकीचा प्रवास हा ठरलेलाच आहें. “या विश्वाच्या पसा-यात मागे काही राहत नाही. थोड्या दिवस नाव लक्षात राहते नंतर विसरून जाते. नंतर ज्या आठवणी राहतात त्या आठवणी इतरांना पुन्हा पुन्हा आल्याने मन अस्वस्थ होते, विचारात सारखे डुंबून राहते. मनुष्य गेल्यावर जर मागे काही राहत नसेल तर मग या आठवणी तरी कशाला मनाला छेडायला येतात?” म्हणून कवयित्री म्हणतात की,
- नको पाहुस पुन्हा मागे तुझे उरले नसे काही
- हवे तर जा पुसोनी आठवांचे तू ठसे काही
शब्द हे तलवारीचे पाते आहे, शब्द हे जहरीले विष आहे. आपल्या जीभेवर असणारा हा विषारी शब्दांचा काटा एखाद्याचा जीव घेऊ शकतो . त्याकरीता शब्द फार तोलून मापून बोलावे लागतात. जर हे शब्द एखाद्याच्या जिव्हारी बसले तर ते मरेपर्यंत विसरता येत नाहीत. मारल्याचे घाव बुजत असतात पण बोलल्याचे घाव बुजत नाही. म्हणून असे जिव्हारी लागणारे जहरी शब्द बोलूं नये ज्यामुळे मनाच्या गाभा-यात असे शब्द रूजून बसतील आणि मग ते विसरणे अशक्य होईल. म्हणून कवयित्री म्हणतात की,
- घुमावे शब्द राहूनी मनाच्या खोल गाभारी
- विसरणे व्हायचे अवघड नको बोलू असे काही
मानसाचं जीवन क्षणभंगूर आहे, पाण्यावरचा बुडबुडा आहे. कधी फुटेल हे सांगता येणार नाही. जसे एखादा लहानमुलांचा खेळाचा डाव मांडला आहे आणि एखादा खेळाडू खेळ सोडून खेला तर क्षणात तो मोडला जातो तसे प्रपंच हा एक डाव आहे या डावात एक जरी सदस्य सोडून गेला तर हा डाव अधूरा राहतो त्या डावाला नंतर कितीही रंगत आणली तरी डाव रंगत नाही . कधी कधी प्रपंचात असेही दिसते की आपला जोड़ीदार खूप सुखी आहे पण त्याच्या मनातील दुःख झाकून तो ईतरांना सुख देण्याचा प्रयत्न करत असतो. पण ते सुखी दिसणं हे वरवरचे असते, आतून तो पूर्ण कोलमडलेला असतो. म्हणून कवयित्री म्हणतात की-
- घडीचा डाव सर्वांचा न कळता मोडतो नंतर
- सुखी दिसती जरी वरवर खरे नसते तसे काही
मानवी जीवन जगत असतांना प्रत्येक जण सुखाच्या शोधात असतो. क्षणभर सुखासाठी मणभर कष्ट करावे लागतात तेव्हा कुठं सुखाची गार झुळूक मनाला गोडवा देते. या सुखाच्या शोधात असतांनाच अचानक झाड उन्मळून पडावं तसा माणूस उभा उन्मळून पडतो. अकस्मात आभाळ कोसळावं तसा मृत्यु त्याच्या पाठीशी येऊन उभा राहतो. त्याला ‘बिचारा’ ही उपमा देवून कवयित्रीने दुःखातून थोडंसं खंबीर होण्याचा प्रयत्न केला आहे, दुःखाला जरा बाजूला सारायचा प्रयत्न केला आहे। खरंच त्या बिचा-याला काय माहिती की, हा किती दुःखाने व्यापला आहे, त्याला जरा उसंत द्यायला हवी हे त्य्याला कुठे माहिती. म्हणून कवयित्री म्हणतात की-
- अचानक थांबला मृत्यू उभा येऊन पाठीशी
- कळवले ना बिचाऱ्याने मला साधे कसे काही
सध्या मरण सोपं आणि जगणं अवघड झालं आहे. जगण्याचे मार्ग बदलत चालले आहे. रोज नवनव्या संकटांना सामोरे जातांना मानसाची दमछाक होतेय. रोजचा जगण्याचा मार्ग अवघड होत चालला आहे. जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलत चालला आहे. रोज नवनव्या युक्त्या शोधून जीवनरथ ओढण्याचे कसब चालू आहेत. त्यामुळे प्रत्येक क्षणाला नव्या उमेदिनं लढावे लागत आहे. रोज नवे संकट रोज नवे मार्ग यामुळे जीवनाकडे फक्त बघ्याची भुमिका घेऊन मनुष्य जगत आहे. कितीही नवनवे उपाय केले तरी जीवन सुखकर होत नाही. यामुळे कविमन व्यथित होते आणि म्हणूनच कवयित्री आपल्या शेवटच्या शेरात म्हणतात की-
- अता शोधून घेतो मी जरा संदर्भ जगण्याचे
- नव्याने पाहतो आहे मला नुसते जसे काही
खुप छान ग़ज़ल, आपणास रसग्रहण आवडल्यास जरूर प्रतिक्रिया पाठवा, आपल्या प्रतिक्रिया लाखमोलाच्या आहेत.
- -प्रशांत शहादू वाघ “(पॅसिफिक टायगर)”
- संपर्क- (तीन सत्ते एकोणचाळीस पंचवीस हजार)
- ————–
तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? आम्हास आपल्या परिसरातील बातम्या, लेख अवश्य पाठवा आणि प्रतिनिधी बना ! ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Gaurav Prakashan फेसबुकपेज !
- ——————–
आम्ही तुमच्यासमोर बातम्या, कथा, कविता, वाचनीय लेख अश्या खूप साऱ्या लेखामार्फत भेटत असतो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते, तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याचबरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद…!
- -बंडूकुमार धवणे
- संपादक गौरव प्रकाशन
- ——————–
आदरणीय प्रशांत वाघ सर अतिशय समर्पक शब्दात आपण माझ्या गझलेचे रसग्रहण केले.. खूप खूप धन्यवाद..
गीतांजली वाबळे यांची सुंदर गझल
खुप सुंदर गझल गीतांजली ताईची
धन्यवाद सर आपण साहित्यिकांना प्रोत्साहन देवून साहित्यिकांचा सन्मान करीत आहात
अतिशय समर्पक शब्दात आपण माझ्या गझलेचे रसग्रहण केले आहे वाघ सर मनःपूर्वक धन्यवाद
आदरणीय प्रशांत वाघ सर अतिशय समर्पक शब्दात आपण माझ्या गझलेचे रसग्रहण केले.. खूप खूप धन्यवाद..