• Mon. May 29th, 2023

Lockdown : टाळेबंदीतील विस्थापीतांचा थरारक प्रवास : ‘ ते पन्नास दिवस ‘

    ‘ते पन्नास दिवस’ ही चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारपूर येथील पवन भगत लिखीत कादंबरी नुकतीच दि.१४/१०/२०२२ ला रस्त्यावरच्या माणसांच्या हातून दीक्षाभूमी,नागपूर येथे प्रकाशीत झाली. ही पवन भगत यांची पहिलीच साहित्यकृती असावी. पवन भगत हा आंबेडकरी चळवळीतील हाडाचा कार्यकर्ता आहे. सामाजीक,राजकीय,साहित्य,सांस्कृतिक कार्यात सतत कार्यरत राहिलेलं व्यक्तीमत्व. तो महाराष्ट्र तसेच इतर राज्यातील लोकांनाही परिचित आहे. तो कबीरपंथी विचाराची चळवळही नेटानं चालवितो. त्यामुळे त्याची नव्यानं ओळख करून देण्याची मला गरज वाटत नाही.ही कादंबरी वास्तवादी कादंबरी प्रकारातील वाटते. निवेदनाच्या प्रकारात त्रयस्त निवेदनात्मक असून,तिने कादंबरीच्या नियमांची चौकट जपलेली दिसते. यात कथानक, वेळ,स्थळ,पात्र कादंबरीच्या या घटकांचं योग्य संघटन दिसतं. यातील कथानक हे हृदयस्पर्शी असून मानवी जीवनातील संघर्षमय प्रवासावर आधारीत आहे. पण तो संघर्ष नेमका कुणाशी? हे एक कोडंच आहे. या कादंबरीचा तसा कुणी प्रमुख एक नायक नाही तर चार ठळक पात्र (व्यक्तिरेखा) यात आहेत. रेखीय कालक्रमानुसार हे कथानक लेखकाच्या एकूणच अभ्यासूवृत्तीनुसार हळूहळू ताकदिने पुढे सरकते.

● हे वाचा – आयुष्याच्या वाटेवर,अनुभव संपन्न कविता संग्रह

    कोवीड-१९ या विषाणूने सर्वत्र थैमान घातले आहे. त्यापासून सर्वत्र पसरलेल्या निसर्गनिर्मीत वा मानवनिर्मित कोरोणा नावाच्या आजाराने उद्भवलेल्या संकटाला आटोक्यात आणण्यासाठी देशातंर्गत शासन स्तरावर अनेक उपाय योजना केल्या जातात. त्यापैकीच एक जटील उपाय म्हणजे’ लाॅकडाऊन’ (टाळेबंदी). अचानक देशाचे पंतप्रधान एके दिवशी प्रसार माध्यमावरून शांतपणे सर्वत्र टाळेबंदीची घोषणा करतात. त्यामुळे पुढील आदेशापर्यंत रेल्वे, बसेस, टॅक्सी, रीक्षा,कारखाणे, कार्यालये, शाळा, महाविद्यालये, बाजार, मार्केट बंद ठेवण्याचे आदेश काढले जातात. आणि सर्व माणसांच्या घराबाहेरील हालचालीवर निर्बंध लादल्या जाते. जिकडे तिकडे आणिबाणी वा युद्धसदृश्य परिस्थिती निर्माण होते. सर्वत्र या आजाराची दहशत पसरली जाते. प्रथम २१ दिवसाचे, नंतर पुन्हा २१ दिवसाचे आणि नंतर अनिश्चित काळासाठी .अशा टप्प्या टप्प्याने टाळेबंदीचा कालावधी वाढत जातो. सर्वच लोक घरात स्वत:ला कोंडून घेतात. मात्र या काळात पर राज्यातून इतर राज्यातील मोठ्या शहरात उदरनिर्वाहासाठी कामाच्या शोधात आलेले मजूर जेथचे तेथेच अडकून पडतात. कुणी कुणाच्या जवळ जाऊ शकत नव्हते, कुणी एकमेकाशी बोलतही नव्हते.कोणतेच सभा,संमेलने,लग्न,मृत्यू सोपस्कार सर्वच बंद. काम बंद असल्याने जवळ पैसा नाही,खायला अन्न मिळत नाही, राहायची सोय नाही, मजूरांची जबाबदारी कुणी कारखाणदार घ्यायला तयार नाही .अशावेळी त्यांची स्थिती ना घर का ,ना घाटका होते. राहायचे कोठे, काम नाही,पैसे नाही, खायचे काय ? असे अनेक प्रश्न मजूरांपुढे उभे ठाकलेत. शासन त्यांना त्यांच्या गावापर्यंत पोहोचवायला तयार नाही. तर काही राज्य आपल्याच नागरीकांना स्विकारायला तयार नाही. या आजाराचा प्रसार मोठ्या प्रमाणात होऊन लाखो लोकांना लागन होऊन काही दवाखाण्यात भरती झालेत, काही विलगीकरणात राहिलेत, काही बरे झालेत, तर काही मृत्यूमुखी पडलेत. परंतु पर राज्यातील मजूरासमोर आपल्या गावी जाण्याचा महाभयंकर प्रश्न उभा ठाकला होता. मायानगरी मुंबईत कामासाठी आलेले परप्रांतीय लाखो मजूर अडकून पडले होते. त्यांच्याच विस्थापनावर ,स्थलांतरावर आणि त्या जिवघेण्या प्रवासावर आधारीत हे कथानक आहे.

● हे वाचा – एसटी महामंडळाला सवलत योजनेतून लाखोंचा फटका…!

    त्यातीलच एक मजूर म्हणजे रामस्वरूप उत्तरप्रदेशातील ,वाराणसीजवळच्या एका गावाचा रहिवासी असलेला ३०-३५ वर्षे वयाचा आईचा एकुलता एक आधार असलेला,बनारस हिंदू विद्यापिठात इतिहासात एम.ए.करीत असलेला युवक रामस्वरूप मौर्य (मोरे) ही कादंबरीतील पहिली व्यक्तिरेखा वाचकांना भेटते .तो आपल्या गावाकडे जाण्यासाठी आवश्यक सामानाचं गाठोडं डोक्यावर घेऊन आपल्या झोपडीतून सीएसएमटी रेल्वेस्टेशनच्या दिशेने पायी चालत निघतो. तेथे गेल्यावर गाडी नसल्याचे कळते. याच रेल्वे स्टेशनवर त्याला त्याच्याच राज्यातील , जिल्ह्यातील ४५-५० वर्षे वयाचे बणारस येथील गंगा घाटवरील रहीवासी ,पुजापाठ ,सत्यनारायण इत्यादी विधी करून उदरनिर्वाह करण्याकरीता मुंबईत आलेले पं. ब्रिजमोहन मिश्राजी ही दुसरी व्यक्तिरेखा. तर ३०-३५ वर्षे वयाचा ,रामपूर(बणारस) येथील रहीवासी शेख आरीफ ,पडेल ते काम करण्यासाठी आलेली ही तिसरी व्यक्तिरेखा वाचकांना या कादंबरीत भेटते. येथून कोणतीही रेल्वे गावाकडे जात नसल्याने वैतागून ते तिघेही दादर स्टेशनवर पायी चालत जातात. तेथे जाताच अनिश्चित काळासाठी रेल्वे बंद केल्याची घोषणा होते. आता असंख्य मजूरांसह मुंबई शहराच्या बाहेर पडण्याच्या उद्देशाने तिघांचाही पायी प्रवास सुरू होतो. जवळ खायला काही नाही, प्यायला पाणी नाही, सर्व दुकाने बंद , वरून उन्हाचा प्रहार. पण याही स्थितीत पोलीसांचे डंडे तेवढे मात्र भरपूर प्रमाणात मोफत मिळत होते. तिघेही रात्रंदिवस पायी चालत एकेक गाव मागे टाकतात.

● हे वाचा – Rahul Gandhi : राहुल, संतांच्या पवित्र भूमीत तुझे स्वागत करतांना ……..

    शहापूरसमोर रस्त्यावर निळ्या झेंड्यावाले पोरं पोळीभाजीचे पॅकेट देतात. कसारा घाट चढतांना मध्येच मध्यप्रदेशातील मजूराच्या गटातील एका म्हाता-याचा अचानक मृत्यू होतो. त्याला माणुसकीच्या नात्याने ते अग्नी देऊन पुढे जातात. काही कंटेनर इगतपुरीवरून मजूर वाहून नेत असल्याचे एका बिहारी ड्रायव्हरकडून त्यांना समजते पण इगतपुरीला येताच तोही कंटेनर निघून जातो. मग असंख्य मजूरांबरोबरच हे तिघेही हायवेवरून प्रवास करीत धुळे मागे सोडून,शिरपूरला पोहचतात, तेथून मध्यप्रदेशची हद्द सुरू होते, त्यांचा मध्यप्रदेशच्या दिशेने पायी प्रवास सुरू होतो. आता खायचे साहित्य संपते, पंडीतजी एखाद्या गावात जाऊन काही मिळालं तर घेऊन येत होते. कधी गाववाले किंवा पोलीस यांना गावात प्रवेश करू देत नाहीत. रखरखत्या उन्हात दररोज वीस ते पंचेवीस कि.मी. प्रवास करून रात्र झाली की उघड्यावरच आराम करायचे, खायला नसले की पाणी पिऊन झोपायचे . चालताना एका गावाशेजारी जाताच, ” परदेशी तबलीगी भारतात मेळाव्यासाठी आल्याने कोरोणा पसरला ” अशी बातमी जिकडे तिकडे पसरली. त्यामुळे आरीफच्या दाढीमुळे (धर्मामुळे) गोत्यात येण्याची वेळ येते. तेव्हा पंडीतजीं ब्लेडने आरीफची दाढी काढून टाकतात आणि पुढील प्रवास सुरू होतो. यावेळी त्यांना एका गावात लंगरमध्ये जेवन मिळतं, कधी जंगलातील फळं खायचे, तर कधी गावात जाऊन काही साहित्य खरेदी करून आणायचे. रस्त्यावरच्या लोहाराकडून रामस्वरूपने एक कु-हाड,एक सूरा व एक तवा विकत घेतला होता. ऩंतर पुढील गावातून स्वयंपाकाचे आवश्यक साहित्यही विकत घेतात. आणि मुक्कामास्थळी स्वयंपाक करून एकवेळ जेवन व एकवेळ चहा फुलके खाऊन झोपायचे .भोपालच्या जवळपास रात्री हे तिघेही झोपण्याच्या तयारीत असताना २०-२५ वर्षे वयाची एक घाबरलेली तरुणी तेथे येते. ही या कादंबरीतील चौथी व्यक्तिरेखा. दिपाली तिचे नाव. तीही वारानसीजवळ मिर्जापूर (यु.पी. ) येथील रहीवासी असते. शिकली सवरली एका कंपनीत उच्च पदावर फॅशन डिझायनर म्हणून कामाला असते. आता त्यांच्या काफील्यात ते चौघे झाले होते.

● हे वाचा – Karanja Lad : आमचे लाडाचे कारंजे ….आधुनिक कारंजा महात्म्य

    रस्त्यात त्यांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागते. वाघ, अस्वल, साप, ईंगळी त्यांना भेटले . पण ते याही प्रसंगातून कसेबसे वाचले. चालतांना त्यांचेसोबत काही आदिवासी छत्तीसगडी मजूरही होते. त्यांच्या सोबत काही मुलं, म्हातारी माणसं, गरोदर महिलाही होत्या. मुंबईवरून निघताना एक महिला सात महिण्याची गरोदर होती,चालता चालता या प्रवासात भोपालजवळच जंगलातच मुक्कामाच्या ठिकाणी तिला प्रसुती कळा येणे सुरू होतात. कोणताच पर्याय नसल्याने आरीफ,रामस्वरूप, मिश्राजी व दीपाली यांच्या मदतीने तिची तेथेच प्रसुती होते. ही घटना हृदय हेलाऊन सोडणारी व व्यवस्थेविषयी चीड निर्माण करणारी होती. झोपेतच दिपालीजवळ नाग येण्याची घटना, तिला मासीकपाळी येण्याची घटना, रामस्वरूपला पोलीसांनी मारण्याची घटना, आजारी होण्याची घटना ,दिपालीला ईंगळी चावण्याची घटना,अशा कितीतरी संकटांना तोंड द्यावे लागले. कसेतरी ते उत्तरप्रदेशच्या सिमेवर येऊन पोहचतात. तेथे पोलीस कसून चौकशी करून प्रवेश देतात. मिश्राजीची प्रकृती फारच खालावलेली असते, रक्ताच्या उलट्याही होतात. चालनं होत नाही. कसातरी ४५ दिवसांचा प्रवास संपतो. आता पाच दिवसांचा प्रवास शिल्लक असतो. दिपालीचं गाव येतं, तिच्या घरी सर्वांची जेवायची इच्छा असूनही पोलीसांनी हाकलून लावल्याने पोटात काही टाकता आले नाही. तिघेही दिपालीचा जड अंत:करणाने निरोप घेऊन पुढील प्रवासाला निघताना. दिपाली ,मिश्राजीच्या दवाखाण्याच्या खर्चासाठी आपलं एटीएम कार्ड व पासवर्ड आरीफजवळ देते, खात्यात साडेचार लाख रुपये असते. ही बाब एकमेकाविषयी माणुसकी जपण्याची आहे. पुढील चौकातून रामस्वरूपच्या गावाचा आणि मिश्राजी व आरीफच्या बनारसचा मार्ग वेगळा होतो. आरीफ व मिश्राजी पुढच्या गावात एसटी स्टॅन्डच्या शेडमध्ये झोपतात. सकाळी आरीफ उठतो पण मिश्राजी कायमचे झोपले असतात. आरीफ विलाप करीत त्यांना अग्नी देऊन, अस्थी झोळीत सोबत घेऊन जड अंत:करणाने गावाच्या दिशेने निघतो. शेवटी कसाबसा रामपूरला (बनारसला) येवून पोहचतो. विलगीकरण संपल्यावर तो थेट पं.मिश्राजीच्या घराकडे त्यांच्या अस्थी घेऊन जातो.

● हे वाचा – हृदयविकाराबाबत पूर्वकल्पना देणारा स्टेथॅस्कोप ; अमरावतीच्या युवकाचे संशोधन

    असा हा लाकडाऊन काळातील या मजूरांचा एकूण पन्नास दिवसांचा थरारक प्रवास संपंन्न होतो. यात असंख्य मजूरांच्या वाट्याला संघर्ष आला होता. पण तो कोरोणाशी होता ? लाॅकडाऊनशी होता? शासनाशी होता ? व्यवस्थेशी होता ? स्वत:चा स्वत:च्या आयुष्याशी होता ? की जगण्यासाठीचा होता ? हे मात्र वाचकच ठरवू शकतील. तसा या पुर्वीही या देशातील अस्पृश्य समाजातील अनेक लोकांनी ,अनेक वर्षे विलगीकरणाचे चटके सहन केले होते. पण टाळेबंदीच्या काळात विलगीकरण (भेदाभेद)काय असते ?हे या देशातील सर्वच जाती धर्मातील,गावातील,घरातील लोकांनी या काळात जवळून अनुभवले होते. हे जीणे किती अपमानजनक असते याची प्रचीतीही आली असावी. त्यामुळे समाजात पाळल्या जाणा-या ब-याच अनावश्यक गोष्टी मानवी मनाचा भ्रम आहेत, हे कळून चुकले असावे. तसेच या प्रवासात सोबत असलेले रामस्वरूप मौर्य, आरीफ शेख, पं.ब्रिजमोहन मिश्राजी व दीपाली हे वेगवेगळं काम करणारे, वेगवेगळ्या धर्माचे,गावाचे व लिंगाचे दिसतात. सुरुवातीला एकमेकाकडे शंकेच्या नजरेने बघतात पण नंतर जिवाभावाचे मित्र म्हणून जगतांना दिसतात, एकमेकांना जपतात. हे येथे उल्लेखनीय आहे. येथे बंधुभाव,मैत्री,मानवता ही मूल्ये जपलेली दिसतात . या संघर्षमय प्रवासात खाण्यापिण्याचे पथ्यपाणी, सोवळे ओवळे ,जात पात,धर्म,रीतीरीवाज असा कुठलाही भेद असल्याचे दिसत नाही. ते केवळ माणूस म्हणून जगले. येथे केवळ माणुसकी सर्वश्रेष्ठ ठरलेली दिसते.

● हे वाचा – संविधानात धार्मिक स्वातंत्र्याचा अन्वयार्थ

    या कादंबरीत लेखक हा निवेदकाच्या भूमीकेत आहे. त्याने या वास्तववादी कथानकात वेळ,पात्र,स्थळ,भाषाशैली यांचा अचूक समन्वय साधलेला दिसतो. प्रत्येक माहितीचे योग्य उपयोजन केलेले आहे. ही साहित्यकृती कल्पनेवर आधारीत नसून घडलेल्या,बघितलेल्या घडामोडींवर आधारीत आहे. लेखक प्रथितयश लेखक,कवी,कथाकार नाही. तो एक साधा कार्यकर्ता व वाचक असूनही, त्याने या कादंबरीसाठी बरीच मेहनत घेतलेली दिसते. ब-याचअंशी अचुकता दिसून येते. क्रमवार सत्य नोंदी यात दिसतात. गावा- शहरांची नावे,जंगलातील वेगवेगळ्या प्रकारच्या झाडांची माहिती, फळांची माहिती, झाडपाला ,वनस्पती औषधीची नावे, ती कोणत्या आजारावर उपयोगी पडतात? या माहितीचा अचूकपणे अंतर्भाव केलेला आहे. थोडा वैदर्भीय भाषेचा शिरकाव दिसतो. या प्रवासातील प्रत्येक घटनेशी तंतोतंत जुळणारे एतिहासीक संदर्भ दिलेले आहेत. काही म्हणींचाही अंतर्भाव केला आहे. यात अनेक विचारवंतांच्या विचारांचा समावेश आहे. तर दुश्यंतकुमार, संत कबिर, निदा फाजली, वामनदादा कर्डक, विरू सोनकर, अंजुमन शर्मा, राहत इंदोरी,अनुराग अनंत, बाबा नागार्जून,मार्टीन ल्यूथर किंग, धुमील, राहूल संकृतायन,बाल गंगाधर त्यागी इत्यादी साहित्तिकही आपल्या साहित्यकृतीद्वारे वाचकांना अधून मधून भेटतात. यावरून लेखकाचा मराठी,हिंदी,उर्दू साहित्याचा अभ्यास दिसून येतो. लेखकाने बुवाबाबा ,देव ,आत्मा,धर्म,जात, भाकडकथा,अंधश्रद्धापासून या कादंबरीला दूर ठेवले आहे, हे या कादंबरीची वैशिष्ट्ये आहे.

● हे वाचा – देवस्थान इनाम वर्ग 3 जमीन आणि वंचित विमुक्त व भटक्या जमाती, भिक्षेकरी भटक्या जमाती..!

    थोडक्यात या कादंबरीचे कथानक वाचकांच्या अंगावर शहारे आणणारे आहे . वाचकाला खिळवून ठेवणारे आहे. डोळ्याचे पापनकाठ ओले करणारे आहे. बोध घेणारेही आहे. विचार करायला लावणारे आहे. त्या पन्नास दिवसांचा मजूरांचा प्रवास खुप कष्टदायी व मरणयातना देणारा आहे. या कथानकाच्या प्रवासात एकही मजूर कोरोणा आजाराने मृत्यू पावल्याची नोंद नाही. हे विशेष आहे. येथे लेखकाचा दृष्टीकोण काय ? हा वाचकाना कळून येतो. दोन जनांचे झालेले मृत्यू हे टाळेबंदीमुळे उद्भवलेल्या जिवघेण्या परिस्थितीमुळे झाल्याचे लेखक आपल्या निवेदनात अधोरेखीत करतात. याविषयी वाचकांचा अभिप्रायही महत्वाचा असेल. ही कादंबरी साहित्यक्षेत्रात आपला ठसा उमटवेल असे वाटते. वाचकांनी आवर्जून वाचावी, असे वाटते. ब-याच लोकांनी कोरोणाकाळ व टाळेबंदीतील बंदिस्त जीवन अनुभवले आहे, जवळून बघितले आहे. त्यामुळे हा प्रवास वाचकांच्या मनावर सकारात्मक प्रभाव करून जाणार ,असे वाटते. लेखकास हार्दिक मंगलकामना.

    -अरुण हरिभाऊ विघ्ने
    मु.पो. रोहणा
    जि.वर्धा
    मो.८३२९०८८६४५
    ◾कादंबरीचे नाव: ते पन्नास दिवस
    ◾लेखकाचे नाव : पवन भगत, बल्लारपूर
    ◾प्रकाशक : मैत्री पब्लीकेशन,हडपसर,पुणे
    ◾मुखपृष्ठ व रेखाटने: मिलींद कडणे
    ◾प्रकाशक मो.नं. : ९२८४६१७०८१
    ◾पृष्ठसंख्या : १७०
    ◾स्वागतमूल्य : ३००/-₹
    ——————–

    आम्ही तुमच्यासमोर बातम्या, कथा, कविता, वाचनीय लेख अश्या खूप साऱ्या लेखामार्फत भेटत असतो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते, तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याचबरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद…!

    – बंडूकुमार धवणे
    संपादक गौरव प्रकाशन
    ——————–

gauravprakashan1@gmail.com

Maharashtra News, Braking News, Marathi News, Most Popular Marathi News, Latest Marathi News,Today News,Marathi Article, Marathi Poem, Marathi Story,

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *