अमरावती (प्रतिनिधी) : राज्यघटनेतील मुलभूत तत्त्वांचे संरक्षण करत असतानाच सामाजिक न्याय साकारण्यासाठी शासन, प्रशासन, माध्यमे, संस्था, नागरिक या सर्व घटकांनी योगदान द्यावे, असे आवाहन विविध वक्त्यांनी पत्रकार कार्यशाळेत आज केले.
सामाजिक न्याय विभागातर्फे संविधान दिन ते महापरिनिर्वाण दिनादरम्यान ‘समता पर्व’ आयोजित करण्यात आले असून त्याअंतर्गत पत्रकार बांधवांसाठी ‘सामाजिक न्याय विभागाची नवी दिशा’ या विषयावरील कार्यशाळा डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवनात झाली. समाजकल्याण उपायुक्त सुनील वारे अध्यक्षस्थानी होते. अमरावती जिल्हा मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष अनिल अग्रवाल, श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष गोपाल हरणे, प्र. माहिती उपसंचालक हर्षवर्धन पवार, जात पडताळणी समितीच्या उपायुक्त जया राऊत, सहायक आयुक्त माया केदार, जिल्हा समाजकल्याण अधिकारी राजेंद्र जाधवर, डॉ. राजकुमार दासरवाड आदी उपस्थित होते.
सामाजिक न्याय विभागातर्फे वंचित घटकातील 37 लाख नागरिकांना दरवर्षी शिष्यवृत्ती, वसतीगृहे, विविध लाभाच्या योजनांचा लाभ देण्यात येतो. योजनांच्या अंमलबजावणीसाठी महाडीबीटीसारख्या प्रणाली विकसित करण्यात आल्या असून अनेक त्रुटी व तक्रारी दूर झाल्या आहेत. योजना, उपक्रमांची अधिक प्रभावी अंमलबजावणीसाठी माध्यमांनी सहकार्य करावे, असे आवाहन श्री. वारे यांनी केले.
श्री. अग्रवाल म्हणाले की, सामाजिक न्याय संपूर्णत: अस्तित्त्वात येण्यासाठी अंतर्मुख होऊन मंथन होणे आवश्यक आहे. सामाजिक न्याय व महिला सबलीकरणाच्या संकल्पनेनुसार सर्वोच्च न्यायालयाने मुलीचा वडीलांच्या संपत्तीत अधिकार याबरोबरच मिळकत कराच्या 10 टक्के रकमेतून मजूरांसाठी कल्याणकारी योजना राबविण्याबाबत निर्णय दिले आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थेने हा निधी मजूरांसाठी खर्च केला पाहिजे. अशा विविध अंगांनी विचार व कृती करुन सामाजिक न्यायाची संकल्पना अस्तित्त्वात आणण्यासाठी सर्वांचे योगदान आवश्यक आहे. सोशल मिडियाच्या आजच्या युगात नवनवी माध्यमे उदयास येत असताना मुद्रित माध्यमांनी विश्वासार्हता टिकवून ठेवली आहे, असेही ते म्हणाले.
श्री. हरणे म्हणाले की, सामाजिक न्याय प्रत्येक स्तरात निर्माण होऊन तळागाळातील घटकांचा विकास साधण्यासाठी सामाजिक न्याय विभागाची भूमिका महत्त्वपूर्ण आहे. न्याय मिळण्याची भूमिका सर्वांची असली पाहिजे. पत्रकार बांधवांनी आपल्या लेखणीचा वापर सामुहिक हितासाठी करावा, असे आवाहन त्यांनी केले.
लोकशिक्षण घडविण्यात माध्यमांची भूमिका महत्त्वपूर्ण असून त्यासाठी योगदान देण्याचे आवाहन श्री. पवार यांनी केले. श्री. दासरवाड यांनी नवमाध्यमांबाबत माहिती दिली. श्रीमती राऊत यांनी जात पडताळणी प्रक्रियेची माहिती दिली. श्री. जाधवर यांनी विभागाच्या योजनांची माहिती दिली.
श्रीमती केदार यांनी प्रास्ताविकातून विविध योजना, उपक्रमांची माहिती दिली. विभागाच्या जनसंपर्क अधिकारी मंगला देशमुख यांनी सुत्रसंचालन केले. राजेंद्र बिलव यांनी आभार मानले. कार्यशाळेला पत्रकार बांधव, पत्रकारिता अभ्यासक्रमाचे विद्यार्थी व अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? आम्हास आपल्या परिसरातील बातम्या, लेख अवश्य पाठवा आणि प्रतिनिधी बना ! ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Gaurav Prakashan फेसबुकपेज !
आम्ही तुमच्यासमोर बातम्या, कथा, कविता, वाचनीय लेख अश्या खूप साऱ्या लेखामार्फत भेटत असतो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते, तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याचबरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद...!
Copyright (c) 2022 Gaurav Prakashan All Right Reseved
0 टिप्पण्या