• Fri. Jun 9th, 2023

काॅलेज जीवनातील किस्सा…

  * परदेशी परदेशी जाना नही… जो वाचनार तो पोट धरून हसनार

  परदेशी परदेशी जाना नही हे मी कॉलेजला असताना आमीर खान आणि करिष्मा कपूर यांच्या राजा हिंदुस्थानी या सिनेमातील प्रचंड गाजलेलं गाणं. आजही मी हे गाणं कुठं ऐकल्यावर गाण्यात मग्न होऊन जातो. अन् जेव्हा कधी हे गाणं ऐकेल त्यावेळी प्रचंड हसू येतं. मन काही क्षणात कॉलेजमध्ये वर्गात घेऊन जातं. या गाण्याबरोबर असलेली अनोखी आठवण/किस्सा तुमच्या समोर मांडतोय….

  आमच्या वर्गात स्नेहल परदेशी नावाची मुलगी होती, भिंगार वरून यायची. अतिशय सुंदर, सडपातळ, काळेभोर वाऱ्यासोबत हवेत लहरणारे केस, सरळ नाक आणि नाकासारखीच सरळ चालणारी, बोलके डोळे, कधी नजरानजर झालीच तर तिचे डोळे आपल्याशी बोलताय असा भास व्हायचा, एकंदरीत पाहताक्षणी कुणीही प्रेमात पडेल असे सौंदर्य.. आम्ही सगळे मित्र सतत तिच्याकडे पाहत राहायचो, पण तिने जर कधी चुकुन आमच्याकडे पाहिले तर धन्य झाल्यासारखं वाटायचं. तिच्याबद्दल न आवडणारी गोष्ट म्हणजे ती थोडीशी शिष्ट होती. मग आम्ही सर्व मित्रांनी विचार केला हीची एक दिवस जिरवायचीच.. रुपेश म्हणाला अरे अशोक जिरवायची म्हणजे नेमकं काय करायचं भाऊ? तू आम्हाला मार खायला लावशील, इतक्यात हितेश म्हणाला आरे रुपेश ती स्वतःला खुप शहाणी समजते रे. मी म्हटलं हित्या तुझ्याकडे पण पाहत नाही वाटतं.. सगळे जाम हसलो. तर हित्या म्हणतो तुला कस माहीत? मी म्हटलं तू एकटाच तिचा दिवाना नाहीस, आम्हीही तेच करतोय. काल मी तिच्याशी असंच बोलायला गेलो तर म्हणते कशी आरश्यात तोंड बघ..! माझ्या भावनेचा अक्षरशः कडेलोट झाला रे… मन्या म्हणाला जाऊ दे आता तुझा कडेलोट झालाय ना? पण आता करायचं काय म्हणजे, ती पटणं.. मी म्हणालो म्हणजे कोणाला पटलं? मन्या म्हणाला तुला..! मी म्हटलं ही पटत नसती भाऊ, तिच्याकडं पाहिलं तरी ती डोळे वटारती.. मी म्हणालो रुपेश तुलाच बघ, रुपेश म्हणला आता मला बळीचा बकरा बनवू नका..

  काय करायचं ते बोला..!! मग मी म्हटलं ती वर्गात आल्यावर आपण सगळ्यांनी गाणं म्हणायचं.. जाल्या म्हणाला कोणतं रे? आरे येड्या ते परदेशी परदेशी जाना नही, मुझे छोडके.. ती वर्गात आली की आपण सुरू व्ह्यायच.. ठरलं उद्या..दुसऱ्या दिवशी आम्ही जरा लवकर वर्गात येऊन बसलो…. स्नेहलची वाट पाहत…! आयुष्यात एवढ्या आतुरतेने कधीच कुणाची वाट पाहिली नव्हती, अगदी दुसरी कुणी आले तरी आम्हाला भास व्हायचा की स्नेहल आली.. शेवटी हसत हसत, वाऱ्या बरोबर तिचे केस जणू मस्ती करत ती वर्गात आली, तिच्या जागेवर बसली. का कुणास ठावुक पण कधी न भरणारा वर्ग त्या दिवशी संपूर्ण खचाखच भरला होता.

  इतक्यात हित्या म्हणाला म्हणायचं का? मी मन्या कडे पाहिलं,मन्याने रुप्याकडे, रुप्याने जाल्याकडं आणि जाल्यानी इतर मित्रांनकडं.. सांकेतिक संकेत सगळ्यांना पोहचला.. वर्ग शांत असताना आम्ही सर्व जण स्नेहलकडे पाहत अगदी त्या आमिर खान पेक्षाही सरस अभिनय करत गाणं म्हणायला लागलो, “परदेशी परदेशी जाना नही, मुझे छोडके..मुझे छोडके” क्षणात सगळा वर्ग आमच्यासोबत गायला लागला ‘परदेशी परदेशी’ त्या स्नेहलला हे सर्व अनपेक्षित आणि अनाकलनीय होत… ती जोर जोरात रडायला लागली, आम्ही गप्प बसलो हित्या म्हणाला आश्या तुझं ऐकलं आणि आता मरणार आपण.. मन्या म्हणाला तिचा बाप पोलिस आहे. हे ऐकून जाल्या म्हणाला आश्या आता आपली धुलाई नक्की आहे. रुप्या आणि मी म्हणालो अब ‘जो होगा वह मंजुर ए खुदा होगा’ हित्याने आम्हाला अशा शिव्या घालायला सुरवात केली की, अक्षरशः मी इकडून त्याला शिव्या दिल्या त्यावेळी तो गप्प बसला. हळूच माझ्या कानात म्हणतो कसा, वर्गात चोप भेटणार आहेच पण घरी बापाला कळलं ना आश्या तो उलट टांगून मारीन..!!

  आमचा संवाद चालू होता तेवढ्यात, वर्ग आज ज्यांची आतुरतेने वाट पाहत होता त्या सदा हसतमुख देशमुख सरांचं आगमन झाले, वर्ग एकदम शांत.. आता काय वादळ निर्माण होणार याची आम्हाला खात्री होती. इतक्यात स्नेहलचा रडण्याचा आवाज आणखी वाढला… सरांनी विचारलं काय झालं? म्हणतात ना ‘चहा पेक्षा किटली गरम’ तसंच तिच्या मैत्रिणींनी, सगळा पट अगदी तेल मीठ लावून सांगितला… सरांनी स्नेहलला उभे केले, सरही थोडे विनोदी होते आणि असे कित्येक अनुभव त्यांना होते. परिस्थिती कशी हाताळायची हे त्यांना चांगलंच ठाऊक होतं…. त्यांनी तिला विचारलं स्नेहल तू सांग काय झालं ते…ती उभी राहिली आणि आमची ह्रदयाच्या ठोक्यांनी पाचवा गिअर टाकला… ती म्हणाली सर, तो पांढऱ्या शर्टवाला… सर म्हणाले अगं आत्ताच लाजू नको…! वर्गात जोरदार हशा पिकला आणि माझ्या मनात आनंद लहरी.. किमान तिने तो पांढऱ्या शर्ट वाला म्हणल्यावर ज्या आनंद लहरीनिर्माण झाल्या ना त्या काय वर्णवु? असो…

  बोल… सर म्हणाले काय केलं त्याने? सर तो आणि त्याचे सर्व मित्र मी वर्गात आल्यावर जोर जोरात ‘परदेशी परदेशी जाना नही’ म्हणून माझ्याकडे बोट दाखवून मला चिडवत होते.. पुन्हा ती परत रडायला लागली. सर मला म्हणाले वाह रे आमिर खान या तुमच्या सर्व मित्रांसोबत पुढे.. आता शांतता पसरली होती, सर यांना काय शिक्षा करणार? यासाठी वर्गातली सर्वांची उत्कंठा शिगेला पोहचली होती.. आम्ही सर्व मान खाली घालून समोर गेलो, काही कळायच्या आत प्रत्येकाच्या कानाखाली आवाज निघायला सुरुवात झाली, सन सन आवाज संपूर्ण वर्गात घुमत होता… मला वाटलं आता थांबले सर पण, परत खुर्ची वर बसण्याअगोदर माझ्या कानाखाली अजून सणसणीत पडली.. माझी नजर त्या स्नेहलवर… ती हसत होती, अगदी माधुरी दिक्षितसारखी..

  सर म्हणाले तुम्ही खूप पट्टीचे गायक आहात ना? आता तेच गाणं माझ्या समोर म्हणा.. आता मात्र आमची बोबडी वळत नव्हती.. कानाखाली आवाज काढले होते,आता कुठं तोंडातून आवाज निघत असतो काय? अस वाटत होतं… परत सर म्हणाले कान बधिर झालेत काय तुमचे सगळ्यांचे? पवार मी काय बोललो ऐकलं नाही का? मी गप्प अरे संपूर्ण वर्ग तुमच्या बरोबर गात होता, तुम्ही खूप सुंदर गाणं म्हणता, म्हणा लवकर… नाहीतर तुमचा आवाज आला नाही तर मी आवाज काढेन.. मी हित्या कडे पाहिलं डोळ्यांनी खुणावत विचारलं तो रुप्याकडे पाहात म्हणाला चल हो जा सुरू…आम्ही परत एक सुरात सुरू झालो, ‘परदेशी परदेशी जाना नही,जाना नही’ फक्त स्नेहल कडे मात्र आता पाहत नव्हतो.. एव्हाना आमच्या सोबत संपूर्ण वर्ग ही सुरू झाला होता.

  सर मात्र हसत होते, थांबा आता म्हणत सरांनी आम्हाला जवळ घेतलं आणि हसत हसत म्हणाले आयुष्यात हा जिवंत पणा कायम असाच ठेवा, फक्त कुणाचं मन दुखावेल अशी थट्टा करू नका.. त्या स्नेहल ची कान पकडून माफी मागा, आम्हीही निर्लज्ज लगेच कान पकडून तिची माफी मागितली…वर्ग सुटल्यावर सर आम्हाला म्हणाले अरे हेच कॉलेजच जीवन असत.. बाकी शिकतात, तुम्ही ते अक्षरशः जगत आहात. खऱ्या अर्थाने तुम्ही महाविद्यालयीन जीवन जगत असता, जोपर्यंत तुमच्यातील अवखळपणा जिवंत आहे. असेच हसत रहा,पण लक्षात ठेवा थट्टा ही कुणाच्या मनाला आघात करेल अशी करू नका आणि सर निघून गेले…

  आमच्या डोळ्यात पाणी होतं, सरांबद्दल कित्येक पटीने आदर वाढला होता.. त्यांच्या पाठमोऱ्या आकृतीकडे आम्ही पाहत होतो, इतक्यात स्नेहल आली आणि आम्हाला म्हणाली, सो सॉरी मित्रानो माझ्यामुळे तुम्हाला सरांनी मारलं.. तुम्ही खरे मित्र आहात, तुमच्यातील एकही मागे हटला नाही की घाबरला नाही.. त्यानंतर आम्ही कधीच, कुणाची मनाला लागेल अशी थट्टा केली नाही… स्नेहल आमची कुणाची जरी झाली नसली तरी, आम्हा सर्वांची चांगली मैत्रीण झाली..

  -अशोक_पवार
  गटेवाडी। पारनेर अहमदनगर
  8652122491
  ————–

  तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? आम्हास आपल्या परिसरातील बातम्या, लेख अवश्य पाठवा आणि प्रतिनिधी बना ! ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Gaurav Prakashan फेसबुकपेज !

  ——————–

  आम्ही तुमच्यासमोर बातम्या, कथा, कविता, वाचनीय लेख अश्या खूप साऱ्या लेखामार्फत भेटत असतो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते, तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याचबरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद…!

  -बंडूकुमार धवणे
  संपादक गौरव प्रकाशन
  ——————–
  (छाया : संग्रहित)

gauravprakashan1@gmail.com

Maharashtra News, Braking News, Marathi News, Most Popular Marathi News, Latest Marathi News,Today News,Marathi Article, Marathi Poem, Marathi Story,

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *