राहूल गांधी यांची पदयात्रा जोरात आहे. प्रचंड प्रतिसाद मिळतो आहे. राहूल गांधी लोकात मिसळत आहेत. गांधी घराण्याचे ग्लॅमर त्यांच्याकडे जन्मजात होते, पण या पदयात्रेमुळे ते लोकनेते होण्याच्या दिशेने निघाले आहेत. या दृष्टीने त्यांचा पुढील प्रवास महत्वाचा असेल.
मोदी यांच्या राष्ट्रीय राजकारणातील उदयानंतर देश एका मोठ्या संकटात सापडला आहे. आज हुकुमशाहीचा धोका समोर स्पष्टपणे दिसतो आहे. पण सामाजिक, आर्थिक, धार्मिक, राजकीय अनर्थाची सुरुवात २०१३ पासूनच झालेली आहे. गोवा अधिवेशनात मोदी यांना भाजपाने प्रचार प्रमूख नियुक्त केले होते. मोदी यांच्या दबावापुढे संघ झुकला आणि संजय जोशी यांना पक्षाच्या केंद्रीय कार्यकारिणीतून काढले होते. आणि त्याचक्षणापासून पक्षात मोदी यांची मनमानी सुरू झाली.
२०१४ ला भाजपा सत्तेत आली. मोदी पंतप्रधान झाले. आणि हिंदुत्ववादाच्या नावाने सनातनी हिंदू किंवा गोडसेवादी हिंदूनी देशात थैमान घालायला सुरुवात केली. मॉब लिंचीग सुरू झाले. गोमांसाच्या बहाण्याने विशिष्ट समुदायाच्या घरात घुसून हत्या करण्यात आल्या. तालिबान्यांचा भारतीय अवतार देशात बघायला मिळाला.
संघ ही भाजपची मातृसंस्था आहे. मोदी हे संघाचे प्रॉडक्ट आहेत. अडवाणी यांच्या रथयात्रेने देशभर जी विषाची पेरणी केली होती, त्याला आलेलं विनाशी फळ म्हणजे मोदी! गुजरात दंग्यानंतर मोदींना मुख्यमंत्री पदावरून हटवू नये, यासाठी खुद्द अडवाणी दबाव टाकत होते. त्याच अडवाणींचा पाणउतारा मोदींनी प्रधान मंत्री होताच केल्याचे देशाने पाहिले आहे.
मोदी यांची एकूणच राजकीय, आर्थिक नीती अफलातून आहे. कसलीही पूर्वतयारी न करता जाहीर केलेली नोटबंदी, शेखचील्लीप्रमाणे अचानक जाहीर केलेले लॉक डाऊन, जीएसटीचा गोंधळ, करोना काळातील अंदाधुंद निर्णय, गंगेतून वाहणारी असंख्य लावारिस प्रेतं, सैतानी कृषी कायदे, शेतकरी आंदोलकांच्या अंगावर मंत्री पुत्राने राजरोस गाडी घालणे, बुलडोझर, विरोधकांच्या बाबतीत इडीच्या कारवाया, ब्लॅक मेल करून आमदार फोडणे, सरकारं पाडणे इत्यादी प्रकार अत्यंत संतापजनक आहेत. आणि धडधडीत खोटं बोलणे, हा तर त्यांचा आवडीचा विषय आहे. सत्तेचा उन्माद ठासून भरला आहे. ’या देशात आता आम्ही म्हणू तेच होईल, बाकी सारे गुलाम आहेत. देश हा दोन चार लोकांची खाजगी प्रॉपर्टी आहे’ अशा आविर्भावात सत्ताधारी वागत आहेत. मुख्य मिडिया पूर्णतः खरेदी केला गेला, न्यायव्यवस्था बटिक झाली. मोदी, शहा, योगी आणि संघ मोकाट सुटले. मागचा पुढचा कसलाही विचार केला नाहीत.
एकंदरीत देश एका भयंकर संकटात सापडलेला आहे. २०२४ची निवडणूक देशाचे, लोकशाहीचे भवितव्य ठरवणारी निवडणूक असेल. यावेळी जर मोदी - शहा यांच्या तावडीतून देश सोडवता आला, तरच लोकशाही जिवंत राहील. देश बर्बाद झालाच आहे, तो पुन्हा सावरता येईल, पण त्यासाठी प्रचंड मेहनत करावी लागेल. सर्वच क्षेत्रात नवी आणि विवेकपूर्ण मांडणी करावी लागेल. समाजात परस्पर विश्वासाचे वातावरण तयार करावे लागेल. न्यायव्यवस्था स्वच्छ करावी लागेल. धर्माचा उन्माद आणि अन्य धर्मीयांचा द्वेष अगदी शिगेला पोचला आहे, त्यातून मार्ग कसा काढता येईल, यावर चिंतन झाले पाहिजे. त्यासाठी नव्या, प्रामाणिक आणि दूरदर्शी नेतृत्वाची देशाला गरज आहे. त्या दृष्टीने आपली काय तयारी आहे, यावर आपले भवितव्य अवलंबून आहे. आणि दुर्दैवाची गोष्ट अशी की, कोणत्याही प्रस्थापित पक्षाकडे याबाबतीत ठोस असा कुठलाही कार्यक्रम दिसत नाही. केवळ एक दुसऱ्यावर आरोप केल्याने देशाचे प्रश्न सुटणार नाहीत. उलट ते आणखी गंभीर होतील. निदान आतातरी आपण भानावर आले पाहिजे.
आम्ही ’लोकजागर’ तर्फे बारा कलमी कार्यक्रम तयार केला आहे. त्यावर विचारवंतांनी, राजकीय नेत्यांनी, युवकांनी, समाजसेवी संस्थांनी, उद्योगपतींनी, महिलांनी, शेतकरी आंदोलकांनी गांभीर्याने विचार करावा, अशी अपेक्षा आहे. (’समतावादी हिंदू धर्म आणि नवा भारत’ या पुस्तकात ’लोकजागर’ ची भूमिका सविस्तर मांडली आहे. तेच आमचे व्हिजन डाक्युमेंट आहे, असे म्हणता येईल.)
धर्मांधता ही कमी अधिक प्रमाणात जगाचीच समस्या झालेली आहे. मूळ धर्माची शिकवण कितीही उदात्त असो, त्याला विकृत करणारे काही लोक प्रत्येक धर्मात असतात. जसे तिकडे तालिबानी आहेत, तसेच म्यानमार, श्रीलंका या देशात बुद्ध धर्मियांची सत्ता आहे. त्यांच्या अतिरेकाच्या कहाण्या काही नविन नाहीत. पण त्यात धर्माचा दोष नाही. त्यासाठी एखाद्या धर्माला, जाती समूहाला सरसकट दोषी ठरविणे योग्य नाही. भारतात देखिल हिंदुत्वाच्या नावावर काही धर्मांध शक्तींनी धुमाकूळ घातला आहे.
भारतामध्ये हिंदू धर्मियांची संख्या ७८ टक्के म्हणजेच सुमारे ११० कोटींच्या घरात आहे. त्यात काही मोजके लोक तालिबानी प्रवृत्तीचे आहेत. त्यांच्या पापासाठी सरळ सरळ हिंदू धर्माला टार्गेट करणे, ही तथाकथित बुद्धिजीवी किंवा अर्धवट पुरोगामी लोकांची सर्वात मोठी चूक आहे. काही मोजके आंबेडकरवादी आणि काही बामसेफी लोक यात आघाडीवर आहेत, असे दुर्दैवाने सांगावे लागते. त्यांची भूमिका स्पष्टपणे संघाच्या फायद्याची आहे, हे त्यांना कळत नाही.
प्रत्येक धर्मात गट तट आहेत. वैज्ञानिक मांडणी असणारा बुध्द धर्मही त्याला अपवाद नाही. अशावेळी बुद्ध धर्मियांनी हिंदू धर्मीय लोकांना दोष देत बसण्यापेक्षा आपाल्या धर्मात घुसलेल्या विकृतीचा विरोध करणे, जास्त योग्य आहे. बुद्ध धर्मात १. महायान, २. हीनयान, ३. नवयान असे पंथ, प्रवाह आहेत. तसेच हिंदू धर्मात देखिल अनेक पंथ आहेत आहेत. मुठभर वैदिक/मनुवादी/सनातनी हिंदू सोडले तर बाकी सर्व समतावादी प्रवाह आहेत. गम्मत म्हणजे योगी आदित्यनाथ ज्या नाथ संप्रदायाचे आहेत, तो संप्रदाय देखिल मुळात मनुवादी/सनातनी हिंदू धर्माचा कट्टर विरोध करण्यासाठीच स्थापन झालेला आहे. संत ज्ञानेश्वर महाराज आणि त्यांची भावंडे ही नाथ संप्रदायाची आहे. उच्चवर्णीय असूनही इथल्या मनुवादी उच्चवर्णीयांनी त्यांचा कसा छळ केला, हे आपण लक्षात घेतले पाहिजे. मुळात ती लढाई जातीची नसून प्रस्थापित विरूद्ध विस्थापित, संस्कृती विरुद्ध विकृती अशी आहे. जसा समतावादी संत तुकाराम महाराजांचा खून इथल्या वर्णवादी सनातन्यांनी केला, तसाच तशीच संत ज्ञानेश्वरांच्या आईवडिलांना घ्यायला लावलेली जलसमाधी हा देखील खुलेआम खूनच होता. चक्रधर स्वामींच्या बाबतीत देखील हेच घडले. म्हणूनच हिंदू धर्माचे दोन मुख्य प्रवाह आम्ही मानतो.
तुमचा धर्म कोणताही असू द्या, कितीही महान असू द्या, मात्र तो तुमच्या घरापर्यंतच मर्यादित असू द्या. तुमच्या मनात असू द्या. त्याचे बाहेर प्रदर्शन नको, अशी ठाम भूमिका आपल्याला राजकीय आणि सामाजिक पातळीवरून घ्यावी लागेल. धर्माचा तिरस्कार किंवा द्वेष न करता, त्याचा सकारात्मक उपयोग करून घ्यावा लागेल. समाजाला व्यापकपणे बांधून ठेवणारा धर्मासारखा मजबूत धागा आजतरी दुसरा कोणताही नाही!
मोदी यांच्या एकूणच अनागोंदी कारभारामुळे देशाची अर्थव्यवस्था बर्बाद झालेली आहे. राष्ट्रीय संपत्ती कवडीच्या भावाने विकली गेलेली आहे. देश अक्षरशः कंगाल करून सोडला आहे. अशावेळी आपल्याला शुन्यातून सुरुवात करावी लागेल. नवी उभारणी करावी लागेल. त्यासाठी शेवटच्या माणसाला विश्वासात घ्यावे लागेल. त्याच्या सहभागाशिवाय पुढील उभारणी कठीण आहे. सार्वत्रिक सहभाग असलेली नवी अर्थव्यवस्था आणावी लागेल.
आमदारांची खरेदी विक्री हा मोदी-शहा यांच्या राजकारणाचा मुख्य फंडा आहे. त्यासाठी सरकारी संस्थांचा दुरुपयोग आणि ब्लॅक मेलिंग हा सरळ मार्ग त्यांनी स्विकारला आहे. सद्याचे लोकप्रतिनिधी मोठ्या प्रमाणात भ्रष्ट असल्यामुळे ते साहजिकच शरण जातात. त्यांच्या पायावर लोटांगण घालतात. हे नको असेल, तर आपल्याला ’नंबर दोनवाल्यांची/ धनदांडग्यांची लोकशाही’ ’गरिबांच्या लोकशाही’मध्ये परावर्तित करावी लागेल. त्यासाठी जनतेमधून प्रमाणिक उमेदवार द्यावा लागेल. प्रचारासाठी जनतेचा सहभाग आणि सहयोग असावा लागेल.
भारत हा खेड्यांचा देश आहे. ६० टक्के जनता खेड्यात राहते. खेड्यात शेतीशिवाय दुसरा व्यवसाय नाही. उद्योग नाहीत. त्यामुळे शेतीवर अतिरिक्त भार पडतो. मोठ्या प्रमाणात स्थलांतर होते. शहरं फुगत आहेत. खेडी ओस पडत आहेत. यावर उपाय म्हणजे शेतीवर आधारित उद्योग खेड्यापाड्यातून उभे करावे लागतील. छोटे छोटे गृहोद्योग ग्रामीण भागात काढावे लागतील. शहरात उद्योगांची गर्दी कमी करावी लागेल. जागेचे भाडे, मजुरी इत्यादी बाबतीतला खर्च ग्रामीण उद्योगामुळे मोठया प्रमाणात कमी होईल. उत्पादन खर्च कमी झाल्यामुळे बाहेरच्या स्पर्धेत आपल्याला उतरता येइल. त्यामुळे ग्रामीण अर्थव्यवस्था मजबूत होईल. ग्रामीण भागातील शाळा, इतर व्यवसाय, शेती यासाठी पुरक वातावरण तयार होईल. रस्तेही चांगले होतील, विजेच्या सोयी देखील होतील. एकूणच ग्रामीण विकासाला चालना मिळेल.
शेती, निसर्ग आपल्याला सर्वकाही देतो. अन्न, निवाऱ्यासाठी लाकूड, फळं, फुलं, सावली, प्राणवायू, पाऊस अशा जीवनोपयोगी गोष्टी त्यापासून मिळतात. म्हणूनच शेतकरी हा शेती किंवा निसर्गपूजक आहे. शेतीच्या विविध टप्प्यावर पूजा केली जाते. पेरणी करण्याआधी पूजा, पीक काढण्याआधी पूजा, घरी आणताना पूजा वगैरे. तोच त्याचा धर्म आहे. तीच त्याची संस्कृती आहे. जगातील कोणताही धर्म किंवा देव आपल्याला ह्या साऱ्या गोष्टी देऊ शकत नाही.
सध्या उद्योग हा लूट आणि प्रचंड नफेखोरीच्या विकृतीने ग्रासला आहे. गरीब आणि श्रीमंत यांच्यातील दरी दिवसेंदिवस वाढत आहे. हे बदलावे लागेल. उद्योग असो की सरकार समाजहित हीच त्याची मुख्य प्रेरणा असली पाहिजे. उद्योगातून येणाऱ्या नफ्यामध्ये कच्चा माल उत्पादकासह त्यात सहभागी घटकांचा देखिल उचित वाटा असला पाहिजे.
अन्न, वस्त्र, निवारा ह्या कालच्या मुलभूत गरजा होत्या. आज त्यासोबतच शिक्षण आणि आरोग्य ह्या देखिल मुलभूत गरजा आहेत. त्यावर होणारा खर्च हा खर्च न मानता ती देशहितासाठी केलेली गुंतवणूक आहे, हे लक्षात घेतले पाहिजे. त्यासाठी हवी तेवढी तरतूद सरकारने केली पाहिजे. शिक्षण आणि आरोग्य या बाबतीत संपन्न असल्याशिवाय कोणताही देश पुढे जाऊच शकत नाही.
एक गाव, एक परिवार ही भावना जनतेमध्ये जागी होणे गरजेचे आहे. एक दुसऱ्याशी असलेली भांडणे, विवाद, मतभेद मिटवावे लागतील. हेवेदावे, द्वेष संपवावे लागतील. त्याशिवाय गावाच्या विकासाला गती येणार नाही. अनावश्यक स्पर्धा आणि परस्पर अविश्वास यामुळे देशाचं वाटोळं झालं आहे. हे काम संतांनी अविरत सुरू ठेवलं होतं. त्यातूनच खरे संस्कार आपल्या मनावर, समाजावर झालेले अपल्याला दिसतात.
पक्ष कोणताही असो, अलिकडच्या राजकीय नेत्यांची दृष्टी तेवढी प्रगल्भ दिसत नाही. कोणत्याही पक्षाकडे दूरदर्शी कार्यक्रम नाही. घराणेशाहीमुळे राजकारणात स्वतंत्र विचाराच्या, नव्या दमाच्या तरुणांना संधी नाही. सहभाग नाही. तो वाढवावा लागेल. किमान ३० टक्के जागा तरुणांच्या हातात असायला हव्यात. त्याशिवाय देशाची प्रगती होणार नाही.
विद्यमान संसदेमधे ४१ टक्के खासदारावर आतंकवाद, खून, अपहरण, बलात्कार, दरोडा यासारखे आणि इतरही गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल आहेत. राजकारणाचे अपरधिकरण झपाट्याने होत आहे. ह्या केसेस २०/२५ वर्षे चालत असतात. त्यामुळे गुन्हेगार आणखीच बेफिकीर होतात. हे थांबवायचे असेल तर न्याय पारदर्शी असावा आणि तो त्वरित मिळाला पाहिजे. त्यासाठी जे लोक निवडणूकीत उमेदवारी अर्ज भरतील, त्यांच्यावरील केसेस अतिशीघ्र न्यायालयात चालविल्या गेल्या पाहिजे. पहिले सहा महिने खालचे कोर्ट, सहा महिने हायकोर्ट आणि सहा महिने सुप्रीम कोर्ट असा निकाल लावण्याची तरतूद केली गेेली पाहिजे. असे होणार असेल तर कुठलाही गुन्हेगार निवडणुकीचा फॉर्म भरण्याची हिम्मत करणार नाही.
महिलांची संख्या जवळपास पन्नास टक्के आहे. म्हणजेच मतदार देखिल तेवढेच. तरीही महिलांना सत्तेत उचित प्रतिनिधित्व मिळत नाही. इतर क्षेत्रातही त्यांना सन्मान मिळत नाही. देशाची अर्धी लोकसंख्या जर कमजोर असेल, तर देशाच्या प्रगतीला फटका बसणे अपरिहार्य आहे. म्हणून महीलांना सक्षम करणे गरजेचे आहे. प्रबोधन करणे गरजेचे आहे. त्यांच्या विचारात अमुलाग्र परिवर्तन घडवून आणावे लागेल. तशा योजना आखाव्या लागतील. महिला सक्षम असतिल, तर समाजही सक्षम झाल्याशिवाय राहणार नाही.
असंख्य जाती, असंख्य भाषा, अनेक धर्म, अनेक प्रांत असलेला हा खंडप्राय देश आहे. विभिन्न संस्कृती आहे. त्या सर्वांचा आदर करणारा, सर्वसमावेशक समाज आपल्याला निर्माण करावा लागेल. एकदा समाज सर्वसमावेशक झाला की त्याचे प्रतिबिंब आपोआपच राजकारणात देखील पडल्याशिवाय राहणार नाही.
अर्थात् लढाई मोठी आहे. कण एवढे सोपे देखिल नाही. पण ते हाती घेतल्याशिवाय गत्यंतर देखिल नाही. आपल्याला खरंच हा देश वाचवायचा आहे का ? लोकशाही वाचायची आहे का? आपले संविधान वाचवायचे आहे का ? तुमचे उत्तर ’होय’ असेल.. तर फक्त एवढं करा..
आम्ही तुमच्यासमोर बातम्या, कथा, कविता, वाचनीय लेख अश्या खूप साऱ्या लेखामार्फत भेटत असतो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते, तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याचबरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद...!
Copyright (c) 2022 Gaurav Prakashan All Right Reseved
0 टिप्पण्या